आज पन्नाशीतल्या पिढीला अरबी सुरस कथा आठवत असतील. कोणा एका सुलतानाला रोज एक नवी गोष्ट ऐकायचा छंद होता आणि त्याला तशी रोज नवी कहाणी सांगणारी पत्नी लागायची. ज्या दिवशी तिला नवी गोष्ट सांगता येत नसे, त्या दिवशी तिचा शिरच्छेद करून सुलतान नवा विवाह करीत असे. अशा सुलतानाचा प्रधान त्यामुळे रडकुंडीला आलेला होता. कारण त्यालाच सुलतानासाठी नवी बायको शोधावी लागत होती. अशा प्रधानाच्या मुलीनेच सुलतानाशी विवाह करण्याची मागणी केली तेव्हा तो प्रधान उर्फ़ वजीर हवालदिल होऊन गेला. पण त्या मुलीने रोज सुलतानाला नवनव्या गोष्टी सांगायला सुरूवात केली आणि तीच त्याची पट्टराणी होऊन गेली. तिने सांगितलेल्या कथा अरबी सुरस कथा म्हणून जगप्रसिद्ध आहेत. त्यात काहीही घडू शकते आणि कितीतरी मनोरंजक चमत्कारीक गोष्टी आलेल्या आहेत. अलिकडे नव्या पिढीला अरबी सुरसकथा म्हणजे खनिज तेल वा पेट्रोल इतकेच माहिती असावे. खेरीज अरब इथे भारतात कोवळ्या मुलींचे लैंगिक शोषण करायला येतात किंवा तरुणींना फ़सवून अरबी देशात त्याच कामासाठी पाठवले जाते, या गोष्टी ऐकिवात आहेत. कामधंद्यासाठी अरबी देशात गेलेल्या अन्य देशातील लोकांचे हाल किंवा तिथे जिहादच्या नावाने माजलेला हिंसाचार; ह्या अरबी कथा झालेल्या आहेत. पण अशा देशात सध्या जो हलकल्लोळ माजला आहे, त्याविषयी बहुतांश माध्यमे चिडीचुप आहेत. वास्तविक गेल्या शनिवार रविवारपासून तिथे अशा काही घटना घडत आहेत, की जुन्या काळातील अरबी सुरस कथा आठवाव्यात. कारण सौदी अरेबिया हा अरबी देशांचे नेतृत्व करणारा मोठा तेलसंपन्न व श्रीमंत देश आहे आणि तिथे आता राजघराण्यातच धुमश्चक्री उडालेली आहे. पण त्याविषयी जगभरच्या माध्यमांनी मौन कशाला धारण करावे? ही सुद्धा एक सुरसकथाच नाही काय?
शनिवारी रात्री व रविवारी सकाळी सौदी अरेबियातील अनेक राजपुत्र व सरदार उद्योगपती व्यापार्यांची सरसकट धरपकड झाली आहे. त्या कारवाईत एक ज्येष्ठ राजपुत्रही मारला गेला आहे. तर आणखी एका राजपुत्राचे विमान कोसळून निधन झाले आहे. इतकी मोठी घटना असूनही निदान पहिले दोन दिवस कुठल्याही मोठ्या वर्तमानपत्राने वा माध्यमाने त्याचा फ़ारसा उहापोह केलेला नाही. तिकडे पॅलेस्टाईन वा इस्त्रायल यांच्यात जरा काही खुट्ट वाजले, तरी त्यावर गहजब करणार्या पाश्चात्य वाहिन्या, सौदी अरेबियातील वादळाविषयी थंड कशाला? गंमत म्हणजे तो त्याच एका देशापुरता विषयही नाही. त्याच्या लगत असलेला वादग्रस्त लेबानॉन देशातही उलथापालथ झालेली आहे. तिथल्या पंतप्रधानानेही तडकाफ़डकी राजिनामा दिलेला असून, त्या अरबी देशाने सौदी विरोधात युद्ध पुकारल्याचाही आरोप सौदी राज्यकर्त्यांनी केलेला आहे. पण माध्यमात याविषयी फ़ारसा तपशील आढळून येत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही या घडामोडीचे स्वागत केलेले असून, सौदी राजांना त्यात पाठींबा जाहिर केला आहे. अमेरिकेचा या घराण्याच्या अंतर्गत भाऊबंदकीशी काय संबंध? असे कितीतरी प्रश्न आहेत. पण जागतिक राजकारणाचा गंभीरपणे उहापोह करणार्या कुणालाही त्यावर सविस्तर भाष्य करण्याची गरज वाटलेली नाही. कारण यात फ़सलेल्या एका राजपुत्राच्या पैशावर जगातली अनेक मान्यवर माध्यमे पोसलेली आहेत. तलाल असे या राजपुत्राचे नाव असून, जगातल्या अनेक मातब्बर माध्यम कंपन्यात त्याची लक्षणिय गुंतवणूक आहे. पण तो सध्याचे राजे सुलतान सलमान यांच्या काळ्या यादीत फ़ेकला गेला आहे. त्याच्याच चुलत भावाने त्याला तुरूंगात टाकलेले असून, त्याच्यासह अनेक सौदी राजपुत्र व गुंतवणूकदारांवर टाच आलेली आहे. आपल्या मालकांचे भवितव्यच गोत्यात असल्याने बहुतांश पत्रकार संपादकांची धाबी दणाणली आहेत ना?
सौदी अरेबिया हा तसा कृत्रिम देश आहे, अनेक शतके ज्याला जग अरबस्तान म्हणून ओळखते, त्यातला मोठा भूभाग आज सौदी अरेबिया म्हणून ओळखला जातो. त्याच्या आजुबाजूला लहानमोठे तुकडे पाडून त्यांना इराक, सिरीया वा लेबेनॉन अशी नावे ब्रिटीश फ़्रेंच या महासत्तांनी दिलेली आहेत. दुसर्या महायुद्धापुर्वी ब्रिटीश फ़्रेंच हे जगातल्या महासत्ता होत्या आणि अर्ध्याहून अधिक जगावर त्यांचा कब्जा होता. त्याच काळात त्यांनी आपल्या सोयीनुसार व तड्जोडीनुसार अरबस्तानचे विभाजन केले. त्यातून सौदी अरेबिया जन्माला आला. तिथे प्रेषित महंमदाचे दोन वारस अस्तित्वात होते आणि त्यांच्या मागे तमाम अरबी लोकसंख्या एकजुट होऊ नये, म्हणून या दोन महासत्तांनी त्याचे लहानमोठे तुकडे पाडून, त्यांना वेगवेगळे देश म्हणून अस्तित्वात आणले. त्या कालखंडात मक्का व मदिना अशी दोन इस्लामी तीर्थस्थळे सौदी कुटुंब वा टोळीच्या कब्जात होती. त्यांनाच मोठा प्रदेशाचे स्वामित्व देऊन ब्रिटीश फ़्रेंचांनी अरबांची विभागणी करून टाकली. तेव्हापासून सौदी अरेबिया हा वेगळा देश झाला आणि सौदी घराणे राजघराणे म्हणून मानले जाऊ लागले. त्यापुर्वी तिथे खनिज तेलाचा शोध लागलेला होता आणि मोठ्या सौदी प्रदेशात पाश्चात्यांनी तेलखाणी खोदलेल्या होत्या. त्यांची निर्यातही सुरू केलेली होती. त्याची रॉयल्टी राजघराण्याला मिळत होती. अशा राजघराण्यात राजाने आपल्या वारसाला नेमण्याची पद्धत होती आणि ती आजवर सुरू राहिलेली आहे. त्यात दुसर्या पिढीचेच राजपुत्र होत राहिले आणि सध्याचे राजे हे दुसर्या पिढीतले आहेत. या घराण्याचे १५ हजार वारस असून त्यातील निकटवर्तियांच्या सहमतीने नवा राजा वा भावी वारस निवडला जात असतो. विद्यमान राजे सलमान यांच्यापर्यंत हा शिरस्ता चालू राहिला आणि तेच सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पुढला राजा म्हणून आपला पुतण्या नयीफ़ याची निवडही केलेली होती. पण तिथेच सगळा घोळ झालेला आहे.
नयीफ़ याची निवड घराण्यातल्या ज्येष्ठांनी केलेली असली तरी सलमान यांनी अलिकडे काही महिन्यांपुर्वी त्यात बदल करण्याचा पवित्रा घेतला. आजवरची निवडपद्धत मोडीत काढणारा फ़तवा जारी करून, त्यांनी वारस निकालात काढला. नवा वारस राजा आपल्याच मर्जीनुसार बदलू शकतो असा फ़तवा लागू झाला असल्याने, सलमान यांनी आपला लाडका पुत्र महंमद बिन सलमान याची नेमणूक केली. त्यानंतर मागल्या काही महिन्यात सौदीमध्ये उलथापालथी सुरू झालेल्या आहेत. या देशात सर्व महत्वाची पदे व अधिकाराच्या जागा राजघराण्यातच वाटून दिल्या जात असतात. सहाजिकच सत्तेचे अधिकारही विविध कुटुंबियात वाटलेले आहेत. त्यातून सत्ता समतोल राखलेला आहे. पण नव्या भावी राजपुत्राला तो अडथळा वाटू लागला होता. त्याने पित्याच्या नावाने अनेक धाडसी निर्णय घेण्याचा सपाटा लावला होता. इराणशी चालू असलेले दिर्घकालीन वैर अधिक प्रभावी करणे. मध्य आशियातील राजकारणात थोरला भाऊ म्हणून सौदीला स्थान प्राप्त करून देणे, अशी या राजपुत्राची महत्वाकांक्षा आहे. त्यातून हे वादळ घुमू लागलेले आहे. त्याने आधी अन्य अरबी वा आखाती देशांची एक आघाडी उभी केली व इराणशी थेट संघर्ष पुकारला. त्यासाठी शेजारच्या येमेन देशात सौदी सैन्य धाडून इराणशी अप्रत्यक्ष लढाई आरंभली. मात्र यात त्याला तितके यश मिळाले नाही आणि इराणनेही खुलेआम सौदीचे हे आव्हान स्विकारले आहे. त्यामुळे एकूणच मध्य आशियाचे राजकारण धुमसू लागलेले आहे. इराक सिरीयातील इसिसच्या उचापतींनाही याच राजपुत्राचा आशीर्वाद होता आणि शेजारच्या लेबानॉन देशातही त्याने आपले वर्चस्व उभे करण्याचा प्रयास चालविला होता. आजवर कितीही संपत्ती हाती असून सौदीने अशी राजकीय मुलूखगिरी केलेली नाही. पण राजपुत्राने ते पाऊल उचलले आणि एकूणच चित्र वेगाने बदलत चालले आहे. कदाचित नजिकच्या काळात सौदी व मध्य आशियात रणधुमाळी माजण्याची शक्यता आहे.
सौदी राजघराण्यात इतकी बेदिली सहसा कधी बघायला मिळालेली नाही. पण महंमद बिन या राजपुत्राने सत्तेची सर्व सुत्रे आपल्या हाती येण्यासाठी उचललेली पावले त्या बेदिलीचे कारण झालेली आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली पित्याने फ़तवा काढून एक भ्रष्टाचार निर्मूलन आयोग नेमला आणि त्याला तपास व धरपकडीचेही अधिकार दिले. त्यानंतर झालेल्या कारवाईत ११ राजपुत्रांना अटक व्हावी, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यात अटकेला प्रतिकार करणार एक राजपुत्र मारला गेला आहे आणि त्याच दरम्यान दुसरा राजपुत्र येमेनच्या सीमेनजिक हेलिकॉप्टर कोसळून ठार झाल्याचे सांगण्यात येते. कित्येक व्यापारी उद्योगपती अफ़रातफ़रीच्या आरोपाखाली अटकेत गेले आहेत. मात्र अशा कारवाईचे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनी स्वागत केलेले आहे. याचा अर्थच त्यांच्याच आशीर्वादाने ही कारवाई सुरू झाली असे मानता येईल. यापैकी बंडखोर मानल्या जाणार्या एका राजपुत्राने ट्रंप यांच्याशी उभे वैर होते, हा भाग विसरता कामा नये. पण हा मामला केवळ सौदी राज्यापुरता किवा तेवढ्या घराण्यापुरताही राहू शकत नाही. कारण ज्याच्या पुढाकाराने ह्या गोष्टी घडत आहेत, त्याच भावी राजाने आतापासून शेजारी अनेक देशांना शत्रू करून ठेवलेले आहेच. त्यात कतार ह्या अरबी देशाचाही समावेश होतो. हा देश सौदीच्या आखाती आघाडीचा सदस्य नसून मध्यंतरी सौदीने त्याची नाकेबंदी करण्याचे पाऊलही उचलले होते. पण त्यातून मुस्लिम देशांची एकजुट निकालात निघालेली आहे तशीच सुन्नी देशांची एकजुटही संपुष्टात आली आहे. कारण कतारच्या राजांनी थेट इराणशी दोस्ती केली व त्यांना तुर्कस्थानसारख्या सुन्नी देशानेही पाठींबा दिलेला आहे. थोडक्यात मुद्दा इतकाच, की मागल्या सात आठ दशकात इस्त्रायल विरोधात झालेली मुस्लिम देशांची एकजुट निकालात निघालेली आहे. म्हणूनच आजकाल कोणी पॅलेस्टाईनचा विषय बोलतही नाही.
मध्य आशिया वा मुस्लिम देशांचे नेतृत्व करण्याच्या सौदी राजपुत्राच्या महत्वाकांक्षेने मध्य आशियाच्या राजकारणाला आता ऐतिहासिक वळण मिळाले आहे. इस्त्रायल त्याचा पुरेपुर लाभ उठवणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण त्याहीपेक्षा नजिकच्या काळात सौदी अरेबियाचे रुपांतर सिरीया वा इराकसारखे अराजकात झाले, तर नवल मानण्याचे कारण नाही. जगातल्या इस्लामीकरण व जिहादी हिंसाचाराचा खरा आश्रयदाता सौदी अरेबियाच होता. पाकिस्तान वा अफ़गाणिस्तानच्या जिहादला पैसा व साहित्य पुरवण्याची छुपी जबाबदारी सौदीच पार पाडत होता. आता तो जिहाद विस्कळीत झाला आहे आणि त्या मुजाहिदांना कुठेही आश्रय मिळणे अवघड झालेले आहे. अशावेळी त्यांना वार्यावर सोडूनही सौदीला भागणार नाही. ते मरणाला कवटाळलेले योद्धे असतात. त्यांना कोणी तरी हत्यारे व पैसा पुरवला आणि धर्माचे आवाहन केले, तरी ते जीव द्यायला उत्सुक असतात. त्यांचा कणा इराक सिरीयात मोडला गेला आहे आणि त्यांना जवळ कुठेतरी आश्रय हवा आहे. तो द्यायला सौदी घराण्यातल्या कोणा नाराजांनी पुढाकार घेतला; तर सौदी राजपुत्राची महत्वाकांक्षा त्या देशाला यादवी युद्धाच्या खाईत लोटणारी ठरू शकते. आज या राजपुत्राने आपले चुलत वा सख्खे भाऊ उचलून तुरूंगात टाकले आहेत. पण त्यांच्याविषयी सहानुभूती असणारे वा आपल्याच भविष्याविषयी साशंक असलेले डझनावारी भाऊ या राजपुत्राला अजून आहेत. त्यांनी तुरूंगातील आपल्या भावबंदांना सोडवण्यासाठी अशा मोकाट परागंदा जिहादींना मदत करायचे ठरवले, तर सौदी अरेबियात नवी खिलाफ़त उभी रहायला वेळ लागणार नाही. कारण ज्या व्यापारी उद्योगपतींना चिरडण्यात आलेले आहे, त्यात ओसामा बिन लादेनच्या पित्याच्या कंपनीचाही समावेश आहे आणि त्याचे भाईबंद अशा जिहादींशी कधीही संपर्क साधू शकतील.
ही कारवाई सुरू करण्यापुर्वी सौदीची राजधानी रियाद वा विमानतळ जेद्दा येथून कुठल्याही खाजगी वा राजेशाही विमानांच्या उड्डाणाला प्रतिबंध घालण्यात आले होते. ज्या प्रकारे व वेगाने ही कारवाई उरकण्यात आली, त्यावर नजर टाकली तर त्याला दरबारी कारस्थान म्हणता येऊ शकेल. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे तर राजे सलमान यांच्या लाडक्या राजपुत्राच्या वाटेत आज वा उदया येऊ शकतील, अशा तमाम राजपुत्र वा वारसांचा परस्पर काटा या मोहिमेतून काढला गेला आहे. ते करताना आडव्या आलेल्या वा प्रतिकार करणार्या राजपुत्रालाही गोळ्या घालून मारले गेलेले आहे. हा अस्सल अरबी टोळीवादाचा दाखला आहे. ज्यात शक्तीमान व बलवान भाऊ सत्ता बळकावतो असा आजवरचा इतिहास राहिलेला आहे. आपल्या मोगल इतिहासात औरंगजेबाने आपल्याच सख्ख्या भावांन छळून छळून मारल्याच्या कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत. त्याचा काहीसा सौम्य प्रकार सध्या सौदी सिंहासनासाठी चालू झाला आहे. मात्र तो एका देश वा सत्तेपुरता मर्यादित रहाण्याची शक्यता कमीच आहे, कारण या राजपुत्राने आपल्या महत्वाकांक्षेसाठी अन्य शेजारी अरब देश व राज्यकर्त्यांना त्यात ओढलेले होते आणि आसपास शत्रूही खुप निर्माण करून ठेवलेले आहेत. म्हणूनच अरबी राजकारणाचे व घडामोडींचे अभ्यासक मानल्या जाणार्यांनाही सध्याच्या घटनांवर मतप्रदर्शन करणे अशक्य होऊन बसलेले आहे. त्यात कोण कोणाचा शत्रू वा मित्र, तेही समजणे अशक्य झालेले आहे. पण सौदी राजघराण्यात धुमसणारी ही सत्तास्पर्धा अवघ्या मध्य आशिया व मुस्लिम जगताचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वेगाने सरकते आहे, इतके आज नक्कीच म्हणता येईल. शिवाय हाच जगातला तेलसंपन्न प्रदेश असल्याने त्याचे बरेवाईट परिणाम अवघ्या जगाला अनुभवावेच लागतील यात शंका नाही. थोडक्यात पुन्हा एकदा अरबी सुरसकथा सुरू झालेली आहे. मात्र ती कथन करणारा अजून समोर यायचा आहे.
Jabardast!!Bhau great !!
ReplyDeleteफारच उत्तम लिहिलंय.. भाऊ!!!
ReplyDeleteVery nice n intresting
ReplyDeleteLai bhari !!!
ReplyDelete