Monday, March 26, 2018

एक मालवणी किस्सा

modi cartoon kureel के लिए इमेज परिणाम

घरातलीच गोष्ट आहे. घरातली म्हणजे कुटुंबातली. माझ्या वडिलांकडे एक जुन्या काळातली डॉज गाडी होती आणि तिचे पंक्चर झालेले चाक बदलण्याच्या कामात ते गर्क झालेले होते. तेव्हाच त्यांचा एक मित्र घरी आलेला आणि थोड्या वेळात चाक बदलून मोकळा होतो, असे सांगून त्याला वडीलांनी बसवून ठेवलेला. बराच वेळ त्यांची चाकाशी झुंज चालली होती आणि तो मित्रही बघत होता. मुळात चाक निघत नव्हते, तर बदलण्याची काय कथा? शेवटी त्या मित्राने चिडून विचारले ‘मेल्या वसंता करतंहस तरी काय? त्यावर वडील उत्तरले, ह्यो टायरचो नट निघाना म्हणून वेळ लागतासा.’ तो टायपिकल मालवणी संवाद होता. सहाजिकच त्या मित्राने चुक दाखवली. ‘मेल्या मगाधरून बघतंय मी, तू नट घट्ट करत बसलंय. मग टायर निघतलो कसो?’ त्याच्या उपहासाने खजील झालेल्या वडीलांनी तरीही युक्तीवाद केला. ‘अरे नट सैल करूचो तर तो घट्ट नको? म्हणान आधी घट्ट करत होतंय.’ त्यानंतरच्या काळात तो आमच्या कुटुंबातला एक परवलीचा शब्द होऊन गेला होता. वडील चुक मान्य करायचे नाहीत, तेव्हा आई त्यांना एकच सुनवायची. ‘तुमचा काय, तुमी घट करून सैल करणारे.’ खुप बालवयात ऐकलेला हा किस्सा आहे. अचानक त्याचे स्मरण झाले. कारण अर्थातच राजकीय आहे. त्रिपुरातील डाव्यांचा पराभव आणि पोटनिवडणूकातील भाजपाला बसलेला दणका, यामुळे देशातील नरेंद्र मोदी विरोधी राजकारणाला वेग आलेला आहे आणि तेलंगणा बंगालच्या मुख्यमंत्र्यापासून मनसेच्या अध्यक्षांपर्यंत प्रत्येकाला मोदीमुक्त भारताचे वेध लागले आहेत. इतकीच सर्वांना मोदींची भिती वा चिंता असेल, तर त्यांनी मुळात २०१४ सालातच मोदींना सत्तेपर्यंत का पोहोचू दिले? तेव्हा तर हा गृहस्थ गुजरातचा मुख्यमंत्री होता आणि त्याच्याकडे आजच्या इतकी उजळ मोठी प्रतिमाही नव्हती. म्हणजे तेव्हा मोदींना पराभूत करणे सोपे असून का दुर्लक्षित राहिले? त्याचे उत्तर उपरोक्त गोष्टीत दडलेले आहे.

आज तावातावाने प्रत्येकजण मोदींना पराभूत करण्याचा मनसुबा बाळगून आहे. मोदींमुळे देशाचे नुकसान होत असल्याचे दाखले दिले जात आहेत आणि काहीही करून मोदींपासून देशाची मुक्ती करण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. पण एका प्रश्नाचे उत्तर कोणीच देत नाही. तो प्रश्न आहे २०१४ सालात तरी मोदींमुळे भारताचा असा कुठला लाभ व्हायचा होता, की याच सर्वांनी एकमेकांच्या पायात पाय घालून मोदींचा विजय सोपा कशाला केला होता? तेव्हाच प्रत्येक लहानमोठ्या वा प्रादेशिक पक्षाचे शहाणपणा दाखवून मोदींना पंतप्रधानपदी पोहोचू दिले नसते, तर आज त्यांनाच पाडण्यासाठी इतका आटापिटा करावा लागला नसता ना? म्हणूनच आधी २०१४ सालात मोदींना अशी मोकळीक कशाला दिली, त्याचे उत्तर यापैकी प्रत्येक पक्षाने शोधले पाहिजे. पण तो प्रश्न विचारला जात नाही, की त्याचे उत्तर कोणी देत नाही. मग त्याचे उत्तर शोधावे लागते आणि मला ते उत्तर माझ्या वडिलांच्या फ़सव्या युक्तीवादात सापडले असे वाटले. घट्ट असल्याशिवाय सैल करता येत नाही, म्हणून आधी घट्ट करणे, याचा अर्थ मोदींना पराभूत करण्यासाठी आधी मोदींना पंतप्रधानपदी स्थानापन्न होऊ देणे, असाच निघतो ना? आज कुठल्याही तत्वावर वा तडाजोडी करून मोदी विरोधात एकत्र यायला निघालेल्यांनी, २०१४ सालात त्यापेक्षा कमी लवचिकता दाखवली असती, तरी ३१ टक्के मते वा एनडीएची ४३ टक्के मते घेऊन मोदी पंतप्रधान झाले नसते, की आज त्यांना इतके मजबूत होताही आले नसते. मग तशी मोकळिक विरोधकांनी मोदींना कशाला दिली असेल? कदाचित जितके मोदी मजबूत, तितके त्यांना पराभूत करण्यातले शौर्य अधिक, अशी समजूत त्याला कारणीभूत असावी. मोदींना पाडण्यापेक्षा पंतप्रधानाला पाडण्याचा पुरूषार्थ मोठा, असे त्यामागचे तर्कशास्त्र असू शकते. अन्यथा या लोकांनी चार वर्षापुर्वीची संधी कशाला वाया घालवली असती?

आज मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणिस आपल्या पक्षाच्या अधिवेशनात कॉग्रेस सोबत आघाडी करण्याचे प्रस्ताव मांडत आहेत. किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री कोलकात्याला भेट देऊन ममतांशी गुफ़्तगु करीत आहेत. न मागितलेला पाठींबा अखिलेशला देऊन मायावती पोटनिवडणूकीत भाजपाला पराभूत करण्यात धन्यता मानत आहेत. पंधरा वर्षे चाललेली आघाडी मोडून भाजपाचा मार्ग सोपा करणार्‍या शरद पवारांना मोदीविरोधी आघाडी करायचे डोहाळे लागलेले आहेत. फ़ार कशाला, चार वर्षापुर्वी मोदीच पंतप्रधान व्हावेत म्हणून तावातावाने बोलणारे राज ठाकरेही मोदीमुक्त अशी भाषा बोलू लागले आहेत. त्यांनी तसे करण्याला लोकशाही व्यवस्था मान्यता देते. म्हणूनच मोदी वा भाजपाने त्याच्या विरोधात तक्रार करण्याचे काही कारण नाही. पण मग तीच सदबुद्धी त्यांना चार वर्षापुर्वी कशाला सुचलेली नव्हती? कालपरवा कुठेतरी बोलताना शरद पवार म्हणाले, तरूण वयात कोणीतरी तंबाखूच्या व्यसनापासून रोखायला हवे होते. त्याचे दुष्परिणाम मग भोगावे लागले नसते. याला पश्चातबुद्धी असे म्हणतात. अन्य कोणी आपल्याला व्यसनापासून मुक्त करावे, ही अपेक्षा गैरलागू नाही. पण पवार हे तितके सामान्य बुद्धीचे गृहस्थ नाहीत. त्यांना अपायकारक गोष्टी नक्की कळू शकतात. म्हणजेच त्यांनी डोळसपणे ते व्यसन केले होते. त्यापेक्षा २०१४ सालची राजकीय स्थिती भिन्न मानता येईल काय? आपले राजकीय रागलोभ वा मतभेद आपल्यालाच संकटात घेऊन जातील, हे राजकीय नेत्यांना वेळीच ओळखता येत नसते काय? आज नरेंद मोदी पंतप्रधान होण्यात यशस्वी ठरले, तर पाच वर्षात ते असाध्य आव्हान होऊन बसतील, हे ओळखता आले नाही, अशाच राजकीय जाणत्यांचा भारतीय राजकारणात भरणा आहे काय? तर आहे! कारण तेव्हा त्यांना मोदी नावाचे आव्हान ओळखता आले नाही. किंवा त्यापेक्षाही अशा प्रत्येक नेता व पक्षाला आपल्या अंहंकाराचे व्यसन सोडण्याचा शहाणपणा सुचलेला नव्हता.

थोडक्यात आज अशा नेत्यांनी आपला अतिरिक्त शहाणपणा वा मोदींचे आव्हान सांगण्यापेक्षा, आधी आपला चार वर्षापुर्वीचा मुर्खपणा कबुल केला पाहिजे. इतका थोडासा तंबाखू आपल्या आरोग्याला बाधक ठरणार नाही, ही मस्तीच संकटाला आमंत्रण असते. आजही त्या अहंकारातून किती राजकीय पक्ष व नेते बाहेर पडू शकलेले आहेत? व्यसन सोडायचे संकल्प अगत्याने केले जातात, पण पाळले जात नाहीत; तशी या नेत्यांची स्थिती आहे. त्यांना संकल्प करता येतात. पण त्यासाठी अनेक मोह व आमिषे सोडण्याचा निर्धार आवश्यक असतो, त्याचा दुष्काळ आहे. म्हणून मग पळवाटा व युक्तीवाद शोधले जातात. २०१४ सालात मोदी जिंकणार नाहीत, हा अहंकार दगा देऊन गेला आणि आजही मोदींचे निश्चीत मूल्यांकन करण्यापेक्षा नुसते युक्तीवाद चालले आहेत. आपली चुक नाकारणारे माझे वडील आणि या विरोधकांची विधाने यात तसूभर फ़रक नाही. खरोखरच मोदी विरोधात लढायचे असेल, तर प्रत्येक पक्षाने आपला स्वार्थ, जागा किंवा अहंकार सोडून, मोदी पराभवाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यातली पहिली अट आपल्या सहकारी वा मित्रपक्षाला अधिक जागा मिळतील तर मिळू देण्याचे औदार्य दाखवता आले पाहिजे. सगळे घोडे तिथेच येऊन अडते. मोदींना पराभूत करण्याविषयी एकमत आहे. पण मग पंतप्रधान कोणी व्हायचे व नेतृत्व कोणाकडे जाणार, याविषयी शेकडो दिशांनी तोंडे करून विरोधक उभे आहेत. तीच विरोधी गोटातील मतभिन्नता मोदींचे आजचे बळ आहे. युक्तीवादात गुरफ़टून नट इतका घट्ट केला गेला आहे, की तो आता कितीही ताकद लावून सैल होताना दिसत नाही. त्यातून आणखी निराशा पदरी येते आणि त्यामागची मिमांसा करायला गेले, मग नट घट्ट करण्यातली चुक मानण्यापेक्षा आणखी घट्ट करण्यासाठी बुद्धी वापरली जात असते. ‘मगे टायर निघतलो कसो आणि चाक बदली तरी होवचा कसा?’

12 comments:

  1. अप्रतिम तुलना!

    ReplyDelete
  2. उदाहरण उत्तम तुलना उत्तम क्या बात है

    ReplyDelete
  3. Sir
    Voters che prabodhan krta tumhi
    Sply mala actual political approach tumchymule developm zalay
    Thanks

    ReplyDelete
  4. भाऊ, तुम्हाका माहित असत तुमच लेख ताई सायेब वाचतात त्ये, कशाला त्यांना आयडिया देता, थोडे वर्ष राहू द्या कि रामराज्य

    ReplyDelete
  5. Kashala chak badluk hava...sagli gadhva yeun kay desh chalavnar...

    ReplyDelete
  6. वैयक्तीक स्वार्थीपणा करून टीम जिंकू शकत नाही.योग्य विश्लेषण.

    ReplyDelete
  7. भाऊ.....मस्त !! खरे सान्गायचे तर या सर्वाना २०१४ मध्ये मोदी जिन्कतील हि अपेक्षाच नव्हती आणि त्यातून ते जिन्कले तर दिल्लीच्या राजकारणाचा अनुभव नसल्याने ' ल्युटेन्स ' टोळीसकट सर्वाना मोदीना दिल्लीत ' धोबीपछाड ' घालणे सोने वाटले होते. पण डावच उलटा पडला आणि या मोदीग्रस्ताना ' अस्तित्वावरच ' सन्कट आल्याचे भासु लागले आहे. मोदी २०१९ मध्ये बहुमताने परत आले तर या मोदीग्रस्ताची ' पळापळ ' बघण्यालायक असेल हे निश्चित !!

    ReplyDelete
  8. एक काँगेस सोडली तर 1977 मध्ये बाकी सर्व एकत्रच होते व याच लोकांनी जनसंघाचे प्रकरण काढून जनता पक्ष मोडून काढला. त्या वेळी जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. आशा करू की या वेळी ते सर्वजण सुधारले असतील. या पुढील काळ हा निश्चित मनोरंजाची हमी देतो हे मात्र नक्की.

    ReplyDelete
  9. 40 वर्षा पूर्वी राजकारणात येन्यापासुन कोणी रोखले असते तर महाराष्ट्र वाचला असता

    ReplyDelete
  10. मस्त भाऊ... तुम्ही मालवणी आसास?

    तुमचे लेख वाचून आमचं पोलिटिकल ज्ञान मागच्या एक दोन वर्षात चांगलंच सुधारलं आहे.

    पेपर मध्ये ज्या गोष्टी वाचायला मिळत त्या इथे समजतात , ते पण संदर्भासह ....त्या साठी धन्यवाद !

    बाकी हल्ली नॉर्मल पब्लिक भाजप सरकार ला ( राज्यातील आणि देशातील ) खूप शिव्या घालतयात. दैनिक न्यूज पेपर व टेलिव्हिजन मधील दुष्प्रचाराचे शिकार आहेत सर्व. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे २०१९ ची निवडणूक भाजप आणि मोदीं साठी नक्कीच सोपी नाहीय.

    ReplyDelete
  11. Modinche thik aahet..te changle aahet yaat vaad nahi. Pan je umedwar ata loksabhesathi ubhe krnar tyanchyavr matdar kiti khush aahe? Kharach pratyek samanya mansanna vatte ki Modich PM asavet pn tyachbarobar Local he Khasdar,Aamdar Jr kaam krat nastil tr kshi milnar mate?

    ReplyDelete
  12. सध्या तरी मोदींना पर्यायच नाही; आणि ते सांभाव्य पर्याय रागा इत्यादी पेक्षा स्वच्छ,योग्यतेचे आहेत. सु.स्वामीना अर्थ खात द्यायला पाहिजे!

    ReplyDelete