पाकिस्तानात नव्याने झालेल्या निवडणूकीत इमरान खान हा माजी क्रिकेटपटू विजयी झाला असून, त्याचा लौकरच पाकचा पंतप्रधान म्हणून शपथविधी व्हायचा आहे. २०१४ सालात भारतात सत्तांतर झाले आणि प्रथमच आठ निवडणूकांनंतर एका पक्षाला स्पष्ट बहूमत मिळण्याचा चमत्कार घडला होता. तो साजरा करताना दिल्लीतील प्रस्थापितांना बाजूला ठेवून नवा नेता नरेंद्र मोदी यांनी सार्क देशातील राष्ट्र्प्रमुखांना शपथविधीला आमंत्रित करण्याचा नवा प्रघात सुरू केला, यातले बहुतांश नेते इथे आलेही. सहाजिकच आता पाकिस्तानात सत्तांतर होत असताना इमरान खानही आपल्या शेजारी देशांना वा परकीय नेत्यांना शपथविधीला आमंत्रित करील, अशी अपेक्षा अनेकांनी बाळगली होती. निदान भारताच्या पंतप्रधानाला आमंत्रण असेल आणि मोदी तिकडे जातील काय, अशीही चर्चा चालली होती. पण लगेच आलेल्या बातमीनुसार इरमानने आपल्या काळातील जुन्या ज्येष्ठ निवृत्त क्रिकेटपटूंना आमंत्रण दिले. दोनच दिवसांनी त्याने आणखी स्पष्टपणे बोलत कुठल्याही राजकीय नेत्याला आमंत्रण देणार नसल्याचेही सांगून टाकले. सहाजिकच मोदी वा अन्य कुठल्या शेजारी राष्ट्रप्रमुखाचा तिकडे जाण्याचा प्रश्न परस्पर निकालात निघाला. किंबहूना राजकारण जवळ केले असले तरी आपण आजही तितकेच क्रिकेटपटू असल्याचेच उमरानने कृतीतून जाहिर केले म्हणायचे. त्याने त्यालाही ज्येष्ठ असा सुनिल गावस्कर, समकालीन कपीलदेव व नवज्योतसिंग सिद्धू आणि पुढल्या पिढीचा क्रिकेटपटू नव्हेतर बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान, यांना अगत्याने आमंत्रित केलेले आहे. परिणामी आजही इमरान राजकारणात सत्तेपर्यंत येऊन पोहोचला तरी त्याची धारणा, भूमिका व निती, क्रिकेटमधलीच असल्याचे लक्षात येते. सहाजिकच त्याची क्रिकेटनिती काय होती, ते विचारात घेऊनच पाकिस्तानच्या भावी राजकारणाची कुंडली मांडावी लागणार आहे.
दोन देशातील युद्धामुळे दोन्ही देशातील क्रिकेट सामने बंद पडले होते आणि त्याचा नव्याने आरंभ भारतात जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर झाला. त्या १९७८ साली पाकचा नवा संघ भारताशी भिडला, त्यातला उमदा वेगवान गोलंदाज अशी इमरानची ओळख होती. कपीलदेवही त्याच मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये आला आणि गावस्कर काही वर्षे रुळलेला ज्येष्ठ खेळाडू होता. त्याच काळात कधीतरी इमरानने क्रिकेटच्या खेळाविषयी व्यक्त केलेले मत आठवते. हा फ़लंदाजाचा खेळ आहे आणि त्यात गोलंदाजाला संधी खुप कमी असतात. गोलंदाजाला फ़टकावून काढण्याची वहाव्वा मिळवण्याचा हा खेळ आहे. सहाजिकच अधिक मेहनत घेऊन त्या फ़लंदाजाला बाद करण्याचे कष्ट, गोलंदाजाला उपसावे लागतात आणि क्वचितच त्याच्या वाट्याला वहाव्वा ये्ते. मग गोलंदाजानेही टिच्चून फ़लंदाजाला लक्ष्य करण्याखेरीज त्याच्या हाती असते काय? गोलंदाजाने टाकलेल्या लक्ष्यवेधी चेंडूपासून आपला व विकेटचा बचाव फ़लंदाजाने करावा. गोलदाजाला चेंडू टाकण्याविषयी सल्ले देऊ नयेत. हातात बॅट आहे, तिने आपला बचाव किंवा प्रतिहल्ला करावा. असे सांगणार्या इमरानचा फ़लंदाजीविषयीचा तिटकारा साफ़ दिसतो. अर्थात पाक संघासाठी टिच्चून गोलंदाजी करताना त्याने अनेक फ़लंदाजांना भयभीत करून टाकलेले होते आणि भरपूर विकेटही काढलेल्या होत्या. पण अनेकदा त्यालाही आपल्या संघाची फ़लंदाजी ढासळल्यावर हातात बॅट घेऊन फ़लंदाजी करावी लागलेली आहे. त्याने काही शतकेही ठोकलेली आहेत. पण स्वत:ला गोलंदाज म्हणूनच ओळखले जावे, असाही त्याचा अट्टाहास असे. मग राजकारणात आल्यावरही त्याने प्रस्थापित पक्षांमध्ये सहभागी होऊन कधी फ़लंदाजीची जबाबदारी पेलली नाही. त्यापेक्षा आपलाच वेगळा पक्ष काढून मागली अनेक वर्षे तो सत्ताधार्यावर किंवा प्रस्थापित पक्षांवर लक्ष्यवेधी गोलंदाजी करीत राहिला होता.
ताज्या निवडणूकांनी त्यालाच यश दिले आणि त्यामुळे गोलंदाजीची खेळी संपलेली आहे. आता इतर कोणावर आरोपबाजी करण्यापेक्षा आजवर केलेल्या वक्तव्ये अथवा घेतलेल्या भूमिकांना पार पाडून दाखवण्याची जबाबदारी त्याच्यावर आलेली आहे. हा राजकारणाचा खेळही काहीसा क्रिकेटसारखाच असतो. त्यात विरोधक हे नेहमी फ़िल्डींग करणार्या संघासारखे असतात आणि फ़लंदाजी करणारा संघ सत्ताधारी पक्षाप्रमाणे चहूकडून घेरलेला असतो. हातातला चेंडू फ़लंदाजावर भेदक रितीने टाकून त्याला बाद करणे, किंवा त्याची कोंडी करणे हा क्रिकेटमधल्या फ़िल्डींग करणार्या बाजूचा शिरस्ता अस्तो. पण कायम गोलंदाजी करून क्रिकेट खेळता येत नाही. त्यात आपली फ़िल्डींग संपली वा समोरच्या संघाचे सर्व फ़लंदाज बाद झाले, मग त्यांनी जमवलेल्या धावसंख्येला ओलांडून जाणारी धावसंख्या उभारण्याचे आव्हान पेलण्यातून सुटका नसते. राजकारणात आधीच्या सत्ताधार्यांबा पराभूत करून भागत नाही. त्यांना नालायक ठरवून पराभूत केलेल्या पक्षाला मग जनतेचा कौल मिळतो आणि आपण कसे उत्तम संघ वा राज्यकर्ते आहोत, ते सिद्ध करायचे असते. सहाजिकच आधीच्या संघापेक्षाही एक एक चेंडू महत्वाचा मानून फ़लंदाजी करावी लागते आणि एक एक धाव जमवित धावसंख्या पार करण्याचे आव्हान स्विकारावे लागत असते. इमरान खानची आता तीच स्थिती आहे. त्याने आजवर दहाबारा वर्षे सत्ताधारी पिपल्स पार्टी वा शरीफ़ यांच्या मुस्लिम लीगवर दुगाण्या झाडल्या आहेत. तोफ़ा डागलेल्या आहेत. त्यांची धोरणे चुकीची होती व पाकिस्तानचे त्यातून नुकसान झालेले असेल, तर त्यापेक्षा अधिक चांगला कारभार व धोरणे राबवून उत्तम काम करून दाखवले पाहिजे. या स्वभावानेच गोलंदाज असलेल्या इमरानला ते कितपत साध्य होणार आहे? कारण त्याने कितीही यश मिळवलेले दिसत असले, तरी त्यामागचा बोलविता धनी पाकसेना आहे.
पाकिस्तानला विश्व़चषक मिळवून देणारा इमरान खान अशी त्याची ओळख असली, तरी क्रिकेट संघात तोच तेव्हा ज्येष्ठ खेळाडू व कर्णधारही होता. संघनिवड किंवा मैदानावर असतानाचे डावपेच आखताना, त्याला संपुर्ण स्वातंत्र्य होते आणि त्यात कोणाची ढवळाढवळ चालत नव्हती. राजकारणाचे काम वेगळे असते. इथे कर्णधार जो कोणी असेल त्याला इतरांवर हुकूम सोडून भागत नाही. तर त्यांच्याकडून योग्य काम करून घ्यावे लागते आणि याच्या निर्णयात अनेकजण ढवळाढवळ करीत असतात. त्याच्या निर्णयाला बदलण्याचेही प्रयास होत असतात आणि त्याने कुठले निर्णय घ्यावेत, याचेही आदेश लादले जात असतात. नवाज शरीफ़ असोत किंवा बेनझीर भुत्तो असोत. त्यांना पंतप्रधानपदी बसून आपल्या मनाप्रमाणे व इच्छेने कारभार हाकता आला नाही, की कुठली धोरणे राबवता आली नाहीत. त्यांनी आपल्या भूमिकांचा आग्रह केला, तेव्हा त्यांची गठडी वळण्यापर्यंत पाक सेनाधिकार्यांनी त्यांची गळचेपी केलेली आहे. त्याहीपुर्वीच्या अनेक राज्यकर्त्यांना गुंडाळून ठेवत लष्कराने सत्ता बळकावलेली होती. त्यामुळे राज्य कारभाराची फ़लंदाजी करताना बेनझीर वा शरीफ़ यांच्या काय अडचणी होत्या, त्याचा किंचीतही अनुभव इमरानपाशी नाही. गोलंदाजी करताना खेळपट्टीवरच्या खाचाखोचा असतात, त्याचे आयते लाभ गोलंदाज उठवित असतो. तसेच लाभ इमरानने क्रिकेट खेळताना उठवलेले होते आणि राजकारणातही तसाच लाभ विरोधी पक्ष म्हणून त्याला मिळालेला आहे. पण आता त्याच बिनसलेल्या खेळपट्टीवर त्यालाच फ़लंदाजी करायची आहे. ते काम किती अवघड आहे, त्याचा साक्षात अनुभव त्याला घ्यायचा आहे. ज्या पाकसेनेच्या लुडबुडीचे समर्थन करीत इमरान या पदापर्यंत पोहोचला आहे, त्या पाकसेनेची लुडबुड तो किती सहन करतो वा त्यांना किती शरण जातो, यावरच त्याची विकेट टिकणे अवलंबून आहे. म्हणून त्याने गावस्करला आमंत्रण दिलेले असावे काय?
जगातल्या कुठल्याही तुफ़ान वेगवान गोलंदाजीसमोर टिकून रहात धावा गोळा करणारा आघाडीचा फ़लंदाज, अशी सुनीलची ख्याती क्रिकेटच्या इतिहासात आहे. त्याचे धावांचे विक्रम अनेकांनी मोडलेले वा गाठलेले असतील. पण आघाडीवीर म्हणून नव्या डावाची सुरूवात करीत दिर्घकाळ क्रिकेटमध्ये टिकून राहिलेला व धावा जमवणारा फ़लंदाज, ही सुनीलची ओळख कायम आहे. प्रथमच फ़लंदाजीला येणार्या इमरानसाठी नेमकी तशीच स्थिती आज राजकारणात उभी ठाकलेली आहे. १९७१ सालात नवा खेळाडू म्हणून वेस्ट इंडीजच्या तोफ़खान्यासमोर त्यांच्याच देशात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या गावस्करने, चार सामन्यात ७७४ धावा आणि चार शतके ठोकण्याचा केलेला पराक्रम जगाला ठाऊक आहे. पण त्या धावा त्याने वेगवान गोलंदाजांचा सामना करीत आघाडीचा फ़लंदाज म्हणून केलेल्या होत्या. इमरान आज राजकारणाच्या फ़लंदाजीत तितकाच नवखा आहे. उलट त्याच्यासमोर उभे असलेले गोलंदाज म्हणजे विरोधी पक्ष, एकाहून एक जाणकार मुरब्बी राजकीय पक्ष व नेते आहेत. त्यांच्या आरोपांचा व प्रतिकाराचा भडीमार कसा असेल, याचा अंदाजही आज इमरानला आलेला नाही. किंबहूना निवडणूका लागल्यापासून व निकाल आल्यानंतरही विरोधकांनी इमरानला पाकसेनेचे कळसुत्री बाहुले घोषित करून टाकलेले आहे. मग प्रत्यक्षात इमरान सरकार स्थापन होईल आणि विरोधकांशी संसदेत सामना करण्याचा प्रसंग येईल, तेव्हा इमरानची स्थिती काय झालेली असेल? उंच धिप्पाड वेस्ले हॉल, ग्र्नीच अशा वादळी घोंगावत येणार्या गोलंदाजांसमोर सुनील कसा उभा राहिला असेल? त्याचेच स्मरण इमरानला झालेले असेल काय? अन्यथा त्याने याच जुन्या मित्रांना कशाला आमंत्रित केलेले असेल? पाकिस्तानची स्थिती आज एकूणच दिवाळखोरीत गेलेली अर्थव्यवस्था व बिथरलेला मतदार जनता, अशी अराजकाची झालेली आहे.
जगात पाकिस्तानची ओळख जिहाद दहशतवादाचा जनक व पोशिंदा अशी झालेली आहे. अमेरिकेसारख्या जुन्या मित्राने पाकला वार्यावर सोडलेले आहे आणि कर्जाचे डोंगर पाकच्या माथी चढवणारा चीन एकटाच पाकसाठी मतलबी मित्र शिल्लक उरला आहे. प्रत्येक प्रांतात नाराजी वैफ़ल्याची आग धुमसते आहे आणि पोलिस व सेनेला अराजकाला आवर घालताना नाकी दम येतो आहे. त्यातच आजवर पोसलेले विविध जिहादी गट, स्थानिक व राजकीय प्रश्नात मनमानी करीत असतात. या सगळ्याच धुमसत्या विस्तवाचा आगडोंब उभा करायला सगळे विरोधी पक्ष एकजुटीने कंबर कसून मैदानात उतरलेले आहेत. पिपल्स पार्टी व मुस्लिम लीग आजवरचे पाकिस्तानी प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत आणि राजकीय सत्ता त्यांनी़च आलटून पालटून उपभोगलेली आहे. ते लष्कराने गडबड केलेल्या निवडणूकीत कुठल्या कुठे फ़ेकले गेलेले असले, तरी त्यांची संघटनात्मक शक्ती इमरानच्या कोवळ्या नवख्या पक्षापेक्षा अधिक आहे. त्यातच त्यांच्यापाशी मुरब्बी राजकीय नेत्यांच जत्था आहे. इतकी विरोधी सज्जता पुरेशी नाही, म्हणून की काय निवडणूक काळातील गळचेपीने बिथरेलेली व संतापलेली माध्यमे कुठल्याही मार्गाने इमरानचा बळी घ्यायला उतावळी झालेली आहेत. अशा एकूणच प्रतिकुल खेळपट्टीवर इमरानला फ़लंदाजीला उतरायचे आहे. जी गोष्ट आयुष्यभर त्याला आवडली नाही, ती राजकारणात करावी लागण्याचा प्रसंग आला आहे. हल्ला करावा आणि फ़रारी व्हावे. चेंडू टाकल्यावर चौकार गेला वा षटकार ठोकला गेला, म्हणून गोलंदाजाचे फ़ार नुकसान होत नाही. त्याला पुढल्याच चेंडूत आणखी भेदक हल्ला करण्याची मुभा कायम असते. पण तितकी सुविधा फ़लंदाजाला उपलब्ध नसते. एक फ़सव्या चेंडूला बळी पडले की विकेट गेलीच. मग तो चकवून यष्टीपर्यंत गेलेला चेंडू असो, किंवा षटकार म्हणून टोलवून गेलेला झेल असो. बाद म्हणजे बाद! दुसरी संधी नाही.
बेनशीर भुत्तो वा नवाज शरीफ़ असे संथगती खेळणारे फ़लंदाज होते. म्हणूनच वारंवार बाद होऊनही पुन्हा पुन्हा दुसर्या तिसर्या डावात त्यांना फ़लंदाजीची संधी मिळाली होती. पण इमरानची मानसिकताच गोलंदाजाची आहे. फ़लंदाजीचा बचावात्मक पवित्रा त्याच्या स्वभावात नाही आणि आक्रमण करण्याची संधी येईपर्यंत बचावात्मक खेळी करण्याइतका संयम त्याच्यापाशी नाही. त्यातच कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून वा निवड समितीतून त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे सुत्रधार आडोशाला बसलेले आहेत. मग इमरान कशी फ़लंदाजी करणार आणि षटकार चौकार ठोकायचा मोह कितीसा आवरू शकणार आहे? क्रिकेटच्या मैदानाभोवती स्टेडीयम असते आणि तिथे बसलेले जमलेले प्रेक्षक कायम गदारोळ हल्लागुल्ला करीतच असतात. तसे जगभरचे राजकीय नेते व हितसंबंधी गोंधळ घालायला आहेतच. इतक्या बाजूने कोंडीत सापडलेला असतो, त्याला फ़लंदाज म्हणतात. हे इमरानलाही पक्के ठाऊक आहे. म्हणूनच राजकारणात येताना त्याला जितके सोपे वाटले होते, तितका हा खेळ सोपा नाही. त्यातल्या अनेक खाचाखोचा आता त्याला उमजू लागतील. त्यामुळे बहूमताचा पल्ला गाठून पंतप्रधान होणे जितके सहजशक्य झाले व कोणीतरी ते सोपे करून दिले, त्यांची किंमत मोजताना इमरानची मोठी दमछाक होणार आहे. सहाजिकच इतर देशाच्या राजकीय नेत्यांना शपथविधीला आमंत्रित करण्यापेक्षा, ज्यांच्याकडून पाठ थोपटली जाईल असे क्रिकेटमधले समकालीन मित्र त्याने आमंत्रित केले असावेत. पण त्यातून सोहळा साजरा होईल. कारभार हाकता येणार नाही. त्याला फ़ारतर नाणेफ़ेक जिंकली असे मानता येईल. सामना पुढे आहे. त्यात फ़िल्डींग घेण्याचेही स्वातंत्र्य इमरानपाशी नाही. कारण फ़लंदाजी त्यानेच करण्याचा निर्णय निकालांनी आधीच दिलेला आहे. ‘सो, बेस्ट लक माय फ़्रेन्ड’ या शब्दांपेक्षा सुनील, कपील वा सिद्धू त्याला आणखी काय मदत करू शकणार आहेत?
बेनझीर, नवाझ कडे स्वतःच पूर्ण बहुमत असायचं पण पाक आर्मी ते सहज उलटून टाकायची ,इथं इम्रान तर तिनेच आणलाय म्हणून तिथले लोक १५-१८ महिने टिकेल असा म्हणतायत,त्याच्या पक्षाला पूर्ण बहुमत नाहीये त्यासाठी तडजोडी कराव्या लागतायत ते त्याचा स्वभावात नाही ,उदा भारतातल्या मुजाहीर लोकांचा पक्ष संपविण्यासाठी आर्मी ने कराचीतून इम्रान ला जिंकवलं ,मुजाहिरांच्या जागा २५ च्या ८ राहिल्या पण त्याच ८ जणांनी पाठिंबा देण्यासाठी चक्क MOU सही करून घेतलाय,ते मुजाहीर पण मूळ पक्षाची गद्दारी केलेले आहेत ,कारण मूळ पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला ,ते पाक आर्मी चे पगारी फितूर आहेत आणि बाकी प्रांतात पण असाच सावळा गोंधळ चालूय जो पूर्वी नव्हता,पाक आर्थिक राजकीय सामाजिक अराजकाकडे चाललाय ,देश म्हूणन कितपत टिकेल काळ ठरवेल
ReplyDeleteएखाद्या देशाच्या आर्मीने देशाचं किती शोषण करावं याच उदाहरण जगात नसेल,पाकची अवस्था सध्या खूप वाईट आहे ,देशाचे तुकडे केलेल्यांचं असाच व्हावं म्हणून बर वाटत पण वाईट सुद्धा वाटत ,कारण ती मूळ जमीन आपली आहे ,सिंधू काठचा प्रदेश आपल्या संस्कृतीचं मूळ आहे ,हडप्पा अवशेषांची त्यांनी वाट लावलीय काही दिवसात ते संपून जातील,त्यामुळं गांधी नेहरूंचा राग येतो ,दिल्लीच्या मूठभर नवाबांसाठी देशाचे तुकडे झाले ,त्यांनी मग तिथल्या लोकांना वेठीस धरून ,जगातल्या प्राचीन भूमीला त्यांनी दहशतवादाची भूमी बनवलं,ती जर आपल्याकडे असती तर एवढा उत्मात नक्कीच झाला नसता ,थोडं लढायला हवं होत,धीर धरायला हवा होता
ReplyDeleteभाऊ, तुम्ही पत्रकार आणि म्हणुनच हा तसा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय. पुण्यप्रसून वाजपेयी, अभिसार शर्मा आणि मिलिंद खांडेकर यांचा पत्रकारी अगाऊपणा, त्यांची गच्छंती आणि त्यानंतरची चिडचिड या बद्दल तुमचे विवेचन वाचायण्याची उत्सुकता आहे.
ReplyDeleteइम्रान हा एक अतिसामान्य फलंदाज होता त्याच्यापेक्षा समकालीन बोथम कपिल बरेच वरच्या दर्जाचे होते त्याचीच पुनरावृत्ती होईल
ReplyDeleteअचूक मनोवैज्ञानिक विश्लेषण. देशासाठीच्या तळमळीमुळे उपजत स्वभावाला मुरड घालण्यात यश मिळते का ते बघायचे.
ReplyDelete