Sunday, September 2, 2018

इथे ‘ममता’ का आटली?

mamta pawar के लिए इमेज परिणाम

नक्षलवादाचा धुमाकुळ ज्या राज्यात चालू आहे, त्यापैकी झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची गोष्ट सोडूनच द्या. ते दिल्लीत बसलेल्या ‘कथीत’ हुकूमशहाचे बगलबच्चेच आहेत. शिवाय आणखी एक नक्षलग्रस्त राज्य बिहारचा मुख्यमंत्री तर हुकूमशहाशी हातमिळवणी करून बसलेला आहे. त्यामुळे अशा चार मुख्यमंत्र्यांचे मौन समजू शकते. पण अन्य चार राज्याचे मुख्यमंत्री तर मोदी विरोधात गेल्या काही दिवसापासून आकाशपाताळ एक करीत होते ना? त्रिपुरात भाजपाने बहूमत व सत्ता संपादन केल्यावर थेट ममताशी संपर्क साधून कॉग्रेस व भाजपाला वगळून संयुक्त फ़ेडरल फ़्रंट उभी करण्याचा तात्काळ पुढाकार घेणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री चम्द्रशेखर राव होते. त्यांच्या उत्स्फ़ुर्त आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देण्यास बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जींनी क्षणाचाही विलंब लावलेला नव्हता. ममता तर कुठल्याही फ़ुसक्या कारणास्तव उठसुट मोदींवर तोफ़ा आणि रॉकेट डागण्यासाठी संधीच शोधत राहिलेल्या आहेत. शिवाय त्यांच्याही राज्यात नक्षलवादी धुमाकुळ चालू असतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर सात महान नक्षलवादी विचारवंत पकडले गेल्यावर आणिबाणी आलीच म्हणून ममता व राव यांनी आक्रोश सुरू करायला नको होता काय? अलिकडेच दिल्लीश्वर हुकूमशहाची साथ सोडून महागठबंधनात सहभागी झालेले आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सुद्धा अजून कसे गप्प आहेत? ओडिशाही नक्षलग्रस्त राज्य आहे. तिथले मुख्यमंत्री काही भाजपाच्या एनडीए गोटातले नाहीत. मग या चौघांनी इतकी छान सुवर्णसंधी असूनही इतके मौन कशाला पाळलेले आहे? खरे तर बाकीच्या भुरट्यांपेक्षा त्यांची या विषयातली साक्ष सर्वाधिक निर्णायक ठरू शकते ना? मग कथित बुद्धीमंत प्राध्यापक यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र द्यायला यापैकी कोणीच कशाला पुढे आलेला नाही? ‘ममता’ कशाला आटली आहे?

चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांनी व नंतर सुशीलकुमार शिंदे यांनी युपीए काळात बुद्धीमंत प्राध्यापकांविषयी कोणते प्रमाणपत्र सुप्रिम कोर्टात सादर केले होते, त्याचा तपशील आधीच बाहेर आलेला आहे. पण त्यांचे पक्षांतर्गत सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पक्षाध्यक्षांनी शिंदे यांच्या छातीवर चिदंबरम म्हणून बिल्ला लावला, मग चिदंबरमही शिंदेच कसे लुंगी गुंडाळून संसदेत प्रश्नांना उत्तरे द्यायचे, त्याचा तपशील सांगू लागतात. सहाजिकच आपण संसदेत किंवा अन्य ठिकाणी या शहरी बुद्धीमान नक्षल्यांविषयी काय बोललो वा सांगितले होते, ते बोलायची त्यांना हिंमत कशी होईल? त्यांनी काही लिहून ठेवलेले असेल आणि बोललेले असेलही. पण ते खरेच त्यांनीच लिहीले बोलले असल्याचे प्रमाणपत्र आधी राहुल गांधींकडून त्यांना घ्यावे लागत असते. ते मिळाले नाही आणि अन्य काही असल्याचे पुरावे राहुलनी घोषित केले, मगच शिंदे वा चिदंबरमना आपण गृहमंत्री असताना काय बोललो, ते सांगण्याची मुभा आहे. सहाजिकच त्यांना तेव्हाचे नक्षलवादी आता गांधीवादी वा सर्वोदयवादी वाटत असतील, तर आपण आश्चर्य मानायचे कारण नाही. पण ममता किंवा चंद्राबाबू तर कॉग्रेसचे गुलाम नाहीत ना? मग त्यांनी हुकूमशाही हाणून पाडण्यासाठी नक्षली हात मजबूत करायला, पुढे कशाला येऊ नये? कारण त्यांना या अहिंसक बुद्धीवादाची झळ नित्यनेमाने सोसावी लागत असते. राहुल त्यापासून मैलोगणती दुर असतात. ममतांना किशनजींच्या हत्याकांडाचा हिशोब द्यावा लागेल ना? बंगालमधून डाव्यांना मुळासकट उखडून टाकण्यासाठी किशनजींची मदत कोणी घेतली होती? नंतर किशनजींचा काटा कोणी काढला होता? हे सगळे गाडलेले मुडदे असतात, ते बाहेर काढले गेल्यास राहुलना नव्हे ममतांना त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा मौन धारण करणे सोपे नाही काय? मोदींच्या हाताने साप मारला जात असेल, तर ममतांना हवाच असतो. ममता थोड्याच शरद पवार असतात?

पवारांची गोष्ट वेगळी आहे. ममतांना साप मारून सत्ता मिळते. पवारांना झोपेत असताना अंगावरून साप निघून गेल्यामुळे सत्ता मिळत असते. सध्या त्यांच्या हातातून सत्ता गेलेली असल्याने पवार सर्पमित्र झालेले आहेत. मोदींसारख्याला हरवण्यासाठी विषारी साप अंगावरून जाण्याचे व्रत त्यांनी घेतलेले असावे. अन्यथा त्यांनी नक्षली म्हणून पकडलेल्यांविषयी इतकी आत्मियता कशाला दाखवली असती? ते नक्षली दिसत नाहीत असे म्हणून त्यांची भेट घ्यायला पवार निघालेले आहेत. पवारांची नजर भलतीच भेदक आहे. त्यांच्या नुसत्या बघण्यातून जिहादी, नक्षली वा दहशतवादी त्यांना ओळखता येत असतात. त्यांनीच पक्षाच्या अलिबाग येथील चिंतन शिबीरात एकाच धर्माच्या लोकांना दहशतवादी म्हणून कशाला पकडता, असा नुसत्या सवाल केला आणि चित्र किती आमुलाग्र बदलून गेले होते ना? महाराष्ट्राचा एटीएसने तेव्हा मालेगावच्या ज्या काही संशयितांना पकडलेले होते, त्यांना तसेच कोठडीत ठेवून हेमंत करकरे यांनी त्याच गुन्ह्यासाठी हिंदू दहशतवादी पकडून आणलेले होते. त्यात कुठले पुरावे होते? दहा वर्षे होत आली. पण अजून तरी त्या कर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञासिंग यांच्या विरोधात टिकू शकणारा कुठलाही पुरावा कुठल्या कोर्टात सादर होऊ शकलेला नाही. दरम्यान करकरे यांचा पाकिस्तानातून आलेल्या कसाब टोळीने खुन केला. मात्र पवारांच्या नजरेचा प्रभाव इतका दांडगा होता, की त्यामुळे मालेगावसह हैद्राबादची मक्का मशीद, राजस्थानातील अजमेर शरीफ़, हरयाणातील समझोता एक्सप्रेस अशा अनेक बॉम्बस्फ़ोटात कर्नल पुरोहित यांचाच हात असल्याचे दावे दहा वर्षे अखंड चालू होते. पुरावे द्यारे बाबा, असली मागणी करायला कोणी हरीचा लाल पुढे आला नाही. त्यात असीमानंद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन जे काही कबुलीजबाब मिळवण्यात आले, तेवढाच भक्कम पुरावा होता. जो कोर्टात टिकलेला नाही.

एक मोठी चुक महाराष्ट्र पोलिसांनी यावेळी केली आणि करकरे यांच्या एटीएसने ती केलेली नव्हती. तिची फ़ारशी चर्चा इथे झालेली नाही. करकरे यांच्या पथकाने कर्नल पुरोहित व साध्वी यांच्या खटल्यात अशाच रितीने जाताना त्यांना मोक्का लावून टाकला आणि जामिनाचा विषयही आला नाही. तो त्यांचा शहाणपणा होता आणि आज तोच महाराष्ट्र पोलिस वा पुण्याच्या पोलिसांना सुचलेला नाही. आणखी मजेची गोष्ट आहे. मोक्का कोर्टाने पुरोहित व साध्वी यांचा मोक्का हटवला होता. कारण तिथेही चुक झालेली होती. मोक्का त्या दोन्ही आरोपींना लागूच शकत नव्हता. एक दोषी ठरलेला गुन्हा व आणखी एक दखलपात्र आरोप असेल, तरच मोक्का लावता येतो. असे म्हणून मोक्का कोर्टानेच करकरे पथकाला दणका दिला. तर मोक्का कायम राखण्यासाठी अजमेर, मक्का मशीद, वा समझोता स्फ़ोटातही या दोघांची नावे घुसडून देण्यात आलेली होती. याला पवारांची नजर म्हणतात. तिच्यासमोर क्षकिरण वा नार्कोटेस्टही नगण्य आहे. नुसत्या नजरेने पवारांनी मालेगावची धरपकड चुकीची ठरवली आणि नंतर झालेल्या पुराव्याशिवायच्या अटकाही तब्बल नऊ वर्षे वैध ठरवल्या गेल्या होत्या. विश्रामबाग वाडा पोलिसांनी ताज्या कारवाईची कागदपत्रे पवारांच्या नजरेत घालून स्कॅन करून घेतली असती, तर इतकी फ़टफ़जिती झाली नसती. तशीच या विषयात राहुल गांधी वा शिंदे चिदंबरम यांनी आपापली जुनी वक्तव्ये राहुलकडून स्कॅन केली असती, तर आज कदाचित ममताही त्यांच्या बाजूने थयथयाट करायला उभ्या राहिल्या असत्या. ममतांशिवाय अशा वादग्रस्ततेला मजा येत नाही. त्यात केजरीवालांचा तडका असला तर बघायलाच नको. मजेची गोष्ट अशी, की नक्षलग्रस्त राज्यापैकी कोणी बिगरभाजपा मुख्यमंत्री बुद्धीमंत प्राध्यापकांच्या मदतीला धावून का आलेला नाही, असा प्रश्न एकाही वाहिनीला वा संपादकाला पडलेला नाही. साखरेचे खाणार त्यालाच मधूमेह होणार ना?

7 comments:

  1. वा भाऊ वा

    ReplyDelete
  2. भाउ खरच तुमच्या नजरेतुन काही सुटत नाही सगळ्या गदारोळात ममता नायडु का उतरले नाहीत नवल आहे कारन मोदीसरकार जे करील त्याच्या विरुद्ध बोलने हेच काम आहे त्यांच

    ReplyDelete
  3. वा ते काही नक्षली दिसत नाहीत या पवारांच्या शहाजोगपनाचा चांगला समाचार घेतलात खरच संतापजक बोलतात हल्ली ते इथली दैनिके वाहिन्या काही बोलत नाही यांच्या्विरुद्द भाजपच सरकार असुन पन त्यांतील कोनी जरी वादग्रस्त जाउदे चांगल बोलल तरी तुटुन पडतात म्हनुनच त्यांना trp नाही मी barc वर पाहील तर इतरप्रादषेेशिक भाषेतील न्युजचॅनेलचा weeklydata आहे मराठीत एवढे चॅनल असुन नाही कारन ठराविक प्रेक्षक नसेलतर ते मोजतच नाहीत

    ReplyDelete
  4. कोळसा आत जाणार का ?

    ReplyDelete
  5. नांवे घेऊन पंचनामा फक्त भाऊच करू शकतात

    ReplyDelete