इतिहास कधीकधी इतका निष्ठूर होतो, की एकेकाळी मस्तवालपणा केलेल्यांना शरणागत होऊन आपली पापे फ़ेडावी लागत असतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पिताश्री देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपापल्या पद्धतीने तिथल्या घडामोडींवर सुखावलेले असतील. कारण कर्नाटकात आज रंगलेले नाटक या दोन्ही नेत्यांच्या पुर्वायुष्यातील घडामोडींची परतफ़ेड नक्कीच म्हणता येईल. कारण कधीकाळी त्या दोघांनाही अशाच तणावपुर्ण घटनाक्रमातून जावे लागलेले आहे आणि ज्यांनी असा छळ केलेला होता, त्यांनाच आता त्याची किंमत मोजावी लागते आहे. एकप्रकारे म्हणूनच हा काळाने उगवलेला सूडही म्हणता येऊ शकतो. दहा वर्षापुर्वी याच कुमारस्वामींनी भाजपाशी सौदेबाजी करून तात्कालीन कॉग्रेस जनता दलाचे संयुक्त सरकार पाडलेले होते. त्यात धर्मसिंग नावाचे कॉग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्रीपद सिद्धरामय्या जनता दलाचे प्रतिनिधी म्हणून उपभोगत होते. पण आपल्या पित्याचा वारसा आपल्यालाच मिळाला पाहिजे, म्हणून कुमारस्वामी यांनी कारस्थान शिजवले आणि त्यात भाजपाला सहभागी करून घेतलेले होते. त्यानुसार जनता दल व भाजपा यांनी आघाडी करायची आणि प्रत्येकी २० महिने मुख्यमंत्री त्या त्या पक्षाला मिळणार होता. पण त्यासाठी मुळात सत्तेत असलेले सरकार कोसळायला हवे होते. पक्षाचे सर्वेसर्वा देवेगौडा त्याला राजी नव्हते. म्हणजे तसले नाटक त्यांनी रंगवले होते. त्यांना धाब्यावर बसवून पक्षाचे बहुतांश आमदार कुमारस्वामींच्या मार्गाने जात होते आणि काही मंत्र्यांनीही राजिनामे फ़ेकलेले होते. बिचारे सिद्धरामय्या कधी सत्ता जाते, याची प्रतिक्षा करीत एकटेच गौडांच्या सोबत थांबलेले होते. अखेर मुलाची जीत झाली आणि सिद्धरामय्यांची खुर्ची गेलेली होती. आज कुमारस्वामींच्या सत्तापदाला घरघर लागलेली असताना सिद्धरामय्या किती समाधानी असतील?
अर्थात अजून कर्नाटकातले सरकार पडलेले नाही आणि कदाचित कोसळणारही नाही. कारण भाजपानेही आपण सत्तेवर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. मग यात भाजपाचे कोणते राजकारण असू शकते? तर आघाडीची सरकारे टिकावू नसतात, असे जनमत लोकसभा मतदानापुर्वी तयार होणे, भाजपासाठी लाभदायक असू शकते. जो तमाशा चालला आहे, तो त्यालाच पोषक आहे. पण यात कुमारस्वामी यांच्या जीवाची घालमेल चालू आहे आणि सिद्धरामय्या बाजूला बसलेले आहेत. तेच आघाडीच्या सुसुत्रता समितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे आघाडीचे सरकार विनासायास चालणे, त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. आघाडीतील विवाद सिद्धरामय्यांनीच सुरू केलेले नाहीत काय? मंत्रीमंडळाचा विस्तार पुर्ण होण्यापर्यंत कुठली गडबड नव्हती. पण तो झाल्यावर सत्तापदे उरलेली नाहीत. त्यामुळेच अनेकजण नाराज झाले आहेत आणि त्यांनी बंडाचे झेंडे खांद्यावर घेतलेले आहेत. त्यांची समजूत घालूनच विस्तार झाला असता, तर ही वेळ आलीच नसती. पण ती आली म्हणजेच सिद्धरामय्या यांनी पक्षांतर्गत विवाद व बेबनाव संपू दिलेला नाही. कदाचित त्यालाच खतपाणी घातलेले असावे. त्याचे कारणही स्वाभाविक आहे. ज्या कुमारस्वामींनी सिद्धरामय्यांना बारा वर्षापुर्वी सत्तभ्रष्ट केले व विरोधी नेतेपदी आणुन बसवले होते, त्यांनीच कर्नाटकात कॉग्रेसला ८० जागा जिंकून दिल्या. त्याच बळावर कुमारस्वामी मुख्यमंत्री म्हणून सत्तेत बसलेले आहेत. ही बाब सिद्धरामय्यांना किती बोचत असेल? ज्यामुळे हे सत्तारोहण शक्य झाले, त्या सिद्धरामय्यांना शपथविधीच्या मंचावरही स्थान मिळू शकलेले नव्हते. किती दु:ख झाले असेल त्यांना? मग आज तेच मुख्यमंत्रीपद डळमळीत झाल्यावर सर्वात कोण आनंदी असेल? दहाबारा वर्षापुर्वी असाच घोर त्यांच्या जीवाला लागलेला होता आणि आज कुमारस्वामी व्याकुळ आहेत.
दुसरीकडे आपल्या लाडक्या मुलालाच मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून देवेगौडांनी दहा वर्षापुर्वी नाटक केलेले होते आणि आताही आघाडी करताना सिद्धरामय्यांना सत्तेच्या बाहेर ठेवण्याच्या अटीवरच तडजोड झालेली आहे. तेव्हा जनता दलाचे आमदार तरी ६०हून अधिक होते आज तुलनेने कमी आहेत. त्यांच्या दुपटीने कॉग्रेसचे आमदार आहेत. म्हणजेच आघाडीच करायची तर सरकारचे नेतृत्व कॉग्रेसला व पर्यायाने सिद्धरामय्यांना मिळायला हवे होते. पंधरा वर्षे महाराष्ट्रात कॉग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती, किरकोळ फ़रक होता तरी मुख्यमंत्रीपद कॉग्रेसने आपल्याकडेच ठेवलेले होते. २००९ सालात दोन आमदार कॉग्रेसचे कमी असतानाही ते पद सोडलेले नव्हते. मग कर्नाटकात दुपटीने आमदार अधिक असून जनता दलाला वा गौडापुत्राला मुख्यमंत्रीपद देणे; हा सिद्धरामय्यांवर कॉग्रेसनेही केलेला अन्यायच नाही काय? ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू अशी, की १९९७ सालात वाजपेयींच्या नंतर कॉग्रेस पाठींब्याने पंतप्रधान झालेल्या देवेगौडांनी सरकारमध्ये कॉग्रेसचे मंत्री घ्यावेत म्हणून कॉग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी लकडा लावला होता. तो गौडांनी जुमानला नाही. म्हणून केसरी यांनी पाठींबा अकस्मात काढून घेतला होता आणि असेच आपले सरकार टिकवायला गौडांची तारांबळ उडालेली होती. तेव्हा त्यांची तारांबळ ज्यांनी उडवली, त्याच कॉग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आपल्या लाडक्या पुत्राचे सरकार टिकवण्यासाठी धावपळ करताना बघून देवेगौडांना सुडाचा आनंद मिळत नसेल? कसे योगायोग असतात ना? घटनाक्रम एकच आहे. पण त्यात कर्नाटकचे दोन वरीष्ठ नेते आपापल्या ऐतिहासिक जखमांची भरपाई बघत असतील. अर्थात तसे कोणी जाहिरपणे बोलणार नाही. पण अंतर्मनात त्याची सुखद जाणिव त्या दोघांनाही नक्की असेल. इतिहास किती निष्ठूर असतो ना? कधी कुठल्या चाव्या फ़िरवून कोणाला सुख देईल आणि कोणाच्या दु:खात ते सुख सामावलेले असेल, सांगता येत नाही.
बिहार मधे पण महागठबंधनाच असच झाल ज्या नितीशना मुख्यमंत्री म्हनुन बहुमत मिळाल त्यांना धुडकावुन तेजस्वी भोवती गराडा जमु लागला तेव्हा नितीशना काय वाटत असेल हे अंतर्गत धुसफुस मोदी विरोधम्हनुनखुष होणा्यांना कळत नाही
ReplyDeleteसत्य 👍👍👍
ReplyDeleteमस्त
ReplyDelete