Monday, July 9, 2018

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

sharad pawar in cap के लिए इमेज परिणाम

आषाढी वारीचे निमीत्त करून अनेक कार्यक्रम होत असतात, तसाच एक प्रकाशनाचा कार्यक्रमही पुण्यात पार पडला. त्यानिमीत्ताने जाणता नेता शरद पवारांनी चांगलीच शेरेबाजी केलेली आहे. आजकाल साहेब शेरेबाजी खुप करत असतात. तसे त्यांना कोणी शब्दात पकडू शकत नाही. कारण इतके गोलमाल बोलण्याचे कौशल्य साहेबांनी आत्मसात केलेले आहे, की दादा कोंडकेंनाही द्वयर्थी बोलण्याची शिकवणी घ्यायला परत साहेबांकडे यावे लागेल. पण सत्य किंवा वस्तुस्थिती कमालीची चेंगट असते. ती मदार्‍याच्या पोतडीच्या छिद्रातून सापाने डोके बाहेर काढावे, तशी डोकावत असते. साहेबांच्या अनेक विधानांची कथा तशीच आहे. ते बोलायला एक जातात, पण त्या शब्दातून जे झाकायचे असते, तितकेच नेमके डोके बाहेर काढत असते. उदाहरणार्थ साहेबांनी उपरोक्त पुस्तक प्रकाशनाच्या निमीत्ताने वारीसंबंधी मतप्रदर्शन केले. स्वत: साहेब कधी वारीला जात नाहीत. हे जगाला ठाऊक आहे. त्यामुळे त्याचा खुलासा या निमीत्ताने करण्याची काहीही गरज नव्हती. पण पंढरपूर वा विठ्ठल दर्शनाचा विषय त्यांनी कशाला काढला ते समजले नाही. आपण अंधश्रद्ध नाही असे त्यांना बहुधा सुचवायचे असावे. पण तसे म्हणायचे तर गुपचुप त्या भागात असल्यावर दर्शनाचा लाभ घेतो, असेही साहेब म्हणालेच. त्याचे फ़ोटो वगैरे येणार नाहीत, याचीही काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. वरकरणी बघता आपल्या भक्तीभावाचे वा श्रद्धेचे प्रदर्शन मांडण्याचे कारण नाही, हा त्यातला आशय चांगला आहे. पण असे कुठले निमीत्त धरून ते सांगताना प्रदर्शन होतच असते ना? यालाच भिडे गुरूजींच्या बागेतला आंबा खाणे म्हणतात. कारण नुसता आंबा खाऊन मुले होतात असे गुरूजींनीही कुठे म्हटलेले नाही. मुल होण्यासाठी आवश्यक असलेले ‘उद्योग’ गुपचुप करावेत आणि प्रदर्शन आंबा खाण्याचे करायचे असते. मग लोकांना आंब्यामुळे मुले झाली असे वाटते.

कुठलीही गोष्ट वा कृती करताना त्यातला हेतू शुद्ध असला पाहिजे. त्यातून काही लाभ मिळण्यासाठी वा गैरहेतूने काम करू नये. त्यामुळे तुम्ही देवदर्शनाला जात असाल तर त्याचे प्रदर्शन करायची काहीही गरज नसते. हजारो, लाखो वारकरी तसेच कसलाही गाजावाजा प्रदर्शन केल्याशिवाय वारी करून येतात. समाधानीही होतात. त्यात कोण सहभागी झाला आहे किंवा कोण त्यापासून अलिप्त राहिला आहे, याची चर्चा वारकरी करीत नसतात. मग त्यापासून शरद पवार चार हात दूर राहिल्यामुळे कुणा वारकर्‍याला पांडुरंगाची अवकृपा झाली असे वाटत नाही. की त्याच वारीत संभाजी भिडे सहभागी झाल्यामुळे ती वारी विटाळली, असेही कोणी मानत नाही, अशा गोष्टींचा गवगवा त्यांना करावा वाटतो, जे त्यात सहभागी होत नाहीत की त्यापासून कटाक्षाने दूर रहाण्याचा उद्योग करीत असतात. मैलोगणती पायपीट करीत उन्हापावसात वारी करणार्‍याला फ़ोटोशी कर्तव्य नसते. त्याला चंद्रभागेच्या तिरी जाऊन विठूरायाच्या मंदिराचा कळस दिसला, तरी साक्षात पांडुरंगाशीच गळाभेट झाल्याचे समाधान मिळत असते. त्याला वारीत वा पंढरपूरला गुपचुप जावे लागत नाही. वारकर्‍याला चेहरा नसतो. त्याचा फ़ोटो कोण कशाला काढणार? संपुर्ण वारीच एक चेहरा असतो आणि एक धारणा असते. पण ती साहेबांना अजून उमजलेली नाही. म्हणून त्यांना असे गोंधळल्यासारखे विधान करावे लागलेले आहे. पण ते विधान करताना त्यांनी किती सहजगत्या मनातले सत्य बोलून टाकले, त्याकडे कोणाचे गंभीरपणे लक्ष गेलेले दिसत नाही. ‘कधी पंढरपूरच्या दिशेला गेलो, तर फार लोकांना बरोबर न घेता गुपचूप पांडुरंगाचे दर्शन घेतो.’ हा किती मोठा फ़रक आहे ना? गुपचुप भेटायला पांडुरंग काय विरोधी पक्षाचा आमदार मंत्री असतो काय? तो अढळ वीटेवर उभा आहे आणि पायरीवर अडवलेल्या चोखोबा वगैरेंना बाहेर येऊन भेटलेला आहे. मग त्याला अगुपचुप भेटण्याची गरज काय?

याच विधानाचा पुढला भाग अतिशय मोलाचा आहे. ‘मला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर केलेले आवडत नाही. कधी पंढरपूरच्या बाजूला गेलो, तर फार लोकांना बरोबर न घेता गुपचूप पांडुरंगाचे दर्शन घेतो. त्याचे फोटो प्रसिद्ध व्हावेत, अशी माझी इच्छा नसते.’ साहेबांना कोणत्याही गोष्टीचे अवडंबर केलेले आवडत नाही. म्हणजे विठ्ठ्ल दर्शनाचे अवडंबर आवडत नाही. पण पगडी पागोट्याचे मात्र अवडंबर आवडत असते. तसे नसते तर एका जाहिर समारंभार शेकडो कॅमेरे सज्ज असतानाच सन्मानाने दिलेली पगडी काढून मुद्दाम मागवलेले पागोटे भुजबळांना जाहिर समारंभात देण्याचा उद्योग साहेबांनी कशाला केला असता? तर त्यांना त्याचे फ़ोटो निघायला हवे होते आणि चित्रण प्रसिद्ध व्हायला हवे होते. हेतुपुरस्सर आपण पगडी पागोट्याचा खेळ केल्याची अशी कबुली नकळत समोर येत असते. देवदर्शनाचे फ़ोटो प्रसिद्ध होऊ नयेत, पण पगडी हेटाळण्याचे मात्र फ़ोटो प्रसिद्ध व्हावेत. त्याच्यावर चर्चा वादंग माजावेत. याचा साहेबांना खुप हव्यास असतो. नसता, तर त्यांनी कार्यक्रम संपल्यावर कार्यकर्त्यांना व भुजबळांना बाजूला घेऊन (पंढरपूर पॅटर्नप्रमाणे) गुपचुप विषय मार्गी लावला असता ना? थोडक्यात कशाचे अवडंबर माजवावे आणि कुठल्या गोष्टी गुपचुप उरकाव्यात, याचे काही पंढरपुरी निकष असतात. साहेब ते निकष पाळतात. मनात खरा भाव असेल तर देवदर्शनाचे अवडंबर माजवले जात नसते. पण मनातली श्रद्धा दिखावू व दाखवण्यापुरती असली, मग फ़ोटो अगत्याचे ठरतात. आवश्यक वाटू लागतात. भुजबळांच्या तुरूंगकाळात त्यांच्याकडे साफ़ पाठ फ़िरवलेली असल्याने त्यांच्या सुटकेनंतर आपल्यालाच किती आस्था आपुलकी असल्याचे प्रदर्शन मांडून अवडंबर माजवण्याला पर्याय कुठे होता? ह्याला म्हणतात तारतम्य! बाकीचे उद्योग चालवायचे आणि मनातली इच्छा साधण्यासाठी गुपचुप आंबा खाऊन घ्यायचा.

आता पवारांच्या विधानाचा पडताळा बघूया. जे पवार पंढरपुरात जाऊन गुपचुप पांडुरंगाचे दर्शन घेतात, पण त्याच गाजावाजा होऊ देत नाहीत, ते अन्य कशाकशाचा सतत गाजावाजा करीत असतात? कशाला करीत असतात? मनातले लपवायचे असले, मग त्याचा गाजावाजा करावाच लागतो. म्हणून तर १९९९ सालात वाजपेयी सरकार पडले, तेव्हा शरद पवारांनीच प्रथम सोनियांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्याचा जाहिर उच्चार संसदेच्या पाय्ररीवरून केला होता. पण निवडणुका जाहिर झाल्या आणि त्यांनी कॉग्रेसच फ़ोडून सोनियांना परदेशी नागरिक म्हणून बोंब ठोकली होती. वेगळ्या पक्षाची चुल मांडली होती. असा आक्षेप त्यांनी कॅमेरासमोर केला नाही, तर गुपचुप कॉग्रेस कार्यकारिणीला पत्र लिहून आपल्या ‘मनिचा भाव’ कथन केला होता. पांडुरंगाचे दर्शन मोजक्या लोकांना सोबत घेऊन करणारे शरद पवार, इफ़्तार पार्ट्या मात्र जंगी स्वरूपात शेकडो लोकांना जमवून करीत असतात. कारण त्यांना मुस्लिमांविषयीची आत्मियता मतांसाठी दाखवायची असते. गाजावाजा करून इफ़्तार पार्टीचे अवडंबर माजवायचे असते. इतका देखावा करायचा की दिवसभराचा उपास सोडणार्‍या खर्‍या श्रद्धाळू मुस्लिमालाही साहेबांनी दिवसभर रोजा पाळलेला असावा, असाच संभ्रम व्हावा. झकास इस्लामी लोकरी टोपी चढवून फ़ोटो निघावेत, असा प्रयास त्यातून लपत नाही. हा एकूण विधानातला आशय आहे. अर्थात पांडुरंग असो किंवा अल्ला असो, साहेबांना त्यांच्याशी कुठलेही कर्तव्य नसते. त्यांना आपला कार्यभाग उरकण्याशी मतलब असतो. मग विषय तुरुंगात खितपत पडलेल्या भुजबळांचा विषय असो वा पंढरपूरची वारी असो. अशाच टवाळखोरीत उभे आयुष्य खर्ची पडले, पण त्यातून काही शिकायची तयारी वा इच्छा नसेल, तर हाती लागणार काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्यासाठी एक सल्ला दिलेला आहे.

मनी नाही भाव, देवा मला पाव,
देव अशाने पावायचा नाही रे,
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

13 comments:

  1. सही पकडे है,भाऊ!

    ReplyDelete
  2. In last few years never seen or heard about Saaheb visit in Mandir. I m residing in neighbourhood of Mandir. Amazing.

    ReplyDelete
  3. इफ्तार पार्टीमध्ये जाऊन खांद्यावर हिरवा रुमाल , डोक्यावर हाजी मस्तान घालायचा तशी लोकरी टोपी घालून ओठांवर ' पवित्र ' हासू ( इंग्रजीमध्ये हे वर्णन करण्यासाठी एक छान वाक्य आहे ' होलिअर देन काऊ ' ) आणि याचे फोटो वाजतगाजत छापून आणायचे आणि त्याचे अवडंबर माजवायचे आणि ' शीर कुर्मा ' चोपायचा. एकमेकाला मिठाई भरवतानाचे फोटो काढायचे. आणि पंढरपूरला गेल्यावर गुपचूप दर्शन घेऊन यायचे ............इतका भंपकपणा का करतात लोक तेच कळत नाही. सामान्य लोकांना एवढे मूर्ख समजतात ही लोक याचा जास्त राग येतो. अशाच एका इफ्तार पार्टीनंतर यांनी पूर्वी घोषणा केली होती कि ' अल्पसंख्याकांनाच ' टार्गेट केले जाते. मंदिरात जायला याना लाज वाटते. भाषणात यांनी कधी ' आई भवानी ' अथवा ' आई जगदंबेचा ' उल्लेख तरी केला का ते आठवा.' दहशतवादी इशरत जहाँचा पोलिसांकडून ' एन्काउंटर ' झाला तेंव्हा यांनी तिच्याच बाजूने टाहो फोडला होता. डमरू वाजवून लोकांचे लक्ष वेधून घेऊन ' डोंबाऱ्याचा ' चालणारा खेळ आणि यांचे हे खेळ यात काही फरक नाही.

    ReplyDelete
  4. निर्लज्जपणा आणि ढोंगीपणा करण्यातच उभी हयात घालवलेल्या (अ)जाणत्या राजाला अशा लेखांची भीती वाटत नाही. कारण मतदार किती पोरकट आणि अपरिपक्व आहे हे चांगले जाणून आहेत. आता तरुण मतदारांना एक गठ्ठा मतपेटी बनवले आहे. सोशल मिडीयाच्या अफूचे व्यसन लावून.

    ReplyDelete
  5. विठोबा भक्तांसाठी युगे अठ्ठावीस विटेवर उभा राहिला, हा लबाड लांडगा तीन तपे कुंपणावर उभा राहिला आहे. आता सत्ता नसल्याने तडफडत आहे. त्याच्या साठी सत्ता हाच देव आणि त्यासाठी लबाड बोलणे आणि वागणे हाच खरा धर्म.

    ReplyDelete
  6. खुप मार्मीक लेख भाऊ

    ReplyDelete
  7. गुरूचा अशी वाक्य फेकायचा उपयोग शिष्यच चांगल्या प्रकारे करतोय आणि पवार हे राजकीय गुरू असल्याची जाहीर कबुली देउन त्यांना कायमच अडचणीत आणुन ठेवलय

    ReplyDelete
  8. हा "अर्धवटराव" बेभरवशाचा असल्याने ना हिंदूंचा नेता झाला, ना मुस्लिमांनचा झाला. आता या वयात सगळी मळमळ बाहेर येतेय. सहन होत नाही, आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था झाली आहे.

    ReplyDelete
  9. Bhau
    Saheb ha vishay aala ki tumhi front foot var batting kartat. Aso, kahi kahi personality astatach ashya.

    I really enjoy your batting on pa-war topic, there are hardly few like you (Or you may be the only) who can write the truth like this and that too in very blunt words. But that is so satisfying for many of us as you are writing our thoughts only.

    Keep it up, Long Live Bhau.
    JaiHind

    ReplyDelete
  10. साहेबांच्या प्रत्येक वाक्याला * टाकून ' स्वरचित अटी आणि शर्ती लागू' असं समजण्याची गरज आहे..

    ReplyDelete
  11. खुप छान लेख

    ReplyDelete