Saturday, January 27, 2018

सहाव्या रांगेचे पदमहात्म्य

rahul gandhi in 6th row के लिए इमेज परिणाम
                                                                                                                                                                
प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात राजपथावर जी पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती, तिथे राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याने अनेकांना मिरच्या झोंबल्या आहेत. अर्थात राहुल कॉग्रेसचे अध्यक्ष असल्याने त्या पक्षाच्या नेते समर्थकांना असा संताप येणे स्वाभाविकच आहे. पण त्यांच्याही पलिकडे अवघी जमाते पुरोगामी रडकुंडीला आलेली आहे. त्यामागेही अशा लोकांना मोदींचे काही कारस्थान दिसले तर नवल नाही. मुद्दाम राहुलना अपमानित करण्यासाठी असे वागवण्य़ात आल्याचा आरोप म्हणूनच झाला. ज्यांना आपला सन्मान राखता येत नाही, त्यांचा कोणाला अपमान करावा लागत नसतो. अगदी मोदी सरकारने जाणिवपुर्वक राहुलचा अपमान करण्यासाठीच त्यांना चौथ्या सहाव्या रांगेत बसवले असे मान्य केले; तरी एक प्रश्न शिल्लक उरतोच. स्वत: राहुलना कधी पहिल्या रांगेत येऊन बसण्याची हिंमत झाली आहे काय? त्यांना शक्य असलेल्या वेळी तरी त्यांनी पहिल्या रांगेत येऊन बसायचे धाडस कशाला केलेले नाही. मोदीपुर्व दहा वर्षे त्यांच्याच पक्षाच्या हाती देशाची सत्ता होती, त्या काळात राहुल कधी अशा सोहळ्यात पुढल्या पहिल्या रांगेत बसायला का प्रयत्नशील नव्हते? तर त्या रांगेत जबाबदार व्यक्तींनाच बसवले जात असते आणि त्यासाठी कुठले जबाबदारीचे पद पत्करण्याची हिंमतही असावी लागते. राहुलनी कधी तितकी हिंमत गोळा केली? त्यासाठी पुढाकार घेतलेला दिसला आहे काय? पक्षाचा दारूण पराभव झाल्यावर पुढे येऊन संसदेतील पक्षनेतेपद राहुलनी स्विकारले असते, तर त्यांना लोकसभेतील पहिल्या रांगेत बसायची संधी मिळालीच असती. पण तिथे खरगे वा ज्योतिरादित्य शिंदे यांना बसवून राहुलनी मागल्या रांगेत आपली सोय लावून घेतलेली होती. त्यातूनच त्यांनी आपण पहिल्या रांगेतला नेता वा व्यक्ती नसल्याची प्रत्येक वेळी साक्ष दिलेली नव्हती काय?

२००४ सालपासून राहुल गांधी लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी एकदा तरी पुढाकार घेऊन कुठल्या विषयात नेतॄत्वाचे गुण प्रदर्शित केले आहेत काय? मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कुठलेही एक जबाबदारीचे पद घेतले असते, तर तिथेच राहुलची कसोटी लागली असती. पण अशा प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी पळ काढायचा व इतर कोणाला पुढे करायचे, ही राहुलनिती राहिली आहे. कधी सहाव्या तर कधी आठव्या रांगेत बसून जांभया देण्यात त्यांची संसदीय कारकिर्द खर्ची पडलेली आहे. पक्षाध्यक्ष होण्यामुळे पहिल्या रांगेतले स्थान मिळत नाही, तर जितकी मोठी जबाबदारी तितकी पुढली रांग व आसन मिळत असते. ते कोणाच्या कृपेने वा वशिल्याने मिळत नसते. तो तुमच्या हक्क असतो आणि हक्कासाठी लढावे लागत असते. आज राहुल पक्षाध्यक्ष आहेत. ते पद मिळवण्यासाठी तरी त्यांनी कुठली लढाई केली आहे? फ़क्त एका कुटुंबात जन्म घेण्यापेक्षा त्यांचे राजकीय योगदान नगण्य आहे. त्यांना कधी मेहनत मशागत करून मतदारसंघ उभा करावा लागला नाही. वडिलार्जित जागी फ़क्त पुण्याई म्हणून लोकसभेत वर्णी लागलेली आहे. हे पक्षातले स्थान सार्वजनिक जीवनात सवलत म्हणून मिळू शकते. त्याचा हट्ट करून चालत नाही. नरेंद्र मोदी आज पहिल्या क्रमांकाच्या स्थानावर बसलेत, ते त्यांनी मिळवलेले स्थान आहे. संसदेत निवडून येण्यासाठी त्यांनी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही उत्तरप्रदेशात वाराणशी या मतदारसंघात लढण्याची हिंमत केलेली होती. राहुलना आपल्या वडिलार्जित प्रभावक्षेत्राच्या बाहेर कुठे निवडणूक लढण्याचा विचार तरी करता आला आहे काय? नसेल तर रांगेचे आग्रह धरून चालत नाहीत. त्यांनीच नव्हेतर त्यांच्या कुणा समर्थक भाटांनीही असल्या अपेक्षा बाळगण्यात अर्थ नसतो. त्याविषयी तक्रार करण्याला कांगावा म्हणतात. अशा स्थळी वडिलांची पुण्याई कामी येत नसते.

चार वर्षापुर्वी जिथे कॉग्रेसचे अधिवेशन भरलेले होते, त्या तालकटोरा स्टेडीयमच्या बाहेर मणिशंकर अय्यर काय म्हणाले होते? आज राहुलच्या रांग व स्थानाविषयी मोठे पांडित्य सांगणार्‍यांना ते शब्द आठवतात काय? ‘वो चायवाला देशका प्रधानमंत्री कभी नही बन सकता. उसे अगर चाय बेचनी है, तो यहा आकर स्टॉल लगा सकता है.’ हेच शब्द होते ना अय्यर यांचे? तेव्हा मोदींनी कॉग्रेस अधिवेशनात येण्यासाठी आमंत्रण मागितले नव्हते, की राहुल वा अय्यर यांच्या कृपेने कोणी देशाचा पंतप्रधान होत नसतो. तरीही जाणिवपुर्वक मोदींचा जाहिर अपमान करायची मस्ती कोणी केली होती? त्याविषयी मोदींनी तक्रार केली नव्हती, की राहुलनी अय्यरचे कान उपटले नव्हते. अशा बाष्कळ बडबडीकडे काणाडोळा करून मोदींनी ते पंतप्रधानपद आपल्या हिंमतीने मिळवले आणि आज त्यावर तो माणूस आरुढ झालेला आहे. समजा तो विरोधी पक्षात असता आणि त्याला त्याच प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात सहभागी करताना राहुल वा अय्यर यांनी कुठले स्थान दिले असते? ‘इथेही चहा विकायचा असेल तर’ हीच भाषा उपयोगात आली असती ना? अशी भाषा बोलतात आणि वापरतात, ते आपल्या लायकीने आपले स्थान निश्चीत करीत असतात. अय्यरना तर या सोहळ्यात कोणी इडलीडोसाही विकायला येऊ देणार नाही. पण तोच मोदी आज त्या सोहळ्यात महत्वाच्या आसनावर पहिल्या रांगेत बसलेला होता. ते पद त्याने मिळवलेले आहे. कोणी त्याला त्याची भीक घातलेली नाही. आपला अपमान पचवूनही संसदीय शिष्टाचार त्याने पाळलेला आहे, जो राहुलना चार वर्षापुर्वी पाळता आलेला नव्हता. तुम्हीच ज्याला नीच ठरवलेले आहे, त्याने आज तुम्हाला तुमची पातळी दाखवून दिली असेल, तर तक्रार कशाला? उतरा मैदानात आणि धुळ चारा त्या मोदीला. जनानखान्यात रुसून बसलेल्या सुंदरीसारख्या तक्रारी कशाला करायच्या?

साडेचार वर्षापुर्वी दिल्लीतील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उरकल्यावर कच्छ येथे पाकिस्तानच्या सीमेलगत मोदींनी त्या दिवसाचा सोहळा मुख्यमंत्री म्हणून साजरा केलेला होता. त्याला नाके कोणी मुरडली होती? त्या समारंभात व्यासपीठ लालकिल्ला असल्यासारखे सजवले होते. ती आयोजकाची मर्जी होती. त्याला कॉग्रेस व मोदी विरोधी लोकांनी नाके मुरडण्याची काय गरज होती? मोदींनी आपले व्यासपीठ कसे सजवावे, हा त्यांच्या आवडीनिवडीचा विषय असतो. तेव्हा त्या लालकिल्ल्याच्या प्रतिकृतीला नाके मुरडणारे तेच लोक होते ना? ज्यांना आज सहावी रांग बोचली आहे? मोदींनी खोट्या व लाकडाच्या लालकिल्यावरूनच भाषणाचे सोहळे करावेत. खर्‍या लालकिल्ला परिसरात भाषण त्यांच्या नशिबी येणार नसल्याची भाषा कोणाची होती? त्याची काय गरज होती? त्यात कुठला शिष्टाचार होता? कुठली सभ्यता होती? त्या घटनेला वर्ष उलटण्यापुर्वी तोच मोदी मराठी फ़ेटा बांधून खर्‍याखुर्‍या ऐतिहासिक लालकिल्ल्यावर उभा राहिला. देशाला उद्देशून भाषणही केले. त्याला नाके मुरडणारे मात्र त्याच किल्ल्याच्या पायथ्याशी रांगा धरून बसलेले होते. अपमानासाठी रडत बसण्यात पुरूषार्थ नसतो, तर अपमानाचा बदला कर्तृत्व गाजवून घेतला जात असतो. शिवरायांना आग्र्याच्या किल्ल्यात अपमानित केले गेल्यावर त्यांनी पुढल्या परिणामांची पर्वा केली नव्हती. वाकायला लावणारी कमान तोडून पुढले पाऊल टाकले होते. बाकी त्या औरंगझेबाच्या दरबारातल्या मर्दांना कधी तितकी हिंमत झालेली नव्हती. महाराजांनी अपमानाची पत्रके काढलेली नव्हती, की त्यावर गवगवा करायला प्रवक्ते धाडले नाही. मागून मिळतो तो सन्मान नसतो की त्यात कुठला अभिमानही नसतो. सन्मान ही पराक्रमाची पावती असते. ते कुठल्या सोहळ्याचे तिकीट नसते. अर्थात राहुल किंवा त्यांच्या समर्थकांना ते समजायला अजून कित्येक वर्षे उलटावी लागतील.

8 comments:

  1. अप्रतिम अप्रतिम अत्यंत सुंदर

    ReplyDelete
  2. केवळ अप्रतिम..🙏

    ReplyDelete
  3. अहो भाऊ बाकीचं जाऊदे. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला स्वातंत्र्यवीर सावरकरांना आमंत्रण सुद्धा दिलं नव्हतं या कॉंग्रेसने. अर्थात सावरकरांबद्दल कॉंग्रेसचा द्वेष कधीच लपून राहिलेला नाहीये पण तरीही ती गोष्टं चुकीची होती. त्यामुळे मोदींनी काय केलं हा मुद्दा च इथे लागू होत नाही. या रांगेत बसवण्याच्या गोष्टींवर (निदान) कॉंग्रेसने तरी बोलू नये त्यांनी आपली कृत्य आठवावीत.

    ज्या चुका त्यांनी केल्या आहेत...आता त्या सगळ्याची फळं भोगत आहेत ते.

    ReplyDelete
  4. भाऊ, धन्यवाद
    आपण नेमक्या शब्दात कानउघडणी केली आहे. ह्या निमित्त लहानपणी समर्थ उपासक मा श्री दीनानाथ गंधे ह्यांचे ऐकलेलं "मानाची पालखी" हे पेशवेकालीन प्रसंगावरील कीर्तन आठवले. आपला आजचा लेख त्याच विस्तारित कथानकाची नवीन आवृत्ती आहे.
    ह्याद्वारे आपण राहुलकांग्रेस ला "मानाची पालखी" दाखवलीत!
    कर्तृत्व हेच मान मिळवण्याचे माध्यम आहे. उगाच बालिश(आपण तर इथं जनानखान्यात सुंदरी ची उपमा दिलीत!!)पणाने त्याचा हट्ट धरू नये हाच ह्या कीर्तनाचा उद्देश आहे.

    ReplyDelete
  5. मानापमानाची भाषा काँग्रेसी "पिद्दी" ना शोभत नाही. गांधी परिवाराने पक्ष कार्यकर्त्यांचा कसा मान राखला आहे, ते जगजाहीर आहे.
    २०१८ WEF च्या बैठकीची सुरवातच भारतीय प्रधानमंत्र्यांच्या भाषणाने झाली. ही मोदी सरकारची केवळ तीन वर्षांची उपलब्धी आहे.
    या कृतितूनच जगाने भारतीय काँग्रेसची लायकी दाखवली आहे. अशा पक्षाच्या अध्यक्षाची दखलही घेण्याची गरज नाही.

    ReplyDelete
  6. काँग्रेसी लोकांना वैयक्तिक मानापमान कळतो. पण यांनी देशाच्या मानापमानाची उठाठेव केल्याचे उदाहरण नाही.
    चीनने भारतीय भूभाग व्यापल्या नंतर, नेहरूनी दिलेल्या प्रतिक्रीयेने भारताची प्रतिष्ठा जगात उंचावली काय ?
    भोपाल गॅस दुर्घटनेतील अपराधी वॅार्न अँडरसन (Warren Anderson) "सुखरूप" पळाला, ही घटना देशाची अप्रतिष्ठा करणारी नव्हती का ?
    पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या सरबजीत सिंगला सोडवून आणण्याचा विषय देशासाठी प्रतिष्ठेचा नव्हता का ?
    भारतीय जनतेने बहुमताने निवडून दिलेल्या मोदींच्या सरकारला घालवण्याकरता पाकिस्तानची मदत मागताना काँग्रेसींनी, देशाचा मान वाढवीला होता का ?
    सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे आपल्याच सेना व सरकारकडे मागून जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली का ?
    देशाच्या प्रतिष्ठा, मान या विषयी काँग्रेसची भूमिका या संदर्भांनी स्पष्ट होते.

    ReplyDelete
  7. धन्यवाद भाऊ, आपण अल्प शब्दात मोठी कानउघाडणी केली, काँग्रेसने केलेल्या आशा चुकांसाठी शासन हे झालेच पाहिजे.

    ReplyDelete