अमिताभच्या आधीचा सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना याला ‘आराधना’ चित्रपटाने खुप मोठा करून ठेवले. त्यात त्याचा डबलरोल होता. यापैकी पुत्र राजेशची प्रेयसी म्हणून फ़रिदा जलालने अप्रतिम काम केले होते. पण आज तिचे स्मरण त्या अभिनयापेक्षाही त्याच चित्रपटातील एका गीतामुळे होते. काहीसे संवादमय असलेल्या या गीतामध्ये राजेश आपल्या प्रेयसीकडून प्रेम कबुल करण्याच्या प्रयत्नात असतो आणि ती त्यात शब्दाने फ़सायला तयार नसते, असे गीत होते. ‘बागोमे बहार है?’ असे प्रश्न तो विचारत जातो आणि नकळत तिने होकार द्यावा, असा मध्येच प्रश्न टाकतो, ‘तुमको हमसे प्यार है?’ त्यावर फ़रिदा ना ना म्हणून झटकून टाकते. अखेरीस एका वळणावर ती असेही सांगून टाकते, ‘लेकीन वो ना कहुंगी, जिसका तुमको इंतजार है’. नेमकी तशीच आजकाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची अवस्था झालेली आहे. ते वाटेल ते बोलतात, कशावरही मतप्रदर्शन करतात. पण पत्रकार वा चिकित्सकांना त्यांच्याकडून ज्या माहिती व तपशीलाची अपेक्षा आहे, त्याबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. कोणी विचारण्याचा प्रयास केला तर कॅमेरासमोरून अक्षरश: पळ काढतात. तो विषय आहे, त्यांच्या सुपुत्र कार्टी चिदंबरमचा किंवा नुकत्याच उजेडात आलेल्या नीरव मोदीच्या बेताल कर्जलूटीचा! बाकी मोदी सरकारच्या अर्थसंकल्प वा आर्थिक धोरणांविषय मनमुराद मुक्ताफ़ळे उधळणारे चिदंबरम कार्टी वा नीरवचा विषय आला, मग थेट फ़रीदा जलाल होऊन जातात. तिने तरी निदान ना ना ना असे म्हणत उत्तर नाकारले होते. चिदंबरम आपल्याला प्रश्न ऐकूच आला नाही किंवा प्रश्न विचारणारा अस्तित्वातच नाही, असे भासवून काढता पाय घेऊ लागतात. कारण ज्या गोष्टी विचारल्या जातील, त्याचा इन्कार करणे शक्य नाही आणि कबुलीही देण्याची सोय नाही. त्यापेक्षा पाठ वळवणे आणि जेटलींना शहाणपण शिकवणे सोपे आहे ना?
युपीए सरकारमध्ये दिर्घकाळ चिदंबरम अर्थमंत्री होते आणि त्यात बहुतांश आर्थिक घोटाळ्याचे विक्रम साजरे करण्यात आले. मध्यंतरी काही काळ चिदंबरम यांना आपले लाडके खाते सोडून गृहमंत्री व्हावे लागलेले होते. पण त्याही काळात गृहखात्याचे विषय सोडून हे गृहस्थ कायम अर्थविषयक मतप्रदर्शन करीत असायचे. आताही त्यांनी ज्या विषयांचे खुलासे करावेत असे डझनावारी प्रश्न आहेत. पण त्यविषयी एकही शब्द ते बोलत नाहीत आणि आपण अर्थमंत्री असतो, तर काय केले असते; त्याविषयी फ़ुशारक्या मारत असतात. त्यापैकी ताजी वल्गना राजिनाम्याची आहे. आपण जेटलींच्या जागी असतो तर अमूकतमूक चुकीसाठी राजिनामाच दिला असता, असे काही चिदंबरम यांनी म्हटलेले आहे. असतो तर कशाला होतात, तेव्हा राजिनामा दिला असता तर असे अभिमानाने आज म्हणता आले असते. नीरव किंवा विजय मल्ल्या यांना बेताल बिनतारणाची कर्जे दिली गेली आणि देशाची लूटमार चालू होती, तेव्हा राजिनामा देण्याची वेळ होती. कारण तेव्हा चिदंबरम हेच अर्थमंत्री होते आणि राजिनामा फ़ेकावा असा दिवाळखोर कारभार चाललेला होता. पण तिकडे डोळे उघडून बघण्याची हिंमत ता गृहस्थांना झाली नाही, तर राजिनाम्याची गोष्ट येते कुठे? ह्या दिवाळखोरी माजवणार्या शेकडो व्यापारी, उद्योगपतींना जवाहिर्यांना बुडवायला हजारो कोटीचे कर्ज कोणी दिले? युपीए सरकारने दिले आणि त्यातले अर्थमंत्री चिदंबरमच होते ना? त्याविषयी बोलायची बिशाद नाही आणि एनडीए सरकारने स्वच्छ अभियानासाठी देशात किती शौचालये बांधली वा त्यात पाणी पुरवठा करण्यासाठी जोडण्या कशा दिल्या नाहीत, त्यावर हे अर्थशास्त्री पांडित्य सांगत आहेत. त्यासाठी अर्थमंत्र्याने राजिनामा द्यायला हवा, असे त्यांचे अभ्यासपुर्ण मत आहे. म्हणूनच मग हे अर्थशास्त्री कुठल्या ‘केबिन’मध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करतात, असा प्रश्न विचारणे भाग आहे.
त्या चित्रपट गीतामध्ये जशी फ़रीदा जलाल राजेश खन्नाच्या प्रत्येक गैरलागू प्रश्नांना सहजगत्या उत्तरे देते आणि कुठलाही प्रश्न टाळत नाही, तसेच चिदंबरम समोर आलेल्या कुठल्याही विषयावर आपले मतप्रदर्शन हक्काने व हट्टाने करीत असतात. मात्र थेट त्यांच्याशी निगडीत वा भिडणारा प्रश्न असला, की नानाना असेही म्हणत नाहीत, तर थेट पळ काढतात. एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे, की त्यांच्याच कारकिर्दीत एनपीए म्हणजे दिवाळखोरीत गेलेल्या हजारो कोटीच्या कर्जाची परतफ़ेड अशक्य झाली होती आणि ती वसुली करण्यापेक्षा सरकारी दबावाखालीच अशा दिवाळखोरांना अधिकाधिक बुडवेगिरीसाठी आणखी काही हजार कोटी रुपयांची खिरापत वाटली गेली आहे. तर बुडव्यांना असे अधिक दिवाळ्खोर कर्ज देण्यात कुठले महान अर्थशास्त्र सामावलेले होते? त्याचे विवेचन चिदंबरम यांनी केले तर लोकांना हवेच आहे. पण त्याबद्दल विषय निघाला की चिदंबरम पोबारा करतात. उलट अन्य कुठल्या म्ह्णजे शौचालये वा दुर्गम भागातल्या वीज पुरवठ्याविषयी पांडीत्य सांगायला पुढे सरसावतात आणि जेटली यांचा राजिनामा मागतात. त्याच्याही पुढे जाऊन कुठलेही पद हाताशी नसताना त्या पदाचा राजिनामा द्यायला कंबर कसून उभे ठाकतात. इतकीच राजिनाम्याची त्यांना हौस होती, तर त्यांनी अर्थमंत्री पदावर असताना मल्ल्या किंवा नीरव मोदींचे अधिकचे कर्ज रोखण्यावरून राजिनामा फ़ेकायला हवा होता. तर आज त्यांचे गुणगान जेटलींनी केले असते आणि नरेंद्र मोदींनी सगळ्यांना बाजूला सारून चिदंबरम यांनाच भारताचे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी घेण्यासाठी पायही धरले असते. पण जेव्हा वेळ होती, तेव्हा राजीखुशीने अक्कलहुशारीने बुडव्यांना बॅन्का लुटू दिल्या आणि आता राजिनाम्याच्या फ़ुशारक्या मारल्या जात आहेत. माणसे किती निर्लज्ज असू शकतात, त्याचे नमूने पेश करायचे काम त्यांनी हाती घेतले आहे काय?
बाकी मोदी सरकार वा त्यांच्या मंत्र्यांना सल्ले देण्याची गरज नाही. त्यांच्या कर्माची वा चुकांची फ़ळे ते भोगतीलच. पण चिदंबरम यांनी आपल्या कारकिर्दीत जे काही दिवे लावले त्याचा उजेड पडू लागलाय. त्याला डोळे उघडून सामोरे जाण्याची जरा हिंमत दाखवावी. त्यावरून मुक्ताफ़ळे उधळत सुटलेल्या आपल्या पक्षाध्यक्षाला समज सल्ले देऊन पोरकट ट्वीट करण्यापासून आवरले तरी खुप मोठे काम होईल. मग स्वपक्षीय मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या जावयाच्या कर्जबुडव्या विषयावरून मोदींना जाब विचारण्याचे ट्वीट केले जाणार नाहीत आणि ते मागे घेण्याची नामुष्की कॉग्रेसवर येणार नाही. सुरजेवाला यांना पुढे करून बिळात बसायचे आणि जेटलींना सल्ले द्यायचे, हे कुठल्या परदेशी इकॉनॉमिक स्कुलमध्ये शिकवले जाते? हे विषय निघतात, तेव्हा पक्षाची बाजू मांडायला हिंमतीने चिदंबरमम यांनी पुढे यायला हवे ना? पण तिथे टेपरेकॉर्डरप्रमाणे बोलणार्या सुरजेवाला यांना पुढे करून चिदंबरम बिळात बसतात. मिस्टर चिदंबरम ती वेळ होती राजिनाम्याची, जेव्हा अशा बिनतारणाच्या कर्जाची लुटमार चालू होती. तेव्हा राजिनामा फ़ेकला असतात, तर देशाची संपत्ती वाचली असती आणि आज लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतले असते. भले सोनियांच्या काळ्या यादीत गेला असता आणि राहुलने दाराशी उभे केले नसते. पण जनतेने मोदी-जेटलींपेक्षा तुमचेच कौतुक केले असते. आताच्या फ़ुशारक्या म्हणजे नाराजीनामे आहेत. दिले कोणी घेतले कोणी? आणि होय, कॉग्रेसमध्ये राजिनाम्याची परंपरा कुठे आहे? कंबरड्यात लाथ घातल्याशिवाय राजीखुशीने खुर्ची सोडतो कोण? शिवराज पाटलांना कसे जावे लागले? अश्विनीकुमार वा पवनकुमार बन्सल कोणत्या मार्गाने गेले? युपीएला लोकांनी राजिनामा घेऊन बाजूला केले नव्हते? हाकलून लावले होते ना? तेव्हा ही ‘आराधना’ पुरे झाली. खरे बोलायची अडचण असेल तर निदान गप्प रहाण्याची सवय तरी लावून घ्या.
भाऊ ...........एकदम मस्त लेख !! सुरजेवाला ला ' टेंपरेकॉर्डरची ' उपमा एकदम ' चपखल '..............................बाळासाहेब चिदम्बरमला ' लुंगीपुचाट ' म्हणायचे त्याची आठवण झाली.
ReplyDeleteटेप रेकॉर्डर जरा जास्त होते आहे. पूर्वीचा HMV मोनोग्राम चपखल उपमा होईल.
Deleteअतिशय समर्पक व्यंगचित्र. मा. राजसाहेब अशी व्यंगचित्रे कधी काढायला शिकणार?
ReplyDelete