Friday, January 18, 2019

प्रेम-द्वेष आणि बुद्धी

shahid siddiqui yogendra yadav के लिए इमेज परिणाम

मागल्या लोकसभेचे वेध लागलेले असताना शाहिद सिद्दीकी नावाचे ज्येष्ठ संपादक गयावया करून वाहिन्यांच्या चर्चेत काय सांगत होते? त्यांनाही तेच आज आठवत नाही. मग योगेंद्र यादव यांच्यासारख्या अभ्यासू मतचाचणी जाणकाराची बुद्धी निकामी झाली असेल, तर नवल कुठले? तसे हे दोघेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक वा चहाते नाहीत. उलट कट्टर विरोधकच आहेत. पण बाकीच्या निर्बुद्ध विरोधकांसारखे मंद्बुद्धी नक्कीच नाहीत. कुठल्याही विचारसरणीचे ते अनुकरण करीत असले. तरी आपल्या बुद्धीने निदान विचार करीत असतात. म्हणूनच मागल्या लोकसभेपुर्वी नरेंद्र मोदींच्या विरोधात अशीच माध्यमातून सार्वजनिक धुळफ़ेक चालू झालेली असताना सिद्दीकी गयावया करीत सांगायचे, अरे बाबांनो, सारखे मोदीविरोधी निरर्थक बोलत राहू नका. त्या माणसाविषयी व नावाविषयी कुतूहल निर्माण होते आणि तुमचे खोटे उघडे पडले, की सहानुभूती त्याला फ़ायदेशीर ठरू शकते. पण कोणी त्यांचा सल्ला मानला नाही आणि १६ मे २०१४ रोजी निकाल लागल्यावर विरोधकांचे डोळे पांढरे झालेले होते. पण तेव्हा योगेंद्र यादव केजरीवालांच्या करिष्म्याने इतके प्रभावित झालेले होते, की आपली बुद्धी व अभ्यास चुलीत घालून त्यांनी हरयाणातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांचे दुसरे सहकारी कुमार विश्वास अमेठीतून लोकसभा लढवित होते आणि विश्वास यांनी तेव्हा सोशल मीडियातून यादवांना भावी मुख्यमंत्री म्हणूनही घाईघाईने शुभेच्छा देऊन टाकलेल्या होत्या. ते दोघेही मुर्ख नव्हते व नाहीत. पण प्रेमात पडलेल्या माणसांची बुद्धी काम करत नाही. त्याला वास्तवाचे भान रहात नाही आणि जे हवे तेच असल्याच्या भासांनी तो विचार करीनासा होतो. आज पुन्हा लोकसभा निवडणूक दार ठोठावत असताना तीच चुक बहुतेक शहाणे व अभ्यासक नेते करीत आहेत. पर्यायाने नरेंद्र मोदींना दुसर्‍यांदा लोकसभा जिंकण्यासाठी प्रयत्नपुर्वक हातभार लावत आहेत.

दोन वर्षापुर्वीची गोष्ट असेल. तेव्हाही आजच्यासारख्या मतचाचण्या घेऊन विविध राजकीय पर्याय शोधले जात होते आणि मोदींच्या विरोधात राजकीय पक्षांची एकजुट कशी होईल; त्याची चर्चा चालली होती. त्यात अभ्यासक म्हणून सहभागी होताना योगेंद्र यादव अतिशय नेमके मोलाचे मत मांडत होते. त्यांनी विरोधी एकजुट किंवा मतविभागणी टाळण्याच्या असल्या घाईगर्दीच्या उचापतींमागचा धोका स्पष्टपणे मांडला होता. सगळे विरुद्ध नरेंद्र मोदी, ही संकल्पनाच यादवांनी फ़ेटाळून लावलेली होती. किंबहूना अशी चर्चा व प्रयास म्हणजे मोदींचे हात मजबूत करणे असाच सिद्धांत यादवांनी मांडलेला होता. त्यासाठी त्यांनी १९७०-८० च्या दशकातील इंदिरा गांधींच्या विरोधातील एकजुटीच्या प्रयत्नांचा हवाला दिला होता. तो एकजुटीचा प्रयास हाणून पाडताना इंदिराजी म्हणायच्या, ‘वो कहते है, इंदिरा हटाव, मै कहती हू गरिबी हटाव.’ थोडक्यात आपल्याला हटवायला एकत्र येणारे तुम्हाला गरीब ठेवू बघत आहेत आणि सामान्य जनतेच्या विरोधात एकवटत आहेत. असेच चित्र इंदिराजींनी तयार केले होते किंवा आपोआप निर्माण झालेले होते. किंबहूना सततच्या इंदिरा विरोधातल्या टिकाटप्पणीने तशी परिस्थिती निर्माण केली होती आणि आपल्या गतीने टिकेला बगल देऊन काम करणार्‍या इंदिराजींना सहानुभूती मिळाली होती. विरोधकांनी कितीही मतविभागणी टाळली वा युत्या आघाड्या केल्या, तरी इंदिराही प्रचंड बहूमतानेच नव्हेतर दोनतृतियांश बहूमतांनी जिकलेल्या होत्या. ही सहानुभूती इंदिराजींच्या शब्दांनी वा भाषणांनी निर्माण केलेली नव्हती, तर सतत त्यांची हेटाळणी करणार्‍यांच्या गैरवाजवी टिकाटिप्पणीने निर्माण करून दिलेली होती. योगेंद्र यादव दोन वर्षापुर्वी नेमके तेच सांगत होते. पण आज नेमक्या त्याच दिशेने सगळे विरोधक मोदींना संपवण्यासाठी चालले असताना, यादवही त्याय दिंडीत सहभागी झालेले आहेत. याचा अर्थ ते वा शाहीद सिद्दीकी मुर्ख नाहीत. मग ते अशा गोतावळ्यात कशाला फ़सलेले आहेत?

ते दोघे वा त्यांच्यासारखे अनेक बुद्धीमान लोक वा अभ्यासक नेते, कडवे मोदी वा संघ विरोधक आहेत. त्यांना मोदी वा संघाचा पाडाव होताना बघायची अतीव इच्छा आहे. पण ती पुर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत करायची इच्छा अजिबात नाही. तीनचार दशकापुर्वी असेच लोक कॉग्रेस वा इंदिराजींचा करिष्मा संपवायला उतावळे असायचे. पण त्यासाठी लागणारी संघटना उभी करून चिकाटीने विरोधी राजकारण खेळण्याची इच्छाशक्ती त्यांच्यापाशी नव्हती. आजचा भाजपा किंवा सर्वांच्या डोळ्यात भरणारा रा. स्व. संघ त्यापैकीच आहेत. म्हणूनच एका बाजूला संघ वा भाजपा अशा विरोधी एकजुटीमध्ये सहभागी होत असे आणि दुसरीकडे आपले संघटन देशाच्या कानाकोपर्‍यात प्रत्येक राज्यात उभे करण्यासाठीही प्रयत्नशील रहात असे. कॉग्रेसला मागे टाकून देशभर व्यापक संघटन उभे करून लोकसभेमध्ये भाजपाने एकहाती बहूमत मिळवले. त्यामागे ती चिकाटी व मेहनत आहे. सिददीकी वा यादव यांच्याप्रमाणे नुसता आशाळभूतपणा भाजपाला इथवर घेऊन आलेला नाही. यादव किंवा सिद्दीकी तितकेच विसरतात. इंदिराजी वा कॉग्रेस विरोधात विविध पक्ष वा संघटनांनी केलेली एकजुट वा प्रयत्नात भाजपाही होताच. पण इतरांप्रमाणे आळशी न रहाता, आपणच कॉग्रेसची जागा व्यापण्याचाही त्यांचा अखंड प्रयास चाललेला होता. आपल्याला नावडती कॉग्रेस संपवायची तर निवडणूकीपुरते राजकारण मर्यादित असू नये, तर दोन निवडणुकांच्या मधल्या काळातही लोकमत बदलण्यासाठी व बदललेले लोकमत संघटित करण्यासाठी कंबर कसावी लागत असते. भाजपाने तेच केले आणि त्यांना परिणाम मिळाले. उर्वरीत लोक तेव्हा कॉग्रेस व इंदिराजींच्या द्वेष करण्यात रमलेले होते आज त्यांचा रोख मोदी भाजपकडे वळला आहे. पण त्यातून तेव्हा काही निष्पन्न झालेले नसेल, तर आज मोदी विरोधात काय होऊ शकेल?

अशा गठबंधन वा संयुक्त आघाड्यांचा विपरीत परिणाम त्यांनाच भोगावा लागत असतो. तेच तर सिद्दीकी वा यादव डोके ठिकाणावर असताना सांगतात. इंदिराजींना अशा एकजुटीच्या फ़ायद्याची किती खात्री असावी? त्यांनी दोनदा दोनतृतियांश बहूमत मिळवताना आपलाही पक्ष फ़ोडण्याचा जुगार खेळलेला होता. १९६९ सालात कॉग्रेस पक्ष दुभंगला होता आणि तरीही विरोधी एकजुट होऊन इंदिरा गटाला १९७१ साली प्रचंड यश मिळाले. नंतर जनता लाटेत इंदिराजी रायबरेलीतही पराभूत झाल्या होत्या. पण १९८० च्या मध्यावधी लोकसभेपुर्वी त्यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील आगंतुकांना जागा दाखवुन देत पक्षात फ़ुट पाडली. सगळे ज्येष्ठ नेते दुरावले म्हणून इंदिराजी डगमगल्या नाहीत, की आणिबाणीच्या बोजाने त्यांना भयभीत केले नाही. पुन्हा एकदा त्यांना दोनतृतियांश बहूमत मिळाले. त्याचे खरे श्रेय त्यांच्यापेक्षाही जनता पक्ष नावाच्या तात्कालीन गठबंधन राजकारणाच्या चुथड्याला होते. सगळ्यांना इंदिराजी नकोच होत्या. पण त्यांच्याजागी कोण देशाचा पंतप्रधान असावा, याविषयी जे मतभेद होते, त्यातून इंदिराजींचे पारडे जड केलेले होते. नेमकी तशाच इतिहासाची पुनरावृत्ती यंदा होऊ घातली आहे. विरोधातल्या सगळ्य़ांनाच नरेंद्र मोदी नकोत. पण त्यांच्या जागी कोण त्याविषयी एकमत नाही, एकवाक्यता नाही. त्यातून चाललेला सावळागोंधळ मोदींच्या पथ्यावर पडणारा आहे. हेच तर यादव दोन वर्षापुर्वीपासून सांगत आले. पण तीन राज्यात भाजपाने निसटती सत्ता गमावली, तर बुद्धी निकामी होऊन मोदीद्वेषाने यादवांचे प्रेम उफ़ाळून आलेले आहे. आणखी शंभर दिवसातच त्याचे उत्तर मिळाणार आहे. कारण तोपर्यंत गठबंधनाची लक्तरे व चिंध्या वेशीवर टांगल्या जाणार आहेत आणि त्याचा सर्वात मोठा राजकीय लाभ भाजपा वा मोदींनाच मिळणार आहे. त्याचे श्रेय मात्र त्यांचे नसेल, ते महागठबंधनाचा तमाशा मांडणार्‍यांना द्यावे लागेल

1 comment:

  1. Very basic analysis.Honorable Bhau your writing is facts based analysis so it appeals all of us. When l go through your writing l suddenly remember late G.V.Behere former editor of Weekly Sobat .Go on writing .Apparao Kulkarni Latur

    ReplyDelete