पाकिस्तानच्या तुरूंगात कोठडीबंद असलेला भारतमातेचा सुपुत्र कुलभूषण जाधव, अजून तिथेच खितपत पडलेला आहे. गतवर्षीच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या स्थगिती आदेशामुळेच त्याला अजूनपर्यंत जीवदान लाभलेले आहे. त्या खटल्याचे पुढे काय झाले, ते आपण जवळपास विसरून गेलेलो आहोत. पण तो विषय अजून निकालात निघायचा आहे आणि त्यासाठीची सुनावणी पुढल्या वर्ष फ़ेब्रुवारी महिन्यात सुरू व्हायची आहे. अडीच वर्षापुर्वी कुलभूषणला बलुचिस्तान प्रांतामध्ये घातपाती कारवाया करताना अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा होता. मात्र त्याविषयी पाकिस्तानातूनच आलेल्या बातम्या उलटसुलट होत्या. आधी त्याला इराणी सीमेवर अटक केल्याचे सांगण्यात आले आणि नंतर बलुचिस्तानात अटक झाल्याचाही खुलासा करण्यात आला. पण प्रत्यक्षात या भारतीय उद्योजकाचे इराणच्या चाबाहार बंदरातून पाक हस्तकांनी अपहरण केल्याचा भारत सरकारचा दावा आहे. अर्थात दोन देशातील शत्रूत्व लक्षात घेता, दोघांचे दावे परस्परविरोधी असणारच. म्हणूनच आंतरराष्ट्रीय कोर्टात तशा दाव्यांना फ़ारशी किंमत नसते. तिथे पुरावे आणि साक्षीच्या मदतीने निर्णय घेतला जात असतो. सहाजिकच भारताने त्याच कोर्टात धाव घेतलेली होती व तिथे भारताचा दावा प्राथमिक पातळीवर मान्य झाल्याने पाकिस्तानला मिरच्या झोंबलेल्या आहेत. कारण त्या कोर्टाच्या हस्तक्षेपाने पाकिस्तानी कायद्याची मनमानी मोडीत काढलेली आहे. तसे झाले नसते, तर एव्हाना कुलभूषणच्या गळ्यातला फ़ास आवळला गेला असता. ते होऊ शकले नाही, कारण त्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने त्यात हस्तक्षेप केला आणि तिथला निकाल लागण्यापर्यंत पाकिस्तानात झालेल्या फ़ाशीच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे. पण ज्या आधारावर स्थगिती मिळाली, तीच पुढील निकालाचीही चाहुल ठरू शकण्यासारखी स्थिती आहे. कारण पाकिस्तानचा दावाच बिनबुडाचा आहे.
दोन देशातील संबंध वितुष्टाचे असले, मग दोन्हीकडल्या हेरांकडून व हस्तकांकडून उचापती चालूच असतात. सहाजिकच एकमेकांच्या हेरखात्यावर घातपाताचे व दगाबाजी केल्याचे आरोप होणे स्वाभाविक आहे. पण त्यासाठी पुरावेही असावे लागतात. अनेकदा अशा हस्तकांना व हेरांना परस्पर ठारही मारून टाकले जात असते, त्याविषयी कुठला बोलबाला केला जात नाही. पण कधीकधी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अशा गोष्टींचे भांडवली करायचा मोह राज्यकर्त्यांना आवरत नाही. पाकिस्तान हल्ली जगभर जिहाद व दहशतवादामुळे बदनाम झालेला देश आहे. त्यातून पळवाट काढण्यासाठी तो देश मुद्दाम आपणच दहशतवादाचे बळी असल्याचेही नाटक करण्याची धडपड करीत असतो. किंबहूना भारताकडून पाकिस्तानात घातपात होत असल्याचाही आरोप सरसकट करीत असतो. तिथे फ़ाळणीनंतर जाऊन वसलेल्या भारतातील मुस्लिमांना सामावून घेण्यात पाकला यश आलेले नाही. ते मुस्लिम व अन्य बिगर मुस्लिमांची तिथे सतत धार्मिक उन्मादातून ससेहोलपट होत असते. त्यातून त्यांचे अनेक गट उभे राहिले असून, ते उचापती करीत असतात. त्याखेरीज पठाण व बलुची, अधिक शिया मुस्लिमांचाही कोंडमारा हिंसेचे रुप धारण करीत असतो. तशा घटना घडतात, तेव्हा त्यामागची प्रेरणा अतिरेकी कट्टर सुन्नीपंथीय संघटना आहेत. पण ते सत्य मान्य करायची हिंमत पाकिस्तानात नाही, की त्या संघटनांच्या मुसक्या आवळण्याचे धाडस पाक सरकार वा सेनेपाशी नाही. म्हणून मग अशा सर्व हिंसाचाराचे खापर भारताच्या माथी मारले जात असते. त्यासाठीचा पुरावा म्हणून कुलभूषण जाधवचे प्यादे वापरण्याचा हा डाव होता. स्वतंत्रपणे व्यापार उद्योग करण्यापुर्वी कुलभूषण भारतीय नौदलाचा अधिकारी होता आणि निवृत्तीनंतर त्याने सागरी वाहतुक हा उद्योग सुरू केला. तर तेवढे सुत्र धरून त्याला भारतीय हेर ठरवण्याचा खेळ पाकिस्तानने केलेला आहे.
नौदलातील आपल्या नोकरीचा राजिनामा देऊन कुलभूषण याने सागरी वाहतुक व्यवसायात पदार्पण केले. त्यासाठी तो इराणच्या चाबाहार बंदरात जाऊन मुक्कामाला राहिला होता. तिथून त्याचे पाकिस्तानी हस्तकांनी अपहरण केल्याचा भारताचा दावा आहे. त्याच्याशी जुळणारी कबुली तालिबानांच्या एका म्होरक्यानेही दिलेली आहेच. म्हणजे असे, की कुठल्यातरी कंत्राटाचे आमिष दाखवुन कुलभूषणला दुर सागरी क्षेत्रात बोलावून घेण्यात आले आणि तिथून कुलभूषणला गाफ़ील उचलून अपहरण झाले. त्याला अन्य मार्गाने गुपचुप बलुची प्रदेशात पाकिस्तानच्या हवाली करण्यात आले. मग पाकिस्तानात अशा भारतीय हेराला अटक करण्यात झाल्याची अफ़वा पसरवून देण्यात आली. तशा बातम्या आता नव्या राहिलेल्या नाहीत. कराचीमध्ये सिंधी नाराजीने दंगली पेटल्या की स्थानिक सिंधी नेत्यांवर किंवा स्थलांतरीत मोहाजिरांवर भारताचे हस्तक असल्याचा सरसकट आरोप केला जात असतो. गुन्हेही दाखल केले जातात. मग कुलभूषणच्या अटकेची अफ़वा पसरवण्यात आल्यावर हळुहळू पाकच्या कुठल्याही घातपात वा हिंसाचाराचा सुत्रधार म्हणून कुलभूषणवर नवनवे आरोप करण्याचा सपाटा लावला गेला. मात्र त्याची आपल्याला भारताच्या वकिलातीशी संपर्क साधायची विनंती अमान्य झाली. बातम्या वाचून भारतीय वकिलातीने कितीतरी वेळा त्याला भेटण्याची मागितलेली परवानगी नाकारली गेली. तिथेच पाकिस्तान फ़सत गेला. कारण त्यांनी कुलभूषणवर हेरगिरीचा आरोप लावला. पण त्याला पाक हद्दीत घुसलेला भारताचा सैनिक म्हणूनच वागणूक दिली. पण आपल्या सोयीनुसार कायदे लावले. शत्रू सैनिक म्हणून असलेले अधिकार नाकारून त्याला हेर ठरवले गेले आणि त्यातून काही निष्पन्न होत नाही बघितल्यावर, त्याला सैनिक ठरवून खटला थेट लष्करी न्यायालयात चालविला गेला. पण कुठल्याही बाजूने गेलात तरी त्याला मायदेशीच्या वकीलातीशी संपर्क नाकारणे बेकायदा होते. पाक तिथेच फ़सला आहे.
कुठल्याही देशाचा हस्तक वा हेर असला, तरी त्याला शत्रू सैनिक म्हणून वागवता येत नाही. शत्रू सैनिक असला तरी त्याला मानवाधिकार असतातच. त्यापैकी कशाचेही पाकिस्तानने पालन केले नाही. त्याला कुठल्याही कोर्टात आपला बचाव करण्याची मुभा ठेवली नाही, की पाकिस्तानात मानवाधिकाराचे काम करणार्या कुठल्या वकीलाशीही संपर्क साधू दिला नाही. मध्यंतरी अशाच एक सरबजीत नावाच्या पंजाबी नागरिकाला हेर ठरवून पाकने दिर्घकाळ तुरूंगात डांबलेले होते. पण त्या बाबतीत निदान पाकच्या मानवाधिकार संघटनांना काही काम करता आलेले होते. कुलभूषणला हे सर्व नाकारले गेले. २०-२५ वेळा तरी भारत सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अपयशी ठरल्यावर अंतिम पर्याय म्हणून भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाय दाद मागितली. कारण पाकच्या लष्करी न्यायालयाने एकतर्फ़ी खटला चालवून कुलभूषणला फ़ाशी ठोठावली होती. त्याची तारीखही निश्चीत केलेली होती. म्हणूनच पहिली पायरी फ़ाशी रोखण्याची होती. त्यात दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर त्या कोर्टाने फ़ाशीला स्थगिती दिलेली होती. आपला निर्णय लागेपर्यंत कुलभूषणला फ़ाशी देऊ नये, असे ते फ़र्मान पाकितान नाकारू शकत नव्हता. तो पराभव पाकला खुप झोंबला होता. मग त्यांची बाजू लढवणार्या पाक वंशाच्या ब्रिटीश वकीलावरही दोषारोप झालेले होते. आता त्याच खटल्याची अंतिम सुनावणी करायच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. पण दरम्यान आपली गेलेली अब्रु झाकण्यासाठी पाकिस्तानने दुसरे नाटक रंगवलेले होते. कुलभूषणची पत्नी व माता यांना त्याला भेटण्याची संधी देण्यात आली. मात्र तेव्हाही भारतीय वकिल वा मुत्सद्दी यांना तिथे जाऊ देण्यात आले नाही. काचेच्या आडून कुलभूषणच्या माता पत्नीला भेटू देण्यात आले. त्या दोघांनीही मायदेशी परत आल्यावर कुलभूषण गुंगीत असंबद्ध बोलत होता, असेच सांगून टाकले आणि पाकची आणखी नाचक्की झाली.’
जगसमोर कुलभूषणने आपला गुन्हा मान्य करावा, किंवा तसा आभास निर्माण व्हावा, म्हणूनच पाकने ही भेट योजली होती. तिथे त्याच्या आई व पत्नीची पादत्राणेही जप्त करण्यात आली व त्यात मायक्रोफ़ोन असल्याचाही दावा केला. तिथे कुलभूषण गुंगीत पढवलेली वाक्ये बोलत होता आणि त्याचे बोलणेही असंबंद्ध होते. त्यातून पाक पोलिस वा तपासयंत्रणांनी त्याला छळून हवे तेच बोलायला भाग पाडल्याचे जाणवत होते. त्याने काहीही सांगितले तरी कुलभूषणच्या आईने तिथेही त्याचे कान उपटले आणि भलतेसलते बोलू नकोस असेच शब्द उच्चारले. त्यामुळे त्यांच्यातल संवाद कोर्टात साक्ष म्हणून वापरण्याचा पाकचा डाव वाया गेला. अर्थात असल्या खुळ्या डावपेचांनी फ़सण्याइतके आंतरराष्ट्रीय कोर्ट मुर्ख नसते, की दुधखुळेही नसते. मुळ मुद्दा कुलभूषणला पाकमध्ये न्याय्य वागणूक मिळालेली नाही व मानवाधिकार नाकारला गेला हा आहे. लष्करी कोर्टात त्याला स्वेदेशी सरकारचे सहकार्य नाकारले आणि वकीलही दिला नाही, ही त्रुटी आहे आणि त्यातून पाकला निसटता येणार नाही. यातून कुलभूषणला भारताच्या हवाली करा असा निकाल येऊ शकत नाही. पण निदान नव्याने नागरी कोर्टात खटला चालवावा आणि त्यात कुलभूषण व भारत सरकारला मान्य होईल असा बचावाचा वकील द्यावा; असा निर्णय नक्की येऊ शकेल. तसे झाले मग त्या खटल्यावर त्याच जागतिक कोर्टाची देखरेखही भारत मागू शकेल. काश्मिरात वा भारतात अन्यत्र पाक हस्तकांना मिळणारी वागणूक किती सोयीस्कर आहे, ते लक्षात येण्य़ासाठी पाकच्या या अमानुष वर्तनची चर्चा करणे भाग आहे. एक मात्र निश्चीत, भारताचा हा एक मराठा खरोखरच ‘लाख मराठा’ ठरला आहे. मरगळलेला व गुंगीतला कुलभूषण व त्याची वयोवृद्ध माता, पाकिस्तानला भारी पडलेले आहेत. त्यांच्या शौर्याला आंतरराष्ट्रीय कोर्टात ‘न्याय’ मिळावा, इतकीच प्रार्थना!
खरय भाउ.मधे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी isiचा हेर नोकरीचे अमिष दाखवुन नेपालमधे पकडला होता.म्हनुनच कुलभुषन जिवंत आहे कदाचित कारण पराभव होत ्सताना सबरजीतसारख कोणतही कारण काढुन पाकने विषय संपवला असता.पन isi agent कडे पाकची किती गुपिते असतील? कुलभुषण एजंट नाही पन भारताने मुद्दाम खराखुरा एजंट पकडला असु शकतो
ReplyDeleteCan Siddhu help...
ReplyDelete