पाकिस्तानात नुकतेच सत्तांतर झाले आणि तिथल्या नव्या पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू अगत्याने उपस्थित राहिले. सिद्धू आज राजकारणात असतील, पण मुळात तो एक क्रिकेटपटू आहे आणि म्हणून पाकचे नवे पंतप्रधान इमरान खान यांनी सिद्धूला आमंत्रित केलेले होते. अर्थात इमरान स्वत:च माजी क्रिकेटपटू असल्याने त्याने आपल्या समकालीन परदेशी खेळाडूंना आमंत्रित करणे स्वाभाविक आहे. म्हणूनच त्याने सिद्धूच नव्हे तर कपील देव आणि सुनील गावस्कर अशा इतर नामवंत भारतीयांनाही बोलावले होते. पण त्या दोघांनी त्यामागचे राजकीय डावपेच ओळखून तिकडे जायचे टाळले. खरे तर ते दोघेही कुठे राजकारणात नाहीत. म्हणूनच व्यक्तीगत जीवनात त्यांनी इमरानच्या शपथविधीला जाणे कोणाला खटकलेही नसते. पण भारतीय जनतेच्या भावना ओळखून त्यांनी तिथे जायचे टाळले. त्याची उलटी बाजू अशी, की सिद्धू राजकारणात असल्याने अशा बाबतीत त्याने अधिक काळजी घ्यायला हवी होती. पण कुठल्याही बाबतीत सिद्धू कधीच गंभीर राहिला नाही. म्हणूनच अनेकदा निवडून येणारा उमेदवार असूनही भाजपाने त्याला बाजूला सारण्याचा निर्णय काही वर्षापुर्वी घेतला होता. कॉग्रेसने त्याला पक्षात स्थान दिले व आपल्या पंजाबी खंबीर नेत्याचा रोष पत्करूनही मंत्रीपदही दिले. मात्र त्याचे भान सिद्धूला अजिबात नाही. म्हणूनच टाळणे शक्य असूनही त्याने पाकिस्तानला जाण्याची मुळातच चुक केली. पण त्याच्याही पुढे जाऊन तिथे पाकच्या लष्करप्रमुख जनरल बाजवा यांची गळाभेट करण्याचाही आगावूपणा केला. ज्या माणसाच्या आदेशावर भारतात व घातपात होतात आणि शेकड्यांनी भारतीय सैनिक शहीद झालेले आहेत, त्याच्याशी गळाभेट कुणाही भारतीयाला खटकणारीच असते. पण त्याचे भान ठेवण्याइतका सिद्धू हा गंभीर माणूस कुठे आहे? त्याने पक्षाला अकारण अडचणीत आणलेले आहे.
लोकशाही अध्यक्षीय असो किंवा संसदीय असो, त्यात नेहमी सत्ताधारी पक्ष टिकेचे लक्ष्य होत असतो. सहाजिकच भारतीय राजकारणात मागल्या चार वर्षात सातत्याने भाजपा टिकेचे लक्ष्य झाला असेल, तर नवल नाही. पण त्याचीच दुसरी बाजू अशी आहे, की तितक्याच सातत्याने प्रमुख विरोधी पक्ष मानला जाणार्या कॉग्रेस पक्षालाही टिकेचे लक्ष्य व्हावे लागते आहे. हा विचित्र विरोधाभास आहे. कारण कुठलीही मोठी सत्ता व निर्णय हाती नसलेल्या पक्षावर टिका होण्याचे कारण नसते. पण कॉग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यातही अपवाद करून दाखवला आहे. सिद्धू त्यापैकी एक आहे. आपण व्यक्तीगत पातळीवर इमरानचे आमंत्रण स्विकारले असे त्याने कितीही म्हटले असले, तरी खुद्द त्याच्याच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पहिली झोड सिद्धूवर उठवली. हे मुख्यमंत्री भारतीय हवाई दलाचे निवृत्त कॅप्टन आहेत. म्हणूनच त्यांना भारतीय शहीद जवानांच्या यातना वेदना कळतात. नुसताच वाचाळवीर असलेल्या सिद्धूला त्याचा गंधही नसतो. म्हणूनच त्याने पाकिस्तानला जाण्याची चुक केली व पुढे गळाभेट करून जखमेवर मीठ चोळण्याचा आगावूपणा केला आहे. पंजाब हा भारतातील सेनादलाच्या निवृत्त वा विद्यमान सैनिकांचा सर्वात अधिक भरणा असलेला समाज आहे. म्हणूनच तितक्या प्रमाणात अधिक लोकसंख्या दुखावली जाते. त्याचे भान अमरिंदर यांना आहे. अर्थात हा विषय एका पंजाब प्रांतापुरता मर्यादित नसून देशभर पसरलेल्या आजीमाजी जवान व शहीदांच्या आप्तस्वकीयांच्या दुखण्याचा आहे. सहाजिकच पुढे येऊन कुणी कॉग्रेस नेता सिद्धूचे समर्थन करू शकलेला नाही. मग असा प्रश्न पडतो, की सिद्धू वा तत्सम कॉग्रेस नेत्यांना असल्या उचापती करण्याचे कारणच काय? पक्षाला चार मते मिळवून देण्याची यांची कुवत नाही आणि संघटनात्मक कौशल्यही नाही. अशा रंगल्या तोंडाची चेहर्यांची कॉग्रेसला गरज काय आहे?
हे लोक आपल्या कृतीतून वा बोलण्यातून पक्षाची लोकप्रियता वाढवण्यापेक्षा असलेली विश्वासार्हता संपवत असतात. मग आधीच पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या कॉग्रेस पक्षाचे भवितव्य काय असेल? मध्यंतरी गुजरात निवडणूकीच्या भरात मणिशंकर अय्यर या ज्येष्ठ नेत्याची यासाठीच पक्षातून हाकालपट्टी करावी लागली होती. आता त्याला पक्षात पुन्हा स्थान दिलेले असले तरी सिद्धू वा शशी थरूर असले उचापतखोर कमी नाहीत. शशी थरूर हे भारतीय राजकारणात येण्यापुर्वी संयुक्त राष्ट्रसंघातले एक अधिकारी म्हणून काम केलेले मुत्सद्दी आहेत. पण भारतीय राजकारणात त्यांच्या बोलण्यावागण्याने त्यांनी आपल्या पक्षाला सतत अडचणीत आणलेले आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू व त्याचा खटला त्यांच्या डोक्यावर तलवार टांगून उभा आहे. अशावेळी तरी त्यांनी आपल्याला आवरले पाहिजे. पण तेही सिद्धूच्या पलिकडे पोहोचलेले उचापतखोर आहेत. गेल्या आठवड्यात त्यांचे समकालीन राष्ट्रसंघाचे सचिव कोफ़ी अन्नान यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित रहाण्यासाठीही थरूर यांना न्यायालयाची परवानगी घेऊन परदेशी जावे लागले. तिथे गेल्यावर अन्य देशात भरकटणारे थरूर मुळचे केरळी असून तिरुअनंतपुरम हा त्यांचा लोकसभेत निवडून आलेला मतदारसंघ आहे. अन्नान यांच्या निधनापुर्वीच केरळ अतिवृष्टी व महापुरच्या गर्तेत लोटला गेला होता. तिकडे पाठ फ़िरवून शशी थरूर विदेशी भटकत राहिले आणि त्या चुकीवर प्रश्न विचारले गेले, तेव्हा त्यांनी आपण केरळला परदेशी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची थाप ठोकून दिली. ती खरी ठरवण्यासाठी आपण केरळच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करूनच हे काम करीत असल्याचेही थरूर यांनी बेधडक सांगून टाकले. सहाजिकच त्यांचा खोटेपणा मुख्यमंत्र्यांना जाहिरपणे सांगावा लागला. मुळात याची काय गरज असते?
सिद्धू असोत किंवा थरूर, अय्यर; अशा लोकांना आपले नसलेले महत्व जगाला दाखवून देण्याची इतकी हौस असते, की ते लोक आपल्यासकट पक्षाला व सहकार्यांनाही अडचणीत आणत असतात. आपला प्रभाव वा महत्ता सिद्ध करण्यासाठी अशा कर्तृत्वहीन लोकांना नेहमीच काहीतरी उचापती वा उठाठेवी कराव्या लागत असतात. ते माध्यमातून व प्रसिद्धीतून आपले कर्तृत्व गाजवण्याच्या नादात नको ती उठाठेव करून बसतात आणि पक्षाला सारवासारव करण्याची नामुष्की येत असते. थरूर किंवा सिद्धू यांनी आपल्या पक्षाला कोणते योगदान दिले, हा मुळातच संशोधनाचा विषय आहे.. थरूर परदेशातून आल्यावर थेट कॉग्रेस नेता बनले आणि सिद्धू भाजपात आपली कारकिर्द सुरू करून नंतर कॉग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना तात्काळ अधिकारपदे मिळालेली आहे. पण खरेच या लोकांची भारतीय राजकारणात काही उपयुक्तता आहे काय? प्रसिद्धी माध्यमात झळकणारे चेहरे, यापेक्षा त्यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान शून्य आहे. पण त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांच्या पक्षाला कितीतरी किंमत मोजावी लागत असते. सत्तेत आलेल्या भाजपासाठी ती किंमत भले आज परवडणारी असेल. पण सत्तेला वंचित झालेल्या व पुनरागमनासाठी धडपडणार्या कॉगेस पक्षाला अशा उठाठेवी करणारे वा उचापतींनी नुकसान करणारे कसे परवडू शकतात? राहुल गांधी अशा लोकंना का भरती करतात आणि त्यातून पक्षाचे पुनरुज्जीवन कसे होणार आहे, ते म्हणूनच रहस्य बनलेले आहे. अशाच उठाठेवींनी पक्षाला नित्यनेमाने अडचणीत आणणार्या दिग्वीजय सिंग यांना अलिकडे गप्प केल्याने जी पोकळी निर्माण झाली, त्याची भरपाई अशा नमुन्यांना पक्षात स्थान देऊन राहुल गांधी करू इच्छितात काय? कारण ह्या लोकांमुळे पक्षाची संघटना उभी रहायला कुठे मदत होत नाही. पण जे मित्रपक्ष कॉग्रेसच्या समर्थनाला येतात, त्यांनाही अशा उचापतखोरांमुळे कॉग्रेसचे समर्थन अवघड होत चालले आहे.
भारतात लोकशाही आहे आणि आजही विविध मतचाचण्या होतात. त्यात साडेचार वर्षे उलटून गेल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागलेली नसल्याचे निष्कर्ष काढले जातात. तेव्हा त्याच पंतप्रधानाला आव्हान देऊ बघणार्यांनी आपली कुठे चुक होते आणि कुठे दुरूस्ती केली पाहिजे, याचा विचार करण्याची गरज असते. बारकाईने बघितले तर मोदींची लोकप्रियता सिद्धू, थरूर, अय्यर अशा दिवाळखोरांच्या उचापतीमध्ये सामावलेली आहे. कारण त्यांच्यामुळे विरोधात असून कॉग्रेसपक्ष सातत्याने टिकेचे लक्ष्य होत असतो. पक्षाची धोरणे वा भूमिका यापेक्षा अशा लोकांच्या खुळेपणाने कॉग्रेसला अडचणीत यावे लागते. तितकी मोदींची मतदाराला अधिक उपयुक्तता वाटू लागते. साधारणपणे कुठल्याही लोकशाहीत विरोधी पक्ष जितका दुबळा किंवा बेताल असतो, तितकी सत्ताधारी पक्षाची लोकप्रियता अधिक असते. मोदी वा भाजपा त्याला अपवाद नाहीत. त्यांना आपल्या चुका कबूल करण्याची वा झाकण्याचीही गरज असल्या कॉग्रेस नेत्यांनी ठेवलेली नाही. कॉग्रेस पक्षातल्या या बाजारबुणग्यांना बाजूला केल्याशिवाय त्याचे पुनरूज्जीवन शक्य नाही. कारण असे लोक जागा अडवून बसलेले असतात आणि म्हणूनच पक्षातल्या इतर गुणी लोकांना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधीही मिळत नसते. अशीच काहीशी स्थिती पाच वर्षापुर्वी भाजपाची होती. तिला बाजूला सारत मोदींसारखे नेतृत्व मुसंडी मारून पुढे आले नसते, तर भाजपाला २०१४ मध्ये इतके मोठे यश वा सत्ता मिळाली नसती. दहा वर्षाच्या अपयशातून भाजपाचा कार्यकर्ता व दुय्यम नेतॄत्वाला त्याचा साक्षात्कार झाला आणि त्यातून नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला. त्यातून नरेंद्र मोदी हा चेहरा पुढे आला. चित्र पालटत गेले. आज कॉग्रेसला या उठाठेवी करणार्यांना लगाम लावण्याचीही बुद्धी सुचत नसेल, तर त्या पक्षाला नजिकच्या काळात कुठले भवितव्य असू शकते?
भाउ अध्यक्षच काही न करतुत्व न दाखवता जर या पदी पोचला असेल व तो पन तसच वागत असेल तर बाकींची काय कथा राहुल जर्मनीत जाउन isis ही बेरोजगारांची संघटना आहे व महिलांवर अत्याचार केवळ भारतीय संस्कृतीमुळे होतात असे अकलेचे तारे तोडत असेलतर आताच भाजपने बहूमत गाठल्यात जमा आहे म्हनुनच हल्ली मोदी निवांत दिसतात जे पुर्वी सतत गंभीर असत. शहा फक्त लोकांना पेजप्रमुख नेमुन मतदान घडवुन आणतील.
ReplyDeleteहे कमी म्हनुनकी काय wire theprint सारखी कांगरेसी माध्यमे तसेेच कांगरेसी पत्रकार त्यांचे पेरलेले लेखक,बाॅलीवुडी,इतिहासकार,डावे उमर खालीद पाक सेना यांच समर्थन करतात तसेच केरळवरुन देशाला तोडण्याचे मनसुबे रचतात म्हनजे उरल्यासुरल्या लोकांना ते भाजपकडे ढकलतात कारन भारतीय जनता नेमक उलटा विचार करते आणि जाणते राजे पन हल्ली राहुल जे बोलेल त्याला पाठींबा देतात
ReplyDeleteUttam theory. Yaatil Siddhu BJPnech pudhe aanle v Tharoor lokanmadhoon 2 vela nivdoon aalele aahet. Te tyanchya junya bosschya antydarshans gele tar gair kaay? Keralat te ekte kaay karoo shaktaat? Aso.
ReplyDeleteशशी थरूर विदेशी भटकत राहिले आणि त्यावर प्रश्न विचारले गेले, तेव्हा त्यांनी आपण केरळला परदेशी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची थाप ठोकून दिली. ती खरी ठरवण्यासाठी आपण केरळच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करूनच हे काम करीत असल्याचेही थरूर यांनी बेधडक सांगून टाकले. सहाजिकच त्यांचा खोटेपणा मुख्यमंत्र्यांना जाहिरपणे सांगावा लागला. मुळात याची काय गरज असते?
DeleteBhau, tumchya blog site war kuthalya tari virus ne attack kelela distoy. Khoop pop-ups yet aahet.
ReplyDelete