Friday, April 5, 2019

शिमग्यातली सोंगे

sharad pawar kureel cartoon के लिए इमेज परिणाम

ज्या नगरच्या जागेमुळे महाराष्ट्रातील कॉग्रेस राष्ट्रवादीला घरघर लागली, तिथे प्रचारासाठी गेले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक महत्वाचा खुलासा करून टाकला, हे बरे झाले. शिवबांचा आणि फ़ुले, शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुणा लुंग्यासुंग्यांना भीक घालणार नाही; असा इशारा साहेबांनी शेवगावच्या सभेत दिला. असे इशारे फ़क्त साहेबांनाच शोभतात. अर्थात त्यांच्या असल्या वक्तव्यामुळे अनेक भाजपावाले किंवा चड्डीवाले खवळून उठण्याची शक्यता आहे. कारण मागल्या लोकसभा विधानसभा प्रचारात शरद पवारांनीच वारंवार अर्ध्या चड्डीकडे कारभार सोपवणार काय, असा सवाल सातत्याने मतदाराला विचारला होता. पण मतमोजणी संपण्यापुर्वी खुद्द साहेबच अर्ध्या चड्डीकडे कारभार सोपवायला पुढे सरसावलेले होते. त्यांच्या मोजपट्ट्याच खुप वेगवेगळ्या असतात. मतदानापुर्वीची मोजपट्टी मतमोजणी होताना व मोजणी संपल्यावर काही क्षणात बदलून जात असते. मग ऐकणाराच शंकाकुल होतो. मोजपट्टॊ बदलून गेली आहे, की खुद्द साहेबच मुखवटा बदलून नव्या वेशात समोर आलेत? असा संभ्रम निर्माण होत असतो. त्यामुळेच असले इशारे वा वक्तव्ये फ़क्त साहेबांनाच शोभतात. तसे नसते तर त्यांनी पंतप्रधानांना लुंगेसुंगे म्हटले नसते आणि चार वर्षापुर्वी त्याच पंतप्रधानांना बारामतीत आमंत्रित करून सन्मानीत केले नसते. ती साहेबांची श्रीमंती आहे. बाकीचे सगळे भिकारी असतात ना? त्यांना केव्हा भीक घालावी ते महाराष्ट्र साहेबांना विचारून ठरवित असतो. तसे नसते तर असला इशारा देण्याची वेळ कशाला आली असती? साहेबांना बर्‍याच दिवसांनी महाराष्ट्र फ़ुले शाहू आंबेडकरांचा असल्याचे स्मरण झाले, म्हणून इशारा. अन्यथा मध्यंतरी चार वर्षात त्यांना या महात्म्यांचे स्मरणही झालेले नव्हते. आताच स्मरण झाले, कारण गांधी घराण्याला लक्ष्य केले गेल्याने त्यांना हे महात्मे आठवले.

२०१४ च्या लोकसभा विधानसभा निवडणूकात ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले, तेव्हा या जागा महाराष्ट्राच्या बाहेर होत्या काय? मग तेव्हा कुणाला मतदाराने कौल दिलेला होता? की तेव्हाचा भाजपा लुंग्यासुंग्या नव्हता? की महाराष्ट्र शिवबांचा नव्हता? आपण काय बोलतो आहोत याचे भानही हल्ली सुटायला लागल्याचा हा दुष्परिणाम आहे की काय? मागल्या चार दशकात आपला प्रभाव राज्यभर पाडायला पवार अखंड राबत आहेत. पण त्यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्र काबीज करता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र कोणा लुंग्यासुंग्याला भीक घालत नाही, याची नव्याने कसोटी घेण्याचे काही कारण नाही. पुलोद बनवण्यापासून विविध प्रयोग करून थकल्यावर पवारांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी राजीव गांधींना शरण जावे लागले. अलिकडल्या काळात पुन्हा सत्तेत वाटा मिळावा म्हणून सोनियांच्या समोरही शरणागती पत्करावी लागली होती. त्यांनी शिवबांचा महाराष्ट्र अगैरे बोलणे शोभत नाही. किरकोळ मंत्रीपदासाठी कुठलीही शरणागती पत्करणार्‍यांनी स्वबळावर देशाची सत्ता मिळवणार्‍या व महाराष्ट्रात येऊन यांनाच लोळवणार्‍या व्यक्तीचा उल्लेख लुंग्यसुंग्या अशा शब्दात करण्याने पवारांच्याच बुद्धीवर प्रश्नचिन्ह लागत असते. राहिला प्रश्न भीक घालण्याचा वा भीक मागण्याचा. गेल्या पाच वर्षातले राजकारण बघितले, तर आपले बोट पकडून राजकारण शिकलो असे म्हणणारा पंतप्रधान तिथपर्यंत कसा पोहोचला आणि आपल्याला कर्मभूमी महाराष्ट्रात एकदाही बहूमत का मिळू शकलेले नाही, याची फ़िकीर पवारांनी करायला हवी होती. तर आज कसोटीच्या प्रसंगी त्यांना माढा या हक्कच्या जागेवरून माघार घ्यावी लागली नसती. किंबहूना दिड वर्षापुर्वी याच संदर्भातला प्रदीर्घ लेख मी लिहीला होता आणि पवारांना आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन केलेले होते. पण तितकी एक गोष्ट सोडून साहेब इतर बर्‍याच फ़डतूस गोष्टीत कायम व्यग्र असतात.

प्रदिर्घकाळ दिल्लीत राजकारण करून पवाराना महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्या एका राज्यातही नाव घेण्यासारखे अनुयायी मिळवता आले नाहीत. निम्मे आकाराच्या शेजारी गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आरंभ केल्यावर अवघ्या बारा वर्षात मोदी देशाचे पंतप्रधान झाले, कुठलेही गठबंधन वा पाठींब्याच्या भिकेवर त्यांनी आपले पंतप्रधानपद पदरात पाडून घेतलेले नाही. देशभरच्या कोट्यवधी मतदाराची मते मिळवून स्वबळावर बहूमताने ते पद मिळवले आहे. गुजरात सोडून प्रतिकुल असलेल्या उत्तरप्रदेशात वाराणशी येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची हिंमत त्या माणसाने केलेली होती. पवारांना बारामतीच्या बाहेर जाऊन किती मजल मारता आली आहे? पश्चीम महाराष्ट्राच्या वेशीबाहेर औरंगाबाद, विदर्भ, मराठवाडा किंवा कोकणात पवारांनी कधी मुलूखगिरी करून दाखवली आहे काय? बारामती लगतच्या माढ्यापर्यंत त्यांची मजल गेली. चौदा निवडणूका लढवून एकदाही हरलो नाही, असे ठणकावून सांगणार्‍या पवारांना आज माढ्यातूनही लढायची हिंमत राहिलेली नाही. त्यावेळी त्यांना शिवबांचा किंवा फ़ुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कशाला आठवला नव्हता? तो महाराष्ट्र लुंग्यासुंग्यांना भीक घालणार नाही याची ग्वाही देणार्‍या पवारांना, त्याच महाराष्ट्राकडून माढ्याची हमी कशाला घेता आली नाही? की महाराष्ट्रात भीक मागणे हा कुणासाठी राखीव अधिकार असतो? महाराष्ट्राने कोणाला भीक घालावी ते ठरवण्याचा अधिकार साहेबांना जन्मसिद्ध मिळालेला आहे काय? ५५ महिन्यात मोदींनी ९२ विदेश दौरे केल्याचाही हिशोब पवारांनी दिलेला आहे. पण मोदी तिथे गोट्या खेळायला गेले, की क्रिकेट खेळायला गेले; त्याचे विवरण साहेबांनी दिलेले नाही. बहुधा पंतप्रधान परदेशी टाईमपास करायला जातो, अशी साहेबांची राजकीय जाण असावी. अन्यथा त्यांनीही राहुलच्या तालावर असले हिशोब सांगितले नसते. असली भाषणे ऐकून हल्ली साहेबांची कींव वाटायला लागली आहे.

महाराष्ट्र शिवबांचा आहे तितकाच तो फ़ुले शाहू आंबेडकरांही आहे. पण तो आजकाल पवारांचा राहिलेला नाही. पवारांपेक्षाही अन्य कुणा लुंग्यसुंग्यांनाही महाराष्ट्र दाद देऊ लागला आहे. तसे नसते तर पवारांनी दोनदा कॉग्रेस सोडली तरी त्यांच्यापेक्षाही दिल्लीच्या कॉग्रेसश्रेष्ठी असलेल्या सोनिया, राजीव वा इंदिराजी यांनाही महाराष्ट्राने मते दिलेली होती, पण पवारांच्या राजकीय धाडसाला कधी भीक घातली नाही, हा इतिहास आहे. त्यांना ज्या गांधी घराण्याचा त्यात आज पुळका आला आहे, त्याच घराण्याची सून असलेल्या सोनियांच्या परदेशी जन्माचे भांडवल करून वीस वर्षापुर्वी पवारांनी वेगळी चुल मांडली. तेव्हा महाराष्ट्र शिवबांचाच होता ना? मग त्याने पवारांच्या ऐवजी सोनियांच्या कॉग्रेसला कशाला भीक घातली होती? त्याच महाराष्ट्राने साडेचार पाच वर्षापुर्वी मोदी शहांना कशाला मतांची व सत्तेची भीक घातली होती? पवारांनी कधी डोळसपणे या वास्तवाला सामोरे जाण्याची हिंमत तरी केली आहे काय? असल्या शाब्दिक टिवल्याबावल्या करण्यात हयात खर्च झाली आणि वायासुद्धा गेलेली आहे. पण पवारांना आपण कुठे व कसे चुकतो, त्याकडे वळून बघयाला जमलेले नाही. त्यातून त्यांची अशी केविलवा्णी स्थिती झालेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना तरी मतदाराने किती भीक घातली आहे? असती तर त्यांना गुजरातमध्ये स्वतंत्रपणे उमेद्वार उभे करावे लागले नसते आणि इथेही मनसे सारख्या नवख्या पक्षाकडे इतके आशाळभूत नजरेने बघायची नामुष्की आली नसती. बाबासाहेबांच्या नावाने इतरांना इशारे व हवाले देणार्‍या पवारांना त्याच आंबेडकरांचा नातूही आज भीक घालत नाही. यापेक्षा आणखी मोठे दुर्दैव कुठले असू शकते? बोट पकडून पवारांकडून राजकारण शिकलो, असे सांगणार्‍या शिष्याने तोंडात बोट घालायची वेळ आणल्यावर पवारांना कंठ फ़ुटला आहे. निवडणूक प्रचार हा शिमगाच असतो. पण त्यात सोंग म्हणून नाचावे किंवा नाही, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते ना?

21 comments:

  1. Once I met a young autowala in PCMC. He told me that he is supporter of Pawar and worker of Rashtrawadi but he genuinely feels that if Pawar can not go with Modi, he should remain quiet and should not oppose Modi. He thinks that Modi and Fadnavis both are doing good. He is from sports background and he told me that Modi government and Rajyavardhan sing Rathod are doing very good for sports. Sports madhe achche din ale ahet!! He also said "Rafel madhe paise khalle asle tari chalel pan Rafel viman ghetale he mahatvache".. Indians now assume that there will be corruption in big deals but what is more important is that deal happened..

    ReplyDelete
  2. भाऊ झाडाझडती उत्तम झाली आहे. पण तिचा काही उपयोग होईल असे अजुनही वाटते का तुम्हाला ??

    'नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे' हि म्हण आठविली.

    ReplyDelete
  3. सगळं वलय टरा टर फाडलं हो । अतिशय पोटतिडिकीनं लिहिलेला लेख ।

    ReplyDelete
  4. Very true and very very very good thank you for giving true and very good article. I am your fan. Because you are great.

    ReplyDelete
  5. व्वा भाऊ अगदीच बिनासाबणपाणी वस्तऱ्याने भादरून मर्दास लंगोट घातला की !

    ReplyDelete
  6. आई गं ....
    लय मारलाय भाऊ तुम्ही ....

    ReplyDelete
  7. Pawar sahebanchi rajkiya vatchal achuk tipali aahe,Bhaukaka.

    ReplyDelete
  8. Lungesunge nemke modi ki Pawar he maharashtrane anek vela tharwlele ahe. Yancha pawtichi Maharashtrala garaj nahi. Maharashtrala Kay jahagiri samjata kay

    ReplyDelete
  9. " एक तो आप हिरो की मौत मरते हो ।।
    या तब तक जिंदा रेहते हो जब तक आप व्हिलन नही बन जाते ।। "

    ReplyDelete
  10. भाऊ तुमच विश्लेषण अतअति मार्मिक आहे लेख वाचल्यास यांची किती दुर्दैशा झाली भाऊ जुनी मण आहे अति तिथ माती अशी गत झाली

    ReplyDelete
  11. भाऊ
    पवारांनी सर्व प्रकारच्या चळवळी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साम दाम दंड भेद इत्यादी प्रकारच्या क्लुप्त्या वापरुन थेट संपवल्या मग त्या मध्ये शेकाप, रिपब्लिकन, जनता दल, खुद्द त्यात काँग्रेस सुद्धा,
    एक ही काँग्रेस चा पुढारी वाचला नाही मग तो ग्रामपंचायतीचा सदस्य ते खासदार पर्यंत सर्वांना त्यांनी पाडले आहे त्यात पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पतंगराव, अनंतराव ही यादी न संपणारी आहे,
    या पाडापाडीच्या राजकारणामुळे आता ते स्वतःच संपले आहेत,
    खुप दुटप्पी पणाची उदाहरणे देता येतील आणि त्याचा उहापोह सुद्धा भाऊ तुम्ही बऱ्याच दा केला आहे
    काल परवाचे उदाहरण बघा,
    महिलांवरील अन्याय आणि आरक्षण संदर्भात हुल उठवायची आणि तिहेरी तलाक विषय आला की त्यांच्याचच चिरंजीवीनी संसदेत युटर्न मारुन त्या अबलांना १६ व्या शतकात ढकलायचे आणि पुढे म्हणायचे की घटनेला सुद्धा मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही
    पाढा वाचेल तेवढा कमीच आहे,
    फक्त एक उलगडा करा भाऊ, मोदी सरकार ने पवारांना 2 क्रमांकाचा पद्म का दिला असावा

    ReplyDelete
  12. शेवटचा प्रश्न मटा लाही लागू......

    ReplyDelete
  13. श्री भाऊ ह बरिक खर आहे जयललिता, नवीन पटनाईक, लालू यादव ह्याच्या सारख शरद पवारांना कधीही एकहाती सत्ता मिळवता आली नाही असं का ह्यवर एकदा लिहाच

    ReplyDelete
  14. उत्तम आणि थेट भाष्य ... !

    ReplyDelete
  15. जो बारामती वर विसंबला त्याचा कार्यभाग संपला . हे रेल्वेइंजिनाने समजून घेतले पाहिजे.

    ReplyDelete
  16. भाऊ लोकसभा निवडणुका पूर्णपणे संपेपर्यंत आपण रोज किमान तीन ते चार लेख लिहीत जावेत अशी आपल्याला नम्र विनंती आहे कारण आपल्याला कल्पना असेल नसेल माहिती नाही परंतु आपल्या प्रत्येक लेखाला किमान काही लाख वाचक मिळतात एकूणात आपले लेख कोट्यावधि लोकांची मते बनवण्याचे काम करत आहेत महाराष्ट्राची लोकसंख्या दहा कोटी आहे यावरून आपण आपल्या ताकतीचा अंदाज लावा

    ReplyDelete
  17. भाऊ, उत्तम लेख. पवारांबद्दल किमान महाराष्ट्रात तरी सतत कौतुकास्पद आणि चापलुसी करणारे लेख लिहिले जात असतात आणि त्याउलट एखाद्या परखड लेखाची प्रतीक्षा होती, ती आपण पूर्ण केलीत. जसे त्यांच्यात पुष्कळ गुण आहेत तसेच त्यांनी भरपूर चुकीचे राजकारणही केले आहे, आणि त्यांच्या राजकारणाला मर्यादा आहेत. या सगळ्याचा संतुलित ऊहापोह व्हायला हवा, जो कधी महाराष्ट्रात -- किमान पुण्या-मुंबईकडे -- होत नाही. असो.

    मला तर वाटते की पवारांची अलीकडची वागणूक ही वैफल्य आणि जराश्या आत्मशोधाच्या प्रयत्नातून आलेली वाटते. पूर्वी, म्हणजे काँग्रेसच्या राज्यात, ज्या मुद्द्यांवरून कारभार चालला त्यात पवारांना ब्राह्मणविरोधी, जातीयवादी संघटनांना हाताशी धरून राजकारण करणे सोपे गेले. त्या काळात मुख्य विकासाची व्याख्या ही तथाकथित उच्च जातींची गोची करण्यावर आधारित होती. कारण त्या व्यवस्थेत संधी मर्यादित असत आणि आपण संधी मिळवायची तर दुसऱ्या कुणाला डावलले पाहिजे, अशी समजूत होती. पण आता कुण्या जातीचे खच्चीकरण केल्याने आपला विकास आपोआप होत नाही, हे लोकांना कळले आहे. विकासाचा मुद्दा - जो लोकांना पटकन भावतो -- तो मोदींनी उचलून धरला, पण त्यांचे विरोधक अजूनही भाजप म्हणजे मनुवाद आणि ब्राह्मणवाद, असे तुणतुणे वाजवत बसले आहेत, आणि त्याचे प्रत्युत्तर म्हणून हीन दर्जाचे जातीय राजकारण करण्यात मग्न आहेत. गेल्या कित्येक वर्षांमधले भाजपचे नेते बघा, सर्व जातींमधून आलेले दिसतील. आता विचार करा, की अजूनही जर पवार वगैरे मंडळी जातींवर आधारित राजकारण करण्यातून बाहेर येऊ शकत नसतील, तर त्यांना मते मिळणार कशी? पण याचा सारासार विचार ना करता ही मंडळी डोके खाजवत बसली आहेत की मते कशी मिळवायची?

    किंबहुना, पवारांना स्वतंत्रपणे पक्ष स्थापन करून केंद्रात सरकार स्थापता येणे अशक्य आहे हे त्यांनासुद्धा माहीत असेलच की. मग एकाच पर्याय उरतो, तो म्हणजे राष्ट्रीय पक्षाबरोबर युती करणे. मग उरतात दोन पक्ष: भाजपा किंवा काँग्रेस. त्यात विचार करा, पवारांना भाजप का जवळ करेल? भाजपचा जो हिंदुत्वाचा कार्यक्रम आहे त्यात हिंदुत्वाच्या पोटजातींमधल्या भांडणांना स्थान नाही. तेच तर पवारांनी महाराष्ट्रात अजूनही चालवले आहे. मला तर वाटते, की पवारांना भाजपा नको आहे असे म्हणण्यापेक्षा भाजपलाच पवार नको आहेत असेही असू शकते, आणि पडद्याआड ह्या हालचाली झाल्यासुद्धा असतील. भाजपाला सेना चालते कारण त्यांची हिंदुत्वाशी उघड बांधिलकी आहे. मला तर वाटते की पवारांचा भाजपावरचा रोष हा आंबट द्राक्षांचा प्रकार आहे. म्हणूनही असेल, जो कडवटपणा पवारांच्या बोलण्यातून भाजपाबद्द्ल दिसतो तो कधी भाजपाच्या बोलण्यातून पवारांबद्दल दिसत नाही.

    ReplyDelete
  18. first analyze what u hav done in ur life as compared to him ,,, just going through ones lifetime and then making a viewpoint is such an easy job but quiet difficult to live like that ,,well happy that u got a job for increasing ur bank balance by criticizing mr.pawar ,,go on

    ReplyDelete
  19. भाऊ छान मांडणी परंतु
    पवारांच्या विरोधात लिहिले नाही तर वाचील कोण.?
    राजकारण क्षणाक्षणाला बदलत असते.त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. कोणी काही म्हणले तरी पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू आहे हे नाकारता येत नाही. महाराष्ट्र पुरोगामी आहे. येथील लोक जास्त विचारवंत व अभ्यासू आहे. वाहत जात नाही. म्हणून महाराष्ट्र पवारांच्या पाठीशी पूर्णपणे राहिला नाही. इतर राज्या सारखे एखादा मोठा नेता मेल्यावर आत्महत्या या राज्यात होत नाही.
    राजकारण सोडून जरा पवारांच्या योगदानाबद्दल ही लिहावे भाऊ.
    ईश्वर पवार

    ReplyDelete
  20. पवारांचे योगदान आधी होतेच. पण यश पचवणे अधिक अवघड आणि यशानंतर अपयश पचवणे अशक्यच ... हेच दुर्दैवाने पवारांचे झाले. त्याबद्दल वाईटचं वाटते. नाहीतर पवारांसारखा अभ्यासू नेता विरळाच.

    ReplyDelete