Monday, March 11, 2019

मोदींचा ‘पायलट प्रोजेक्ट’

balakote attack images के लिए इमेज परिणाम

भारताने हवाई हल्ला थेट पाक भूमीत करून पाकिस्तानची जी तारांबळ उडवली, त्याचे कोडे अनेकांना उलगडलेले नाही. असे अतिशहाणे मोदींना हिणवायला बालाकोट येथील हल्ल्यात किती जिहादी मारले गेले, असा प्रश्न थिल्लर भाषेत विचारत असतात. कारण त्यांना आपल्या गल्लीपलिकडले राजकारण ठाऊक नसते की कळत नाही. आसपास वा जगात काय चालले आहे, त्याची चाहुल असेल, तर बालाकोटच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान इतक्या गयावया कशाला करतो आहे, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकतो. किंबहूना आजवर गुर्मीत अण्वस्त्रांच्या धमक्या देणारा पाकिस्तान इतका गर्भगळित कशाला झाला आहे, त्याचे उत्तर मागायचीही गरज उरणार नाही. त्याचे उत्तर भौगोलिक राजकारणात लपलेले आहे. इथे भारतातून पाकला धडा शिकवण्याची भाषा चालू असताना इराणचा लष्करी नेता पाकिस्तानला कोणत्या शब्दात धमक्या देतो आहे? तेही बघावे लागते. तुम्ही जिहादी दहशतवादाला पाठीशी घालताना कुठला शेजारी मित्र म्हणून शिल्लक उरलाय, असा सवाल इराणचे जनरल कासिम सुलेमानी विचारतात. तेव्हा तोच संदर्भ लक्षात घेऊन इमरान खानची वक्तव्ये तपासण्याची गरज असते. पण लहानसहान पक्षांना सोबत घेऊन मतविभागणी टाळण्याचीच रणनिती जमवण्यात रमलेल्यांना इराण वा अफ़गाणिस्तान कुठून ठाऊक असायचे? म्हणून मग बालिशपणा चाललेला असतो. पाकिस्तानला प्रथम अमेरिकन कमांडो पथकाने हद्दीत घुसून ओसामाला ठार मारून दाखवले होते. आता भारतीय हवाई दलाने ८० किलोमिटर्स घुसखोरी करून जिहादी छावण्या उध्वस्त केल्या आहेत. त्यात कितीजण मारले गेले याला महत्व नसून, सीमा ओलांडली गेल्याला प्राधान्य आहे. तशीच काहीशी धमकी आताच इराण देतो आहे आणि अफ़गाण गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख रहमतुल्ला नबील यांनी तीच भाषा वापरलेली आहे. म्हणून इमरानला घाम फ़ुटलेला आहे.

आजवर पाकिस्तान सतत अण्वस्त्रांचा बागुलबुवा करत आलेला होता. आपल्यापाशी अणुबॉम्ब आहे आणि कुणा शेजार्‍याने आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत करू नये, अशीच पाकिस्तानची उद्धट भाषा असायची. पण वास्तवात पाकिस्तानपाशी किती बॉम्ब आहेत आणि ते फ़ेकण्याची कुवत तरी पाकपाशी आहे काय? याचीच अनेकांना शंका होती. पण अशा धमक्या वास्तवात आणल्या गेल्या तर, अशी भिती असतेच. म्हणूनच दहापंधरा वर्षे पाक त्याचा बागुलबुवा होत राहिला. पण अशा धमक्या सतत दिल्याने त्यातली मजा संपून जात असते. मागल्या सहासात महिन्यापासून राहुल गांधींनी राफ़ायलच्या बाबतीत इतका गवगवा करून ठेवला आहे, की आजकाल लोक राफ़ायल भ्रष्टाचार म्हटले तरी हसू लागतात. काहीशी तशीच स्थिती पाकिस्तानी अणूबॉम्बच्या बाबतीत होऊन गेली. एके दिवशी अफ़गाणिस्तानच्या तळावरून अमेरिकन कमांडोचे पथक गुपचूप अंधाराचा फ़ायदा घेऊन पाकिस्तानी लष्करी मुख्यालयाच्या नजिक पोहोचले. तिथे दडवून ठेवलेल्या ओसामा बिन लादेनला ठार मारून मृतदेहासहीत निसटले. सेनादलाच्या मुख्यालयाला जाग येईपर्यंत कमांडो तिथून निसटले होते आणि या नामुष्कीचा खुलासा देता देता पाक सेनादलाची अब्रु चव्हाट्यावर आली. अणुबॉम्बच्या धमक्या देणार्‍यांना लष्करी मुख्यालयाचेही संरक्षण करता येत नसल्याचे जगासमोर आले. जनरल मुशर्रफ़ इत्यादींच्या अण्वस्त्रांच्या धमक्या म्हणजे दिवाळीतले फ़टाके असल्याचे जगाला समजले. आता भारताने पाकव्याप्त काश्मिर ओलांडून ८० किलोमिटर्स पाकिस्तानी प्रदेशात हवाई हल्ला केल्याने पाकच्या सामान्य लष्करी दक्षतेविषयी कोणाला भिती उरलेली नाही. तसे नसते, तर इराण अशी धमकी देऊ शकला नसता. कासिम सुलेमानी यांचा पाक सेनाधिकार्‍यांना विचारलेला सवाल म्हणूनच अब्रुला हात घालणारा आहे. काय म्हणाले सुलेमानी?

तुमच्यापाशी अणुबॉम्ब आहे म्हणून बढाया मारता, मग मुठभर जिहादी दहशतवादी टोळ्यांच्या मुसक्या कशाला बांधू शकत नाही? प्रत्येक शेजार्‍याला सतावणार्‍या कृती हे जिहादी करतात आणि तुमच्या भूमीत येऊन लपतात. त्यांना तुमची गुप्तहेरसंस्था आश्रय देते. त्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर इराणला बंदोबस्त करावा लागेल. तो बंदोबस्त पाकिस्तानच्या भूमीत येऊन करावा लागेल. इतक्या टोकाची भूमिका आता इराणी सेनापतींनी घेतलेली आहे. अमेरिकेचे ठिक आहे. त्यांच्यापाशी अत्याधुनीक हत्यारे, साधने व उपकरणे आहेत. त्यांनी पाकिस्तानी सेनेला अंधारात ठेवून ओसामावर कारवाई केली तर समजू शकते. पण भारतासारख्या तुलनेने कमी शस्त्रसज्ज असलेल्या देशानेही पाकिस्तानी भूमीत घुसून यशस्वी हवाई हल्ला केल्याने इतर शेजार्‍यांना धीर आला आहे. या तीन शेजार्‍यांच्या सीमांवर पाकला कायम सेना सज्ज ठेवावी लागत असते. अशा तिन्ही शेजार्‍यांनी एकदम एकजुटीने पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारले; तर पाक सेनाधिकार्‍यांना स्वत:चा जीवही मुठीत धरून पळायला जागा शिल्लक उरणार नाही. बाकी पाक सेना लढण्यासाठी किती लायक आहे, त्याचा नमूना त्यांचाच वैमानिक जसा मारला गेला त्यातून पेश झालेला आहे. जे एफ़-१६ विमान विंग कमांडर अभिनंदन याने पाडले, त्याचा सैनिक जखमी अवस्थेत गावकर्‍यांच्या हाती लागला. तर त्यांनी त्यालाच भारतीय समजून लाथाबुक्क्यांनी ठार मारले गेले. अजून पाकिस्तानला आपल्या ह्या सैनिकाच्या अशा दुर्दैवी मृत्यूची कबुली देणे शक्य झालेले नाही. पण तोच पाकिस्तान नाक मुठीत धरून अभिनंदनला दोन दिवसात भारताच्या हवाली करतो. ही साक्षात शरणागती आहे. पाकिस्तानच्या राजकीय व लष्करी नेतॄत्वाला अशी शरणागती पत्करावी लागली हा मोठा पराक्रम आहे. कारण त्यातून दहशतवादी कारवाया किंवा काश्मिरी नियंत्रण रेषेवरचा गोळीबार थांबलेला नसला, तरी पाकचा दबदबा संपुष्टात आलेला आहे.

भारताने काय कमावले आणि पाकिस्तानने काय गमावले, हे दोन्हीकडल्या फ़ौजांना नेमके कळलेले आहे. सुदैवाने भारताच्या सत्ताधारी नेतॄत्वालाही उमजलेले आहे. म्हणून तर त्याविषयी अधिक काही बोलण्यापेक्षा भारत सरकारने परराष्ट्र व संरक्षण खात्याला पत्रकार परिषदा घेण्यास पुढे केले. आपला राजकीय पराक्रम नरेंद्र मोदी ओळखून असले तरी जाहीरपणे त्याविषयी मौन पाळून आहेत. कारण या ताज्या हल्ल्यात जे काही मिळवले आहे, ते भविष्यातील युद्धातले मोठे भेदक ब्रम्हास्त्र असणार आहे. त्याची आजच जाहिर वाच्यता करून त्या अस्त्राची धार बोथट करणे मुर्खपणाचे असू शकते. म्हणूनच त्याबाबतीत भारत सरकारने पुर्णपणे मौन धारण केलेले आहे. सर्जिकल स्ट्राईक व ताजा हवाई हल्ला, यातून भारताने मिळवलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या सुरक्षेतील सर्वात दुबळी बा्जू आहे. आता पाकिस्तानच्या कुठल्याही धमक्यांना घाबरून जाण्याचे भारताला कारण नाही, हीच ती बाब आहे. पाकिस्तान बोलतो व गर्जतो. पण लढाईची त्याच्यात किंचीतही क्षमता उरलेली नाही. अंगावर गेल्यास पाकसेना आपल्याला शिंगावर घेण्याच्या अवस्थेत उरलेली नाही, याची खातरजमा ताज्या घटनाक्रमाने दिलेली आहे. त्याचीच कबुली म्हणून इमरान वा पाकसेनेने नमते घेतलेले आहे. त्यांची अब्रु झाकण्यासाठी त्यांनाही भारताची मदत हवीच आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतार्त तशीच नामुष्की पाकिस्तानवर आलेली असताना भारताने त्यांचे अधिक वस्त्रहरण करायचे टाळलेले आहे. पण ज्यांना यातले डावपेच कळतात वा चाली ओळखता येतात, त्यांना त्यातली गंमत उमजलेली आहे. म्हणूनच तर अणुबॉम्ब आहे तर उचापतखोरांना लगाम लावून दाखवा म्हणून इराणी सेनापती पाकला खिजवतो आहे आणि अराजकात अजूनही चाचपडणार्‍या अफ़गाणिस्तानचा माजी गुप्तचर प्रमुख पाकला हिणवण्यापर्यंत हिंमत करतो आहे. हे असले काही समजणे राहुल वगैरेंच्या आवाक्यातली गोष्ट नाही.

१९९९ सालात भारताने अणुस्फ़ोट केला आणि पाठोपाठ पाकिस्ताननेही त्याची नक्कल केली. त्यानंतर दोन्ही देशांना अणुसज्ज देश मानले गेलेले आहे. त्यामुळे केव्हाही दोन देशात वितुष्ट आले म्हणजे अणुयुद्धाची भिती वाटू लागायची. पाकिस्तान तर कुठल्याही कारणास्तव अणुबॉम्ब असल्याच्या धमक्याच देत असे. पण अणुबॉम्ब दुरची गोष्ट झाली. पाकिस्तान आज साध्या पारंपारिक युद्धालाही सामोरे जाण्याच्या स्थितीत राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र ते कोणी समजून घेत नव्हता व पाकच्या पोकळ धमक्यांना सगळे वचकून होते. पाक हद्दीत विमाने पाठवून व बॉम्ब टाकून भारतीय हवाई दलाने पाकला खुले आव्हान दिले. त्या आव्हानाचा हवाई हल्ल्याने प्रतिवाद करण्याचेही धाडस पाकिस्तानला झालेले नाही आणि त्यांचाच माजी लष्करशहा अणुबॉम्बची भाषा कामाची नसल्याचे बोलू लागला आहे. याचा अर्थच यानंतर पाकला कोणीही हुलकावणी दाखवू शकतो आणि भारतीय सेना तर मनात आल्यास थेट पाकव्याप्त काश्मिर पादाक्रांत करण्यापर्यंत सहज मजल मारू शकते. किंबहूना बालाकोट त्याचा प्रायोगिक अविष्कार होता. अभिनंदनला माघारी पाठवण्याच्या इमरानखानच्या संसदेतील घोषणेनंतर नरेंद्र मोदींनी एका परिसंवादात केलेले भाष्य तोच इशारा आहे. ‘आधी पायलाट प्रोजेक्ट यशस्वी केला जातो आणि नंतर मुख्य प्रकल्पाचे काम सुरू होते’, असे मोदी गंमत म्हणून बोललेले नाहीत. बालाकोटचा हल्ला आणि नंतर अभिनंदनचे सुखरूप परतणे, ही भविष्याची चाहुल आहे. येत्या काही वर्षात पाकिस्तान समजूतदार वागला नाही. दहशतवादाला आवर घालू शकला नाही; तर पारंपारिक युद्ध पुकारून काश्मिरचा प्रश्न सोडवला जाईल आणि पाकिस्तानही कायमचा निकामी करून टाकला जाईल, असा त्याचा गर्भितार्थ आहे. तो अफ़गाण व इराणी लोकांना कळला. पण मायदेशातील बुद्धीमंत राजकीय शहाण्यांना त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

19 comments:

  1. Very Nice Bhau..! So fortunate to read and understand Iran and Afghan angle for Balakot..!

    ReplyDelete
  2. भाऊ पुढील पाच वर्षांत पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील झालेला दिसतोय. आता शितावरून भाताची परीक्षा झालेली आहे. आता फक्त भात खायचा राहीला आहे.पाकिस्तानचे हाल सध्या अर्धमेल्या जनावरासारखे झालेले आहेत. छत्र्या जनावराने लोकांना भरपुर ञास दिलेला आहे. आता लहान मुलेही त्याला ञास देत आहेत

    ReplyDelete
  3. खुपच छान भाऊ, पण देशातील विविध विरोधकांना हे किती पचेल?

    ReplyDelete
  4. परमाणु या चित्रपटात एक संवाद आहे. "शकसे मन भरा हो तो नाककें नीचे क्या जल रहा है वह भी समझमें नही आता।" त्याप्रमाणे मोदी विरोधाने आंधळ्या झालेल्या विरोधक आणि पुरोगाम्यांची अशीच अवस्था झाली आहे. आपल्या बुडाखाली काय जळतय हेच कळेनासं झालं आहे.

    ReplyDelete
  5. एकदम सही .पत्रकारांना पाकिस्तान येउ देत नाहि तरी मेडिया व कॉंग्रेस समजू शकत नाहि .

    ReplyDelete
  6. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आजून एका पुलवामाची वाट पहायची?कायमचा पाकिस्तानचा प्रश्न निकालात काढावा मोदीने.

    ReplyDelete
    Replies
    1. इथं स्वतःचं नावही लपवायचं आणि गमजा मारायच्या पाकिस्तानला धडा शिकवायच्या! हे बरं आहे!!

      Delete
    2. हे gmail account la आहे ते by default yete. Ani kahi jan nustach naw taktat adnav nahi photo suddha takawa?By the way maze naw AMIT BADAVE.

      Delete
  7. एकदम सही मुल्यमापन

    ReplyDelete
  8. पाक कायम निकामी होणं हाच अंतिम उपाय आहे.

    ReplyDelete
  9. भाऊ मोदींचा पायलट प्रोजेक्ट हा पाकच्या भारतातील राजकीय मित्रांवर असावा,कारण गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना इशरत जहाँ, सोहरबुद्दीन शेख या विषयावरून मोदी आणि गुजरातच्या देशभक्त पोलीस अधिकाऱ्यांनी जो असह्य मानसिक त्रास सहन केला आहे तो ते विसरणे अशक्य आहे, तीच कथा कर्नल प्रसाद पुरोहित या लष्करी अधिकाऱ्याची पण आहे,त्यामुळे सर्जिकल strike असो किंव्हा आत्ताचा एअर strike असो भारतातील पाकप्रेमी विरोधी पक्ष अक्षरशः चवताळून उठले आणि आपण जसे म्हटले आहे तसे मोदींच्या सापळ्यात अलगद अडकले, त्यामुळे 2019 च्या रणधुमाळीत होणारी निवडणूक ही भारत आणि पाकिस्तान अशी मोदी घडवून आणतील आणि काँग्रेस मुक्त भारताचा 2014 मधला त्यांचा पायलट प्रोजेक्ट 2019 मध्ये मोठया प्रमाणात प्रत्यक्षात आणतील

    ReplyDelete
  10. भाऊराव,

    कासीम सुलेमानी ज्याअर्थी सरळ धमकी देताहेत त्याअर्थी मामला अति गंभीर आहे. कासीम सुलेमानी हे इस्लामिक स्टेटच्या नाकी नऊ आणणारे म्हणून प्रसिद्ध आहेत (संदर्भ : पहिला परिच्छेद - https://en.wikipedia.org/wiki/Qasem_Soleimani ). तर त्यांच्या वक्तव्याचं विवेचन करण्याऐवजी भारतीय माध्यमं पुरोगाम्यांच्या आहारी जाऊन बालाकोट हल्ल्यावर प्रश्नचिह्न उपस्थित करताहेत. शेवटी अशांच्या अकलेविषयी बोलावं तितकं कमीच!

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  11. आपल्या देशाचे किती दुर्दैव आहे की या गोष्टी न समजणारे नेते आहेत आणि त्याच बरोबर समजुन सुद्धा राजकीय स्वार्थासाठी न समजल्या सारखे करणारे पण आहेत

    ReplyDelete
  12. एकदम परखड व मुद्देसूद विवेचन!

    ReplyDelete
  13. अत्यंत महत्वपूर्ण माहिती आणि अभ्यासपूर्ण लेख
    परंतु राहुल आणि त्यांचे चेले
    विनाकारन फक्त मोदी विरोधी लोकांना हे समजेल का ????

    ReplyDelete
  14. 108 टक्के बरोबर मूल्यमापन भाऊ...देश मोदींच्या हातात सुरक्षितच आहे.. आणि परत ते पंतप्रधान होण्यासाठी सर्वांना प्रयत्न करायला लागतील... Great bhau..

    ReplyDelete
  15. 1001 टक्के खरे भाऊ
    पण काँग्रेसप्रेमींना हे कधी उमगणार मोदींचा द्वेष कधी जेल यांच्या मनातून

    ReplyDelete