Sunday, August 5, 2018

#इशानी_पुराण

इशानी पुराण
ही इशानी जावळे! नात्याने माझी नात. अवघ्या चौदा दिवसांपुर्वी माझी तिची प्रत्यक्ष भेट झाली. तिचा जन्म वॉशिंग्टन डीसी अमेरिकेतला. गेल्या शनिवारी २८ जुलै रोजी तिचा पहिला वाढदिवस होता आणि तोच नात्या गोतावळ्यात साजरा करण्यासाठी माझा भाचा अद्वैत आणि त्याची पत्नी शिल्पा, इशानीला घेऊन मुद्दाम भारतात आलेले होते. शनिवारी ठाण्यातल्या टिपटॉप या संकुलातील डॅफ़ोडिल्स हॉलमध्ये इशानीचा वाढदिवस साजरा झाला आणि तमाम आज्या, आजोबा, मावश्या, आत्या, मामा, काका इत्यादिकांनी तिला यथेच्छ छळले. बिचार्‍या त्या बाळाला काय चालले आहे आणि कशासाठी, त्याचाही पत्ता नव्हता. सत्तरऐंशी नातलग परिचितांची झुंबड होती आणि प्रत्येकाला इशानीचे कौतुक करून घ्यायचे होते. पहिले दोन तास फ़ोटोसेशन औक्षण व इतर सोपस्कारात गेले आणि नंतर क्रमाक्रमाने प्रत्येकजण आपल्या परिने या बाळाला छळून घेत होता. दोन तासाने तिला पित्याकडून मी हातात घेतले, तेव्हा इशानी जवळपास माझ्याकडे झेपावलीच. मात्र त्यानंतर ती कोणाकडे जायला राजी नव्हती. मला चिकटून बसली होती आणि भाऊ आजोबाचा मुलीला लळा लागला, असे माझेही अनाठायी कौतुक तिचे चालू झाले. मलाही त्याची गंमत वाटत होती. दहाबारा दिवसात लळा वगैरे लागणे शक्य नव्हते. पण खरोखरच इशानी मला सोडायला अजिबात तयार नव्हती. सोबतचा फ़ोटो बारकाईने अभ्यासला, तर त्यात तिचा बोलका चेहरा खुप काही सांगतो. तिने डावा हात माझ्या खांद्यावर टाकलेला आहे, तो आधार म्हणून अजिबात नाही. मागल्या बाजूने तिने माझ्या शर्टाची बाही घट्ट पकडून ठेवली असतानाचा हा फ़ोटो आहे. तिला माझ्या हातून कोणी ओढून हिसकावून घेऊ नये, म्हणून तिने घेतलेली ती काळजी होती. मलाही तिचे असे बिलगणे चमत्कारीक वाटलेले होते. खुप उशिरा त्याचे कारण माझ्या लक्षात आले. माझ्या हाती येण्यापुर्वी इशानी आई व पित्याच्या हातातच होती. काही काळ आजीकडे. या सगळ्यांकडे असताना कोणीही येऊन तिचे गालगुच्चे घेत होता, पापा घेत होता आणि दोन तासात किमान दोनअडीचशे वेळा तरी तिच्या गालाला हाताला कोणाचा तरी स्पर्श झालेला होता. वर्षभराच्या कोवळ्या बाळाची त्वचा खुप नाजुक असते आणि इतक्या वेळा अनेकांचा स्पर्श, म्हणजे चक्क छळ होता. त्यामुळे इशानी कंटाळली व दमलेली होती. पण बोलता येत नाही की कोणाला रोखता येत नाही, म्हणून ती हताश निराश झालेली होती. अशावेळी ती माझ्या हाती आली आणि त्यानंतर मी कुणालाही तिला स्पर्श करू दिलेला नव्हता. लांबून काय ते बोला-खेळा, असा माझा दंडक म्हणजे इशानीसाठी कवचकुंडल झालेले होते. परिणामी भाऊ आजोबा तिचा कंफ़र्ट झोन झाला होता आणि तो तिला सोडायचा नव्हता. इतरांना मात्र तिचे वागणे लळा लागल्यसारखे वाटलेले होते. बाकीच्या प्रत्येकाने इशानीसाठी काहीतरी भेटवस्तु गिफ़्ट आणलेले होते. मीच एक करंटा आजोबा होतो. स्वभावानुसार मी कुणालाच शुभेच्छा देत नाही, की गिफ़्ट वगैरे देत नाही. इशानीही त्याला अपवाद नव्हती. यावेळी मात्र मला माझ्या स्वभावाचे व हट्टाचे थोडे वाईट वाटले. आपण या बाळाला काहीच गिफ़्ट न देण्यात कंजुषी केल्याचे वाईटही वाटले. पण त्याच शनिवारी म्हणजे त्या वाढदिवस सोहळ्यानंतर चार तासांनी मी सोलापूरला जायला निघणा्र होतो. सोहळा उरकून घरी परतलो आणि मी निघण्य़ापुर्वी या पोरटीने एक अशी गंमत केली, की तिच्या पहिल्या वाढदिवशी मी तिला सर्वात अप्रतिम व आयुष्यभर पुरणारी गिफ़्ट दिल्याचे तिनेच दाखवून दिले. कुठली गिफ़्ट ते सवडीने पुढल्या पोस्टमध्ये सांगेन. एक आताच सांगतो. सत्तर वर्षाच्या आयुष्यात शंभरावर तरी लहान बाळांना हाताळले, संभाळले, शिस्त लावली वा धाक घातला असेल. पण त्यातले हे सर्वात लबाड मुल आहे. इशानीचा फ़ोटो बारकाईने बघा, तिचा बोलका चेहरा अजिबात निरागस नाही, की मनातले काहीही व्यक्त करणारा नाही. ती प्रत्येकाला या कोवळ्या वयातही अजमावते आणि मगच व्यक्त होते.

===========================
Image may contain: 1 person, standing

आयुष्यभर पुरणारे गिफ़्ट
साधारणपणे नवव्या दहाव्या महिन्यात मुले आपल्या पायावर उभी राहून चालू लगली पाहिजेत, हा माझा अनुभव आहे. मी माझ्या मुलीला तसे चालायला लावलेले होते आणि कुटुंबातली जी मुले माझ्या हाती लागली, त्यांनाही त्यांच्या पायावर उभे रहायला त्याच वयात मी भाग पाडलेले होते. एका अर्थाने माझा तो छंद किंवा हट्ट म्हणायला हरकत नाही. पण इशानी १३ जुलैच्या रात्री अमेरिकेतून भारतात आली, तेव्हा वर्षाची व्हायला दोन आठवडे शिल्लक होते आणि ती अजून चालत नाही म्हटल्यावर स्वभावानुसार मी तिच्या मातापित्यांची पहिल्याच दिवशी हजेरी घेतली. आमच्या पुढल्या पिढीतले सगळेच माझ्या असल्या शिव्याशापांना आता सरावलेले आहेत. म्हणूनच अद्वैत आणि शिल्पाने सारवासारव केली. पण त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मी त्याच दिवशी त्यांना सांगून टाकले, रांगणार्‍या इशानीला घेऊन आलाय, पण परत जाताना ही पोर आपल्या पायानेच निघेल इथून. मी सध्या रहातो ते घर ऐसपैस मोठे असल्याने त्यांचा येऊनजाऊन मुक्काम माझ्याकडेच होता. सहाजिकच दहाबारा दिवस मला ते मुल जणू ताब्यात मिळालेले होते. त्याच पहिल्या दिवशी तिला भिंतीला पाठ लावून उभी केली आणि एका मिनीटातच ती खाली बसली. ही चालण्यासाठीची पहिली पायरी असते. बालकाला आपले वजन आपल्या पायावर आणि गुडघ्यात तोलता आले पाहिजे. पोरीची अडचण माझ्या लक्षात आली होती. मग पुढल्या दोनचार दिवसात तिच्याशी खेळताना अधूनमधून तिला भिंतीला पाठ लावून उभा करायचो आणि त्यातून तिला ताठ उभे रहायला सक्तीने भाग पाडत गेलो. त्याला ती सरावली आणि मग पुढले पाऊल टाकले. दोन्ही हात पकडून तिला चालवायचा उद्योग आरंभला. आठदहा दिवसात इशानी एक हात पकडून चालूच नव्हेतर दौडू लागली होती. पण अजून हात सोडून जागीच उभे रहायला राजी नव्हती. हात सोडला की बसकण मारत होती. पण तिचा आजोबाही कमी चेंगट नाही. मी जराही हट्ट सोडला नाही. ती चार दिवस पुण्याला जाऊन माघारी आल्यावर तिला कामाला जुंपलेली होती. आता ती अधिक निर्वेधपणे माझे बोट पकडून चालू व दौडू लागली होती. थोडा वेळ उभीही राहू लागली होती. हा खेळ तिच्या वाढदिवसापर्यंत अव्याहत चालू होता आणि मी काहीसा खजील होऊन गेलो होतो. मला त्याच दिवशी कार्यक्रमासाठी सोलापूरला निघायचे होते आणि त्या संध्याकाळपर्यंत ही पोर हात सोडून चालायचे नाव घेत नव्हती. अगदी समारंभाच्या हॉलमध्येही मी तिला चालवण्याचा अट्टाहास करून बघितला, पण तो निष्फ़ळ ठरला होता. मग घरी परतल्यावर माझे सामान आवरणे व सोलापूरला निघण्याच्या तयारीत दोन तास गेले. साडेआठला निघायचे होते आणि शेवटचा तासभर माझ्यापाशी उरला होता. तो तिच्याशी खेळण्यात खर्च करायचे ठरवून बसलेला होतो. तिची एक छोटी प्लस्टीकची खुर्ची तिथे होती आणि मोठ्या माणसाप्रमाणे तिला पाठ करून खुर्चीत बसायचे होते, ते काही साधत नव्हते. तिची चिडचिड चालली होती आणि ती संधी साधून मी एक खेळी केली. खुर्ची धरून ती उभी राहिली असताना मी खुर्ची जरा मागे ओढली आणि ती पकडायला इशानी एक पाऊल पुढे सरकली. तर मी खुर्ची अणखी मागे ओढली. तर ती आणखी दोन पावले आधाराशिवाय पुढे आली. तशी नऊदहा पावले ती स्वत:च चालली आणि मग असेच काहीबाही दाखवून मी तिला एकटीने चालायला भाग पाडले. पडायच्या भितीने एक एक पाऊल जपून टाकत अकस्मात इशानी चालू लागली. तेव्हा मी घर गोळा केले आणि इशानीच्या आईला, शिल्पासह सर्वांना तो चमत्कार दाखवला. सगळ्यांनाच गंमत वाटली. त्याक्षणी मला लक्षात आले, की इशानीच्या वाढदिवशी मी तिला सर्वांपेक्षा वेगळी आणि आयुष्यभर पुरणारी गिफ़्ट दिली होती. पहिल्या वाढदिवशी इशानी तिच्या छळवादी हट्टी आजोबासाठी आपल्या पायावर उभी राहून चालू लागली होती. इथे टाकलेला इशानीचा चालतानाचा फ़ोटो वॉशिंग्टन डीसीला पोहोचल्यानंतर शिल्पाने मला अगत्याने शुक्रवारी पाठवलेला आहे. इतरांनी तिला कपडे, वस्तु, दागिने खुप काही दिले. त्यापैकी काहीही तिला आयुष्यभर पुरणार नाही. पण उर्वरीत आयुष्यात इशानीला चालवणारे पाय भाऊ आजोबाने ऍक्टीव्हेट करून दिलेले आहेत. सोलापूरला जायला निघालो तेव्हा या इवल्या बाळाने तिच्या वाढदिवशी किती सुंदर रिटर्न गिफ़्ट आजोबाला दिले ना?


============================

8 comments:

  1. छान भाऊ!!! ... अभिनंदन तुमचं आणि इशानी च ही !!!
    रोजच्या राजकीय लेखातून असा कौटुम्बिक जिव्हाल्याचा प्रसंग शेयर केल्याबद्दल धन्यवाद!
    आनंदी आणि सुदृढ़ जीवनासाठी तुम्हाला आणि इशानी ला आमच्या शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  2. Bhau, tumchi naat khupach mhanje kupach jast cute ahe. :)

    ReplyDelete
  3. भाऊ, मला एखादा वर मिळाला तर मी मागीन की तुम्ही एखादं गुरुकुल चालवावे.

    ReplyDelete
  4. भाऊ अप्रतिम
    असंच एक गीफ्ट तुम्ही आम्हांला ही दिलेय
    "राजकीय दृष्टी"
    ज्या गोष्टी आम्हांला कधीच कळत नव्हत्या त्या साध्या सोप्या आणि कळणाऱ्या भाषेत शिकवून

    ReplyDelete
  5. भाऊ मस्त, आजी, आजोबा हरवल्या काळात तुमचा हा हट्ट खूप छान आहे. घरात म्हताऱ्यांची अडगळ असेल पण ती समृद्ध अडगळ पण उपयोगाला येते

    ReplyDelete
  6. खुप छान भाऊ साहेब,तुमचे लेख ही चिकीत्सक व्हायला शिकवतात.

    ReplyDelete
  7. Sir you are really an inspiration

    ReplyDelete