Thursday, December 21, 2017

आणखी एक नैतिक विजय?

2G cartoon kureel के लिए इमेज परिणाम

आठवडाभरात पुन्हा एकदा कॉग्रेस आणि युपीएचा नैतिक विजय झाला आहे. गुरूवारी सात वर्षे लांबलेल्या २ जी स्पेक्ट्रम खटल्याचा निकाल लागला आणि त्यात १९ आरोपींना सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. पण तशी मुक्तता देतानाच प्रत्येकाने पाच लाखाचा जातमुचलका लिहून देण्याचाही आदेश दिला आहे. याचा अर्थ  हा निकाल अंतिम नसल्याची खुद्द न्यायमुर्तींनीच ग्वाही दिलेली आहे. म्हणूनच आपली सत्वपरिक्षा संपल्याच्या थाटात कॉग्रेसने विजयोत्सव सुरू करणे कितपत योग्य आहे? ते त्यांचे त्यांनीच ठरवावे. कारण हा निकाल नुसताच धक्कादायक नसून तर्कबुद्धीला चकित करणारा आहे. या निकालाचा अर्थ असा, की प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे आणि तो कोणीच केलेला नाही. जर घोटाळा झाला असेल, तर तो कोणीतरी केलेला असायला हवा आणि त्याच दिशेने पुरावे व साक्षीदारांची छाननी होण्याची गरज असते. न्यायपीठावर बसलेल्या व्यक्तीने आपली बुद्धी कसाला लावून तपासणी करावी आणि निकाल द्यावा; अशी अपेक्षा असते. नुसत्या कायद्याच्या व्याख्या व शब्दात अडकून न्यायनिवाडा होऊ शकत नसतो. इथे न्यायाधीशांनी त्या कसोटीवर निकाल दिला आहे काय? हा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो. घोटाळा झाला असेल तर आरोपी निर्दोष कसे सुटतात? कारण घोटाळा वा भ्रष्टाचार त्यांच्याखेरीज अन्य कोणाला करण्याची या प्रकरणात कुठलीही संधी नाही. मग त्याच आरोपींना कुठल्या आधारावर निर्दोष ठरवले जाते? याचा अर्थ प्रथमच असा धक्कादायक निकाल कुठल्या न्यायालयातून आलेला आहे, असेही मानण्याची गरज नाही. यापुर्वीही असे अनेक थक्क करून सोडणारे निकाल आलेले आहेत आणि वरच्या कोर्टात त्याचे वाभाडे निघालेले आहेत. म्हणूनच हा २ जी घोटाळ्याचा अंतिम निकाल नसून त्याचे अधिक धिंडवडे पुढल्या काळात निघतील, हे आताच लक्षात घेतले पाहिजे.

दिल्लीत गाजलेल्या आरुषी हेमराज हत्या प्रकरणात सीबीआयच्याच कोर्टाने आरुषीच्या जन्मदात्यांना खुनी ठरवून जन्मठेपेची शिक्षा फ़र्मावलेली होती. त्यावर अपील झाले आणि त्यात त्या मातापित्यांची अलाहाबाद हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली होती. ही खुप जुनी गोष्ट नाही तर अवघ्या दोन महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. त्याचा इथे संदर्भ एवढ्यासाठी द्यायचा, की त्या हायकोर्टाच्या निकालात खालच्या म्हणजे सीबीआय कोर्टाच्या निवाड्यासह न्यायाधीशांवरही ताशेरे झाडलेले आहेत. न्यायमुर्तींनी साक्षीपुरावे अभ्यासताना आपल्या बुद्धीचा वापर केला नाही, असे हायकोर्टाच्या निकालात म्हटलेले आहे आणि २ जी घोटाळा प्रकरणातही त्याचीच पुनरावृत्ती झाल्यासारखे भासते आहे. कारण अनेक पुरावे व गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, की त्यातून आरोपींना निर्दोष ठरवणे अतिरेक आहे. सर्वप्रथम ह्या प्रकरणाचा उल्लेख कॅग अहवालात आला आणि त्यावर युपीए सरकारने पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून सुब्रमण्यम स्वामी सुप्रिम कोर्टात दाद मागायला गेले होते. पुढे सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि त्यातून हा खटला उभा राहिलेला आहे. त्याचा आजच्या मोदी सरकारशी वा भाजपाशी काडीमात्र संबंध नाही. तर सुप्रिम कोर्टाने जे मतप्रदर्शन तेव्हा केले, त्यातून याचा गाजावाजा झालेला होता. २०१२ साली सुप्रिम कोर्टाने तसा आदेश दिला आणि सर्व तपासही सुप्रिम कोर्टाच्या देखरेखीत झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे सुप्रिम कोर्टाने युपीएचे स्पेट्रम वाटप रद्द केले आणि त्याचा नव्याने लिलाव करण्याचा आदेश दिला. ज्याचे वितरण केवळ दहा हजार कोटी घेऊन आलेले होते, त्याचा लिलाव झाल्यामुळे सरकारी तिजोरीत पावणे दोन लाख कोटी रुपये जमा झाले. म्हणजे कोर्टाने हस्तक्षेप केला नसता, तर दिड लाख कोटीहून अधिक रक्कम जनतेच्या खजिन्यातून लुबाडली गेली असती.

सरकारी तिजोरीला दिड लाख कोटीचा गंडा घालण्याचा हा धोरणात्मक निर्णय गुन्हेगारीच्या व्याख्येत बसतो किंवा नाही आणि त्यातले गुन्हेगार कोण; इतकाच निवाडा सीबीआय कोर्टाला करायचा होता. त्यातला घोटाळा व लूटमार सुप्रिम कोर्टाने तेव्हाच मान्य केली होती आणि म्हणून वितरण रद्द केलेले होते. सहाजिकच युपीए व कॉग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचाराचा नुसताच अपप्रचार झाल्याचा कांगावा करण्यात अर्थ नाही. ती शुद्ध भामटेगिरी आहे. मूळात वाजपेयी सरकार असताना वाटपाचे धोरण ठरलेले होते. पण त्याची अंमलबजावणी करताना युपीए सत्तेत आलेली होती. त्यांनी २००१ सालातल्या धोरणाची २०१० सालात अंमलबजाव्णी करताना स्पेक्ट्रमचे दर मात्र दहा वर्षे जुने म्हणजे २००१ सालचे लावले होते. त्यातून ही लुटमार झालेली होती. मात्र अंमलबजावणी करताना त्यात अनेक गफ़लती करण्यात आल्या. तब्बल दहा वर्षे रोखण्यात आलेले वितरण प्रत्यक्ष करतानाची घाई नजरेत भरणारी आहे. स्पेक्ट्रम घेण्यासाठी अवघी एक तासाची मुदत टेंडरकर्त्यांना देण्यात आली. त्यासाठी कागदपत्रे व डिमांड ड्राफ़्ट बनवायलाही काही दिवस लागतात. म्हणजेच इच्छुकांना वेळेची मुदत दिली नाही आणि ठराविक लोकांना आधीपासून सुचना देऊन सज्ज ठेवलेले होते. याचा अर्थ असा, की आधीच कोणाला स्पेट्रम मिळणार हे ठरलेले होते आणि त्यात स्पर्धा नको म्हणून एका तासाच्या मुदतीत टेंडर भरण्याची अट लादली गेली. यात धोरणात्मक भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो साध्या डोळ्यांनाही दिसणारा असताना न्यायमुर्ती आरोपींना निर्दोष मुक्त करणार असतील, तर त्यांनी यात आपली बुद्धी कितपत वापरली, असा प्रश्न विचारला जाणारच. त्यावर अपील होण्याला पर्याय नाही. म्हणूनच हा अंतिम निवाडा नाही व तात्पुरता नैतिक विजय मात्र नक्कीच आहे, असे म्हणणे भाग आहे. कारण हायकोर्टात तो निकाल टिकणारा नाही.

कॉग्रेस ज्याला अपप्रचार म्हणते आहे त्याचे सर्वोत्तम उदाहरण मालेगाव बॉम्बस्फ़ोट वा हिंदू दहशतवाद म्हणून सांगता येईल. स्पेक्ट्रम घोटाळ्यात तरी खटला चालवला गेला आहे आणि सज्जड पुरावे समोर आलेले आहेत. पण साध्वी प्रज्ञा वा कर्नल पुरोहित प्रकरणात नऊ वर्षे कुठलाही खटला चालवल्याशिवाय नुसत्या आरोपांचे पतंग उडवले गेले होते. अजून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले नाही की खटला चालवला गेलेला नाही. मजेची गोष्ट म्हणजे पुरोहित यांना जामिन देताना युपीए सरकारची लबाडी सुप्रिम कोर्टाने बोलून दाखवलेली आहे. कुठल्या एका धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी कुणा व्यक्तीला दिर्घकाळ विनापुरावे तुरूंगात डांबून ठेवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटलेले होते. तशी कुठलीही बाब स्पेक्ट्रम घोटाळ्यात नाही. इथे रितसर पुरावे समोर आलेले आहे आणि कॅगच्या अहवालातला अंदाजही खरा ठरलेला आहे. पावणे दोन लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे अहवाल म्हणतो आणि जेव्हा २०१५-१६ मध्ये फ़ेरवाटप लिलावातून झाले, तेव्हा तितकीच रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित अभ्यासल्या तर गुरूवारी आलेला निकाल कुणालाही पटणारा नाही. किंबहूना तो वरच्या कोर्टात टिकणाराही नाही. कारण यातील आरोपींवर अनेक आरोप असून कुठल्याही आरोपात ते फ़सत नसतील, तर निकाल शंकास्पद होऊन जातो. त्यातून मोठे राजकारण खेळले जाईल आणि तापुरते विजय पराजय रंगवले जातील. मात्र अपीलात गेल्यावर यातला कुठलाही आरोपी निर्दोष सुटण्याची शक्यता नाही. असे यापुर्वी अनेकदा झालेले असून याहीवेळी त्याचीच पुनरावृत्ती होईल. परंतु असेच होत राहिले तर सुप्रिम कोर्टालाही एकूण न्यायलापालिकेच्या विश्वासार्हतेकडे गंभीरपणे बघावे लागणार आहे. विलंबाने होणारा न्याय आणि अखेरीस अपीलात जाऊन फ़िरणारे निकाल; जनतेचा न्यायावरील विश्वास नष्ट करण्याला कारणीभूत ठरत असतात.

14 comments:

  1. ' सी .बी .आय ' कोर्टाचे न्यायाधीश संशयाच्या फेऱ्यात येतात ना ? कोणी याबाबत बोलतच नाही.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर बोललात भाऊ! या निर्णयामुळे काँग्रेस नेते आनंदाने बेहोष होऊन स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत व स्वतःला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देत आहेत. परंतु युपीए कारकीर्दीतील कोळसा घोटाळ्यातील २ प्रकरणांचा आधीच निकाल लागलेला असून त्यात आरोपींना शिक्षा झालेली आहे व अजून त्यातील काही प्रकरणांचा निकाल यायचा आहे याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. आपली झिरो लॉस थिअरी न्यायालयात सिद्ध झाली असे सिब्बल बरळला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आधीचे तरंगलहरी वाटप रद्द करून लिलाव करण्याचा आदेश दिल्यानंतर केंद्राच्या खात्यात १ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्यामुळे आधीचे वाटप हा झिरो लॉस नसून १ लाख कोटी रूपयांहून अधिक मोठा लॉस होता हे केव्हाच सिद्ध झाले आहे.

    ReplyDelete
  3. या निर्णयामुळे मनमोहन सिंगांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या असून त्यांनी तातडीने स्वतःची व स्वतःच्या सरकारची पाठ थोपटून निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. परंतु कोळसा खाणवाटप प्रकरणातील दोन प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे (नुकतीच मधू कोडालाही शिक्षा झाली) व हे प्रकरण आपल्याच कारकीर्दीतील होते याचा त्यांना सोयिस्कर विसर पडलेला दिसतो. २-जी तरंगलहरींचे वाटप व कोळसा खाणींचे वाटप या दोन्ही प्रकरणांमध्ये घोटाळा झाल्याचे सर्वोच्च नायालयाला पटल्यामुळेच न्यायालयाने हे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने विक्री केली होती याचाही मनमोहन सिंगांना विसर पडलेला आहे. २-जी तरंगलहरी वाटपातून २००७ मध्ये सरकारला फक्त ६-७ हजार कोटींचा महसूल मिळाला होता. परंतु २०१२ नंतर आधीचे वाटप रद्द करून लिलाव केल्यामुळे सरकारला १ लाख कोटी रूपयांहून अधिक महसूल मिळाल्यामुळे या प्रकरणात नक्कीच घोटाळा झाला होता हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. हा घोटाळा सीबीआय न्यायालयाला का दिसला नाही हे एक गूढच आहे. अंमलबजावणी संचलनालय या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयात जाणार आहे. तोपर्यंत मनमोहन सिंगांनी स्वतःची पाठ थोपटून घेत भांगडा करावा.

    ReplyDelete
  4. भाऊ हा घोटाळा तपास करणाऱ्या किती लोकांचा मृत्यु झाला व कशामुळे झाला ??? याचा आधी तपास करायला हवा

    ReplyDelete
  5. सर, अगदी खरे आहे. पण कॉग्रेसला तात्पुरता रिलीफ मिळाला इतकेच.

    ReplyDelete
  6. राजकारणात नैतिक विजय हा प्रकार पहिल्यांदाच ऐकतोय. विजय हा विजय असतो तो कसा ही असो. ही सगळी झाडावर बसवणे आहे. गेल्या 3 वर्षात विजय हा प्रकार कॉंग्रेस विसरली आहे त्या मुळे जो काही थोडा फार मिळालाय तोच साजरा करतायत

    ReplyDelete
  7. भाऊ नमस्कार। फारच छान लेख । मला यात भाजपचाच हात वाटतोय कारण सरकार कुठलीही असो अशा मोठया केसेस मधे प्रभाव टाकतेच। मोदींना आडवाणींना राष्ट्रपती होउ दयायचे नव्हते म्हणुन बरोबर निवडणुकी आधी निकाल आला । भारत देशात पक्ष कुठलाही असो पैसे सगळेच खातात आणि एकमेकांचे घोटाळे वाचवतात सुद्धा। प्काँग्रेसचा बोफोर्स घोटाळा सुद्धा वाजपेयींनी वाचवला होता व त्याबदल्यात सोनिया सरकार स्थापिणार नाहीत असे आश्वासन घेतले होते ९८ साली। हे मला सुब्रमनियम स्वामींच्या एका युटयुबच्या विडियोतुन कळले आपणही विडीयो बघु शकता। राहुल ड्रग्स घेउन अमेरिकेत पकडला गेला होता तेव्हा वाजपेयींनी स्वत: अमेरिकेत फोन करुन त्यास वाचविले होते। ए राजा कानिमोडी अजित पवार यासारखी मंडळी कधीच दोषी सिद्ध होणार नाहीत कारण सगळे राजकारणी चोर चोर मौसेरे। त्यात ही मेकाॅलेची तारिख पे तारिख वाली ipc ची सिस्टिम। असो।

    ReplyDelete
  8. अशा परिस्थितीत आणि आजून निकालाची प्रत हाती आलेली नसताना काँग्रेसने जल्लोष करणे, माजी पंतप्रधानांनी माध्यमांवर प्रतिक्रिया देणे आणि माध्यमांनी या विषयी चर्चा आयोजित करणे कितपत योग्य आहे?

    ReplyDelete
  9. नैतिक विजय चिरायु होवो.

    ReplyDelete
  10. भाऊ, काँग्रेसला देव्हारे माजविण्याची खोड आहे.आपल्या नेत्यांचे देव करून त्यात बसवायचे.मग त्यांनी केलेल्या घाणीबद्दल कुणी बोलणे म्हणजे महापाप ठरते.असे बरेच देव करून ठेवलेले आहेत.आता मनमोहनसिंगाना अशा देव्ह्याऱ्या बसविले आहे.

    ReplyDelete
  11. ए राजा आणि कनिमोझी निर्दोष आहेत का ?

    २ जी घोटाळा खटल्याच्या निकालात न्यायालयाने म्हणाले आहे की, या खटल्याच्या सुरवातीला फिर्यादी पक्षाने उत्साहात सुरवात केली आणि हे प्रकरण अतिशय काळजीपूर्वकरित्या न्यायालयासमोर सादर केले. पण शेवटी शेवटी फिर्यादी पक्षाचे काम दिशाहीन बनले. नंतरच्या टप्प्यात, अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठीही कोणी वरिष्ठ अधिकारी किंवा अभियोजक तयार नव्हते. न्या. ओ. पी. सैनी यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की "खटल्याच्या अंतिम टप्प्यात विशेष सरकारी वकील ग्रोव्हर आणि सी.बी.आय. चे वकील कोणत्याही समन्वयाशिवाय दोन वेगवेगळ्या दिशेने काम करीत होते.

    तर याचा नेमका अर्थ काय आहे? - विशेष सरकारी वकिलांनी जाणूनबुजून या प्रकरणात कोणतीही स्वारस्य दाखवले नाही आणि न्यायालयाची दिशाभूल केली आहे.

    २ जी घोटाळ्याच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील कोण आहे हे जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्का बसेल !

    सी. बी. आय. तर्फे सुरुवातीला उदय लळीत हे विशेष सरकारी वकील नियुक्त होते. त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाल्यानंतर विशेष सरकारी वकील म्हणून आनंद ग्रोव्हर यांनी हा खटला चालविण्यास घेतला.

    हे आनंद ग्रोव्हर कोण आहेत ?

    आनंद ग्रोव्हर हे कुख्यात दहशतवादी याकुब मेमन याचे वकील होते व दोन वर्षांपूर्वी याकुब मेमन तर्फे सर्वोच्च न्यायालयात आनंद ग्रोव्हर व प्रशांत भूषण यांनी दयेचा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज फेटाळला गेला. पण तेव्हा
    आनंद ग्रोव्हर यांनी याकुबचा खटला अत्यंत आक्रमकपणे चालवून सर्वोच्च न्यायालयाची संभावना ‘याकुब मेमनला फासावर चढवायला निघालेले रक्तपिपासू’ अशी केली होती.

    आनंद ग्रोव्हर यांची पार्श्वभूमी पहाता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला उद्देशून वरील विधान केले यात आश्चर्य काही नाही, कारण ते व त्यांची पत्नी (इंदिरा जयसिंग) हे डाव्या विचारसरणीचे सक्रीय कार्यकर्ते असून इंदिरा जयसिंग याही सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात.

    या ग्रोव्हर दाम्पत्याने स्त्रीवादी व डाव्या चळवळीच्या खटल्यांच्या कामासाठी एक अशासकीय संस्था (एन.जी.ओ) स्थापन केली होती. इंदिरा जयसिंग यांच्या कट्टर डाव्या विचारसरणीमुळे सोनिया गांधी यांच्या वर्तुळात त्यांना प्रवेश मिळाला व काँग्रेस शासनाच्या वेळी त्यांना भारतातील पहिली महिला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी मानवाधिकार कायद्याअंतर्गत अनेक खटले चालविले आहेत, तसेच भारताच्या सुरक्षेला धोकादायक असणाऱ्या रोहंग्यांवरील कारवाईवरही प्रश्न उपस्थित केला आहे. आनंद ग्रोव्हर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत विशेष बातमीदार आहेत.

    निधीचा गैरवापर व देशविरोधी कारवाया केल्याबद्दल ग्रोव्हर दाम्पत्याच्या या संस्थेची चौकशी होऊन गृह मंत्रालयाने विदेशी देणगी नियामक कायद्याच्या (एफसीआरए) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या संस्थेचा परवाना गेल्या वर्षी रद्द केला होता.
    तेव्हा, ज्यांची पत्नी काँग्रेस पक्षाच्या भूतपूर्व अध्यक्ष सोनिया गांधी यांची सहकारी आहे व ज्यांनी याकुब मेमनसारख्या दहशतवाद्यांचे वकीलपत्र घेतले आहे, अशा आनंद ग्रोव्हर या विशेष सरकारी वकीलने काँग्रेस पक्षाच्या बचावासाठी, २ जी घोटाळ्याच्या खटल्यात काहीच रस दाखविला नाही यात काहीच आश्चर्य नाही.

    - पोस्टकार्ड न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या आधारे.










    ReplyDelete
    Replies
    1. Very important information pl keep sharing
      Thanks

      Delete
    2. Thanks great information but partiality of media not showing..pl share such information..
      Bhau thanks for publishing such important information.

      Delete