Sunday, August 26, 2018

राफ़ायल नामे पेट्रोल-डिझेल

राफेल डील के लिए इमेज परिणाम

संसदेच्या मागल्या पावसाळी अधिवेशनात एक मोठा चमत्कार घडला होता. सहसा अविश्वास प्रस्ताव हा अधिवेशनाच्या अखेरीस चर्चेला येत असतो. विश्वास प्रस्ताव असेल तर तो आरंभी येत असतो. हा प्रस्ताव अविश्वासाचा होता तरीही सभापतींनी सत्ताधारी पक्षाशी मसलत करून तात्काळ स्विकारला आणि लगेच चर्चेलाही घेतला. तोपर्यंत राहुल गांधी रानोमाळी ओरडत फ़िरत होते की पंधरा मिनीटे मला संसदेत बोलू द्या, मोदींना पळता भूई थोडी होईल. राहुल अविश्वास प्रस्तावाच्या वेळी तब्बल पाऊण तास बोलले आणि पंतप्रधान मोदींच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नाही. अखेरीस आपले भाषण संपल्यानंतर राहुल गांधीच पंतप्रधानांच्या आसनापर्यंत गेले व त्यांनी मोदींना बसल्या जागी मिठी मारून ती माशी हलवली. नंतर या चर्चेला उत्तर देताना मोदींनी राहुलची यथेच्छ खिल्ली उडवली. अर्थात आता अशा टवाळीची सवय राहुलच्याही अंगवळणी पडलेली आहे. म्हणून त्यांनीच आपल्या भाषणात ‘मला पप्पू म्हणा’ अशी कबुली देऊन टाकली होती. पण हल्ली तो काळ निघून गेलेला आहे. राहुल पप्पू असल्याचे जनतेने स्विकारलेले आहे. पण त्यांच्या नादाला लागून किती शहाणे बुद्धीमंतर पप्पू होतात, याकडे लोकांचे लक्ष असते. तर अविश्वास प्रस्तावाच्या त्या चर्चेदरम्यान बहुतांश वाहिन्यांनी समांतर चर्चाही चालवलेल्या होत्या आणि त्यात एका मराठी सर्वज्ञानी बुद्धीमंताने राहुल क्षेपणास्त्र घेऊन जोरदार लढत असल्याचीही भाषा केलेली असते. थोडक्यात आपणही राहुल सोबत पप्पू झाल्याची कबुली दिली होती. कारण अशा बुद्धीमंतांना राफ़ायल हे डिझेल आहे की पेट्रोल आहे, त्याचेही आता भान उरलेले नाही. राहुलनी आपल्या आरोपबाजीनेच ते सिद्ध केलेले आहे. जे लोक नित्यनेमाने मोदींच्या भाषणातल्या चुका शोधण्यासाठी जाडजुड भिंग घेऊन सज्ज बसलेले असतात, त्यांना राफ़ायल विमानाच्या किंमती कळतात का?

मागल्या चारपाच महिन्यापासून राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या राफ़ायल विमान खरेदीला लक्ष्य केले आहे. ही खरेदी युपीए सरकार असताना व्हायची होती आणि तेव्हा ज्या किंमतीत विमाने खरेदी व्हायची होती, त्यापेक्षा अधिक किंमत मोजून ही खरेदी आता मोदी सरकारने केल्याच दावा राहुल सातत्याने करीत असतात. परंतु ते रोज काय बोलतात आणि रोजच्या रोज काय बदलतात, किती बदलतात, त्याची कोणी दादफ़िर्याद घेतली आहे काय? मागल्या चारपाच महिन्यात राहुलनी राफ़ायल विमानांच्या मोदी सरकारने केलेल्या खरेदीचे आकडे तपासले, तर कोणाच्याही मनात शंका येईल, की राहुल विमानाविषयी बोलत आहेत की पेट्रोल डिझेलच्या किंमतीविषयी बोलत आहेत? कारण दहापंधरा वर्षात होणारी मोठी खरेदी व त्याच्या किंमती दैनंदिन स्वरूपात बदलत नसतात. आज एक भाव आणि दुसर्‍या दिवशी भलताच भाव, असे कधी विमानांच्या खरेदीत होऊ शकत नाही. कारण ह्या खरेदी व्यवहारात अनेक महिने वर्षे घासाघीस चालते आणि अखेरीस किंमत ठरली, मग प्रत्यक्षातली देवाणघेवाण अनेक वर्षे चालू असते. पण राहुल गांधीचे क्षेपणास्त्रांनी चालले आरोपा़चे युद्ध जगावेगळे आहे. त्यात राफ़ायल विमानाच्या किंमतीमध्ये दैनंदिन चढउतार येत असतात. कुठल्या जाहिरसभेत बोलताना राहुल गांधी राफ़ायल विमान खरेदीत जी किंमत सांगतात, ती संसदेत बोलताना बदललेली असते आणि नंतर इतर कुठे भाषण करताना आणखीनच बदललेली असते. ‘इंडिया टुडे’ नावाच्या एका माध्यम समुहाने मग राहुल गांधींच्या बाजारात राफ़ायल विमानाच्या किंमतीतले चढउतार शोधण्याचा अभ्यास केला, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. एकवेळ भारतातल्या भाजी बाजारातले किरकोळ कांदा बटाटा भाज्यांचे भाव स्थीर असतील. पण राहुलच्या राफ़ायलचे दर प्रतिदिन व तासातासाला बदलत असतात.

चार महिन्यात राहुल गांधींनी मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना राफ़ायल विमानाच्या किंमती चार वेळा बदल केला आहे. ह्या किंमती मोदींच्या काळातील नसून युपीए सरकारने ठरवलेल्या विमानाच्या खरेदीसंबंधी आहेत. म्हणजे मनमोहन सरकारने किती वेळा व किती व्यवहार केले, असाही प्रश्न उपस्थित होतो. जर हा व्यवहार एकदाच झालेला असेल तर विमानाची एकदाच ठरलेली किंमत राहुलना सांगता आली पाहिजे. ती सतत पुढल्या आरोपामध्ये बदलता कामा नये. पण गेल्या एप्रिल महिन्यापासून राहुल हा विषय चघळत आहेत आणि त्यांच्या भाषणांचा वा आरोपांचा आढावा घेतला, तर राफ़ायल विमानाच्या किंमती पेट्रोल डिझेलच्या गतीने बदलत असल्याचे दिसते. २९ एप्रिल रोजी कॉग्रेसने दिल्लीत आक्रोश मेळावा भरवला होता आणि त्यात हा विषय राहुलनी प्रथम काढला. तेव्हा ते म्हणाले होते, मनमोहन सरकार असताना हेच राफ़ायल विमान ७०० कोटी रुपयांना एक, याप्रमाणे खरेदी करायचे ठरले होते. पण मध्यंतरी सरकार बदलले आणि सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तब्बल १५०० कोटी रुपये एक अशा दराने विमान खरेदीचा करार केला. म्हणजेच प्रत्येक विमानामागे ८०० कोटी रुपयांची अफ़रातफ़र झालेली आहे. सहाजिकच २०-३० विमानांच्या खरेदीत अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाला. देशाच्या इतिहासातला तो सर्वात मोठा घोटाळा असल्याचा जाहिर शोध राहुलनी लावलेला होता. विमानाच्या मूळ किंमतीपेक्षाशी शंभर कोटी रुपये अधिक मोजले जाणार असतील, तर त्याला घोटाळाच म्हणावे लागणार ना? पुढले दोन महिने राफ़ायल विमानांच्या किमंती राहुल बाजारात स्थिर होत्या. ज्याला कोणाला विमान हवे, त्यांना राहुल ते १५०० कोटी रुपयात विकायला तयार बसलेले होते. पण त्यांच्या दुर्दैवाने कोणी ग्राहक आला नाही आणि सर्वच विमाने तशीच धुळ खात पडून राहिली.

अगदी कर्नाटक विधानसभा प्रचारातही राहुल राफ़ायल विमाने विकायचा प्रयत्न करीत होते आणि ती घ्यायला कोणीच राजी नव्हता. ना कोणी मोदींची १५०० कोटी रुपयाची विमाने घ्यायला राजी होता, की मनमोहन सरकारची ७०० कोटी रुपयांची विमाने घ्यायला राजी होता. त्यामुळे राहुलना लाटका माल पद्धतीने विमानांच्या किंमती खाली आणुन जाहिर सेलच्या बाजारात उतरावे लागले. जुलै महिन्यात त्यांनी मनमोहन सरकारच्या राफ़ायल विमानांच्या किंमती जवळपास २० टक्क्यांनी कमी करून ५२० कोटी रुपयांना राफ़ायल विमानांची विक्री सुरू केली. ती स्वस्त आणि मस्त असल्याचे लोकांना पटावे, म्हणून मोदी सरकारच्या राफ़ायलच्या किंमतीही खुप चढवून प्रत्येकी १६०० कोटीपर्यंत वर नेल्या. त्यासाठी अन्य कुठे जाण्यापेक्षा राहुलनी लोकसभेतच टपरी मांडली आणि लाटका माल विकायला काढला. अर्थात राहुलचा माल खोटा असल्याचा ओरडा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिथेच जाहिर करून टाकले आणि राहुल बाजार उठला. एकही विमान तिथेही विकले गेले नाही. मग काय करायचे? मग तीन आठवड्यांनी राहुल छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर येथे गेलेले होते. तिथल्या मेळाव्याला चांगली गर्दी बघून त्यांनी पुन्हा राफ़ायल विमानांचा पेटारा उघडला आणि किंचीत भाव चढवून ग्राहकांचा शोध सुरू केला. लोकसभेत मनमोहन मॉडेलची राफ़ायल विमाने ५२० कोटी रुपयांना विकायला काढलेली होती, ती रायपूरला ५४० कोटी रुपयांना विकत राहुल गांधी रस्त्यावर बसलेले होते. मात्र त्यांना रायपूरमध्येही कोणी ग्राहक भेटला नाही, निराश व्हावे लागले आणि तो विमानांचा ताफ़ा घेऊन राहुल पुन्हा दिल्लीला परतले. आपल्या सहकारी सवंगड्यांना गोळा करून त्यांनी सल्लामसलत केली आणि पुढला आठवडे बाजार कुठे आहे, त्याची विचारपुस केली. तो हैद्राबादला असल्याचे कळले.

१३ ऑगस्ट रोजी हैद्राबादला कॉग्रेस पक्षाची जत्रा तिथे भरणार होती आणि आपल्याला तिथे घासाघीस करून राफ़ायल विमान विकता येईल असा आत्मविश्वास त्यांच्यापाशी होता. म्हणून त्या विमानांचा ताफ़ा घेऊन राहुल हैद्राबादला पोहोचले आणि त्यांनी कुठल्याही लिलावात कमीअधिक भाव करावा, तसे दोनचार मिनीटाच्या भाषणात राफ़ायलच्या किंमतीत पुन्हा फ़ेरबदल करून टाकले. भाषणात राहुल म्हणाले, ‘लोकसभेत मी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला. राफ़ायल विमानाच्या किंमतीत ५२६ कोटीवरून १६०० कोटी रुपये इतकी वाढ कशामुळे झाली? पण मोदींनी काहीही उत्तर दिले नाही.’ म्हणजे राहुल यांनी एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत चार महिन्यात मनमोहन सरकारच्या व्यवहारातील राफ़ायल विमानांच्या किंमतीतच चारवेळा बदल केला. आरंभी ७०० कोटी असलेली किंमत दोन महिन्यांनी ५२० कोटी रुपये केली व नंतर त्यात वाढ करून ५४० कोटी इतकी चढवून अखेरीस ५२६ कोटी केली. मोदी सरकारने राफ़ायल किती किंमतीत खरेदी केली, ते राहुलना सत्तेबाहेर असल्याने ठाऊक नसेल कदाचित. अन्य कुणा कॉग्रेस नेत्यांनाही माहिती असणार नाही. पण मनमोहन सरकारच्या मंत्र्यांना निदान त्यांच्या सरकारच्या काळातील राफ़ायलच्या विमानांची नेमकी किंमत ठाउक असेल की नाही? की फ़्रान्स व मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या दरम्यान झालेल्या बोलण्यात ठरलेली किंमत राहुल यांच्या इच्छेनुसार वेळोवेळी बदलत राहिल, असा करार युपीए सरकारने केलेला होता? मनमोहन सरकारने ही खरेदी करताना विमानाच्या किंमती राहुलच्या मनात येतील तशा बदलण्याची काहीशी अट घातली असल्याशिवाय हे बदल कसे शक्य आहेत? राहुलना लोक पप्पू म्हणतातच. पण असल्या बाजारात आपला माल विकायला बसलेल्यांचाही म्हणूनच आता पप्पू होऊन गेला आहे. कारण यांना विमान आणि पेट्रोल डिझेलच्याही किंमतीतला फ़रक कळत नाही, हे लोकांच्याही लक्षात आलेले आहे.

9 comments:

  1. साहेब
    एक करेक्शन
    हैदराबादेत हे विमानं चक्क फक्त ५२६ रूपायांना उपलब्ध होते
    ५२६ कोटी सांगून आपण तर कोटी पटीत किंमत वाढवून सांगत आहात

    भाऊ हा तुमचा तर भ्रष्टाचार नाही ना ?

    ReplyDelete
  2. काॅंगरेसला वाटतय की बोफोर्सने त्यांच भक्कम सरकार घावल तस हे पन जाइलवम्हनुन राहुल ते बोलतात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅकराॅन राहुलपेक्षा १०वर्षांनी लहानआहेत त्यांनी पन खोट पाडल उगीच त्यांची बदनामी केली राहुलने संसदेत

    ReplyDelete
  3. भाउ राहुल सध्या युरोपात जाउन मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी कसा धुमाखुळ घालतायत त्यावर पन लिहा त्यांची जगातील व भारतातील समस्यांची analogy ऐकुन परदेशातील व इथले लोक कपाळावर हात मारुन घेतायत चक्कर येइल अशी विधाने करतायत

    ReplyDelete
  4. आजचा लेख पण पप्पू सारखाच होता....😂 खूप हसवणारा

    ReplyDelete
  5. महाराष्ट्रातील ' कण्हत्या ' राजाला ही आता या राउल बाबाचे काय कवतिक ? राउल काय आणि कसं बोलला हे महत्वाचं नाय ...........त्यो बोलला आणि जे बोलला ते रेटून बोलला ...!!

    ReplyDelete
  6. In sakal newpaser, undar pailtir section, Mr. Sudhir kale has also give nice explanation for this deal.

    ReplyDelete
  7. Please write a blog on NCP corruption cases in previous Maharashtra Govt and expose them.

    ReplyDelete
  8. Rofl
    Rolling on the floor laughing

    ReplyDelete
  9. युवराजांकरता या लेखाचं इंग्रजी भाषांतर होऊनच जाऊ दे..अर्थात मराठीत वाचायला जेवढी मजा आली तेवढी खचितच येणार नाही...!!

    ReplyDelete