मागल्या महिनाभरात शेतकरी आंदोलन आणि दूध आंदोलनाच्या पाठोपाठ मराठा आरक्षणाचाही विषय पेटला होता. त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना नाकर्ते ठरवून कोंडीत पकडण्याची मित्रांपासून विरोधी पक्षांपर्यंत सर्वांनी पराकाष्टा केली. सहाजिकच त्याच पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या जळगाव आणि सांगलीतील महापालिका निवडणूका, भाजपाला महागात पडतील ही अगदी काही भाजपावाल्यांचीही अपेक्षा होती. त्यामुळेच त्याला जोर येण्य़ासाठी एक आवई सुद्धा उठवली गेली. मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली, अशी एक बातमी मध्येच झळकली होती. त्याचा अर्थ फ़डणवीसांना कारभार हाकता येत नाही आणि त्यांच्यामुळेच आता महाराष्ट्र भाजपाच्या हातून निसटत चाललाय, असे छानपैकी चित्र निर्माण करण्यात आलेले होते. खुद्द फ़डणवीसही कमी ‘अभिनेता’ नाहीत. त्यांनीही विरोधकांनी रंगवलेल्या या नाटकात आपल्या वाट्याला दिलेली भूमिका झकास पार पाडली. वारीत गडबड करण्याची धमकी आल्यावर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाऊन शासकीय पुजा करण्यातून माघार घेतली. इतकेच काय आरक्षण आंदोलन भडकले होते, म्हणून त्यांनी सांगली महापालिकेच्या अखेरच्या पर्वात धमक्यांना ‘शरण’ जाऊन प्रचारालाही जाण्यातून माघार घेतली. एकूण पटकथा छानच रंगली. त्यातून प्रेक्षकांना जो शेवट अपेक्षित होता, त्याची मग प्रतिक्षा चालू होती. ‘फ़डणवीसांची शोकांतिका’ असेच बहुधा नाटकाचे नाव असावे. एकदा या दोन्ही पालिकात भाजपाला फ़टका बसला, की मुख्यमंत्र्यावर गंडांतर आलेच समजा. अशी सार्वत्रिक अपेक्षा होती. मतदान होऊन दोन दिवस झाले आणि शुक्रवारी मतमोजणी सुरू झाली, तोपर्यंत हे चित्रच कायम होते. पण मोजणी पुढे पुढे सरकत गेली आणि ‘घाबरलेला’ मुख्यमंत्री सगळ्यांवरच शिरकोर होऊन मोठा विजय संपादन करताना समोर आला. जळगाव सांगलीच्या निकालाचे एवढेच सार आहे.
या दोन महापालिका निवडणूकांची पार्श्वभूमी नवी नाही. काहीसे असेच नाटक दोन दिड वर्षापुर्वीही रंगलेले होते. जिल्हा परिषदा, तालुका पंचायती आणि महापालिकांच्या घाऊक निवडणूका तेव्हा रंगात आलेल्या होत्या. त्याचवेळी राज्याच्या कानाकोपर्यात मराठा मूक मोर्चाचे रान उठलेले होते. एकूण सूर असा होता, की भाजपाचीच सत्ता आल्याने राज्यातली कायदा व्यवस्था बिघडलेली आहे आणि त्याचा मोठा फ़टका या स्थानिय निवडणूकात भाजपाला बसणार आहे. मात्र प्रत्यक्षात मराठा मूक मोर्चाला तसा कुठलाही पदर नव्हता. तिथे एकूण राजकारणापासून अलिप्त असलेला, पण मराठा जातीच्या अभिमानाला दृगोचर करणारा प्रक्षोभ उसळला होता. तो सरकारच्या विरोधात किंवा प्रशासनाच्या विरोधात असण्यापेक्षा, प्रस्थापित सामाजिक दांभिकतेच्या विरोधातला हुंकार होता. त्यात घुसून काही राजकारण्यांनी त्याला आपापले उद्देश हेतू चिकटवण्याची भामटेगिरी चालवली होती. सहाजिकच त्या मूक मोर्चाचा तेव्हाच्या मतदानावर प्रभाव पडला नाही आणि आताच्या जाळपोळीचाही ताज्या मतदानावर काही प्रभाव पडू शकला नाही. दरम्यान शेतकरी आंदोलन व कर्जमाफ़ीच्या विषयाचेही खुप भांडवल करण्यात आले. त्याचाही किंचीत प्रभाव या मतदानावर दिसला नाही. याचा अर्थ भाजपा, फ़डणवीस वा नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अफ़ाट आहे, असाही होत नाही. या किंवा आधीच्या निवडणूका लोकप्रियतेमुळे भाजपा जिंकत आला आहे, असाही अर्थ काढण्याचे कारण नाही. आपल्या देशात कधीही नेता वा पक्षाच्या लोकप्रियतेवर निवडणूका जिंकल्या गेलेल्या नाहीत. तर ‘त्यातल्या त्यात’ सुसह्य कारभार कोण देऊ शकेल, त्याला मतदाराने नाईलाजाने निवडलेले आहे. नरेंद्र मोदी असोत किंवा भाजपा असो, त्यांचे यश हे त्यांच्या गुणवत्तेपेक्षा विरोधातल्या नाकर्तेपणावर मतदाराने केलेले शिक्कामोर्तब आहे. मात्र त्याचा अर्थ समजून घेण्यात गल्लत होत राहिली आहे.
आजवर जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती म्हणजे सुरेश जैन यांचे वर्चस्व होते. तिथेच गडबड होण्याने युती तुटायला आरंभ झालेला होता. युती असतानाही खडसेंच्या सुपुत्राला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली व त्याला पाडून सुरेश जैन यांनी भलताच उमेदवार निवडून आणला. तिथून युतीतली धुसफ़ुस सुरू झाली. खडसे नेहमी छाती फ़ुगवून ‘मीच युती तोडण्याचे धाडस केले’ असे उगाच सांगत नाहीत. सुरेश जैन ज्या पक्षात गेले त्या पक्षाचा झेंडा जळगावमध्ये फ़डकत राहिला. सेनेचा भगवा म्हणून फ़डकत होता आणि आता जैनांचा पराभव झाल्याने भाजपाचा भगवा फ़डकतो आहे. परिणामी जळगावच्या निवडणूकीला तसा राजकीय संदर्भ खुप कमीच आहे. सुरेश जैन सेनेत गेल्याने तिथली कॉग्रेस वा राष्ट्रवादी आधीच गारद झालेली होती आणि यावेळी तर त्या दोन्ही पक्षांना महापालिकेत एक नगरसेवकही निवडून आणता आलेला नाही. अर्थात एकदोन सदस्य निवडून आणणे अशा जुन्या पक्षांना अशक्य नव्हते. पण ते आणण्यासाठी जी शिल्लक कॉग्रेसी मते होती, ती ओवायसी घेऊन पळाला. आजकाल कॉग्रेसपाशी शिल्लक राहिलेली मते केवळ मुस्लिमांचीच उरली आहेत. मध्यंतरी राहुल गांधी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना म्हणालेच होते, ‘होय कॉग्रेस मुस्लिमांचाच पक्ष आहे.’ त्याला जळगावच्या मुस्लिम मतदाराने दिलेले हे उत्तर आहे. ओवायसीचा अस्सल मुस्लिम पक्ष उपलब्ध असताना, कॉग्रेस सारखा भेसळ मुस्लिम पक्ष आम्हाला नको आहे, असा तो मुस्लिम मतदाराने राहुलना दिलेला संदेश आहे. पण त्या गडबडीत जळगाव पालिकेतून कॉग्रेसचे नामोनिशाण पुसले गेले आहे. सुरेश जैन यांच्यावरच विसंबून राहिलेल्या शिवसेनेला स्वबळावर याचा थोडाफ़ार अर्थ उमजला असेल की नाही, याची शंका आहे. कारण सेना आजकाल पराभूतांची पाठ थोपटून त्यांना भावाच्या पदव्या देण्यात गर्क आहे.
राहिला सांगली मिरज महापालिकेचा विषय! खरी लढत याच पालिकेची होती. कारण तिथे मध्यंतरीच्या शरद पवार यांच्या एकूण धुर्त राजकारणाची कसोटी लागलेली होती. आरक्षणापासून शेतकरी आंदोलनापर्यंत पवार साहेब सध्या टोकाच्या भूमिका घेऊ लागलेले आहेत. स्वत: आंदोलन व संघर्षापासून चार हात दूर राहुन, साहेब अन्य लढवय्यांना युक्तीच्या चार गोष्टी सांगणारे भगवान श्रीकृष्ण झालेले आहेत. म्हणूनच ‘न धरी शस्त्र करी’ उक्तीनुसार ते इतरांना कुठे नेम धरायचा, त्याची दिशा दाखवित असतात. त्यातून मग फ़डणवीसांपासून भिडेगुरूजींपर्यंत अनेक द्वीजवर्णीयांना घायाळ करण्याचा प्रयास होत असतो. सांगलीची निवडणूक म्हणूनच महत्वाची ठरलेली होती. तिथे अखेरच्या टप्प्यात प्रचारासाठी मुख्यमंत्री जायचे होते. पण आरक्षण घेऊनच सांगलीत या, अन्यथा मोठी गडबड होईल; अशा आरोळ्या ठोकल्या गेल्या होत्या. मग फ़डणवीसांनी घरातच विठ्ठलाची पुजा केली, तसाच सांगलीकरांना व्हिडीओ संदेश पाठवून त्यांचा आशीर्वाद मागितला. पंढरपूरच्या विठोबासह सांगलीचा मतदारही या पुंडलिकाच्या भक्तीने जणू भारावला. रुग्ण मातापित्यांच्या सेवेत गुंतलेल्या पुंडलीकाला दर्शनाला यायला सवड नव्हती, तर साक्षात विठ्ठलच त्याच्या भेटीला आला होता. ही दंतकथा या निमीत्ताने खरी ठरली म्हणायची. फ़डणवीस पंढरपूरला गेले नाहीत की सांगलीला देले नाहीत. पण विठ्ठलाने आशीर्वाद दिले आणि सांगलीकर मतदाराने भरभरून मते दिली. हे यश भाजपाला मिळालेले असले, तरी त्यातून मुख्यमंत्री विरोधात उठवण्यात आलेले वादळ धुरळा कुठल्या कुठे शमला आहे. असल्या अपप्रचार किंवा धुमाकुळ घालण्याने मतदार आपल्या बाजूला ओढता येत नाही, किंवा कामसू सत्ताधार्यांना संपवता येत नाही, असाच संदेश आलेला आहे. त्याहीपेक्षा सांगलीच्याच संभाजी भिडे यांच्या विरोधात उठवण्यात आलेला धुरळाही पांगला आहे.
सांगली मिरजचा विजय दिसायला भले भाजपाचा असेल. पण तो त्याहीपेक्षा शरद पवार, राष्ट्रवादी व प्रकाश आंबेडकर इत्यादी पुरोगाम्यांचा लज्जस्पद पराभव आहे. कारण मतदाराने भाजपाला मते दिलेली नसून, भिडेगुरूजी यांच्या विरोधात नसलेल्या वा सोबत असलेल्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे. दिर्घकाळ राष्ट्रवादी वा कॉग्रेस यांच्या आधिपत्याखाली असलेली ही महापालिका, स्वबळावर भाजपाने जिंकली. ती पक्षाच्या कामापेक्षाही भिडे समर्थकांच्या भावनामुळे जिंकलेली आहे. हा सगळा परिसर आणि पश्चीम महाराष्ट्रातला मराठा नव्हेतर अवघा शिवप्रेमी गुरूजींचा भक्त आहे. पण त्याच गुरूजींना अटक करा, त्यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असल्या मागण्या तावातावाने केल्या जात होत्या. अजून भिडेंना अटक कशाला होत नाही, असले सवाल केले जात होते. त्याला सांगली मिरजकरांनी दिलेले हे उत्तर आहे. तिथे मते मागायला मुख्यमंत्र्यांना धमक्या देऊन आडकाठी कररण्यात आली. तरी फ़डणवीसांना तिथे जायची गरज भासली नाही. विधानसभेतच त्यांनी गुरूजीवरचे आरोप फ़ेटाळून लावताना दिलेले उत्तर, सांगली म्रिरज पालिकेत पुरेसे ठरलेले होते. त्याची उलट बाजू अशी, की ज्या नेत्यांनी व पक्षांनी गुरूंजींच्या अटकेसाठी आवेशपुर्ण नाटके रंगवली होती, त्यांना पालिका मतदानात त्याचीच किंमत मोजावी लागली आहे. राष्ट्रवादी व कॉग्रेस यांनी केवळ गुरूजींच्या विरोधात बोलून हातातली पालिका गमावली आहे. अर्थात प्रकाश आंबेडकरांना यापैकी काही गमावण्यासारखे नव्हतेच. त्यांचा त्या भागात प्रभाव नव्हता. पण त्यांच्यापेक्षा अधिक पुरोगामीत्व मिरवायला जाऊन शरद पवार यांनी आपला आणखी एक बुरूज ढासळून घेतला. या दोन महापालिका शेतकरी प्राबल्य असलेल्या प्रदेशातील आहेत. म्हणूनच या निकालातून विरोधकांनी खुपच काही शिकण्यासारखे आहे. पण नैतिक विजयात समाधानी असणारे कधी धडा वगैरे शिकत असतात? त्यांना कुठले ‘गुरूजी’ धडा शिकवू शकणार आहेत?
छान विश्लेषण केले भाऊ
ReplyDeleteभेदक विश्लेषण
ReplyDeletehe was my karyvah in pune kabirbag shakha
ReplyDeleteapproved
ReplyDeleteभाऊ खरंच धडा घ्यायला तयार नाहीत,आधी मुख्यमंत्री आणि भाजपचा कसा पराभव होणारे सांगत होते ,आणि आज राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आपण का हरलो हे तर कबूल करेनातच ते नेहमीच evm च पुराण लावत बसल्या,आणि उदा,कोणाचे तर केजरीवालचे ,काय हि वेळ आलीय शरद पवारांवर,हे लोक विचार करत नाहीत कि त्यांना निवडून दिलेल्या मतदारांचा पण अपमान करतायत,हे आधी बोलायचं मग त्यांच्या मतदारांनी बहिष्कार केला असता ,सरकारची पंचाईत झाली असती,हरल्यावर आता कोण विश्वास ठेवेल
ReplyDeleteश्री भाऊ हा लेख वाचून बरं वाटलं कारण लोकसत्ता कार दिवसेंदिवस अघोचार होत चाललेत फक्त एकच उद्योग धर आणि झोड मोदींना
ReplyDeleteभाऊ हे पुरोगामी इतके सनातन झालेत कि ,स्वतःची विधाने लपवतायत ,कोणीही सांगलीत गुरुजींचा प्रभाव आहे त्याचा परिणाम असू शकतो हे खर कारण सांगितलं नाही,भाजपला नका सांगू तुमच्या पुरोगामी पक्षांना सांगा कि टीव्ही वर नाही तर खाजगीत सांगा ,पण तसे काही दिसत नाही ,अन्यथा आंबेडकरांचे ऐकून ज्यांचा तिथे नाही तर त्याच्या पक्षात पण प्रभाव नाही ,भिडेंसारख्या सर्व समाजातील मान्यताप्राप्त माणसाला बदनाम केले नसते ,आधी पण भिडे होते पण तिथं काँगेस च राज्य होत ,म्हणजे त्याचे समर्थक पक्षविरहित होते ,इथं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षांनी अधिकृतपणे त्यांच्या विरोधात भूमिका घेतली ,मग त्यांचे समर्थक पण दुसऱ्या बाजूला गेले .
ReplyDeleteभाऊ या पालिकांचा निकाल आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जसा महत्वपूर्ण आहे तसा तो २०१९ दृष्टीने काय होईल याची नांदी आहे ,कारण महापालिका या राज्यावर अवलंबून असतात ,म्हणून लोक राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाला निवडत ,मध्ये घाऊक निवडणूक झाल्या त्यावेळी पुरोगाम्यांनी हे कारण दिलं मग ते खरं मानलं तर सत्ता संपत असताना भाजपला कस निवडलं लोकांनी कारण या सरकारची १ वर्ष राहिलाय ,आणि मोदी एकत्र निवडणुकीचा संकेत देतायत म्हणजे १ वर्ष पण राहत नाही ,लोकांना विश्वास नाहीये कि केंद्रात व राज्यात काँग्रेस सत्तेवर येईल,पुरोगामी लोकांच्या शब्दात काही महिन्यांसाठी भाजपला का सत्ता देतील
ReplyDeleteभाऊ कल्पना करून पहा अजून भिडे गुरुजींनी तोंड सुद्धा उघडलेले नाही तर या पक्षांची इतकी वाट लागली जर गुरुजींनी तोंड उघडून सांगितले की यांना संपवून टाका तर अक्षरशः नामशेष होऊन जातील महाराष्ट्रातून.
ReplyDelete' खणता ' राजा जवळची भात्यातील सर्व अस्त्रे संपली का ?.............का अजून काही शिल्लक आहेत या सरकारविरुद्ध पेटवायला ? आता नवीन पिढी आली आहे , संदर्भ खूप बदलले आहेत. वेगवान संभाषणाचे नाव नवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. पण हे ' यांच्या जुन्या स्वतःच्या ' ऋतूंमधून ' बाहेर यायलाच तयार नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी मध्ये आर्थर रोड तुरुंगातील दोन कोठड्या अजून मोकळ्या ठेवल्या असल्याचे सांगितले होते. सामान्य लोक वाट बघतायत त्या दोन कोठड्यातील कैदी कधी आत आणले जातायत याची.
ReplyDeleteNice
ReplyDeleteभाऊ, एक नंबर!
ReplyDeleteतुमचा "त्यातल्या त्यात" सिद्धांत मी किती जणांना सांगतो पण एकालाही पटत नाही.ते मला मोदिभक्त म्हणतात.
मात्र गुरुजी हा मुद्दा अजिबात विसरलो होतो, तुम्ही मात्र सगळ्या बाजू बरोबर लक्षात ठेवता.
आपला लेख आवडला.
ReplyDeleteउत्तम
ReplyDeleteउत्तम विश्लेषण
ReplyDeleteमारा तो मारा लेकिन सॉलीड मारा 😊😊😊
ReplyDeleteभाऊ ,भिडे गुरुजी निस्पृह व शिवरायांनी भारलेले आहेत हे गेल्या 4 पिढया आम्ही पाहत आहोत...ह्या पुरोगाम्यांनी खोटे आरोप करून स्वतःचीच इज्जत घालवली ... आणि जिंकूनही भिडे गुरुजी "कशी जिरवली" अशी विधाने करणार नाहीत कारण ते त्यांचे संस्कारच नाहीत... आणि म्हणूनच आणि भिडे गुरुजींना गुरुस्थानी मानतो ... सत्व गुणांची मूर्ती
ReplyDeleteभाऊ, नेहमी प्रमाणेच परखड, वाचनीय,संग्रहणिय...
ReplyDeleteआपला लेख आवडला खुप मस्त आहे.
ReplyDeleteIf analysed in detail at both places Sharad Pawar has won...
ReplyDeleteMaximum BJP cadidates were borrowed from Rashtrawadi.