Sunday, July 15, 2018

आंबेडकरी विचारांचा तपस्वी

संबंधित इमेज

पाच दिवसांपुर्वी एका जुन्या मित्राचा फ़ोन आला. म्हणाला, येत्या रविवारी माझा वाढदिवस आहे. ७५ व्या वर्षात पदार्पण करतोय. म्हणालो छान आहे. काही समारंभ वगैरे आहे काय? माझी अपेक्षा होती, तिथे येण्याचे आमंत्रण वगैरे देईल आणि कदाचित त्याच्यावर छोटेसे भाषण करायला सांगेल. पण हा मित्र भलतेच काही वाढदिवसाची भेट म्हणून मागत होता आणि ती त्याला भेटवस्तु असण्यापेक्षा मलाच त्याने दिलेली मोठी भेट वाटली. त्याची अपेक्षा इतकीच होती, की त्याच्या पंच्याहत्तरीच्या निमीत्ताने मी ब्लॉग लिहावा. माझा ‘जागता पहारा’ ब्लॉग इतका लोकप्रिय वा प्रभावी असल्याची मलाही कल्पना नव्हती. अर्थात पाच वर्षात एक कोटी हिट्स मिळणार, हे तिथे संचित होणार्‍या आकड्यावरून वाटते. पण आकडा हा कधीच महत्वाचा नसतो. त्यापेक्षा त्याचा जनमानसावर पडणारा प्रभाव मोलाचा असतो. ज. वि. पवार याच्यासारख्या प्रखर आंबेडकरवादी कार्यकर्त्याला व मित्राला, मी त्याच्यावर वाढदिवशी ब्लॉग लिहावा असे वाटले, ही म्हणूनच माझ्यासाठी मोठी भेटवस्तु वाटली. तशा अनेक पुढारी मान्यवरांच्याही प्रतिक्रीया ब्लॉगविषयी आजावर आलेल्या आहेत. पण ज. वि. पवारची ही मागणी सर्वाधिक कौतुकाची आहे, कारण तितका निष्ठावान कार्यकर्ता आपल्याकडून चार शब्दांचे कौतुक मागतो, तेव्हा ऊर भरून येतो. कसल्याही अपेक्षेशिवाय आयुष्यातली साठ पासष्ठ वर्षे आंबेडकरी विचारांनी झपाटून गेलेला व अथक त्यासाठी जमेल त्या मार्गाने झुंजणारा असा माणूस, हा आजच्या युगातला तपस्वी असतो. म्हणूनच त्याने अशी अपेक्षा बाळगणे सर्वात मोठे वरदान असते. दुर्दैव इतकेच आहे, की त्याच्या तपस्येची आजच्या युगात कोणाला कदर करावी असे वाटलेले नाही. प्रामुख्याने फ़ुले शाहू आंबेडकर अशी जपमाळ ओढणार्‍या कुठल्या वर्तमानपत्र वा वाहिनीला त्याच्या अभ्यासाचा उपयोग करून घेण्याचे भान नसावे, हे त्यांचे दुर्दैव आहे.

जवि हा तरूणपणातला मित्र आणि त्याच्या कोवळ्या शाळकरी वयापासूनचा आंबेडकरवादी. तेव्हा त्याने बाबासाहेबांचे काय वाचले असेल वा ऐकले असेल, सांगता येणार नाही. पण त्या कोवळ्या वयापासून तो आंबेडकरवादी झाला आणि पक्ष संघटना वा नेत्यांपेक्षा बाबासाहेबांच्या विचारांचा मागोवा घेत चालत राहिला. साठ वर्षाहून अधिक काळ त्याने बाबासाहेबांची वाटचाल, त्यांचे संघटन, विचार व घटनाक्रमाची करून ठेवलेली नोंद, अपुर्व आहे. त्याच्यामागे कोणी आर्थिक व राजकीय़ पाठबळ घेऊन उभा राहिला नाही, की कुठल्या संघटनात्मक शक्तीचा आशीर्वाद त्याला लाभला नाही. अर्थातच तेही एका बाजूने चांगले झाले. कारण त्या नेता वा संघटनेच्या आहारी जाऊन जवि भरकटू शकला असता. पण त्यापासून अलिप्त राहून आपली कुवत व क्षमता एवढ्या बळावर त्याने जमवलेला व जोपासलेला आंबेडकरी विचाराचा ठेवा अमूल्य आहे. प्रामुख्याने बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर दलित रिपब्लिकन चळवळ भरकटत गेली. विस्कळीत होत गेली, तिचा तटस्थपणे, पण आस्थापुर्वक अभ्यास करण्याचे जविचे धैर्य कौतुकास्पद आहे. ‘आंबेडकरोत्तरी आंबेडकरी चळवळ’ ही जविची ग्रंथमाला त्या धगधगत्या कालखंडाचा गोषवारा आहे. अगदी अलिकडे भीमा कोरेगावची घटना घडल्यानंतर जे वाद व संघर्ष उफ़ाळले, तेव्हा मला जविच्या त्या ग्रंथमालेची आठवण झाली. अशा घटना घडतात, तेव्हा कोणीही उपटसुंभ उठतो आणि इतिहासाची पार वाट लावून आपले राजकीय स्वार्थ साधायला पुढाकार घेतो. तेव्हा जविची आठवण होतेच. कारण समोर कितीही भडक प्रक्षोभक मांडणी तरी ती अनेकदा चळवळीच्या इतिहासाचे विकृतीकरण असते. त्यापासूनच दलित उद्धाराची चळवळ, संघटना व विचार निर्दोष व भेसळमुक्त रहावेत, म्हणून जविने आयुष्य खर्ची घातलेले आहे. पण त्याची नोंद वा दखल आजच्या चर्चांमध्ये नसावी, ही माझ्यासारख्याची वेदना आहे.

१९६० नंतरच्या दशकात नवकवी नवसाहित्याची एक पिढी समोर आली. त्यातून अनेक बंडखोर उदयास आले आणि पुढे प्रस्थापिताचे बळीही होऊन गेले. त्यातलाच एक होता नामदेव ढसाळ. त्याचाच सवंगडी होता ज. वि. पवार. या दोघांच्या वेदना शब्दातून व्यक्त व्हायच्या आणि जगासमोर एक वास्तववादी अविष्कार यायचा. त्यातूनच मग १९७० नंतर दलित चळवळीला एक नवा धुमारा फ़ुटला, जो आज दलित पॅन्थर म्हणून ओळखला जातो. त्या पॅन्थरचे पहिले पत्रकही जविच्या घरच्या पत्त्यानिशी छापले गेले होते. काळाची गरज असलेली ती घटना घडवणारा जवि, कधी नेता होऊ शकला नाही वा तशी त्याची कधी आकांक्षाही नव्हती. कुठले पद वा अधिकारासाठी त्याचा पाय नेहमी मागेच राहिला. पण आज साठ वर्ष उलटून गेल्यावरही कुठल्या पदाशिवाय जगलेला जवि, तितकाच फ़्रेश ताजातवाना वाटतो. हीच त्याच्या जीवनाची सर्वात मोठी कमाई आहे. त्याचे काम, अनुभव, ज्येष्ठता किंवा त्याग अशा गोष्टीचा उल्लेखही त्याच्या बोलण्यातून कधी ऐकायला मिळणार नाही. पण कितीही प्रतिकुल परिस्थितीतून आंबेडकरी विचार पुढे कसा न्यायचा व त्या चळवळीला धार कशी यावी, याचे चिंतन त्याच्या बोलण्यातून कायम ऐकायला मिळत असते. त्याच्यासमोर आजचे अनेक आंबेडकरवादी किती थोटे व बुटके आहेत, त्याची जाणिव अधिक व्यथित करून टाकते. कारण पॅन्थरच्या आरंभीच्या काळातली जविची तारांबळ ज्यांनी जवळून बघितलेली आहे, त्याची किंमत आजची आमदारकी वा मंत्रिपदेही भरून काढू शकत नाहीत. बॅन्केत नोकरी करून उरलेल्या वेळात अखंड पॅन्थरसाठी वेळ देणारा जवि, हा त्या काळात अटकेत व तुरूंगात जाणार्‍यांसाठी एकमात्र आधार असायचा. त्या धावपळी करूनही तो तितकाच उत्साही कसा राहू शकायचा, हे नवल होते. निराशेचा स्पर्शही त्याला कधी होऊ शकला नाही. म्हणुन त्याला तपस्वी म्हणावे लागते.

पन्नास वर्षापुर्वीचा पंचविशीतला जवि आणि आता पंच्याहत्तरीतही म्हातारा होत नाही, ही बाब नवलाईचीच आहे. कारण त्याच्याकडून तुम्हाला कधी अडचणींचा पाढा ऐकू येणार नाही. उलट कितीही निराश कार्यकर्त्याला वा नव्या पिढीला उत्तेजन व प्रेरणा देण्यात तो आजही गर्क असतो. काय नाही आहे वा कुठे अडथळा आहे, त्यापेक्षाही समोर असलेल्या परिस्थितीत काय सुलभ होऊ शकते, याचे विवेचन जवि सुरू करतो. शक्यतांचा वेध घ्यायचा आणि त्यातून नवी वाट शोधायची, हा त्याचा सततचा स्वभाव राहिलेला आहे. कदाचित आजच्या पिढीत त्याचे अनेक वारसही असतील. पण तेव्हा म्हणजे पॅन्थरच्या युगात तीसचाळीस जवि उपलब्ध असते, तर पाच दशके जुनी ही संघटना आज महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातला एक प्रभावशाली राजकीय प्रवाह होऊन गेली असती. पॅन्थरने आंबेडकरी चळवळीला अनेक नेते दिले. पण जवि एकच झाला. पुढे संघटनात्मक कामात मागे पडला, कारण राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या सहकार्‍यांमध्ये त्याचा टिकाव लागणेच शक्य नव्हते. तर त्याने आपल्या वेळेचा सदुपयोग नंतरच्या पिढ्यांसाठी आंबेडकरी विचारांचे अस्सल बीज जतन करण्यात खर्ची घातला. आज जी या विचारांची पोपटपंची चालते, त्यांची म्हणूनच दया येते. नाव बाबासाहेबांचे घ्यायचे आणि कुठल्याही गोष्टी विचार डफ़रून द्यायचे, हा आजकाल तेजीतला धंदा झाला आहे. त्यातूनच मग भीमा कोरेगावच्या घटना घडतात आणि त्यात आंबेडकरी समाज होरपळून जात असतो, भरडला जातो. त्याचे लचके तोडणार्‍या विविध राजकीय प्रवृत्ती सोकावत जातात. त्याचाही समाचार आपल्या ग्रंथमालेतीन जविने घेतलेला आहे. नव्या पिढीतल्या दलित कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी तरूणांनी कुठल्याही संघटनात्मक कार्यात उतरण्यापुर्वी, जविच्या उपलब्ध पुस्तके व ग्रंथाचे पारायण आकलन करावे. तरच त्यांना बाबासाहेबांच्या मिशनचा खरा आवाका येऊ शकेल.

आज मार्केटिंगच्या जमान्यात प्रत्येकजण आपला माल खपवण्यासाठी लोकप्रिय मॉडेल शोधत असतो आणि त्याच्या गुणवत्तेचे आपल्या मालाशी साम्य साधर्म्य दाखवून बाजार काबीज करण्याच्या धडपडीत असतो. तेच वारे राजकारण व समाजकारणात घोंगावत आहेत. अशा काळात शुद्ध आंबेडकरी विचार व भूमिका समजून घ्यायची तर जविकडे पाठ फ़िरवून चालणार नाही. आंबेडकरी विचार बाबासाहेबांच्या मूळ भूमिकेतून समजून घ्यायचे असतील, तर निर्भेळ सत्य जविच्याच ग्रंथसंपदेतून मिळवता येईल. प्रामुख्याने दलित वा आंबेडकरी विषय चर्चेत येतात, तेव्हा जविकडे संदर्भासाठी धावल्याशिवाय भागत नाही. पण ज्यांना विचारांपेक्षा मार्केटींग करून सनसनाटी माजवायची असते, ते कधी जविकडे जाणार नाहीत. जातही नाहीत. माझ्यासारख्याला अशा प्रसंगी जविला एखाद्या वाहिनीवर लाइव्ह ऐकायला खुप आवडेल. त्यातून त्या दलित आंदोलनाला नवी प्रेरणा मिळून जाईल. कदाचित पॅन्थरसारखा नवा धुमारा त्याला आजही फ़ुटू शकेल आणि खर्‍या अर्थाने नव्या युगातले नामदेव ढसाळ, राजा ढाले उदयास येऊ शकतील. जविची परंपरा चालवणारे पाचपन्नास हाडाचे कार्यकर्ते जन्माला येतील. ते एका समाजाला पुढे घेऊन जाणार नाहीत, तर सामाजिक अभिसरणाला चालना देऊन जातील. म्हणूनच या निमीत्ताने वाहिन्या व वर्तमानपत्रांच्या संपादकांना माझे आवाहन आहे. जविचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मोक्याच्या प्रसंगी अशा माणसाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून बाबासाहेबांच्या सामाजिक अभिसरणाच्या मुळ संकल्पनेला हातभार लावण्याचा प्रयत्न करावा. उगाच नावाजलेले प्राध्यापक वा नेते सादर करण्यापेक्षा आंबेडकरी विचारांचा निर्भेळ ठेवा, लोकांना सादर करण्याची संधी घ्यावी. इथे जविच्या परवानगी शिवाय त्याचा मोबाईल नंबर (98339 61763) मुद्दाम देतो आहे. वाहिन्या वर्तमानपत्रेच नव्हेत तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोणीही त्याच्याशी संपर्क साधून त्याच्या अभ्यासाचा लाभ उठवावा. त्याचा पंच्याहत्तरीचे सार्थक त्यातच दडलेले आहे. जवि, तुम जियो हजारो साल. कारण सामाजिक चळवळींना तुझी गरज आहे, मित्रा!

13 comments:

  1. Wa bhau mast. Babasaheb sarvanche hote v aahet. Jay sriram Jay Bhim.
    Bharat Mata ki Jay

    ReplyDelete
  2. मित्र असणाऱ्या 'अभ्यासू' दलित नेत्याचं वास्तव चित्रण तुमच्याइतके कुणाला साधेल काय.
    जविना व तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. दलित पॅन्थरने आजपर्यंत समाजासाठी सोडाच पण दलितांसाठी तरी काही विधायक केले आहे का?

    यांची प्रमुख कामगिरी म्हणजे 'रिडल्स' व मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी आंदोलन. या आंदोलनांचा भारतीयांना किंवा अगदी दलितांना सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. या आंदोलनांमुळे दलित फक्त अस्मितेमध्ये अडकून पडले. दलितांना अस्मितेमध्ये अडकवून आठवले, कवाडे, प्रकाश आंबेडकर, गवई इ. नी फक्त स्वत:चा राजकीय स्वार्थ साधला. 'रिडल्स' प्रकाशित झाल्याने किंवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराने सर्वसामान्य दलिताच्या जीवन कणभरही उंचावले नाही. उलट या आंदोलनांमुळे दलित व इतर यांच्यातील दरी अधिक रूंदावून समरसतेचे अभियान काही दशके मागे गेले.

    सर्वसामान्य दलिताच्या जीवनात सुधारणा व्हावी, त्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, अस्मितेमध्ये अडकून आपली शक्ती व वेळ खर्च न करता स्वत:ची उन्नती करण्यासाठी प्रयत्न करावेत इ. साठी आजवर दलित पॅन्थरने काहीही केलेले नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. Agadi khare ahe. kay nakki milawale naw baadalun? quality tar ghasaralich ahe. hya padhatiche kaam chalale ahe sarv bharatat ki atyant nikrushtha widyarthi baher padat ahet. hya peksha baba sahebchya nawane nawin institute kadhun uttam darja dila asata tar anekanni duwa dila asata ani adarane hyanna maan dila asata. hyatune fakt mane kalushit zali baki kahihi zale nahi.

      Delete
  4. Sacchya amedkari vicharkala shatyushyi jivna sathi shubhechya

    ReplyDelete
  5. ज.वि.पवार :- आजचे युवकांसमोरचे प्रश्न आणि आंबेडकर
    https://www.youtube.com/watch?v=HVaPNM_oQDo

    ReplyDelete
  6. श्री भाऊ तुमच्या विषयीचा आदर.शतःपटीने वाढला आजपर्यंत मला असं वाटायचं की तुम्ही मोदींच्या बाजूने लिहिता ( मी तुमचा एकही BlOG चुकवत नाही) पण आज तुमचे मोठेपण कळलं

    ReplyDelete
  7. श्री ज वि पवार याना मनपुर्वक शुभेच्छा

    ReplyDelete
  8. धन्यवाद भाऊ ज वि सरांचा मोबाईल न. दिल्याबद्दल.

    ReplyDelete
  9. भाऊ खूप अस्वस्थ झालो आपला लेख "जवी" च्या एव्हड्या उंचीची जाणीव महाराष्ट्रतील किती जाणकारांना आहे?

    ReplyDelete