राहुल गांधी यांनी स्वपक्षीय अल्पसंख्य विभागाच्या बैठकीत कॉग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याचे वादग्रस्त विधान केले. तशा बातम्या आल्या आणि त्याचा इन्कार आधी कॉग्रेसच्या नेत्या प्रवक्त्यांनी केला होता. तिकडे केरळात शशी थरूर यांनी भाजपा पुन्हा जिंकल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होण्याचा इशारा देऊन टाकला. अशी भाष्ये अर्थातच मुस्लिम मतांना भयभीत करून आपल्या झोळीत ओढण्यासाठी असतात. पण हे कॉग्रेसने वा अन्य पुरोगामी पक्षाने बोलून दाखवण्याची कोणती गरज आहे, तेच समजत नाही. कॉग्रेससह पुरोगामी पक्ष मुस्लिमधार्जिणे आहेत, असा प्रचार भाजपा व हिंदूत्ववादी सातत्याने करीत असतात आणि त्याचाच लाभ उठवित मागल्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदींनी भाजपाला प्रचंड यश मिळवून दिलेले आहे. त्यानंतरच्या विवेचनात कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी संरक्षणमंत्री ए. के अन्थोनी यांनी त्यासंबंधी अहवालही दिलेला आहे. सलग त्याचा इतका प्रचार झाला, की मुस्लिमबहूल भागातील हिंदूमतांचे धृवीकरण होत राहिले आणि त्याचा राजकीय लाभ भाजपाला मिळालेला आहे. किंबहूना तोच डाग पुसून काढण्यासाठी गुजरातमध्ये राहुल गांधींना एकामागून एक डझनभर मंदिरांना भेटी द्याव्या लागल्या, अभिषेक करावे लागले. पण इतके होऊनही गाडे पुन्हा त्याच रुळावर येत चालले आहे. नसते, तर शशी थरूर वा राहुलनी असली मुक्ताफ़ळे उधळली नसती. या घटनेचा पुसटसा संदर्भ मिळाल्यावर मोदींनी चतुराईने त्याचा वापर आपल्या एका प्रचारी भाषणात करून घेतला. त्यांनी राहुलच्या वक्तव्याला विरोध केला नाही, तर त्यात आणखी मीठमिरची घालून अन्वयार्थ स्पष्ट केला. तिहेरी तलाकला विरोध करणारा कॉग्रेस पक्ष मुस्लिमांचाच नाही, तर त्यातल्या फ़क्त मुस्लिम पुरूषांचाच पक्ष आहे. म्हणून कॉग्रेस मुस्लिम महिलांना न्याय देणार्या तलाकबंदी विधेयकाच्या विरुद्ध असल्याची मल्लीनाथी मोदींनी केली.
एकप्रकारे कारण नसताना राहुलनी हे कोलित भाजपा व मोदींच्या हाती दिले. आपल्या हिंदूत्वाचा स्पष्ट व नेमका उल्लेख मोदी कटाक्षाने टाळत असतात. कॉग्रेस वा अन्य पुरोगामी पक्षांना हिंदूविरोधक ठरवण्याची चलाखी मोदींनी सातत्याने केलेली आहे. त्याला हातभार लावणारी विधाने म्हणूनच विरोधकांकडून होता कामा नयेत. हाच २०१४ सालातल्या निकालांचा खरा धडा आहे. साठ वर्षात मुस्लिम मतांशिवाय कोणी देशाचे सरकार बनवू शकत नाही, की बहूमत संपादन करू शकत नाही, असा भ्रम राजकारणात जोपासला गेलेला होता. त्याला मोदींनी प्रत्यक्ष विजय संपादन करून धक्का दिलेला आहे. म्हणूनच त्यानंतरच्या राजकारणात तुम्ही कुठल्या धर्माचे समर्थक आहात, त्यापेक्षा तुम्ही हिंदू विरोधक नाहीत, हे दाखवण्याची व पटवण्याची गरज आहे. पण तेवढाच बोध घ्यायला कोणी पुरोगामी तयार नाही. त्यातून मग असल्या मुर्खपणाला प्रोत्साहन मिळत असते. मुस्लिम धर्ममार्तंडांचे लांगुलचालन करणार्यांना मागल्या प्रत्येक निवडणूकीत सपाटून मार खावा लागलेला आहे. त्यामुळे देश वा इथली बहुसंख्य जनता हिंदूत्ववादी झाली, असा अजिबात होत नाही. पण उठसूट हिंदूंना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याच्या राजकीय बदमाशीला लोक कंटाळले आहेत. त्यातूनच मग आपण हिंदू असल्याची साक्ष त्यांना अधिकाधिक द्यावी लागत आहे. दुसरीकडे उघडपणे आपण हिंदू समर्थक असल्याचे चित्र भाजपावाले निर्माण करत असतात. हिंदू हक्काची भाषा बोलत असतात. तर त्यांच्यावर तोच आरोप करुन गदारोळ माजवण्यातून पुरोगामी आपल्याकडे येऊ शकणार्या तटस्थ हिंदूंनाही भाजपाकडे पिटाळत असतात. ताजी वक्तव्ये त्याचाच दाखला आहे. मात्र आपली मते घटत चालल्याचेही भान हळुहळू येते आहे. तसे नसते, तर डाव्यांना हिंदू धर्माच्या अनेक कर्मकांडाकडे कशाला वळावे लागले असते?
दोन महिन्यापुर्वी ममता बानर्जी यांच्या तृणमूल कॉग्रेसच्या काही नेत्यांनी दक्षिण बंगालच्या काही जिल्ह्यात ब्राह्मण संमेलने भरवून त्यांना महाभारत गीतेच्या प्रतींचे वाटप केलेले होते. आधी दोन वर्षे ममता शक्य तिथे हिंदूंना दुखावणारे निर्णय घेत राहिल्या. बंगाल्यांना अतिशय प्रिय असलेल्या दुर्गापूजा उत्सवाला डाव्यांनी कधी प्रतिबंध निर्बंध लावलेले नव्हते. पण ममतांनी मात्र दुर्गा प्रतिमांच्या विसर्जन सोहळ्याला प्रतिबंध घालून रोष ओढवून घेतला. त्यांच्या तशा पक्षपातावर हायकोर्टानेही ताशेरे झाडलेले होते. इतका उघड हिंदूविरोध करून आपण भाजपाला लोकप्रिय करत असल्याची अक्कल कशाला येत नाही? संघ वा भाजपाला रोखणे ही एक गोष्ट झाली. ते राजकारणही समजू शकते. पण ज्यात बहुसंख्य हिंदू आनंदाने सहभागी व्हायला उत्सुक असतात, त्यात बिब्बा घालून ममतांना काय मिळवता येत असेल? भाजपाचे नाक कापणे ठिक आहे. पण त्यामुळे हिंदू लोकसंख्या विचलीत होऊन निवडणूका जिंकायच्या कशा? तेच त्रिपुरात डाव्यांचे झाले. त्यातून एक अशी विचित्र स्थिती निर्माण झालेली आहे, की या पुरोगामी पक्षांकडून आता मुस्लिम वा बिगरहिंदू धार्मिक नेते भलतीच अपेक्षा बाळगू लागले आहेत. पुरोगामी असल्याचा दाखला म्हणजे हिंदूविरोधी वागणे, अशी अपेक्षा आता झालेली आहे. हिंदूंच्या भावना दुखावणार नसाल, तर अन्य धर्माचे नेते पुरोगाम्यांना सेक्युलर मानायला तयार नाहीत. हा सापळा पुरोगाम्यांनी व कॉग्रेसने स्वत:साठी स्वत:च रचलेला आहे. त्यामुळे त्यात त्यांची तशीच तडफ़ड होत असते. २०१४ च्या निवडणूकीपुर्वी अमित शहा उत्तरप्रदेशचे पक्षप्रभारी म्हणून तिकडे गेले. सर्वप्रथम त्यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. तिथून मग त्यांच्यासह मोदींवर मंदिराचा अजेंडा घेऊन लढत असल्याचे आरोप सुरू झाले. त्यांना मंदिराचा विषयही बोलावा लागला नाही. कारण तो प्रचार पुरोगाम्यांनी फ़ुकटात करून दिला होता.
मागल्या पाच वर्षात मोदींची भाषणे बारकाईने ज्यांनी ऐकली असतील, त्यांना एक गोष्ट लक्षात येईल. मोदी चुकूनही हिंदूत्वाचा विषय काढत नाहीत. विकास व योजना असलीच त्यांची भाषा असते. सर्व समाजांना सोबत घेऊन जाण्याची भाषा मोदी वापरतात. पण ते हिंदूत्ववादी आहेत आणि हिंदूचे पक्षपाती म्हणून इतर धर्मियांच्या विरोधात असल्याचा आयता प्रचार विरोधकांनीच केलेला आहे. जितके मोदींच्या हिंदूत्वाचे भयंकर चित्र पुरोगाम्यांनी रंगवलेले आहे, तितका भयानक अनुभव बिगरहिंदू समाजाला आलेला नाही. म्हणूनच मुस्लिम ख्रिश्चन समाजातही पुरोगाम्यांविषयी शंका निर्माण झालेल्या आहेत आणि पाच वर्षापुर्वी असलेली मुस्लिम व्होटबॅन्कही आता खिळखिळी होऊन गेलेली आहे. त्यातून शियापंथीय व तलाकपिडीत मुस्लिम महिलाही अलिप्त होत चालल्या आहेत. तर त्या मुस्लिमांना चुचकारणे व हिंदूंच्या मनातला संशय संपवणे, ही पुरोगाम्यांची प्राथमिकता असली पाहिजे. पण हे लोक अजून २०१४ पुर्वीच्या सापळ्यातूनच बाहेर पडायला तयार नाहीत. अन्यथा राहुल गांधींनी कॉग्रेस मुस्लिमांचाच पक्ष असल्याचे ठणकावून कशाला सांगितले असते? आता तर डावेही केरळात रामायणाचे पारायण करायला निघालेले आहेत. खरेतर याची काहीही गरज नाही. आपण हिंदूंचे शत्रू नाही, इतके जनमानस बनवले तरी पुरोगाम्यांसाठी खुप लाभाचे ठरेल. त्यांना मुस्लिमांच्या मतांसाठी अगतिक होण्याची अजिबात गरज नाही. कारण कुठल्याही कारणाने मुस्लिमांची भरघोस मते भाजपाला मिळू शकत नाहीत. त्यांना कुठल्या ना कुठल्या पुरोगामी पक्षाच्याच वळचणीला यावे लागते. पुरोगामी गमावत आहेत, ती हिंदू मते आहेत आणि राहुल गांधी व शशी थरूर यांच्या वक्तव्याने त्याला अधिक गती येत असते. राष्ट्रीय राजकारणात आल्यापासून पुरोगाम्यांच्या मूळ मुस्लिमधार्जिण्या भूमिकेलाच मोदींनी सापळा बनवून टाकलेले आहे. तो सापळा तोडायचीही या अतिशहाण्यांना भिती वाटते. ते त्यातच गुरफ़टत चालले आहेत.
मोदींच राजकारण तुम्ही नेमके पकडता ,पण ते विरोधी आणि समर्थक लोकांना कळत नाही ,समर्थकांचे ठीकाय पण विरोधी पक्षांची अवस्था तुम्ही म्हणता तशी आंधळे आणि हत्ती अशी आहे
ReplyDeleteभाऊ मुळात ती मुस्लिम बुद्धिवंतांची बैठक गुप्त होती ,ती कशी बाहेर आली ,आणि त्यात पण सरकारचा कोणी पेरलेला माणूस होता ,कारण बातमी छापणार तसाच सांगतोय ,राहुल स्वीकारत आणि नाकारत नाहीये म्हणजे ते खरंय .पूर्वी पण चीन च्या बाबतीत अस झालं होत,मुळात सरकार उत्तरदायी असत विरोधी पक्षांना पण इथें ४ वर्षात उलटच चालूय विरोधी पक्षानेच उत्तर द्यावी लागतात ,मोदींची हीच पद्धत गुजरात मध्ये पण होती
ReplyDeleteएक वेगळ जुनमध्ये पावसाने थोडी ओढ दिली होती तेव्हा पुरोगामी लेखकांनी खुष होउन मोदींना कसा फटका बसेल 2019 मध्ये अगदी आकडेवारीसह ते लेख अजुन पन आहेत पन परत पाउस सुरु झाला सामान्य लोक खुष झाले ते कोनीही असोत कारन प्रश्न जीवनाचा आहे हर्षीत होउन जानारे देशासाठी वरदान ठरलेल्या पावसाने नक्की दु:खी झालेत काय परवड म्हनावी मोदीद्वेषाची की देशहीताने हताश झालेत
ReplyDeleteBhau ya purogamyana shahane karu naka. Tyana saplyatach gurfatun rahu dya. Kantala alay ho yancha
ReplyDelete