झाहिरा शेख नावाची एक मुलगी होती. होती म्हणजे आजही ती आहे. पण आता ती तिशी पस्तिशीतली महिला असेल. २००२-३ च्या काळात ती विशीतली मुलगी होती. गुजरातच्या दंगलीत बडोद्यातील पित्याच्या बेस्ट बेकरीवर हिंसक जमाव चाल करून आला, त्याची ती साक्षिदार होती. त्या जाळपोळीत दहाबारा माणसे मारली गेली. पुरोगामी भाषेत तितके मुस्लिम हिंदू दंगलखोर जमावाने जाळून मारलेले होते. त्यातून झाहिरा कशीबशी बचावली होती आणि म्हणूनच ती त्या हिंसाचाराची एकमेव जीवंत साक्षिदार होती. पुढे त्या हिंसेचे प्रकरण नोंदले गेले आणी जलदगती कोर्टासमोर त्याची सुनावणी झाली. त्यात एकामागून एक साक्षिदार उलटत गेले. काही महिन्यात त्या खटल्याचा निकाल लागला आणि सत्र न्यायालयाने सर्व २१ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. कारण त्यांच्या विरोधात कुठला पुरावा नव्हता की साक्षिदार नव्हता. हे कसे शक्य होते? झाहिरा त्या घटनेची साक्षिदार होती आणि तिनेही कोर्टात साक्ष दिलेली होती. पण तिने संशयित आरोपींना ओळखण्यास वा त्यांच्या विरोधात बोलण्यास नकार दिल्याने सर्वजण निर्दोष सुटलेले होते. त्या निकालाने गदारोळ उठला आणि एकामागून एक तात्कालीन वाहिन्यांचे वार्ताहर कॅमेरा घेऊन झाहिराच्या घरी पोहोचले. त्यांच्यापैकी काही पत्रकारांशी बोलताना झाहिराने आपण जीवाच्या भयामुळे साक्ष फ़िरवली, असा खुलासा केला आणि ती देशव्यापी नव्हेतर जगभर गाजलेली बातमी होऊन गेली. जेव्हा हा खटला चालू झाला वा त्याचा तपास चालू होता, तेव्हा कोणी समाजसेवी संस्था किंवा न्यायचे पुजारी झाहिराच्या मदतीला गेले नव्हते. तिला कोणी मार्गदर्शनही केलेले नव्हते. तिच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या आल्या आणि एकेदिवशी मुंबईत झाहिरा प्रकटली. मुंबईच्या अनेक नामवंत पुरोगामी गोतावळ्यात झाहिरा पत्रकारांना सामोरी गेली. कालपरवा न्या. लोयांचा पुत्र जसा कॅमेरा समोर आला तशीच.
तीस्ता सेटलवाड हे नाव त्यानंतरच गाजू लागले. तीस्ताने झाहिराला उचलून गुपचुप मुंबईत आणलेले होते आणि आपल्या प्रतिष्ठीत गोतावळ्याच्या उपस्थितीत झाहिरा शेखला माध्यमांच्या समोर हजर केलेले होते. तेव्हाची गांगरलेली झाहिरा शेख आज किती लोकांना आठवते आहे? तिला धड बोलता येत नव्हते की प्रश्नांची उत्तरेही देता येत नव्हती. तिच्या वतीने तीस्ताच प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देत होती आणि अजब गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबातील अनेकजण होरपळून मृत्यूमुखी पडलेले असताना झाहिराच्या चेहर्यावरचा आनंद उत्साह लपून रहात नव्हता. आपल्या कुटुंबला न्याय नाकारला गेला असताना व त्यात खोटी साक्ष घाबरून देणारी झाहिरा त्या पत्रकार परिषदेत भयभीत झालेली दिसायला हवी ना? त्याचे चित्रणही उपलब्ध आहे. एखादी परिकथा सांगावी अशा उत्साहात झाहिरा घटनाक्रम पेश करते. असो, मुद्दा इतकाच, की जे झाहिरा पत्रकारांना सांगत होती तेच तिला कोर्टात सांगण्याची भिती कशाला वाटलेली होती? तर तिला मुंबईत पेश करणार्या तीस्ता टोळीच्या मते झाहिराला गुजरातमध्ये जीव घेण्याची धमकी देऊन खोटे बोलायला भाग पाडण्यात आलेले होते. त्यामुळेच बेस्ट बेकरीच्या खटल्याची फ़ेरसुनावणी व्हावी आणि तीही गुजरात बाहेर व्हावी; अशी या टोळीची मागणी होती. तिथे प्रसिद्ध जाहिरातगुरू अलेक पदमसी, चित्रपट कथाकार कवी जावेद अख्तर अशा एकाहून एक नामवंत लोक हजर होते. सहाजिकच त्यातून माध्यमात भयंकर गदारोळ माजवण्यात आला आणि सुप्रिम कोर्टात धाव घेऊन तोच खटला मुंबईच्या सत्र न्यायालयात चालवावा असा निर्णय मिळवला गेला. त्यानंतर जवळपास दहाबारा वर्षे तीस्ता सेटलवाड ही व्यक्ती गाजत राहिली. तिच्यावर अनेक आरोप झाले. पण न्यायालयीन संरक्षणाचे कवच चढवून तीस्ता कातडी बचाव करत राहिलेली आहे. पण तो विषय वेगळा आहे. इथे झाहिरा महत्वाची आहे.
पुढे मुंबईत बेस्ट बेकरीचा खटला सुरू झाला. दरम्यान झाहिराला गुजरातमध्ये धोका असल्याने तिला मुंबईतच तीस्ताच्या घरात सुरक्षित ठेवलेले होते. म्हणजे निदान तीस्ताचा तसा दावा होता. पण अकस्मात एक दिवस झाहिरा तिथून पळाली वा निसटली आणि बडोदा येथील जिल्हाधिकार्यांच्या आश्रयाला गेली. तिथेही तिला एका पत्रकार परिषदेत पेश करण्यात आले. तिथे झाहिराची भाषा बदलली होती. आपल्याला तीस्ता व तिच्या गुंडांपासून धोका असल्याचा दावा झाहिरानेच केला आणि मोठी खळबळ उडाली. मुळात ती मुंबईतून गुजरातला कशी व का गेली, याचेच रहस्य उलगडत नव्हते. तिच्या शब्दावर विश्वास ठेवायचा तर सुरक्षित ठेवण्यापेक्षा तीस्ताने झाहिराला कोंडून ठेवलेले होते. कशीबशी आपण सुटका करून घेतली असा तिचा दावा होता. पण गंमत कशी आहे बघा, मुंबईत तिस्ताच्या कब्जातल्या झाहिरावर विश्वास ठेवणारा कोणीही बुद्धीमंत ख्यातकिर्त शहाणा झाहिराने तीस्तावर केलेल्या आरोपावर विश्वास ठेवायला राजी नव्हता. उलट झाहिराचे गुजरात पोलिसांनीच अपहरण केल्याचा कांगावा सुरू झाला. झाहिराच नव्हेतर तिची आई व भाऊही ते़च सांगत होता. मुळात आपण बडोद्याच्या पहिल्या कोर्टात खोटी साक्ष दिली नव्हती. पण मोठी भरपाई मिळेल असे आमिष दाखवून तीस्ताने आपल्याला मुंबईत नेवून खोटे बोलयला लावले, असा आता झाहिराचा दावा होता. त्यासाठी तिने तीस्ताचा उजवा हात मानला जाणारा रईसखान पठाण याचेही नाव घेतलेले होते. पण पुरोगामी जगात अन्य कोणावर विश्वास ठेवायची कायदेशीर तरतुद नाही. म्हणूनच कोणीही झाहिराचे शब्द मानले नाहीत. पुढे तिने मुंबईच्या सत्र न्यायालयातही तशीच साक्ष दिली आणि ती कोर्टाने फ़ेटाळून लावली. तिच्यावर खोटे बोलल्याचा गुन्हा दाखल झाला आणि अखेरीस तिलाच वर्षभराच्या कैदेची शिक्षा भोगावी लागली.
गोष्ट किंवा गंमत तिथेच संपत नाही. झाहिराने तीस्ताचा गुंड सहकारी म्हणून ज्याच्यावर गंभीर आरोप केलेला होता, तो रईसखान पठाणही पुढे तीस्ताच्या विरोधात साक्ष द्यायला पुढे आला. गुजरातच्या दंगलीचा धंदा तीस्ताने कसा केला आणि त्यात आपली तुंबडी कशी भरली; ते हा पठाण अगत्याने सांगायला राजी आहे. परंतु त्याची साक्ष कोणी ऐकायलाही राजी नाही. वास्तविक त्याच्या साक्षीने तोच अडचणीत येऊ शकतो. पण त्याला पठाण तयार असूनही त्याला कुठल्या कोर्टात साक्षीला आमंत्रण मिळाले नाही. त्याची साक्ष एवढ्यासाठी महत्वाची आहे, की गुजरात दंगलीचे जे विविध खटले उभे राहिले वा ज्याच्या आधारे सुप्रिम कोर्टानेही तपास पथके नेमली, त्यातली बहुतेक प्रतिज्ञापत्रे आपण कशी खोट्या सह्या घेऊन निर्माण केली, त्याची जंत्री पठाण देतो. तीस्ताने आपल्याला दंगलपिडीत जमवण्यास सांगितले होते आणि त्यांना गोळा केल्यावर आधीच तयार असलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. दंगलीची भरपाई मिळण्याचे आमिष दाखवून ही प्रतिज्ञापत्रे बनवण्यात आल्याचाही आरोप पठाण करतो. पण त्याची दखल कोणी घेतली नाही. गुजरात दंगल व तिच्या तपासासाठी डझनावारी समाजसेवक अहोरात्र राबत होते, पण त्यापैकी कोणालाही पठाण वा झाहिरा कोणते सत्य सांगतात, ते ऐकायचे नव्हते. त्यांना सत्याची चाड नव्हती की गरज वाटत नव्हती. त्या दंगलपिडीतांच्या यातना व दु:खाचे भांडवल करून राजकारण खेळायचे होते आणि काहींना त्यातून आपल्या तिजोर्या भरून घ्यायच्या होत्या. तशी तक्रार मुस्लिमांच्याच जाळल्या गेलेल्या गुलमर्ग सोसायटीच्या रहिवाश्यांनी तीस्ताच्या विरोधात दिलेली आहे. त्याची चौकशी व तपास करण्याला दिर्घकाळ सुप्रिम कोर्टाकडून स्थगिती मिळवून तीस्ता कातडी बचावत राहिलेली आहे. हा लोया मृत्यूचे चिंतक वा गुजरात दंगलीच्या न्यायासाठी झगडणार्यांचा खरा हिडीस चेहरा आहे.
गेल्या आठवड्यात सुप्रिम कोर्टातील चार न्यायाधीशांनी बंडाचा झेंडा हातती घेतल्यावर न्या. लोयांच्या मृत्यूचा उहापोह सुरू झाला. त्यासाठी सरन्यायाधीशांवरही संशय घेतला गेला. त्याचे धागेदोरे या धंदेवाईक न्यायाच्या मक्तेदारांवर आलेल्या गदेमध्ये तर दडलेले नाहीत? सुप्रिम कोर्टाच्या न्यायदानावर या लोकांना कधीपासून संशय यायला लागला? जोपर्यंत यांचे राजकीय डावपेच सुप्रिम कोर्टात मान्य केले जात होते, तोपर्यंत यापैकी कोणाची काही तक्रार नव्हती. आधी अनुज लोयाने पित्याच्या मृत्यूविषयी शंका घेतली तर आज त्याने शब्द बदलता कामा नयेत. मग तीस्ता वा तिच्या टोळीने झाहिराला पळवून मुंबईत आणून वेगळे बोलायला भाग पाडले, ते कसे योग्य असेल? तेव्हा झाहिराची देहबोली कोणाला खटकली नव्हती आणि आजच या शहाण्यांना अनुज लोयाची देहबोली अभ्यासावी वाटलेली आहे. यातला फ़रक लक्षात घेतला पाहिजे. आपण म्हणू तेच सत्य आणि त्याला न्यायालयाने मान्य केलेच पाहिजे. तरच न्याय होतो. जेव्हा त्या आग्रहाला बाधा येईल, तेव्हा न्यायालयाला सुद्धा झुगारून लावणारी ही अरेरावी आहे. याचेही कारण आहे, म्हणून तर जुना इतिहास उकरून काढावा लागला आहे. गुजरातच्या प्रकरणात प्रत्येकवेळी सुप्रिम कोर्टाने हस्तक्षेप केला, तेव्हा असेच आरोप गुजरात सरकार वा मोदी-शहांचे वकीलही करू शकले असते. पण आपल्या विरोधातला प्रत्येक निकाल निमूट सहन करून त्या दोघांनी प्रत्येक तपास व खटल्याचे त्रास सहन केले. पण कुठल्याही न्यायालयावर दोषारोप केले नाहीत. उलट या तथाकथित पुरोगामी शहाण्यांवर विरोधातला निकाल ऐकायची वेळ आल्यावर त्यांनी न्यायालयावरही आरोप करायला मागेपुढे पाहिलेले नाही. तर त्याचीही कारणे जरा शोधावी लागतील ना? जेव्हापासून सुप्रिम कोर्टातली या टोळीची मनमानी नाकारली जाऊ लागली, तिथून ह्या शहाण्यांचे पित्त खवळलेले आहे. त्याचा आरंभ तीस्तावर टांगलेल्या तलवारीपासून होतो.
२०११ सालात गुजरात पोलिसांनी तीस्ताच्या विरोधात एक गुन्हा नोंदलेला आहे. त्यात तीस्ता चांगलीच फ़सलेली आहे. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पंदेरवाडा या गावानजिक पनाम नावाच़्या नदीकाठी २००५ सालात तीस्ता आपल्या काही सहकार्यांना घेऊन पोहोचली. सोबत तिने काही विश्वासातल्या वाहिन्यांच्या पत्रकारांनाही घेतले होते. तिथे खोदकाम केल्यावर जे काही मानवी सांगाडे मिळाले, ते गुजरात दंगलीत मारलेल्या अज्ञात मुस्लिमांचे असल्याचा दावा वाहिन्यांवर करण्यात आलेला होता. त्याचा खुप तेव्हा गाजावाजा झाला. पण प्रत्यक्षात ते तिथल्या स्थानिकांचे मरणोत्तर केलेले दफ़न होते आणि म्हणूनच आपल्या पुर्वजांची विटंबना झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यात तीस्ताचा उजवा हात रईसखान पठाण पुढे होता. गुन्हा दाखल त्याच्यावर झाला आणि तीस्ताने आपले अंग झटकले. त्यामुळे एकाकी पडलेल्या पठाणला आपला बचाव मांडण्याची वेळ आली. तेव्हा त्याने तीस्ताच्या सांगण्यावरून आपणे हे काम केल्याचा कबुलीजबाब दिला आणि पोलिसांनी तीस्तालाच त्या खटल्यात प्रमुख आरोपी केलेले आहे. तर आपल्या विरोधात तपास होऊ नये म्हणून तीस्ताने हायकोर्टात धाव घेतली होती. तिथे तिला कुठला दिलासा मिळू शकला नाही. पुढे तिने सुप्रिम कोर्टात धाव घेऊन हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यावर स्थगिती होती तोपर्यंत कोणाला सुप्रिम कोर्टाच्या न्यायदानाविषयी शंका नव्हती. गेल्या जुलै महिन्यात तीस्ताला मिळालेली स्थगिती सुप्रिम कोर्टाच्या खंडपीठाने उठवली आणि गुजरातच्या या खटल्याची टांगली तलवार तीस्तावर कोसळली. तिथून गडबड झालेली असावी. कारण ती स्थगिती उठवणार्या खडपीठावरच्या न्यायमुर्तींचे नाव आहे, अरूण मिश्रा. लोया खटल्याची सुनावणीही त्याच अरूण मिश्रांच्या खंडपीठाकडे सोपवल्यानंतर आभाळ का कोसळले, त्याचा इथे काही संबंध असू शकतो काय?
मागल्या काही महिन्यात एकामागून एक खटल्यात व प्रकरणात न्यायाची दुकाने थाटून बसलेल्या काही वकील, पत्रकार, विचारवंत व तथाकथित कलावंताच्या टोळीची मनमानी सुप्रिम कोर्टात नाकारली जाऊ लागली. तिथून गडबड सुरू झालेली आहे. झाहिरा शेख सारख्या अडाणी मुलीला तिच्याच कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सुरू झालेल्या संघर्षात एक वर्षाची कैद भोगायला लावणारी ही टोळी आहे. साक्ष बदलण्याची धमकी तिला देणारे गुन्हेगार ठरवले गेले. पण तीस्तानेही आपल्याला साक्ष फ़िरवायला भाग पाडल्याचा टाहो झाहिराने फ़ोडला, तो कोणी ऐकला नव्हता. तीस्ताचाच जुना साथीदार रईसखान पठाणचा टाहो कोणी ऐकत नाही. तेव्हा न्यायाचा व सत्याचा गळा दाबला जातोय, असे कोणाला वाटले नाही. माजी खासदार अहसान जाफ़री यांच्या कॉलनीतील रहिवाश्यांनी तीस्ताने आपल्या नावाने देणग्या गोळा करून तुंबडी भरल्याचा आक्रोश केला, तेव्हा यापैकी एकही न्यायाचा मक्तेदार त्यांना न्याय द्यायला पुढे आला नाही. पंदेरवाडा गावातल्या मृतांची विटंबना करंणार्या तीस्ता सेटलवाडच्या कृत्यामागचे सत्य समोर येऊ नये म्हणून जे आटापिटा करतात, त्यांनाच लोयांच्या मृत्यूचे रहस्य मात्र रात्री झोपू देत नाही. त्यांना लोयापुत्राची देहबोली सतावू लागते. पण झाहिरा शेखची देहबोली बघता येत नाही. मागल्या दहापंधरा वर्षात देशातील कायदा व न्यायव्यवस्थेशी किती पोरखेळ या टोळीने केला आहे, त्याची ही नुसती तोंडओळख आहे. तपशीलात जाऊन सगळ्या गोष्टी नेमक्या मांडायच्या, तर खंडप्राय ग्रंथ लिहावा लागेल. कोणीतरी न्यायमुर्ती या भुरट्यांच्या पाखंडी नाटकाला झुगारायला अवतीर्ण होण्याची गरज होती. ते काम नववर्षाच्या आरंभी होऊन गेले आहे. जनहित याचिका वा लोकांसाठी न्याय म्हणून चाललेल्या बदमाशीचा पर्दाफ़ाश या निमीत्ताने होऊन गेला आहे. म्हणून आजच्या अनुज लोयाकडे बघितल्यावर बारा वर्षापुर्वीचॊ बिचारी झाहिरा शेख आठवली.
भाऊ तुमच्या स्मरण शक्तीला सलाम,जुन्या घटना लक्षात ठेवून त्याचा नवीन घटनांशी जोडून भंपक पणा दाखवून द्यायची क्षमता फक्त निस्वार्थी आणि प्रामाणिक पत्रकार च करू शकतो.
ReplyDelete70 लाख वाचक आपल्या ब्लॉग ला झाले त्याच हेच तर कारण आहे. निर्भीड व उतरूक्ष प्रकारे केलेली चिरफाड हे जनतेला समजत आहे.
त्यामुळे जसे आपले वाचक वाढतायत तसेच समाजात चांगले विचार पोहचतायत.
पुनःश्च एकदा सलाम.
Bhau
ReplyDelete1993 pasun nyayadhish nemnyasathi aanalelta collegium pranalicha ha parinam aahe.
Purvi raje vatandari vatayche tashi yani nyayadhish hi post vatli.
Haramachya khallela mithala jagare aaj aapan nyayadhish mhanun baghto. (majorly)
Pan shevti pratyek goshtila ant ha aahech. Ghada bharla ki futnaar.
Aaj ya vishayavar samanya mansachi samaj vadhate aahe. Aani supreme courtanepan social mediatun ji tyanchi champi hote tyachi dakhal ghetli aahe.
Thoda vel lagel pan sudharana hoil.
Atishay apratim lekh
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteछान लेख !! सुंदर तपशीलवार विश्लेषण !!....................जावेद अख्तरचा फोटो बघून एक गोष्ट आठवली........... हा माणूस स्वतः व त्याची द्वितीय पत्नी शबाना आझमी हे दोघे ' पुरोगामी ' असल्याचा देखावा करत असतात. परंतु परवा इस्राएलचे पंतप्रधान मुंबईत आले असता त्यांनी बॉलिवुडच्या कलाकारांना हॉटेल ' ताज ' मध्ये कार्यक्रमाला बोलावले होते. त्या कार्यक्रमाला एकही ' खान ' फिरकला नाही. जावेद अख्तरने तर इस्राएलच्या कार्यक्रमाला जाणे म्हणजे ' हराम ' असल्याचे ' ट्विट ' केले................ बरे झाले त्यामुळे हा किती ढोंगी ' पुरोगामी ' आहे हे कळाले.
ReplyDeleteसत्तर लाखांमध्ये टकले आहेत का?
ReplyDeletehttps://youtu.be/5OhBhOSJhOs
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteजबरदस्त
ReplyDeleteपरखड विश्लेषण
ReplyDeleteभाऊ सत्य मांडल्याबद्दल अभिनंदन
ReplyDeleteSundar aani mahitipurna.
ReplyDeleteKhup dhanyawad
Aamachya dolyat anjan aani tyanchya dolyat tikhat
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteजबरदस्त
ReplyDeleteतिस्ता सेटलवाड, अरुंधती रॉय, इंदिरा जयसिंग, मेधा पाटकर , सर्व एकाच माळेचे मणी.
ReplyDelete