बिहारच्या आपल्या दौर्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनराव भागवत यांनी जे भाषण केले, त्यातला अर्धवट भाग उचलून खुप काहूर माजवण्यात आले. अर्थात आजकाल कुठल्याही विषयात समजून घेण्यापुर्वीच काहुर माजवण्याला वैचारिक क्रांती मानले जात असल्याने, मुळात भागवतांचे विधान काय आहे, तिकडे कोणाला वळून बघावेसे वाटणे शक्यच नव्हते. झालेही तसेच! त्यांच्यावर सैन्याचा अपमान केल्याच्या आरोपापासून माफ़ीच्या मागणीपर्यंत झेप घेतली गेली. संघ वा भाजपा यांच्यावर खर्याखोट्या गोष्टींसाठी टिकेची झोड उठवण्यालाच बुद्धीकौशल्य मानले जात असल्यावर यापेक्षा अधिक काही अपेक्षाही बाळगता येत नाही. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. भागवत मुळात काय म्हणाले होते? कुठल्याही आपात स्थितीत सैन्याला सज्ज व्हायला सहा महिने तरी लागतात. संघाचे स्वयंसेवक दोनतीन दिवसात तशा आपत्तीचा मोर्चा संभाळू शकतात. अर्थात गरज असेल तर आणि राज्यघटना मान्यता देत असेल तर. असे म्हटल्यावर सैनिक वा सेनादल केवळ लढाईच करण्यासाठी असते वा तितके़च काम करते, अशी ज्यांची बालबुद्धी आहे, त्यांना स्वयंसेवक आणि सैनिक यांची तुलना करायची हुक्की आल्यास चुकीचे काही़च नाही. ते त्यांच्या बालबुद्धीला शोभणारे़च असते. पण वास्तवात सैन्य कायम सीमेवर खडा पहारा देत उभे नसते, की कायमच युद्धसज्ज नसते. युद्धाची वेळ आली तर त्याला सज्ज होण्यासही काही काळ जातो. युद्ध नसते त्या काळात सैनिकांना अनेक आपत्तीच्या प्रसंगी लोकांच्या मदतीला धावावे लागत असते. त्यावेळीही सैन्याला आपला लवाजमा गोळा करण्यासाठी काही काळ द्यावाच लागतो. संघाचे स्वयंसेवक तितक्याच राष्ट्रभक्तीने प्रेरीत असल्याने आपली कामे बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धावायला सज्ज असतात, इतकाच त्याचा अर्थ आहे.
सैनिक लढतात वा कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी धावतात, तेव्हा त्यांनाही बिगरसैनिकी सहाय्यकांची मदत आवश्यक असते. तेही काम उथळपणे करून चालत नाही, तर शिस्तीने करावे लागत असते. ती शिस्त कुठल्या राजकीय कार्यकर्त्याकडे नसते. पण नऊ दशके अशाच कामात व्यग्र असल्याने संघाच्या स्वयंसेवकात ती शिस्त रुजलेली आहे. तिचा भारतीय लष्कर उपयोग करून घेऊ शकते. अर्थात तो करावाच असा भागवतांचा हट्ट नाही. तशी गरज असेल आणि राज्यघटना त्याला मान्यता देत असेल, तरच तसे करावे अशी भागवत यांची सुचना आहे. पण ते समजून घेणार्या सामान्य लोकांसाठीचे वक्तव्य आहे. असामान्य बुद्धीमत्ता संपादन केलेल्या लोकांना हे ‘सामान्यज्ञान’ कुठून असावे? असामान्य बुद्धीमत्ता उपजतच असलेल्यांसाठी आपल्या घरातला प्रश्नही सरकारने सोडवला पाहिजे अशी भूमिका असते. वाजपेयी सरकार सत्तेत असताना ओडिशात महापूर आलेला होता आणि तिथे दौरा करायला गेलेल्या संरक्षणमंत्री जॉर्ज फ़र्नांडीसांनी एक अनुभव असा घेतला, की त्यांना खुपच संताप आलेला होता. पुरात बुडालेल्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते आणि त्या गुडघाभर पाण्यात असलेले आपल्याच आप्तेष्टांचे मृतदेह सुद्धा बाहेर काढण्याची कोणा पुरग्रस्ताची तयारी नव्हती. ते काम सेनादलाने उरकावे म्हणून ते ग्रामस्थ प्रतिक्षेत बसलेले होते. नातेगोते व जन्मसंबंधही विसरून बसलेल्या त्या भावनाशून्य लोकांची ती अलिप्तता बघून फ़र्नांडीस यांना संताप आला होता. गुडघाभर पाण्यात मृतदेह सडत ठेवण्याचा हा नाकर्तेपणा, त्याच असामान्य बुद्धीच्या शहाण्यांनी समाजाच्या मनात रुजवलेला आहे. त्यामुळे लष्कराला अशा संकटावर मात करायलाही धाव घ्यावी लागते. तेव्हा संघाला शहाणपण शिकवणारे कुठे असतात? अशावेळी संघाचे लोक वा स्वयंसेवक काय करतात, त्याचाही खुलासा पुणे जिल्ह्याच्या माळीण गावातील रहिवाश्यांना आलेला आहे.
पुण्याच्या माळीण गावात अतिवृष्टीने दरड कोसळली आणि गावाची एक वस्तीच चिखलात गाडली गेलेली होती. तेव्हा तिथे सरकारी यंत्रणा व सैनिकी पथके पोहोचायला विलंब झाला होता. तिथे सर्वात आधी पोहोचले ते संघाचे स्वयंसेवक आणि त्यांना मृतदेहांचे अंत्यसंस्कार करायला रुग्णवाहिका व शववाहिन्या देण्यासाठी सरकारच्याच अधिकार्याने खास पत्र दिले होते. सरकार कॉग्रेस राष्ट्रवादीचे होते. कोणी पुरोगामी संस्थांचे कार्यकर्ते तिथे फ़िरकले नव्हते. तिथेच नव्हेतर देशात अशा दुर्घटना घडतात तेव्हा कुणाचेही आदेश मिळालेले नसताना संघाचे स्वयंसेवक धाव घेतात. त्यांना किती वेळ लागत असतो, याचा हिशोब कोणी मांडला आहे काय? माळीण हे त्याचे उत्तर आहे. असे कामही सेनादलाचे असते आणि त्यात जवळचे स्वयंसेवक तात्काळ पोहोचतात. तिथे लढाई चालू नसते. पण देशावर आलेले प्रत्येक संकट आपत्ती म्हणजे युद्धप्रसंग समजून त्यात झोकून देण्याची इच्छा ज्यांच्यात भरलेली असते, त्याला देशाचा सैनिक समजले जाते. सैनिक म्हणजे फ़क्त ठराविक गणवेशातला वा हाती बंदुक घेऊन लढणारा, इतकीच ज्यांची बालबुद्धी आहे, त्यांना याचा अर्थ समजणार नाही. भागवतही त्यांच्यासाठी ते विधान बोललेले नाहीत. त्यांच्या समोर बसलेल्या स्वयंसेवकांसाठी भागवत बोलले आणि त्यांनाही त्याचा अर्थ उमजलेला आहे. तो विषय सामान्य बुद्धीचा आहे ना? म्हणून तर न्यायमुर्ती के. टी. थॉमस यांनाही अशा विधानाचा अर्थ समजू शकतो. तसे नसते तर त्यांनी काही आठवड्यापुर्वीच केरळात त्याची जाहिरपणे ग्वाही दिली नसती. धर्माने ख्रिश्चन असूनही सुप्रिम कोर्टाचे निवृत्त न्यायमुर्ती थॉमस यांनी तथाकथित पुरोगाम्यांना थक्क करणारे विधान केलेले होते. खरेतर भागवतांपेक्षाही त्यांचे विधान अधिक नवलाचे होते आणि त्यांच्याकडून अतिशहाण्यांनी माफ़ीची मागणी करायला हवी होती. थॉमस काय म्हणाले होते?
यावर्षाच्या आरंभी केरळात कोट्टायम येथे संघाच्या स्वयंसेवकांचा मेळावा झाला होता. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना थॉमस म्हणाले होते, ‘चार घटकांनी भारत हा खंडप्राय देश अखंडीत ठेवला आहे. पहिली गोष्ट म्हणजे देशाची राज्यघटना, दुसरी गोष्ट लोकशाही आणि तिसरी गोष्ट भारतीय सेनादल. त्यानंतर देश अखंड राखण्याचे श्रेय रा. स्व. संघाला आहे’, असे थॉमस यांनी छातीठोकपणे सांगितले. यापेक्षा आणखी कोणा भुरट्याचे प्रमाणपत्र संघाला मिळण्याची गरज नाही. भारतीय सेनादल आणि संघाची इतकी योग्य तुलना थॉमस यांच्यासारख्या ख्रिश्चन न्यायमुर्तीने केली असेल, तर त्याची कारणे समजून घेतली पाहिजेत. अर्थात काहीही समजून घेण्याची गरज नसलेल्या शहाण्यांचा भरणा भारतात अतिशय झाला असल्याने, भागवतांच्या विधानावर काहूर माजणे स्वाभाविक होते. पण त्यापैकी कोणालाही थॉमस यांना जाब विचारायची गरज वाटली नाही. केरळात झाला तोही स्वयंसेवकांचाच मेळावा होता आणि बिहारमध्ये झाला तोही तसाच मेळावा होता. दोन्हीकडे जवळपास सारखीच विधाने झालेली आहेत. पण थॉमस यांच्या विधानाचा गवगवा कुठेही झाला नाही. तरी भागवतांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची शर्यत रंगली. त्यातून अशा अर्धवट शहाण्यांच्या अज्ञानाचीच प्रचिती येऊ शकते. कारण संघ व सैन्याच्या तुलनेला आक्षेपच घ्यायचा असेल, तर ती तत्परता थॉमस यांच्या विधानानंतर लगेच दिसायला हवी होती. पण विधान कुठले वा तुलना कुठली याच्याशी कोणाला कर्तव्य आहे? टिंगल टवाळ्या करणार्या टपोरी वृत्तीच्या भुरट्यांना बुद्धीमांत ठरवले, मग अशा उथळ पाण्याचा खळखळाट होणारच ना? पण तुलना इथेच संपणारी नाही. संघाच्या स्वयंसेवकांना इतकीच खुमखुमी असेल तर थेट सीमेवर कशाला जात नाहीत, अशीही अक्कल काही शहाण्यांनी पाजळली आहे. तिचे उत्तर नोंदलेल्या इतिहासात सापडू शकते.
काश्मिरात जिहादी धुमाकुळ सुरू झाला नव्हता, तेव्हा खलिस्तानी दहशतवाद बोकाळला होता. अशावेळी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरात धमाल उडवून देण्याची एक कल्पना भारतीय हेरखात्याच्या डोक्यात घुटमळत होती. देशात विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या जनता दलाचे राज्य होते आणि त्यांना डावी आघाडी व भाजपाने पाठींबा दिलेला होता. त्याचवेळी काश्मिर पेटवण्याच्या हालचाली पाकिस्तानात सुरू होत्या. तर त्याला शह देण्यासाठी भारतानेही फ़िदायीनसारखे घातपाती पाकव्याप्त काश्मिरात पाठवण्याची कल्पना विचारात घेतलेली होती. हे घुसखोर कडवे देशप्रेमी व वेळ आली तर आत्मसमर्पण करणारे असायला हवे होते. म्हणून त्यात संघाच्या निवडक लोकांना सहभागी करून घेण्याचा विचार झाला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही त्याला मान्यता मिळालेली होती. पंतप्रधान सिंग यांचीही त्याला मूक संमती होती. म्हणूनच जम्मूतील संघाचे नेते व हेरखात्याच्या काही अधिकार्यांची एक बैठक जम्मूतल्या हॉटेलमध्ये झाली आणि दुसरी बैठक दिल्लीच्या अंबॅसेडर हॉटेलात झालेली होती. त्यासाठी तात्कालीन कॅबिनेट सचिव विनोद पांडे यांनीच रॉ नामक संस्थेच्या वरीष्ठांवर दबावही आणलेला होता. पण पुढे राजकारण बदलत गेले आणि विषय गुंडाळला गेला. सिंग व भाजपा यांच्यात बाबरी राममंदिर विषयावरून वाद सुरू झाला आणि ते सरकारही कोसळले. त्यामुळे संघ स्वयंसेवकांना अशा कामात गुंतवण्याचा विषय पुर्णपणे मागे पडला. याचा काहीसा तपशील भारतीय हेरखात्याचे तात्कालीन अधिकारी बी. रामन यांनी आपल्या पुस्तकात कथन केला आहे. अर्थात संघाचे तेव्हाचे प्रवक्ते राम माधव यांनी त्याचा साफ़ इन्कार केलेला आहे. पण रामन हे इतक्या उथळ गोष्टी लिहीणाते अजिबात नव्हते. म्हणूनच त्यांच्या पुस्तकातील हा उल्लेख गंभीरपणे घ्यावा लागतो.
The Kaoboys of R&AW -- Down memory lane असे बी. रामन यांच्या पुस्तकाचे नाव असून, दहा वर्षापुर्वीच ते प्रसिद्ध झालेले आहे. त्यात संघाच्या स्वयंसेवकांची कुवत सिद्ध झालेली आहे. रामन यांच्यासारखा अनुभवी गुप्तचर अधिकारी गंमत म्हणून अशा गोष्टी सांगत नसतो. पण मुद्दा सीमेवर किंवा पुढे पाकव्याप्त प्रदेशात जाऊन देशासाठी लढण्याचा आहे आणि त्याचे आव्हान देणार्यांसाठी हा इतिहासाचा दाखला आहे. देशासाठी लढणारा कुणी प्रशिक्षित सैनिक असो वा त्यासाठी झपाटलेला तरूण असो, त्याची राष्ट्रनिष्ठा अधिक प्रभावी असते. त्यासाठी शिक्षण प्रशिक्षण तितके महत्वाचे नसते. कसाबसारखे घातपाती जिहादी फ़ार शिकलेले व कसबी नसतात. त्यांच्यात आत्माहुती देण्याची प्रबळ इच्छाच देशाच्या सुरक्षेसाठी सर्वात प्रभावी हत्यार असते. ते काम थॉमस किंवा हेरखाते संघाच्या कार्यकर्त्यावर सोपवू बघते आणि पाकिस्तान तशाच कारणास्तव मणिशंकर अय्यर यांची निवड करते; हा फ़रक लक्षात घेतला पाहिजे. किंबहूना मणिशंकर अय्यर यांना पाकविषयी असलेले प्रेम आणि संघविषयी असलेला तिटकारा, हे खरे प्रमाणपत्र असते. आपले स्वयंसेवक देशासाठी कुठलेही बलिदान देण्यास केव्हाही सज्ज असल्याची साक्ष भागवतांना अशा विधानातून द्यायची असते. पण मणिशंकर अय्यर यांना नेता मानणार्यांना भागवतांचा हेतू वा आशय कसा कळावा? सैनिक म्हणजे हाती हत्यार घेतलेला व अखंड युद्धजन्य मनस्थितीत जगणारा, असे ज्यांच्या बालबुद्धीला पटलेले आहे, त्यांना समजाव्ण्यात अर्थ नसतो. त्यांनी युद्ध चित्रपट बघावेत आणि त्यातले रांबो किंवा पराक्रम बघण्यात धन्यता मानावी. नोकर्या कुठे आहेत म्हणून प्रश्न विचारणार्यांना, कुठल्याही प्रसंगासाठी कायम देशाच्या सेवेत रुजू होण्याची मानसिकता कधीही समजून घेता येणार नाही.
कुठल्याही देशात व समाजात कायम युद्धाची स्थिती असते. शत्रूने हल्ला केला म्हणजेच लढावे लागत नसते, की फ़क्त सैनिकच लढत नसतात. त्या सैनिकांच्या मागे किती ठामपणे देशाची जनता उभी आहे, यावर लढाईचे भवितव्य अवलंबून असते. म्हणूनच अशा सेनेला हिंमत देणारे व प्रसंगी त्यांना मदत करायला धावून जाणारेही स्वयंसेवक आवश्यक असतात. ते संघाच्या मुशीतून तयार केले जात असतात. नव्याने सैन्य उभारायचे तर भरतीमध्येच काही महिने खर्ची पडतात. पण थोड्याफ़ार शिस्तीची जाण असलेले व देशासाठी जीव ओवाळून टाकायला सज्ज असलेले तरूण, एका जागी मिळाले तर अल्पावधीत मोठी फ़ौज उभारता येते. तशी गरज भासली तर स्वयंसेवकांची मोठी संख्या केव्हाही सज्ज आहे, इतकेच त्यातून भागवतांना सांगायचे होते. पण समोर बसलेल्यांना जे समजले ते बुद्धीमंतांना कसे समजावे? आणि समजले तरी ते समजण्यातच आपली बुद्धी निकामी झाल्याची भिती असेल, तर वेगळी कोणती अपेक्षा करता येईल? शहाण्यांकडून समाजाचे प्रश्न सुटले असते आणि वैचारीक विवादाने समस्या सुटल्या असत्या, तर कुठल्याही देशाला सैन्यावर खर्च करावा लागला नसता. सामान्य सैनिकांना बलिदान करावे लागले नसते किंवा मानवी इतिहासात लाखोच्या संख्येने निरपराधांना हकनाक मरावेही लागले नसते. शहाण्यांना त्यांच्याच शब्दांचे अर्थ लावता येत नाहीत की समोरच्याच्या शब्दांना समजून घेता येत नाही. म्हणून युद्धाचा भडका उडतो आणि त्यात सामान्य बुद्धीचे नागरीक मारले जाताता. तितक्याच बुद्धीच्या सैनिकांना मरावे लागत असते. शहाण्यांना कधीच आपल्या प्राणाचे व सुरक्षेचे मुल्य मोजावे लागत नाही. म्हणूनच त्यांना स्वयंसेवक व सैनिक यातलाही फ़रक कधी समजून घेता येणार नाही. शब्दांचे बुडबुडे उडवण्यात हयात खर्ची घालणार्यांना दुसर्यासाठी जगणे किंवा मरणे याचा अर्थ कसा उमगावा?
अप्रतिम
ReplyDeleteApratim..itihas sakshi aahe, jyana sangh mahiti nahi ttech lokk thampane sangha baddall boltat.
ReplyDeleteभाऊ, तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते पोहोचले आमच्यापर्यंत, पण ..............
ReplyDeleteहा पण फार विचित्र आहे. कानाने बहिरे पुढारी सध्या फार झाले आहेत.अर्धवट ऐकणे हा त्यांचा गुणधर्म आहे. हा लेख त्यांच्या डोळ्याखालून कोण घालणार, किंवा वाचून कोण दाखविणार ?
एकदा जज्ज हा विषय चर्चेत असतो. त्यात एक जण म्हणतो की शिक्षा म्हणून जज्जला फाशी द्यायचा अधिकार असतो. हे पुढारी जज्जला फाशी एव्हढेच वाक्य ऐकतो व सगळीकडे जज्जला फाशी असे ओरडत सुटतो. असे आहेत सध्याचे पुढारी.
संघावर टीका करणे हा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे
ReplyDeleteग्रेट सर, रा.स्व. संघाचे कार्य खरेच फार चांगले आहे. पण काही लोक मुद्दाम खोटी व द्वेष पुर्ण माहिती पसरवत असतात. धन्यवाद
ReplyDeleteआता काई आम्ही सीमेवर वगैरे मरायला-मारायला जाणार नाही. एकतर आम्ही आता संघिष्ट नाही आणि दुसरं असं की आता हाणामाऱ्या आणि धावपळ करायचं वय राहिलं नाही. तिसरं असं की सर्व काही उघडपणे बोलायचं नाही. चौथं असं की जी बोलतो ते करायचं नाही. पाचवं असं की अजून काही सुचलेलं नाही.
ReplyDeletechapkhal
ReplyDelete