Monday, March 5, 2018

‘नविन’ पॅटर्न

navin patnaik के लिए इमेज परिणाम

नुकत्याच मध्यप्रदेश व ओडिशात विधानसभेच्या तीन पोटनिवडणूका झाल्या आणि त्यात कितीही झुंज देऊन भाजपाला त्यापैकी एकही जागा जिंकता आली नाही. या तिन्ही जागा ज्या पक्षांच्या आमदारांच्या मृत्यूमुळे झाल्या होत्या, त्याच पक्षांना त्या तिन्ही जागा जिंकता आल्या. पण त्यात किंचीत फ़रक आहे आणि तो विसरून चालणार नाही. मध्यप्रदेशात कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गुणा लोकसभा मतदारसंघातल्या दोन जागा रिकाम्या झाल्या होत्या. त्याच पुन्हा राखताना त्यांची खुप दमछाक झाली. राजस्थानमध्ये दोन लोकसभा व एक विधानसभा अशा तीन जागा मुळात भाजपाच्या होत्या आणि सचिन पायलट या तरूण कॉग्रेस नेत्याने प्रयत्नपुर्वक त्या तिन्ही जागा कॉग्रेसला जिंकून दिल्या होत्या. पण मध्यप्रदेशात आपल्या हक्काच्या जागा जिंकतानाही शिंदे यांची दमछाक झाली. किरकोळ फ़रकाने कॉग्रेसने त्या जागा कायम राखल्या. याचा अर्थ वर्ष अखेरीस होऊ घातलेल्या विधानसभा मतदानात भाजपाला मध्यप्रदेश जिंकणे अशक्य झाले, असा कोणी निष्कर्ष काढू शकत नाही. मात्र राजस्थानची स्थिती खुप नाजुक आहे. तिथे भाजपाला आपली सत्ता कायम राखणे अवघड जाईल, इतक्या मोठ्या फ़रकाने तीन जागा कॉग्रेसने बळकावल्या आहेत. त्यातून मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या विरोधातले लोकमत साफ़ दिसलेले आहे. तशी मध्यप्रदेशात सलग तीन कारकिर्द राज्य करणार्‍या शिवराज सिंग चौहान यांची स्थिती नाजूक नसल्याचा निर्वाळा ताज्या निकालांनी दिलेला आहे. पण याच निमीत्ताने ओडीशात झालेल्या पोटनिवडणूकीचा निकाल लक्षणिय आहे. कारण आपलीच जागा बिजू जनता दलाने कायम राखलेली असली, तरी मोठ्या मताधिक्याने ती पुन्हा जिंकली आहे आणि दुसर्‍या क्रमांकावर येतानाही भाजपा खुपच मागे पडलेला आहे. हा तिथल्या मुख्यमंत्र्यांचा पॅटर्न म्हणूनच इतर राज्यकर्त्यांनी लक्षात घेण्यासारखा आहे.

नविन पटनाईक हे चौथी टर्म ओडिशाचे मुख्यमंत्री असून बहुधा इतका दिर्घकाळ तिथे अन्य कुठला मुख्यमंत्री सत्ता टिकवू शकलेला नाही. १९९८ सालात लोकसभेची मध्यावधी निवडणूक झाली, तेव्हाच ओडीशाच्या राजकारणात नविन पटनाईक यांचा प्रवेश झाला होता. तोपर्यंत तिथे जनता दल व कॉग्रेस यांच्यातच सत्तेसाठी संघर्ष व्हायचा. बिजू पटनाईक हे तिथले दिग्गज नेते म्हणून ओळखले जात होते. नविन पटनाईक त्यांचेच पुत्र असले तरी ते राजकारणापासून अलिप्त होते. व्यावसायिक होते. पण त्या सुमारास जनता दलात फ़ुट पडली आणि एका गटाने बिजूपुत्र नविन यांना राजकारणात नेतृत्व करण्याची गळ घातली. म्हणून मग त्या गटाने आपले नाव बिजू जनता दल असे ठेवले. या गटाने वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाशी हातमिळवणी करून संयुक्तपणे निवडणूका लढवल्या व सत्ता मिळवली होती. तेव्हा प्रथमच नविन पटनाईक ओडिशाचे मुख्यमंत्री झाले. पण ते अननुभवी असल्याचा लाभ उठवून स्थानिक भाजपा नेत्यांनी नविन पटनाईक यांची खुपच कोंडी केली होती. त्यातून ती आघाडी मोडीत निघाली. भाजपाने पाठींबा काढून घेतल्याने त्यांनी बहूमत गमावले होते आणि भाजपा विरोधासाठी कॉग्रेसने नविन सरकारला पाठींबा देत जगवले होते. मात्र लोकसभेसोबत त्यांनी विधानसभा घेतली आणि स्वबळावर बहूमत संपादन केले. तेव्हापासून ते लागोपाठ तीनदा स्पाष्ट बहूमत मिळवून सत्तेत राहिले आहेत. पण त्यांचा वेगळेपणा तितकाच नाही. देशातला हा एकच असा मुख्यमंत्री असेल, की सहसा त्याचे नाव राष्ट्रीय माध्यमात कधी झळकत नाही वा त्यांनी कधी राष्ट्रीय राजकारणात भाजपा वा कॉग्रेस यांच्या नादी लागून एका बाजूला आपला कल कधीच जाऊ दिलेला नाही. कुठल्याही वादात वा विरोधात नाटकबाजी केल्याचेही दिसलेले नाही. जणू हे राज्यच देशात नसावे, इतके त्याकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेले आहे.

लागोपाठ चारदा मुख्यमंत्री असून व कुठल्याही वादग्रस्त विषयात न पडणार्‍या नविन पटनाईक यांनी ओडिशाचा मोठा दैदिप्यमान विकास केला, असेही कोणी म्हणणार नाही. अधूनमधून तिथल्या दुष्काळ व उपासमारीने लोक मरण्याच्या बातम्या झळकत असतात. मध्यंतरी तिथल्या आरोग्यसेवेची दुर्दशा दाखवणारी एक बातमी खुपच गाजलेली होती. एक पती आपल्या मृत पत्नीचे शव खांद्यावर घेऊन दहा मैल चालत गावी गेल्याची ती बातमी होती. पण अशा बातम्यांनी नविनबाबू कधी विचलीत झाल्याचे दिसले नाही, की त्यांनी तावातावाने राजकीय विधाने करून गदारोळ माजवला नाही. माध्यमातून हा मुख्यमंत्री गायब आहे आणि आरामात सातत्याने निवडून येत असतो. आताही बिजेपुर या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या मृत आमदाराच्या पत्नीला चाळीस हजार मताधिक्याने लोकांनी निवडून दिले आहे आणि कितीही आक्रमक प्रचारामुळे ती जागा भाजपाला जिंकता आलेली नाही. कॉग्रेस व भाजपा यांच्या बेरजेपेक्षाही बिजू जनता दलाला मिळालेली मते अधिक आहेत आणि त्यासाठी नविन पटनाईक यांना कोणी विकासपुरूष म्हणू शकणार नाही. देशातले एक अत्यंत मागासलेले दरिद्री राज्य व लोकांचे हाल उपासमार सातत्याने चाललेली असते. तरीही तिथला मतदार अशा मुख्यमंत्र्याला सत्ता कशाला देतो आणि त्याची विजययात्रा कशाला चालू राहिली आहे? देशातल्या राजकीय अभ्यासक व राज्यकर्त्या नेत्यांनी त्याचा म्हणूनच बारकाईने अभ्यास करणे योग्य ठरेल. कुठलेही अपुर्व काम वा जनतेला भुलवणार्‍या गोष्टी न करताही सत्ता व निवडणूका जिंकता येण्याचा हा पॅटर्न नविनबाबूंना कसा साधला आहे? ते समजून घेतले तर अनेक राज्यकर्त्यांना रात्री शांत चित्ताने झोपता येऊ शकेल. कारण एकदा निवडून येणे वा सत्ता संपादन करणे कुठल्याही नेत्याला समाधान देत नाही. त्याला सतत पुढली निवडणूक भेडसावत असते. नविनबाबू तिथेच वेगळे आहेत.

देशातला दुसरा कुठल्याही राज्याचा वा पक्षाचा असा नेता सापडणार नाही, की एकदा निवडणूक जिंकली म्हणजे समाधानी असतो. तातडीने म्हणजे काही दिवसातच त्याला पुढली निवडणूक भेडसावू लागलेली असते. आणखी तीनचार वर्षे बाकी असली, तरी जनतेला वा आपल्या मतदाराला दिपवून टाकणारे काही काम करण्याचे खुळ प्रत्येक नेत्याच्या डोक्यात असते. ममता वा केजरिवाल ही त्याची भडक उदाहरणे आहेत. ते सतत प्रसिद्धी झोतात रहायला धडपडत असतात किंवा काही मोठा पराक्रम गाजवायला उतावळे झालेले असतात. त्यातून आपण पुन्हा निवडून येऊ अशी त्यांची समजून असते. हा निकष किती चुकीचा आहे, त्याचे ओडिशाचे नविन पटनाईक हे ज्वलंत उदाहरण आहेत. म्हणूनच मी त्याला नविन पॅटर्न म्हणतो. मागल्या चार टर्ममध्ये नविन पटनाईक यांनी त्यांच्या राज्याचा कारभार हाकताना कुठलेही विकासाचे वा प्रगतीचे मॉडेल समोर उभे केलेले नाही. कुठल्याही कार्यक्रम वा योजनेसाठी देशातल्या संपुर्ण माध्यमांनी वा पत्रकारांनी त्यांचे गुणगान केलेले नाही. अन्य राज्यांना आदर्श मानावे लागेल, असे काहीही नविनबाबूंनी आजवर केलेले नाही. मात्र अधूनमधून ओडिशाच्या बातम्या येतात; त्या तिथल्या गरीबी, उपासमार, दरिद्री परिस्थितीच्या असतात. मग त्या मतदाराला अन्य पक्षांच्या भुलवणार्‍या योजना वा घोषणा भुरळ कशाला घालत नाहीत? अशी नविनबाबूंची काय जादू ओडिशा़च्या जनतेवर चाललेली आहे? त्याचे उत्तर साध्यासरळ कारभारात आहे. सामान्य माणसाच्या अडचणी कधीच संपत नसतात. त्याला सुसंपन्न जीवनाची स्वप्ने बघायची असली, तरी सुसह्य जीवन मिळाले तरी तो समाधानी असतो आणि त्यासाठी तो नेत्याला व पक्षाला पुन्हा पुन्हा सता देत असतो. नविन पटनाईक यांनी तेच केलेले आहे. सामान्य जनता सुसह्य जगू शकेल, इतका साधासरळ कारभार चालविला आहे आणि लोक खुश आहेत.

बाकीचे नेते वा पक्ष सत्ता हाती आल्यावर मतदार कायम आपल्या कब्जात रहावा म्हणून एकामागून एक भव्यदिव्य योजनांची घोषणा करतात आणि त्यांची पुर्तता होत नाही. नविनबाबू अपेक्षांचा डोंगर उभा राहिल अशा घोषणा करीत नाहीत, की भरमसाठ आमिषेही दाखवत नाहीत. ते किमान शक्य असलेल्या गोष्टी लोकांसमोर मांडतात आणि आपल्या कार्यकाळात तितक्या पुर्ण होण्याची धावपळ करतात. प्रशासन व अधिकार्‍यांना त्यांचे काम करू देतात. म्हणूनच मतदाराने त्यांना सातत्याने सत्ता बहाल केलेली आहे. व्यवस्था व कायदा हाताबाहेर जाणार नाही, याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. तेच त्यांचे खरे यश आहे. जनतेला काहीही फ़ुकट नको आहे. भिक वा खिरापतही नको आहे. परंतु आपण जे कष्टाने मिळवतो, त्याची लूट होऊ नये इतकीच लोकांची माफ़क अपेक्षा असते. ती पुर्ण करण्याला नविन पटनाईक यांनी राज्याचा कारभार असे नाव दिलेले आहे. म्हणूनच त्यांचा राष्ट्रीय माध्यमात गाजावाजा होत नाही, की त्यांच्यावर गदारोळही उठत नाही. कामातून व अनुभवातून जनता त्यांच्या कारभाराचा साक्षात्कार मिळवत असते आणि मतदान असले, मग त्यांच्या निवडणूक चिन्ह शंखाला मत देत असते. त्यासाठी त्या नेत्याला शंख करावा लागत नाही की मतांचा जोगवा मागत फ़िरावे लागत नाही. ज्यांना सत्ता मिळाली आहे आणि टिकवायची आहे, त्यांच्यासाठी म्हणूनच हा ‘नविन’ पॅटर्न आहे. प्रसिद्धीकडे पाठ फ़िरवून प्रामाणिकपणे आपल्या अधिकार मर्यादेत राहून जनतेला सुसह्य जीवन जगता येईल, तो कारभार, हेच त्याचे रहस्य आहे. पण किती नेते व राजकीय पक्ष त्यातले तथ्य ओळखून स्वत:मध्ये बदल घडवू शकतील, याची शंकाच आहे. किंबहूना काही प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे अनुकरण करतात असे दिसते. म्हणूनच ते माध्यमांच्या फ़ंदात पडत नाहीत, तर थेट जनतेसमोर जाऊन आपला पाठीराखा वाढवत असतात.

3 comments:

  1. भाऊ,

    व्वा!कोणीतरी आहे,ज्याला साधेपणातील सामर्थ्य ओळखता आलं!

    ReplyDelete
  2. थेट मोदन्शि तुलना??

    ReplyDelete
  3. Though analysis is largely on point, factual errors are too many. Bijepur had Congress MLA and not that of BJD. also there are lot of developmental works done by Odisha CM.Many of them are worth replicating at all India level eg.his latest policy of providing land rights to slum dwellers or providing piped drinking water to all the habitations. You have also contradictes yourself saying that Navin babu does not make tall promises and then comparing him with modiji.you also suffer from the same fault that you've accused national media ie.not studying the facts and just accusing odisha of poverty and hunger. Please read various databases to know more about ground situation.

    ReplyDelete