Saturday, May 11, 2019

मेरा देश बदल गया है

Image result for mayawati kanshiram statue

मोदीलाट आहे किंवा नाही, ते निकालाच्या दिवशीच दिसून येईल. पण नुसत्या प्रचाराच्या रणधुमाळीने एकेकांची डोकी इतकी फ़िरून गेलीत, की मोदी व भाजपाला खोटे पाडण्यासाठी असे पागल स्वत:लाही खोटे घोषित करण्यापर्यंत पोहोचले आहेत. राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर’ घोषणा इतकी मनावर घेतली, की ‘राहुल गांधी झुठा है’ असे प्रतिज्ञापत्र सुप्रिम कोर्टाला लिहून देण्याचा पराक्रम त्यांनी याच दरम्यान केला. ममता बानर्जी यांनी आपण असभ्य किंवा विकृत असल्याचे स्वत:च ‘आपल्याच तोंडाने’ बोलून दाखवले. अर्थात हल्ली अशा गोष्टी शरद पवार आपल्याच डोळ्यांनी बघत असतात आणि आपल्याच कानानी ऐकत असतात म्हणून बरे. ह्या स्पर्धेत आपण मागे पडलो किंवा काय, म्हणून अचानक मायावती ही पुढे सरसावल्या आणि मोदींना खोटे मागास ठरवण्यासाठी त्यांनी आपणही खोट्याच दलित असल्याचा ठोस पुरावा देऊन टाकलेला आहे. मात्र त्याकडे कुणा बुद्धीमान संपादक वा पत्रकाराला ढुंकून बघायला वेळ मिळालेला नाही. अन्यथा एव्हाना बहनजीच्या त्या विधानावर केवढे काहूर माजले असते? कालपरवाची गोष्ट आहे. मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जबरदस्त हल्ला चढवताना सांगितले, की मोदी बोगस पिछडे आहेत. ते खरोखर मागास पिछडे असते, तर त्यांना पंतप्रधानपदी वा महत्वाच्या पदावर संघाने बसूच दिले नसते. थोडक्यात संघ ज्याला महत्वाच्या पदावर बसावतो, तो पिछडा दलित असूच शकत नाही. हा नवा निकष मायावतींनी सार्वजनिक जीवनात आणलेला आहे. पण तो निकष पेश करताना आपण आपल्याच दलित असण्यावर संशय निर्माण करीत असल्याचे भान बहनजींना उरलेले नव्हते. कारण त्यांचा तोच निकष वा मोजपट्टी मानायची, तर त्यांना प्रथमच १९९६ सालात मुख्यमंत्री पदावर संघाने किंवा भाजपानेच बसवलेले नव्हते का? मग तशा मुख्यमंत्री होऊन बहनजींनी काय सिद्ध केले होते? आपले दलितपण त्यागले होते का?

संघाच्या रचनेत वा कारभारात कुणाही दलिताला स्थान नाही आणि पिछड्याला महत्वाच्या पदाचा मान मिळू शकत नाही. सहाजिकच अशा कोणी दलित पिछडा मोठ्या पदावर संघाने आणुन बसवला, तर आपोआप त्याचे पिछडेपण किंवा दलित असणे अपात्र होऊन जाते. असाच मायावतींचा सिद्धांत आहे ना? मग १९९६ सालात त्याच संघप्रणित भाजपाने मुलायम सिंग सरकार पाडण्यासाठी मायावतींना मुख्यमंत्रीपदी आणून बसवले, तो इतिहास विसरून चालेल काय? त्यावेळी सपा-बसपा अशी आघाडी उत्तरप्रदेशात सत्तेवर होती आणि मुख्यमंत्री झालेल्या मुलायमवर बहनजी अखंड आगपाखड करीत होत्या. त्याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी भाजपाने मायावतींना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे आमिष दाखवले. मनुवादी भाजपाच्या विरुद्ध आयुष्यभर बोललेल्या मान्यवर कांशीराम, यांनीही त्याला मान्यता दिली आणि मुलायम सरकारमधून बसपा बाहेर पडला होता. ४०-५० आमदारांचे पाठबळ असताना बसपाने त्यानंतर सरकार बनवले आणि भाजपाच्या पावणेदोनशे आमदारांनी त्यांना बाहेरून पाठींबा दिलेला होता. त्यातून मोठे राजकीय वादळ उठले होते. तथाकथित पुरोगामी विचारवंत पत्रकारांनी कांशीराम यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप केलेला होता व तसे प्रश्नही फ़ेकले होते. आजचे महान पॅनेलिस्ट व आम आदमी पक्षाचे माजीनेते आशुतोष तेव्हा ‘आजतक’च्या पाळण्यात लोळत अंगठा चोखत पत्रकारितेचे बाळकडू पित होते. त्यांनीही तोच प्रश्न कांशीराम यांना बेधडक विचारला. परिणामी त्यांच्या कानपाळ्या गरम झाल्या होत्या. कारण मान्यवरांनी आशुतोष यांच्या श्रीमुखात भडकावलेली होती. गाल चोळत आशुतोष पुढले धडे शिकत गिरवत पत्रकार झाले आणि मायावती संघाच्या आशीर्वादाने प्रथमच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. मग प्रश्न पडतो, की ते पद मिळवण्यासाठी बहनजींनी आपले दलितपण त्यागलेले होते काय?

आज मायावतींचा मोदी-संघ विषयक निकष मान्य करायचा, तर तेव्हाच मायावती दलित राहिलेल्या नव्हत्या. किंवा त्यांनी संघाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपद भोगूनही त्या दलित राहू शकत असतील, तर नरेंद्र मोदी पिछडे कशाला नसतील? कोणीतरी मायावतींना हा प्रश्न विचारला पाहिजे. कदाचित आपले गुरू कांशीराम यांच्याप्रमाणे बहनजीही कानशील गरम करण्याचा धोका असल्याने कोणाची तितकी हिंमत झालेली नसावी. पण म्हणून इतिहासाचा घटनाक्रम बदलत नसतो. मायावतींना आपल्या आजही दलित असण्याचा पुरावा दिला पाहिजे. किंवा मोदी संघाच्या आशीर्वादानेच पंतप्रधान झाले, तरीही मागास वर्गाचे असल्याचे मान्य करायला हवे. असे प्रश्न विचारू धजेल तोच पत्रकार असतो. निदान असे प्रश्न विचारता आले नाहीत, तर वाचक श्रोत्यांसमोर मांडावेत, याचे भान पत्रकाराला असायला हवे ना? पण प्रत्येकाने बहनजी मायावती यांच्या संघविषयक निकषाला ठळक प्रसिद्धी दिली, तरी मायावतीनी संघाचा घेतलेला आशीर्वाद जगासमोर मांडण्याची हिंमत केलेली नाही. याला म्हणतात अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी. ती कोणा मोदी सरकारने केलेली नसून खुद्द पत्रकार व माध्यमांनीच आपापला गळा आवळून घेतलेला आहे. त्यातून पुरोगाम्यांच्या पाखंडाला प्रश्न विचारणारा शब्दही उच्चारला जाणार नाही, याची पुरेपुर खातरजमा करून घेण्यात आलेली आहे. अन्यथा मायावतींचा असला भंपकपणा असा राजरोस खपून गेला नसता. किंवा पाच वर्षे काय केले ते सांगा, असे आव्हान देणार्‍या प्रियंका गांधींनाही मागली पाच वर्षे त्या काय करीत होत्या, असाही प्रश्न विचारला गेलाच असता. पण असले प्रश्न विचारण्यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत गमावून बसलेल्यांना अविष्कार स्वातंत्र्य हवे असते. हा आजकाल विनोद होऊन बसला आहे. .कोणीही उठावे आणि खुळ्यासारखे काहीही बरळावे, त्याला ब्रेकिंगन्युज म्हणून दाखवण्यात पत्रकारिता होरपळून गेली आहे.

एकूणच पुरोगामीत्व किंवा दलितांचे पिछड्यांचे लढे चळवळी किती भरकटल्या आहेत, त्याचा हा नमूना आहे. उदितराज नावा़चे भाजपाचे खासदार होते. त्यांचाही छोटा पक्ष होता. तो भाजपात विसर्जित करून त्यांनी पाच वर्षापुर्वी दिल्लीतून खासदारकी पदरात पाडून घेतली. ती उपभोगताना त्यांची कुठलीही घुसमट झालेली नव्हती. पण यावेळी त्यांच्या जागी भाजपाने दुसर्‍याच उमेदवाराला तिकीट दिल्यावर त्यांना भाजपा व संघाचा घनिष्ट संबंध असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी भाजपा सोडला आणि दलितोद्धारक राहुल गांधी यांचा आशीर्वाद घेत कॉग्रेस प्रवेश केलेला आहे. तेव्हा त्यांना मागल्या पाच वर्षात भाजपाने दलितांना गैरवागणूक दिल्याचेही दिसू लागलेले आहे. मात्र आधीच्या पाच वर्षात त्यांना कसली ग्लानी आलेली होती? ते त्यांनाही आठवत नाही. उत्तरप्रदेशात सावित्रीबाई फ़ुले नावाच्या अशाच भाजपा खासदार पक्षाला रामराम ठोकून कॉग्रेसमध्ये दाखल झाल्या. बहनजीपासून या प्रत्येकाच्या बाबतीत एक गोष्ट साफ़ आहे. जोपर्यंत त्यांना भाजपा व संघाकडून सर्वप्रकारचे लाभ मिळत होते, तेव्हा त्यांना तिथला मनुवाद दिसत नव्हता, की बोचत नव्हता. मात्र त्यांच्याकडून पद काढून घेतले गेल्यावर त्यांना मनुवाद किंवा संघातले जातीयवाद जाणवू लागतात. मोदींची पाच वर्षे उलटून जाण्यापर्यंत त्यांना मोदी आगडे की पिछडे, त्याचा प्रश्न सुचत नाही. विचारण्याची गरज वाटत नाही. प्रियंका पाच वर्षे नागरिकांना वार्‍यावर सोडून आपल्या पतिदेवांच्या भानगडी निस्तरण्यात व्यतित करतात आणि मतदानाचे दिवस जवळ आल्यावर सभेत बोलू लागतात. रोडशो करून न्याय कधी मिळणार, असे सवाल विचारू लागतात. पण यापैकी कोणालाही मधली पा़च वर्षे कुठे काय करीत होतात, असला प्रश्न विचारण्याची हिंमत गमावून बसलेल्यांना जगात पत्रकार म्हणून ओळखले जाते. खरेच, देश कितना बदल गया है?

8 comments:

  1. श्री भाऊ असले प्रश्न विचारण्याची हिंमत लागते ती तर हे केव्हाच गमावून बसलेत

    ReplyDelete
  2. Parkhad likhan. Tumchya sarkhe patrakar phar kami aahet. Tunche lekh wachne ha ek aanand aahe. Asech lihit rahawe hi vinanti.

    ReplyDelete
  3. 👍👍👍👍👍👍👍
    जबरदस्त

    ReplyDelete
  4. तेवीस मे दोन हजार एकोणीसला प्रियांका गांधी आणि त्यांची पिल्लावळ हे सगळे बडबडणारे जे गायब होतील ते पुन्हा दोन हजार चोवीसलाच दिसतील....अशा गायब होणार्‍या " मिस्टर इंडिया " ना कोणी ही गंभीरतेनं घेत नाही , हे त्यांना समजेल तो सुदिन.

    ReplyDelete
  5. https://youtu.be/SZsoNFD6XbM

    ReplyDelete
  6. तुम्ही लेखातून नेत्यांना स्वच्छ आरसे दाखवू पाहत आहात पण आपले चहरे किती कुरूप आहेत हे दाखवणारे आरसे या नेत्यांना वापरायचे नाहीत.सगळ्यांची थोबाडे थेट धर्मेंद्र-हेमामालिनीसारखी दिसायला हवीत!

    ReplyDelete
  7. 23 मे नंतर सर्व विदूषक तसेच राहतील.

    ReplyDelete