Thursday, January 24, 2019

काकाला मिश्या नसल्या तर?

महागठबंधन kureel cartoon के लिए इमेज परिणाम

आत्याबाईला मिश्या असत्या तर तिला काका म्हटले असते, अशी एक उक्ती आपल्या पुर्वजांनी तयार करून ठेवली आहे. पण आजकालचा बुद्धीवाद पोस्टट्रुथ म्हणजे सत्य संपल्यानंतरचा असल्याने सत्ययुगाचा शेवट नव्या विज्ञानवादी बुद्धीवाद्यांनी जाहिर केला आहे. सहाजिकच जे काही समोर येईल ते सत्याच्या मृत्यूनंतरचे सत्य मानावे लागते. त्याच पठडीत सगळे अभ्यास व सिद्धांत येत असतात. परिणामी राजकारण, समाजकारण वा कलाप्रांतासह निवडणूकांचेही अंदाज सत्याच्या पलिकडून येऊ लागल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. प्रियंका गांधी राजकारणात उतरल्याने अनेकांना ते राहुल गांधींचे ब्रम्हास्त्र असल्याचा शोध लागला आहे. तर चाचणीकर्ते नसलेली स्थिती गृहीत धरून अंदाज व्यक्त करण्यापर्यंत अवकाशात झेपावलेले आहेत. याला पोस्टट्रूथ म्हणतात. शुक्रवारच्या अनेक वृत्तपत्रात आदल्या दिवशी विविध वाहिन्यांवर प्रक्षेपित झालेल्या मतचाचण्यांच्या बातम्या आलेल्या आहेत. त्यावर विश्वास ठेवायचा, तर मोदी व भाजपाप्रणित एनडीए आघाडी आगामी लोकसभेत आपले बहूमत गमावणार आहे आणि पुन्हा एकदा लोकसभेत त्रिशंकू स्थिती येऊ घातलेली आहे. ती तशी का व्हावी वा कशामुळे होऊ शकेल, त्याची मिमांसा विश्लेषणात दिली आहे. त्यानुसार बंगालच्या ममता बानर्जी, उत्तरप्रदेशचे अखिलेश व मातावती आणि कॉग्रेसचे राहुल गांधी एकत्र यायला हवे आहेत. हवे आहेत म्हणजे अजून तरी एकत्र आलेले नाहीत, असाच अर्थ होतो ना? मग जे एकत्र आलेले नाहीत, ते एकत्र आल्यास काय होईल, त्यावर केलेले भाकित कितीसे वास्तववादी असू शकेल? निवडणूकीत एकत्र येणे म्हणजे जागावाटप आणि एकमेकांच्या विरोधात उभे न ठाकणे असते. तसे काही होतानाही दिसत नसेल, तर तसे गृहीत धरून एनडीएच्या जागा कमी करून दाखवण्याला काय म्हणायचे? आत्याबाईला मिश्या असत्या तर? की काकाला मिश्या नसल्या तर?

एक साधी गोष्ट घ्या. ज्यांनी एकत्र यावे अशी चाचणीकर्त्याची अपेक्षा नव्हेतर इच्छा आहे, ती माणसे नुसती एकत्र येऊन वा एकाच पंगतीत जेवायला बसून काही साध्य होणार नसते. त्यांनी राजकारण एकत्र करणे व एकदिलाने भाजपाच्या विरोधात उभे ठाकणे आवश्यक असते. ती खुप दुरची गोष्ट आहे. नुसते चहापानाला वा जेवणाच्या पंगतीला तरी ही मंडळी एकत्र बसायला तयार आहेत काय? कालपरवा कोलकाता येथे ममतांनी दिर्घकाळ मेहनत घेऊन आठ लाखाहून अधिक गर्दीची भव्यदिव्य सभा घेतली. त्यासाठी देशभरातील तमाम बिगरभाजपा नेत्यांना अगत्याने आमंत्रित केलेले होते. तिथेही मायावती वा राहुल यांनी हजेरी लावली नाही. आपल्या प्रतिनिधीला धाडले. याचा एक सरळ अर्थ इतकाच निघतो, की त्या दोघांना ममताचे नेतॄत्व किंवा म्होरकेपण मान्य नाही. आपण ते आमंत्रण स्विकारून कोलकात्याला हजेरी लावली, तर ममताचे राजकीय वजन वाढेल. म्हणूनच राहुल मायावती तिकडे फ़िरकल्या नाहीत. बाकी चिल्लर आशाळभूत किती पक्षाचे नेते तिथे गेले, त्याला फ़ारसे महत्व नाही. त्यांना गर्दीसमोर बोलायची हौस फ़ेडून घ्यायची होती. हा ताजा अनुभव आहे. एकाच्या मंचावर दुसरा जायला राजी नाही, असे राहुल ममता व मायावती एकत्रित होऊन जीवाला जीव देत मोदी विरोधात उभे ठाकले तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधायला कुठली मतचाचणी घेण्याची आवश्यकता नाही. कुणा अभ्यासकाचीही गरज नाही. सामान्य बुद्धीच्या कार्यकर्त्यालाही त्याचे उत्तर सापडू शकते. मग अशा गैरलागू गृहितावर चाचण्या करायच्या म्हणजे काही हजार लोकांना तुम्ही कोणता प्रश्न विचारणार? आत्याबाईला मिश्या असतील, तर तिला काय म्हणाल? काकाला मिश्या नसतील तर आत्या म्हणणार काय? असेच प्रश्न विचारायचे आणि उत्तरे शोधायची ना? त्यातले निष्कर्ष कितीसे टिकतील?

सवाल अशा नेत्यांनी एकत्र येण्याचा नसून त्यांनी जीवाला जीव देण्याच्या बांधिलकीने मोदी विरोधात भक्कम फ़ळी उभारली पाहिजे. जशी लालू व नितीश यांनी बिहार विधानसभेच्या वेळी उभी केलेली होती. तेव्हा मोदीलाट कायम होती आणि तिला शह देण्यासाठी नितीशनी आपल्या कुवतीपेक्षा कमी जागा घेऊन लालू व कॉग्रेसला अधिक जागा देण्याचे औदार्य दाखवले होते. ११२ आमदार असताना नितीशनी शंभर जागा घेतल्या आणि लालूंचे २४ आमदार असताना त्यांनाही शंभर जागा दिलेल्या होत्या. कॉग्रेसचे चारपाच आमदार असताना त्यांना ४० जागा दिलेल्या होत्या. तेव्हा खरेखुरे महागठबंधन आकाराला आलेले होते आणि त्यांच्या समोर भाजपाचा पराभव झाला होता. आज तिथे भाजपाने नितीशना ४ खासदार असतानाही १७ जागा देऊ केल्या आहेत. त्यातला समजूतदारपणा निर्णायक असतो. महागठबंधन हा शब्दच मुळात बिहारमधून आला आहे आणि भाजपाच्या तिथल्या पराभवातून आलेला आहे. पण त्यातली एकमुखी भूमिका आजच्या महागठबंधनात कुठेही दिसत नाही. त्यामुळे आगामी कल्पनेतले महागठबंधन हा नुसता शब्द आहे. तो माध्यतल्या पुरोगाम्यांना खुलवणारा व मोदीत्रस्तांना रिझवणारा शब्द आहे. व्यवहारात त्याला कुठेही स्थान नाही. अखिलेश मायावती व ममतांनी राहुलसह एकत्र यावे, ही इच्छा झाली. पण उत्तरप्रदेशात किंवा बंगालमध्ये राहुलना त्यापैकी कोणी सोबत घ्यायला राजी नाही, ही वस्तुस्थिती आहे ना? मग ते एकत्र आले तर ही भाषा येते कुठून? सूर्यावर पाणी असले तर आणि चंद्रावर लाव्हा सापडला तर; वगैरे कविकल्पना असते. मतचाचणी ही कविकल्पना झालेली आहे काय? मतदान यंत्राविषयी बेछूट थापा मारणारा शुजा हुसेन असो, मोदींना पराभूत दाखवणारा कुठला मतचाचणीचा कल्पनविलास असो, त्यात रममाण होणारा एक बुद्धीवादी अभ्यासक वर्ग आपल्याकडे आहे आणि त्याला खुश करण्यासाठी असला खेळ चालत असतो.

एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. भारतात लोकशाही आहे आणि नित्यनेमाने मतदान घेऊन कायदामंडळांची निवड घडवून आणणारा एक स्वयंभू आयोग आहे. त्या प्रक्रीयेतूनच प्रत्येकाला सत्तेपर्यंत जाता येते, किंवा जमिनदोस्त व्हावे लागत असते. सहाजिकच भाजपा वा मोदी यांना कुठला अमरपट्टा मिळालेला नाही, की त्यांनी नुसते उमेदवार उभे करावेत आणि आपोआप ते निवडून येतील. त्यासाठी जनतेत काम करावे लागते, प्रचार करावा लागतो, मतदाराशी संपर्क साधावा लागतो. मतदान असेल तेव्हा त्या मतदाराला तिथवर आणावे लागते, अशी खुप मोठी प्रक्रिया पक्ष म्हणून करावी लागते. त्यात लोकप्रिय नेत्याची भुरळ ही एक सुविधा असते, अधिकार नसतो. म्हणूनच मोदी उभे राहिले वा त्यांनी भाजपाचा प्रचार केला; म्हणून तो पक्ष अजिंक्य होत नाही. किंवा अपप्रचार करून त्या पक्षाला पराभूत करता येणार नाही. चाचण्या घेऊन वा आकडे दाखवून निवडणूकीचे निकाल फ़िरवता येत नाहीत, की गडबडीचे खोटेनाटे आरोप झाले, म्हणून यंत्रात घोळ घालूनही निवडणूका जिंकता येत नाहीत. तिथे आत्याबाईला मिश्या असल्या तर असल्या कल्पनाविलासाचा स्थान नसते. पण माध्यमातील काही म्होरक्यांना मोदींच्या पराभवाची जी दिवास्वप्ने पडत आहेत, त्यातून मग अशा मनोरम कहाण्या उगवत असतात. अन्यथा जे एकमेकांची तोंडे बघायला राजी नाहीत, त्यांना एकत्र करून त्यांच्या बेरजेने भाजपाचे लोकसभेत बहूमत जाणार असल्याच्या आवया कशाला उठवण्यात आल्या असत्या? अजून सेना एनडीएमध्ये असताना तिच्या मतांची वेगळी चाचणी करायची आणि जे सोबतही नाहीत, त्यांच्या बेरजेतून आकडे काढायचे; म्हणजे काकाला मिश्या नाहीत म्हणून आत्या ठरवण्याचाच प्रकार नाही काय? अर्थात मे महिन्याच्या मध्यास मतमोजणी होऊन निकाल लागण्यापर्यंत ही कॉमेडी सर्कस जोरात चालणार आहे. फ़ुकटच्या मनोरंजनाला नकार का द्यावा ना?

7 comments:

  1. भाउ तुमच विश्लेषन खर ठरो.

    ReplyDelete
  2. पण भाऊ...
    तुम्ही त्या चर्चांमध्ये असता तेव्हाच जास्त मजा येते...
    तुम्ही त्यांच्या पायजम्याची नाडी काढुन घेता, आणि ते पायजमा सांभाळण्यात व्यस्त होतात. त्यांची, ती मजा घेण्यासाठी तरी तुम्ही तिथे जा ना..

    ReplyDelete
  3. आता पण उच्चवर्गीय योगीवर नाराज असल्याची आवइ उठवन्यात आलीय.युपी विधानसभेच्या वेळेस पण जाट नाराज आहेत,ते परत चौधरींकडे गेलेत अशीच,तसे पंजाबमधे आम आदमी पक्षाला बहुमत या अफवा मिडीयानेच चाचणी घेउन फैलावल्या होत्या.

    ReplyDelete
  4. श्री भाऊ, तुम्ही बाकीजी काही बिन पाण्यानी करताय त्याला जबाब नाही

    ReplyDelete
  5. आत्याबाईला मिश्या असत्या तर? की काकाला मिश्या नसल्या तर? आणि बाकी चिल्लर आशाळभूत किती पक्षाचे नेते तिथे गेले, त्याला फ़ारसे महत्व नाही. या दोन उदाहरणावरून आपले मराठमोळे बिन मिशाचे काकासुध्दा तिथे होते आणि बोलायची हौस असुनसुध्दा एकुणचं व्यासपीठावर आणि राष्ट्रीय राजकारणाच्या चर्चेतुनसुध्दा किती दुर्लक्षित होते...केविलवाणा मास्टरस्ट्रोकचं की हा‌सुध्दा

    ReplyDelete
  6. भाऊ
    इपीएस९५ सेवा निव्रत्त ६०लाख कर्मचारी दरमहा हजार रूपयांदरम्यान पेन्शन वर जगत आहेत.त्यांच्या बाबतीत सरकार संवेदनाहीन का? राजकीय द्रुष्टीने विचार केला तरी त्यांची सरासरी ३कोटी नक्की असतीलच.

    ReplyDelete
  7. जर युपी मध्ये अखिलेश आणि मायावती यांनी काँग्रेसला सामावून घेतले तर भाजपचा पराभव होईल परंतु सपा बसपा संपून जातील हे त्यांना समजत असावे म्हणून त्यांनी काँग्रेसला बाहेर ठेवले आहे. आणि आता प्रियांका च्या मूळे काँग्रेस शिवपाल यादव बरोबर आघाडी करेल आणि यामुळे ती आघाडी साधारण 20% च्या आसपास मते मिळविल मात्र यात मते तुटतील ती सपा बसपा ची त्यामुळे त्यांची टक्केवारी 35% च्या आसपास असेल भाजप 38% च्या आसपास किमान मते मिळविल आणि युपी परत स्वीप करेल असा माझा अंदाज आहे.

    ReplyDelete