Friday, January 5, 2018

नक्षली मोडस ऑपरेन्डी

Image result for koregaon violence

भीमा कोरेगावचे निमीत्त करून जे रणकंदन मागल्या दोनचार दिवसात माजवण्यात आलेले आहे, त्यात नवे काहीच नाही. निमीत्त बदलते तरी हेतू कायम असतात. असे पेटलेले वातावरण आणि जीव मुठीत धरून सैरावैरा होणारी लोकसंख्या बघितली, मग भ्रमिष्टांना त्यात क्रांतीची बीजेही दिसू लागतात. ही बीजे किती फ़ळतात, त्याचे अनुभव ज्यांच्या गाठीशी असतात, त्यांना त्यातला फ़ोलपणा उमजलेला असतो. पण त्याचे राजकीय आर्थिक लाभ उठवणार्‍यांना मात्र त्यातून येऊ घातलेल्या क्रांतीची मोहात टाकणारी स्वप्ने रंगवावीच लागतात. जिग्नेश मे्वानी वा उमर खालीद ही त्यातली नवी नावे आहेत. पण बाकीचे पडद्याआडून सुत्रे हलवणारे कोणी वेगळेच आहेत. हळुहळू त्याचे धागेदोरे समोर येतील व काही झाकलेलेच रहातील. पण ज्या पद्धतीने हा संघर्ष मराठा-दलित वा पेशवाई विरुद्ध दलित असा रंगवण्याचा प्रयास आहे, त्यामागे एक सुत्रबद्धता दिसून येते. खुप दूर जाण्याची गरज नाही. आज जसे दलित त्यात ओढले गेले आहेत, तसेच चारपाच वर्षापुर्वी मराठा तरूणही ओढले गेले होते. तेव्हाही त्याला जातीसंघर्षाचा रंग देण्याचा प्रयत्न झालेला होता. त्यातही काही राजकारण्यांनी आपापले हातपाय धुवून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. मराठा आरक्षण असे गोंडस नाव देऊन खुप भडकावू कारवाया झाल्या होत्या आणि पुतळे हलवणे फ़ोडण्यापर्यंत मजल गेली होती. त्याचे नामोनिशाण आज शिल्लक राहिलेले नाही. कोपर्डीच्या घटनेनंतर मूक मोर्चाचे आयोजन झाले, त्यात अशा नेत्यांना वा म्होरक्यांना कोणी स्थान दिले नाही. आजही पेटलेल्या तापलेल्या वातावरणाने काहीसा धुरळा उडालेला आहे. पण जे सुत्रधार आहेत, त्यांची स्वप्ने त्यातून पुर्णत्वास जाण्याची बिलकुल शक्यता नाही. सामान्य माणूस कुठल्याही जातीपंथाचा असो, त्याची मतलबी लोकांचे हेतू ओळखून त्यापासून दूर रहाण्याची विवेकबुद्धी शाबुत असल्यानेच या देशातली लोकशाही आजवर टिकून राहिलेली आहे.

भीमा कोरेगावच्या निमीत्ताने जी एल्गार परिषद योजण्यात आलेली होती, त्यात अनेक संघटना असल्याचा दावा केला जातो. त्यांची नावी समोर आलेली नाहीत. पण अशा अनेक साध्या भासणार्‍या नावांमागची प्रेरणा शहरी नक्षलवाद असल्याचे आता लपून राहिलेले नाही. कधी कबीर कला मंच वा तत्सम नावे घेऊन पुढे यायचे. तर कधी कुठल्याही अन्य जाती समुहांच्या संस्था संघटनांमध्ये शिरकाव करून, त्यांच्या दुखर्‍या भागावर फ़ुंकर घालत आगी पेटवायच्या; ही रणनिती राहिलेली आहे. त्यात काही भूमीगत असतात, तर काही बाकीच्या समाजात मिसळून उजळमाथ्याने आपले उद्योग चालवित असतात. जितके म्हणून निराश वैफ़ल्यग्रस्त राजकीय गट व संघटना आहेत, त्यांनी त्यात परस्परांशी सहकार्य करीत आपापले हेतू साध्य करण्याचा समझोता केलेला असतो. नक्षलवादी प्रवृत्तीचे लोक त्यात साळसूदपणे शिरकाव करून बसलेले आहेत. देशात सत्तांतर झाल्यापासून सत्ताभ्रष्ट झालेले कॉग्रेसी त्यांना रसद पुरवण्याचे काम करीत असतात. त्यांचा हेतू भाजपा वा हिंदूत्ववादी विचारांच्या विरोधात वातावरण उभे करण्याचा आहे. म्हणून जिथे शक्य असेल तिथे कुठल्या तरी समाज समुहाच्या दुखर्‍या जागा शोधून त्यात ठिणगी टाकण्याचा उद्योग चालूच असतो. पुरस्कार वापसीतून काही साध्य झाले नाही, तेव्हा हा नवा मार्ग शोधण्यात आलेला आहे. सहाजिकच दोन वर्षापुर्वी नेहरू विद्यापीठातला कन्हैयाकुमार तेजीतला हिरो होता आणि आज जिग्नेश मेवाणी आघाडीवर आहे. यांचे गौरी लंकेश सोबतचे फ़ोटो दोन दिवसात बघायला मिळाले आणि त्यामुळे महाराष्ट्रात उफ़ाळलेल्या हिंसेचे हेतू उघड झालेले आहेत. त्याचा नक्षली चेहरा लपू शकलेला नाही. अर्थात रस्त्यावर उतरलेल्या शेकडो हजारो दलित आंबेडकरवादी लोकांना कोणी नक्षली म्हणू शकणार नाही. पण चेहरा त्यांचा आणि हेतू नक्षल्यांचा, असा हा खेळ आहे.

यापुर्वीही दलित वस्त्यांच्या भागात अशी हिंसा व बंद झालेले आहेत. पण बुधवारी ज्याप्रकारे रस्त्यावर जमाव फ़िरून बंदसाठी धुमाकुळ घालत होते, त्यातकी कार्यशैली वेगळीच होती. दोन वाहिन्यांच्या वार्ताहरांनी एकाच नाक्यावरून तासभर केलेल्या चित्रण वार्तांकनामध्ये तो फ़रक नजरेत भरणारा होता. दोनतीनशे लोकांचा एक जमाव घोषणा देत, झेंडे फ़डकावर वहाने दुकाने बंद करण्यासाठी फ़िरत होता आणि तो मैलभर पुढे सरकला, की दुसरा दोनतीनशेचा जमाव अन्य कुठून तरी तिथेच अवतीर्ण व्हायचा. यापुर्वी हजारोचा जमाव घोषणा देत निघून गेल्यावर माघारी शांतता असायची. ही नवी कार्यशैली अनेक जागी दबा धरून बसणार्‍या व एकामागून एक हल्ले करीत दहशत माजवणार्‍या नक्षली यादवीची होती. हा फ़रक नजरेत भरणारा आहे. यातून कुठेतरी पोलिसांचा संयम सुटावा किंवा अन्य कुठल्या समाजसमुहाने रस्त्यात उतरून दोन हात करावेत, ही अपेक्षा लपून राहिली नाही. शिवसेना वा अन्य कुठल्या तत्सम संघटनेने प्रत्युत्तर द्यावे आणि हिंसेचा भडका उडावा, अशीच अपेक्षा होती. पण ती फ़ोल ठरली. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला नाही, की बाकी कुठली संघटना वा लोकसमुहाने प्रत्युत्तर दिले नाही. सहाजिकच बंद समर्थकांनी केलेल्या हिंसेपलिकडे कुठलीही हिंसा होऊ शकली नाही. नेमक्या भाषेत सांगायचे तर कुठलीही जातीय वा सामुहिक दंगल त्यातून उसळू शकली नाही. हिंसा वा धुमाकुळाला कुठूनही थोडातरी प्रतिसाद वा प्रतिकार झाला असता, तरी मुंबई वा अन्य शहरात काही दिवसांची दंगल पेटत राहिली असती. आताही तसाच प्रकार गुरूवारी गुजरातच्या राजकोट शहरात झाल्याच्या बातम्या आहेत. भीमा कोरेगाव आणि राजकोटचा दुरान्वये तरी संबंध येतो काय? नसेल तर तिथे बसेस पेटवल्या जाणे वा वहानांवर दगडफ़ेक व्हायचे काय कारण आहे? ही खास गोरिला वॉर किंवा घातपाती युद्धाची संकल्पना आहे.

ही रंगीत तालिम समजायला हरकत नाही. आजवर जंगलात किवा दुर्गम खेड्यात अकस्मात उफ़ाळणारा नक्षली हिंसाचार, आता शहरी भागात सरकू लागल्याची चिन्हे या दोन दिवसातल्या घटनांनी दाखवली आहेत. राज्याच्या गुप्तचर विभागाने मिळवलेल्या माहितीनुसार यामागे नक्षली नियोजन असल्याच्याही बातम्या आल्या आहेत. त्याची पत्रके वा अन्य काही पुरावे मिळणे ही वेगळी बाब आहे. पण या दोन दिवसांच्या धुमश्चक्रीची कार्यशैली त्याचीच साक्ष देणारी आहे. म्हणूनच या उद्रेकाचे समर्थन करणार्‍यांच्या राजकीय भूमिका तपासून बघितल्या, तर त्यामागचे हेतू उघड होऊ शकतील. नेहरू विद्यापीठात भारताचे तुकडे व बरबादी करण्याच्या गर्जना करणार्‍यांनी आता संविधानाच्या मुखवट्याखाली नक्षलवाद विकायचे दुकान उघडले आहे. ज्यांचा लोकशाही वा निवडणूकांच्या मार्गाने सत्तांतर करण्यावर विश्वास नाही वा बंदुकीच्या हिंसेच़्या मार्गानेच सत्ता बळकावण्यावर निष्ठा आहे, तेच आता गांधी आंबेडकरांच्या नावाने क्रांतीची स्वप्ने बघत असल्याचा हा साक्षात्कार आहे. आज जे दलितांच्या अस्मिता घेऊन आपला चेहरा त्यामागे लपवित आहेत, तेच उद्या अल्ला हो अकबरची डरकाळी फ़ोडून मुस्लिमांच्य अस्मितेचा मुखवटा पांघरतील, याबद्दल खात्री बाळगायला हरकत नसावी. कधी प्रादेशिक अस्मिता, तर कधी पर्यावरणाचे बुरखे पांघरून आपला अजेंडा पुढे रेटण्याचा हा खेळ आहे. त्यात उदारमतवादी मनोरंजन करून घेण्य़ासाठी सहभागी होणार आणि त्यांचाच त्यात बळी पडण्याची शक्यता नेहमी असते. रोहित वेमुलापासून मेवाणी खालीदपर्यंत हेही त्यातले मोहरेच आहेत. त्यांच्याच तात्कालीन भावना प्रक्षोभाच्या इंधनावर अशा हिंसक क्रांतीच्या सोहळ्यांचे आयोजन केले जात असते. मात्र त्यात सरपणासारखे होरपळून गेल्यावर त्यांच्याकडे तक्रार करण्याचेही अवसान शिल्लक राहिलेले नसते. असे एल्गार स्वातंत्र्योत्तर काळात शेकड्यांनी होऊन गेलेत. पण भारतीय लोकशाही त्याला पुरून उरलेली आहे.

9 comments:

  1. जबरदस्त सर, घटनेमागची कारणे आपण लिहल्या प्रमाणे बराेबर आहेत.

    ReplyDelete
  2. what you have written is a very serious matter, all of us must take precaution and appropriate action, we must avoid this,

    ReplyDelete
  3. इथले पत्रकार नक्षली पनकाही कमी नाहीत.तुम्ही म्हनताय ते खर आहे त्यांना पोलिसांनी किंवा इतरांनी उत्तर द्यावे असे वाटत होते पन तसे झाले नाही. त्यामुळे ते चरफडतायत तेही ट्विटरवर.

    ReplyDelete
  4. bhau far aswasth watay ho kahhi diwasan pasun.. kay challay hya maharashtrat kahi kalat nahiye... sarkarla kevde adhikar astat pan he sarkar kahi karel asa disat nahi.. fakt apli khurchi ani satta jau naye mhanun ncp ani shivsenela khelvat basnare ka??
    kahi tari thos paul uchlaun karvayi karel asa majbut sarkar asayla hava hya maharashtrat..
    nahi tar ahech pudhcha CM ajit dada..

    ReplyDelete
  5. bhau rognidaan tumhi kelay...
    upcharahi tumhich suchva...
    policani asach hatavar hath theun basaycha ka???

    ReplyDelete
  6. भाऊ आपलं सगळंच लेखन हे नुसतंच अभ्यासपूर्वक तर असतंच अन सडेतोड देखील मी आपला फॅन आहे , लोकशाही अन संविधान च्या आडून आपापले उद्दिष्ट साध्य करणारे लालू भालू सोनिआ माया ममता गेलेली जया जाणते राजे..लिस्ट मोठी आहे आता देश सर्वोतोपरी त्याच्या आड येणारे सगळं शून्य...अन मातीमोल बिनकामाचं ...म ही टिनपाट लोकशाही अन भंकस संविधान ...900 कोटी खाऊन साडे तीन वर्षे सजा 5 लाख दंड अन बेल वाजवली की सुट्टी ...घंटा ह्या फालतु गोष्टी...असह्य झालं तर सामान्य माणूस च म खबर घेईल

    ReplyDelete
  7. असहमत होण्याचं कारणच नाही. एकाच मुद्दा आहे, ह्यांना नक्षली म्हणावे का अराजक ? कारण नक्षली म्हटले तर संबंध नक्षलवादाशी जोडला जातो, आणि नक्षलवादाला काही भूमिका होती. तिच्याशी मी सहमत नाही. मात्र आज हे जे लोक आहेत ते केवळ अराजक माजवण्याच्या उद्देशाने कार्यरत आहेत. त्यांना नक्षली म्हटले तर उगाच कॉम्रेड लोक शब्दांची पिसे काढत बसतील म्हणून मला अराजक हा शब्द अधिक चपखल वाटतो.

    ReplyDelete
  8. एकच बाजू अधोरेखित केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, अस्पृश्यता ही कुष्ठरोग्यांबद्दल देखिल पाळली जाते आणि दलितांबरोबर देखिल पाळली जाते परंतु फरक हा असतो की, कुष्ठरोग्यांबद्द्ल सवर्णांचा मनात करुणा असते पण अस्पृश्यांबद्दल घृणा. याचाच प्रत्यय तुमचा वरील लेख वाचून आला. ३ तारखेच्या बंद बद्द्ल लिहताना तुम्ही १ तारखेला बाहेरून आलेल्या निरपराध अबालवृद्धांवर झालेल्या भ्याड हल्याबद्द्द्ल तुम्ही अवाक्षर ही काढलेले नाही. २९ तारखेला गोविंद गायकवाड यांची समाधीची विटंबणा केली गेली त्यानंतर काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात अ‍ॅट्रोसिटी देखिल लागला होता याचाच बदला म्हणून १ तारखेला वढू गावात मिटींग आयोजि केली होती. त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र भिमा-कोरेगाव, वढू व आसपासच्या गावातील दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्यासाठी धमकावण्यात आले असे तेथिल दुकानदार स्वत: सांगतात. दगडफेक करण्यासाठी बाहेरून हल्लेखोर बोलवण्यात आले असे तेथिल ग्रामस्थ कबुल करतात हा नक्षलवाद नाही का? दोन मजली तिन मजली घरांचे जीने गेटने बंद करण्यात आले होते मात्र त्याच घरातून स्त्रिया देखिल दगडफेक करत होत्या असे तेथिल प्रत्यक्ष दर्शींचे म्हणने आहे. तुम्ही ज्या यल्गार परिषदेबद्दल बोलता त्या यल्गार परिषदेमधील हे लोक नव्हते तर कोण्या भिडे आणि एकबोटेचे लोक होते असे ग्रामस्थांचे काय तर संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे देखिल म्हणने आहे. उगाच एखाद्या समुदायाला लक्ष करण्याच्या दृष्टीने केलेला हा तुमचा शब्द प्रपंच आहे.
    दलितांनी हक्क मागितले किंवा अन्यायविरुद्ध प्रतिकार केला तर त्याला नक्षली कारवाया बोलून बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे.

    ReplyDelete