Friday, November 2, 2018

मुलं पळवणारी म्हातारी

Image result for naidu pawar farookh

मागल्या आठवड्यात विशाखापट्टणम विमानतळावर जगनमोहन या राजकीय नेत्यावर चाकूहल्ला झाला होता. विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असतो आणि तिथे प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची कसून तपसणी होत असते. प्रवाशांना आपल्या सामानातही काही धारदार वस्तु घ्यायला प्रतिबंध आहे. अशा जागी जगनवर झालेल्या हल्ल्याने खळबळ माजणे सहाजिकच आहे. पण तो हल्ला प्रवाशाने केलेला नव्हता, तर विमानतळावर खाण्याची दुकाने सुविधा आहेत, तिथल्या वस्तु वापरून एका कर्मचार्‍याने केलेला हल्ला होता. त्याचा हेतूही समोर आलेला नसताना त्यावरून राजकारण सुरू झाले. जगनमोहन रेड्डी हा आंध्र विधानसभेतला विरोधी नेता आहे आणि आगामी निडणूकीतला आव्हानवीर असल्याने त्याने व त्याच्या पक्षाने अशा हल्ल्याचे भांडवल करणे स्वाभाविक आहे. तात्काळ त्याच्या पक्षातर्फ़े मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर आरोप केला. सत्तेची खुर्ची डगमगू लागली, म्हणून हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि मुख्यमंत्री कमालीचा गडबडून गेला आहे. अर्थात असा मुर्खपणा नायडूंसारखा मुरब्बी अनुभवी राजकारणी अजिबात करणार नाही. त्यातून राजकीय लाभ होण्यापेक्षा नुकसानच अधिक संभवते, हे नायडूंना समजते. पण जखम किरकोळ असली तरी राजकीय संधी मोठी असल्याचे जगनलाही नेमके समजते. म्हणून हल्ला किरकोळ असूनही त्याने मोठे नाटक रंगवले. त्यामुळेच चंद्राबाबू पुरते गोंधळून गेले आहेत. त्यांची नंतरची प्रतिक्रीया खुपच उतावळी व भेदरलेली दिसते. कारण हल्ल्याला एक आठवडा उलटण्यापुर्वी नायडू यांनी थेट राहुल गांधींना शरण जाण्यापर्यंत माघार घेतली आहे. हातातून असलेले राज्य जाण्याच्या भयाने पछाडल्याची ती खुण आहे. अन्यथा अचानक उठून नायडू दिल्लीत आले नसते वा त्यांनी पवारांपासून फ़ारूख अब्दुल्लांपर्यंत सर्वांना शाली पांघरण्याचा सोहळा केला नसता.

अर्थात त्याचे कारण नुसता जगनमोहनवर झालेला हल्ला इतकेच नाही. लागोपाठ दोनतीन मतचाचण्या आल्या, त्यात नायडूंचा पक्ष मागे पडून जगमोहनचा स्थानिक पक्ष पुढे आल्याचे इशारे मिळत आहेत. आपल्या एकट्याच्या बळावर आंध्रची सत्ता टिकवणे अशक्य असल्याची चाहुल चंद्राबाबूंना लागलेली आहे. त्यातही अजिबात नवे काही नाही. २०१४ सालातही त्यांना तशी खात्री पटलेली होती, म्हणून त्यांनी आजच्याप्रमाणेच तेव्हा नरेंद्र मोदींना शाल पांघरली होती आणि निवडणूकांपुर्वी काही दिवस भाजपाशी तडजोड व आघाडी केलेली होती. किंबहूना त्यामुळेच त्यांना सत्ता मिळवणे व मतविभागणी टाळून लोकसभेत अधिक उमेदवार निवडून आणणे शक्य झाले होते. भाजपाची तेव्हा किंवा आज आंध्रातली ताकद फ़ार मोठी नाही. पण मोठ्या पक्षाच्या काठावरच्या उमेदवारांना जिंकून देण्याइतकी मते भाजपाकडे नक्कीच आहेत. त्यामुळे़च २०१४ मध्ये नायडूंचा तेलगू देसम पक्ष बाजी मारून गेलेला होता. अन्यथा जगनच्या पक्षाने तेव्हाच सत्ता मिळवली असती आणि नायडूंना आणखी पाच वर्षे मिळून पंधरा वर्षांचा वनवास सोसावा लागला असता. किंबहूना आज जी नाटके नायडू करीत आहेत. त्याच्याच परिणामी त्यांचा राजकीय वनवास २००४ सालात सुरू झालेला होता. तेव्हाही गुजरात दंगलीचे दोषी म्हणून मोदींनी राजिनामा द्यावा, किंवा भाजपाने त्यांना हटवावे अशा मागणीसाठी नायडू एनडीएतूनबाहेर पडले होते. मात्र त्याची किंमत त्यांना पुढल्या निवडणूकीत मोजावी लागली आणि आंध्रच्या राजकारणात नायडू कुठल्या कुठे फ़ेकले गेले. त्यांना राजकारणातून संपवणारे राजशेखर रेड्डी अपघातात मरण पावल्यानंतर सहानुभूतीने त्यांचा पुत्र जगनमोहन राजकारणात यशस्वी झाला. त्याने आता कॉग्रेसचा सगळा मतदार आपल्या खात्यात जमा करून घेतला आहे. त्यात कॉग्रेसचे पुरते दिवाळे वाजून गेले आहे आणि नायडू त्याच कॉग्रेसच्या झिरो बॅलन्स खात्यात आपला मतदार भरायला निघाले आहेत.

साडेतीन दशकांपुर्वी राजीव गांधी राजकारणात आल्यानंतर प्रथमच हैद्राबादला गेलेले होते. त्यांच्या स्वागताला कॉग्रेसचे मुख्यमंत्री टी. अंजय्या विमानतळावर आलेले असताना उपस्थितांसमोरच राजीवनी त्यांना अपमानित केले होते. राज्याचा कारभार सोडून लाळघोटेपणा करायला इथे कशाला आलात, अशा आशयाने काहीतरी राजीव बोलले आणि अंजय्यांना रडू फ़ुटले होते. तो तेलगू अस्मितेचा अपमान असल्याचा डांगोरा स्थानिक लोकप्रिय ‘एन्नाडू’ दैनिकाने पिटला होता. त्याच दैनिकचे मालक व संपादक रामोजीराव यांनी मग लोकप्रिय अभिनेता रामाराव यांना पुढाकार घ्यायला लावला आणि त्यातून खराखुरा कॉग्रेसशी टक्कर देऊ शकणारा तेलगू देसम पक्ष तिथे जन्माला आला. त्याने १९८२ सालात कॉग्रेसला पाणी पाजले आणि सत्तांतर घडवून आणलेले होते. ती तेलगू अस्मिता इतकी प्रखर होती, की १९८४ सालात इंदिरा हत्या झाल्यावर देशभरात मतदारने कॉग्रेसला भरभरून मते दिलेली असताना, एकटा आंध्रप्रदेश कॉग्रेसच्या विरोधात ठाम उभा राहिला होता. त्याचेही कारण होते. इंदिरा गांधी यांनी रामारावांच्या बिगर कॉग्रेस सरकारमध्ये फ़ाटाफ़ुट घडवून लोकप्रिय मुख्यमंत्र्याला पदच्युत केलेले होते. त्याची संतप्त प्रतिक्रीया उमटली. शंभर दिवसात पुन्हा रामारावांना मुख्यमंत्री करावेच लागले. पण इंदिरा हत्येनंतरही मतदार कॉग्रेसच्या विरोधात गेला. देशात सर्वत्र विरोधकांचा धुव्वा उडत असताना तेलगू देसम हाच लोकसभेतील दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष झाला होता. त्याला ४२ पैकी २७ जागा मिळाल्या होत्या. आज त्याच पक्षाचे म्होरके चंद्राबाबू नायडू त्याच राजीव गांधींच्या पुत्राला राहुल गांधींना शाल पंघरायला जाऊन पोहोचले. त्यातून त्यांची दिवाळखोरी लक्षात येऊ शकते. कारण तेलगू देसम हा तथाकथित पुरोगामी पक्ष नव्हता वा नाही. कॉग्रेस विरोध हे तेलगू देसम पक्षाचे गुणसुत्र वा डीएनए आहे.

नायडूंचा मोदी विरोध आपल्या जागी आहे. पण त्यासाठी त्यांनी कॉग्रेसशी हातमिळवणी करणे, ही निव्वळ आत्महत्या असते. हेच विविध राज्यातल्या प्रादेशिक पक्षांनी केले आणि त्यांची शोकांतिका होऊन गेलेली आहे. महाराष्ट्रात सेना-भाजपा युतीला रोखण्यासाठी इथले पारंपारिक कॉग्रेस विरोधी पक्ष १९९९ सालात कॉग्रेसच्या कच्छपि लागले आणि त्यांचे नामोनिशाण आज शिल्लक राहिलेले नाही. तेच अलिकडे बंगालमध्ये डाव्या आघाडीचे होऊन गेले. ममतांच्या विरोधात कॉग्रेसशी आघाडी केलेल्या डाव्यांच्या सुपडा साफ़ झालेला आहे. बिहार उत्तरप्रदेशात भाजपाला रोखण्यासाठी मुलायम, मायावती वा लालूंची पाठराखण करताना कॉग्रेस नामशेष होऊन गेलेली आहे. कर्नाटकात भाजपाला रोखण्य़ाच्या नादात देवेगौडांचे जनता दल संपून गेले. थोडक्यात हे पुरोगामी राजकारणाचे थोतांड सुरू झाल्यापासून मागल्या दोन दशकात कॉग्रेस ही मुले पळवणारी म्हातारी झाली आहे. त्या पक्षात इतर लहानसहान प्रादेशिक वा अन्य पुरोगामी पक्षातून पळवलेली मुले आता खानदान म्हणून मिरवताना दिसतील. दत्तक घेतलेली वा पळवलेली ही परक्यांची मुले आ्ज कॉग्रेसचा वारसा तावातावाने बोलताना दिसतात. चंद्राबाबू नायडूंना मात्र पळवून न्यावे लागलेले नाही. ते आपणच या राजकीय म्हातारीच्या पोतडीत जाऊन घुसले आहेत. भाजपाचा बागुलबुवा करण्याच्या नादात त्यांनी आपल्या पक्षाला आता कॉग्रेसचे पुनरूज्जीवन करण्यासाठी बळीच द्यायचा निर्णय घेतला आहे. आज जगनला रोखण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, कारण त्यांनी काही महिन्यापुर्वी एनडीएची साथ सोडली आहे आणि जगनचे आव्हान पेलण्यासाठी आता कॉग्रेसच्या पायावर लोळण घेतली आहे. त्यातून तेलगू देसमला पुन्हा सत्ता वा यश मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. पण कॉग्रेसने जगनसाठी गमावलेल्या मतदाराची भरपाई तेलगू देसमच्या खात्यातून होईल आणि नंतरच्या राजकीय लढाईत नायडूंचा पक्ष महाराष्ट्रातल्या शेकापसारखा दुबळापांगळा होऊन जाईल.

9 comments:

  1. भाऊ आपण भविष्यातील तेलंगणा दाखवला आहे

    ReplyDelete
  2. टायटल खुपचमस्त व समर्पक

    ReplyDelete
  3. जगन रेड्डी हा ख्रिश्चन नेता आहे. पण त्याचे आणि सोनियाचे भांडणं आहे. ख्रिश्चन हा आंध्र मधला मोठा अदृश्य हट्ट आहे कारण तेथे लोकं नावं बदलत नाहीत. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो मित्र हा नायडूंचा हिशेब आहे.

    ReplyDelete
  4. भाऊ
    याला विनाश काली विपरीत बुद्धी च महनावे लागेल.

    ReplyDelete
  5. भाऊ त्रिपुराच्या यशानंतर सुनील देवधर यांना भाजपने आंध्र आणि तेलंगणा येथे पक्ष प्रभारी म्हणून पाठवले आहे चंद्राबाबू यांनी काँग्रेस सोबत युती केली आहे त्या पाठीमागे कदाचित हेही कारण असावे

    ReplyDelete
  6. पण जगनचे येणे हे देशाच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही ख्रिश्चन मिशनर्‍यांना मोकळे रान करून देणारा हा जगन कारण तो रिव्रस्ती आहे

    ReplyDelete
  7. भाउ राहुल निवडणुका जिंकण्यातच नाकाम आहे असच नाही तर संघटक म्हणुन पण नाकाम आहे.MP च ताज उदा.आहे राहुलच्या वयाच असताना ४८ व्यावर्षी मोदी कुशल संघटक होते म्हनुनतर संघाने भाजपमधे पाठवल.मोदींनी त्यावेळी जोड करुन हरयानात सरकार बनवल हेेोत राहुलला दोन नेत्यामधली भांडण सेोडवायला अजुन सेोनिया लागतात राहुलच्या आशेवर बसलेल्या पुरेगाम्यांनी हे ध्यानात घ्याव

    ReplyDelete
  8. परखड ...जबरदस्त विश्लेषण !! चंद्राबाबू ...एवढा अनुभवी नेताही ..' आ बैल मुझे मार ' म्हणू लागला म्हणजे आश्चर्यच आहे.

    ReplyDelete