Monday, May 20, 2019

दादांचे डोळे बंद आहेत?

Image result for pawar votes

आता लोकसभा निवडणूक संपत आलेली आहे. सातवी मतदानाची फ़ेरी संपेल आणि मग फ़क्त मतमोजणीच उरलेली असेल. अशावेळी अकस्मात ज्येष्ठ नेता शरद पवार यांनी मतदान यंत्रावर शंका व्यक्त करणारी भाषा करण्याने अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. कारण स्वाभाविक आहे. आधी त्यांनी बारामती भाजपाने जिंकली तर लोकांचा निवडणूकीवरचा विश्वास उडून जाईल, अशी भाषा केली होती आणि नंतर लागोलाग यंत्रावर शंका घेतली. आपण प्रत्यक्ष बघितल्याची भाषा त्यांच्या ज्येष्ठतेला शोभणारी नाही. किंबहूना अजितदादांचा काका म्हणून शोभणारी नाही, असे म्हणावे लागेल. कारण काकांच्या असल्या उथळ विधानानंतर दादांनी अतिशय समतोल मतप्रदर्शन करून सर्वांनाच धक्का दिलेला आहे. सहसा अजितदादा इतक्या समतोल भूमिकेसाठी ख्यातनाम नाहीत. पण अलिकडल्या काही दिवसात दादा खुपच समतोल व संयमी मतप्रदर्शन करू लागले आहेत. म्हणूनच काकांची चिंता करण्याची वेळ आली म्हणावे लागेल. वास्तविक आताच दादांनीही त्याच विषयावर आणि काकांच्या भूमिकेवर शंका घेणारे विधान करायची गरज होती काय? आणि असे एकदाच झालेले नाही. बारामतीच्या जाहिर सभेत कोणी मुलगी अत्यंत बेताल बोलत असताना काकांनी तिला रोखले नाही, असेही तिथेच खुलेआम मतप्रदर्शन करून दादांनी काकांना राजकीय शह दिला होता. हा लागोपाठचा दुसरा वार आहे. म्हणून हा निव्वळ प्रासंगिक विवाद आहे, की पवार घराण्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची शर्यत सुरू झाली आहे, अशी शंका घ्यावी लागते. बारामतीच्या मंचावर तिथे दादांनी तशी नाराजी व्यक्त करणे आणि आता काकांच्या ‘प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यावर’ अविश्वास दाखवणे भविष्यातील वादळाची सुचना असावी काय? आजवर इतरांच्या पुतण्यांना माडीवर काका खेळवत बसले, म्हणून हा घरातला पुतण्या चवताळला आहे काय?

काकांनी मतदान यंत्रावर शंका घेतली असताना तीच पक्षाची भूमिका असते. एवढेही अजितदादांना समजत नाही असे कोणी म्हणू शकेल काय? कारण काका शरद पवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष संस्थापक आहेत. एकदा त्यांनी ठराविक भूमिका जाहिरपणे मांडली, मग तिला छेद देणारे मतप्रदर्शन हा पक्षशिस्तीचा भंग होऊ शकतो, हे दादांना कळले नाही काय? तितके अजितदादा राजकारणात किंवा पक्षामध्ये नवखे आहेत काय? पण तरीही दादांनी दोनदा अल्पावधीतच काकांशी जाहिरपणे मतभेद व्यक्त केले आहेत. त्यावर चकार शब्द बोलण्याची हिंमत पक्षाध्यक्ष काका करू शकलेले नाहीत. कारणही स्पष्ट आहे, अजितदादा अतिशय संयमी व योग्य भूमिका मांडत आहेत आणि आपण त्यांच्या मतप्रदर्शनाचा प्रतिवाद केल्यास अधिकच हास्यास्पद होऊन जाऊ, ही बाब काकांच्या लक्षात आलेली आहे, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी काकांची अवस्था झालेली आहे. इतरांच्या पुतण्यांना चिथावण्या देऊन बंडाला प्रवृत्त करणार्‍या काकांना, आता आपल्याच पुतण्याचे आव्हान घरातच उभे रहाताना जाणवले आहे काय? गोपिनाथ मुंडे असोत किंवा बाळासाहेब ठाकरे असोत, त्यांच्या पुतण्यांना राजकीय व्यवहारात काकांच्या विरोधात चिथवण्या देण्याचे राजकारण शरद पवारच खेळले. हे अवघ्या जगाला ठाऊक आहे. कारण सगळ्या जगाने ह्या घटना ‘स्वत:च्या डोळ्यांनी’ घडताना बघितल्या आहेत. त्याचा खुद्द पवारही इन्कार करू शकत नाहीत. त्यातून हा घरातला बेबनाव सुरू झालेला आहे काय? कारण इतरांच्या पुतण्यांना मोठे करताना काका आपल्याच पुतण्याला पुरता वार्‍यावर सोडायला निघालेले आहेत काय? तशा शंकेने घरातल्या पुतण्याला जाग आलेली आहे काय? नसेल तर ऐन मोक्याच्या क्षणी व महत्वाची निर्णायक निवडणूक रंगात आलेली असताना, हा बारामतीचा पुतण्या काकांच्या भूमिकेला कशाला शह देऊ लागला आहे?

जेव्हा देशाला सतराव्या लोकसभा निवडणूकीचे वेध लागले, तेव्हा पवारांनी आपण माढ्यातून उभे रहाणार असल्याची गर्जना करून टाकलेली होती. त्यातून झालेले सगळे राजकारण लोकांनी आपल्या डोळ्यांनी बघितलेले आहे. त्याचा सगळा तपशील इथे देण्याची गरज नाही. पण त्यातला एक घरगुती तपशील लोक विसरून गेले असतील, म्हणून आठवण करून देणे भाग आहे. आपल्या घरात मुले नातवंडे असताना मी इतरांच्या मुलांचे लाडकौतुक कशाला करत बसू? असा सवाल पवारांनी तेव्हा नगरच्या जागेवरून पत्रकारांना केलेला होता. त्याचा संदर्भ पवार विखे वितुष्टाशी संबंधित होता. दिर्घकाळ पश्चीम महाराष्ट्रातील ही दोन मातब्बर कॉग्रेस घराणी एकमेकांशी वैर जोपासत राहिलेली होती. त्यातले बाळसाहेब विखे पाटील निवर्तले आहेत आणि त्यांच्याच नातवाला लोकसभेची निवडणूक लढवायची होती. त्यांची पारंपारिक लोकसभेची जागा राखीव झालेली असून, आघाडीच्य वाटपात कॉग्रेसकडे गेलेली आहे. पण राखीव असल्याने तिथून विखेनातू ती लढवू शकत नाही. म्हणून त्याच जिल्ह्यातील नगरची जागा लढवण्याची त्या नातवाने तयारी केलेली होती. जिल्ह्यातील दोन्ही जागा बदलून घ्याव्या, असा विखेंचा आग्रह होता. म्हणजे नगर कॉग्रेसला देऊन शिर्डी राष्ट्रवादी कॉग्रेसने घ्यावी, अस सौदा करायचा होता. पण पवारांनी त्याला साफ़ नकार दिला आणि विखे नातवाला भाजपाच्या आश्रयाला जावे लागले. ती जागा नाकारताना पवार काय म्हणाले होते? घरातल्या मुलांचे कौतुक सोडून इतरांच्या मुलांचे लाड कशाला करू? तिथून मग घरातला वादही रंगला. घरातला नातू अर्थात अजितदादांचा सुप्रुत्र पार्थ घरातल्या श्रीकृष्णालाच गीता सांगायला सरसावला आणि हे बारामतीचे महाभारत रंगत गेलेले आहे. अखेरीस पुतण्याच्या मुलासाठी काकांना माढ्याची जागा सोडावी लागली आणि मावळात नातवाला उभे करण्यास मंजुरी द्यावी लागली. पण म्हणून पुतण्याचा संशय कमी झाला असेल काय?

दादांचा सुपुत्र मावळातून लोकसभा लढवतो आहे आणि तिथे कुठलीही यंत्रातील गडबड झाली नसल्याचा विश्वास दादांनी व्यक्त केला आहे. आपला मुद्दा पटवण्यासाठी त्यांनी भाजपाच्या राजस्थान व मध्यप्रदेशातील पराभवाचा हवाला दिलेला आहे. याचा अर्थच काकांच्या एकूण मताशी नुसती असहमती त्यांनी व्यक्त केलेली नाही, तर अशा शंका घेण्य़ावरच प्रश्नचिन्ह लावलेले आहे. हा आत्मविश्वास नुसता मावळपुरता आहे, की बारामतीच्याही बाबतीत आहे? कारण मावळात पार्थ जिंकला आणि बारामती हातची गेली तर काकांना बोलायला जागा शिल्लक राहिलेली नाही. मावळात राष्ट्रवादी किंवा काकांचा पक्ष जिंकत असेल, तर बारामतीच्या मतदान यंत्रावर शंका घेण्याचे कारण उरत नाही. की बारामती गमावल्याची खात्री दादांना आहे? कारण तेच त्यांचे खरे कार्यक्षेत्र असून त्यांनाच बहिणीला संपवायचे आहे? मावळ द्या आणि बारामती घ्या, असा सौदा पुतण्याने भाजपाशी केलेला असेल काय? अशी सौदेबाजी करण्यात आजवर काका बिलंदर म्हणून प्रसिद्ध होते. पाठीवर थाप मारून कोणाला पाठींबा देऊन त्यांनी आपल्या बालेकिल्ल्यातच अनेकांना संपवलेले आहे. त्यांची गुरूची विद्या त्यांनाच गुरूदक्षिणा म्हणून देणारा सौदा पुतण्याने या लोकसभेत भाजपाशी केलेला आहे काय? अन्यथा मोक्याच्या क्षणी काकांशी दगाफ़टका करण्याची जुनी रणनिती इथे कशाला दिसून येते आहे? हेच राज ठाकरे यांच्याही बाबतीत झाले होते आणि धनंजय मुंडेंच्याही बाबतीत घडलेले आहे. पुतण्यांशी सौदे करणारे काका, यावेळी आपल्याच डावपेचांची शिकार झालेले आहेत काय? अन्यथा थोरल्या पवारांनी मतदानापुर्वी व नंतरची धावपळ अनाकलनीय आहे. जितके काकांचे बोलणे अनाकलनीय होत चालले आहे, तितकीच अजितदादाची स्वयंभू राजकारणी भूमिका व मतेही आजवरच्या पठडीतून बाहेर पडणारी भासू लागली आहेत. कुछ तो गडबड है भय्या!

शरद पवारांचे दिर्घकालीन राजकारण अनेक लहानमोठ्या सुभेदारांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच शह देण्याचे राहिले आहे. कुठे घरात तर कुठे गोटात आपले हस्तक उभे करून पवारांनी आजवर अनेक राजकीय दिग्गज विकलांग करून टाकलेले आहेत. इथे आपला पाठींबा द्यायचा आणि परस्पर विरोधकांनी संगनमत करून त्यांनी कित्येक नेत्यांना जमिनदोस्त करून टाकलेले होते. त्यांच्या असल्या खेळातली कुटीलता चतुराई वा धुर्तपणा म्हणून गौरविला जात राहिला. आता तेच पेरलेले खुद्द बारामतीच्या मातीत उगवू लागलेले आहे काय? कारण अजितदादांच्या स्वतंत्र भूमिका वा विधानांचे संदर्भ अजिबात जुळणारे नाहीत. काकांच्या शेपटीला धरून आजवर राजकारण केलेले अजितदादा आता स्वतंत्रपणे राजकीय सौदे करू लागलेले असावेत काय? कारण त्यांना बारामतीविषयी आत्मविश्वास नाही, इतका मावळात आपला सुपुत्र जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास धक्कादायक आहे. एका बाजूला काकांचा आपल्या डोळ्यावर विश्वास वाढलेला असून, मतदार पाठीराख्यांवरचा विश्वास उडालेला आहे. अन्यथा त्यांनी यंत्राविषयी शंका घेतल्या नसत्या, किंवा बारामती गमावण्याचा धोका व्यक्त केला नसता. दुसरीकडे नवा मतदारसंघ असतानाही दादांनी आपल्या सुपुत्राच्या विजयाची अशी छातीठोक हमी कशाला दिली असती? दादांचे बालेकिल्ले असलेल्या पुणे पिंपरी अशा पालिका हातातून घालवताना झालेले सौदे, आता उलटलेले असावेत काय? बारामतीमध्ये काहीतरी मोठी उलथापालथ होऊ घातली आहे. लोकसभा विसरून काका आता दुसर्‍या नातवाला अकोले जामखेड विधानसभेला लढवण्यासाठी कामाला लागलेले आहेत. आजवरच्या धुर्त राजकारणात गाडली गेलेली भुते फ़ेर धरून नाचू लागलेली आहेत काय? कारण काका स्वत:च्या डोळ्यांनी अनेक गोष्टी बघू लागलेले असताना, पुतण्य़ाही आपल्या डोक्याने स्वतंत्र विचार भूमिकाही मांडू लागला आहे. २३ मे ची संध्याकाळ कशी असेल?


10 comments:

  1. 👍👍👌👌👍👍👌👌👍👍👌👌

    ReplyDelete
  2. भाऊ, दादांच्या प्रतिक्रियेवर तुम्ही केलेले सटीक विश्लेषण पटले, तुम्ही या मागचा अर्थ समजावून सांगितला व पटले सर्व काही. या मागचे आजूनकाही अर्थ 23 तारखेनंतर निघणार आहेत त्या दिवसाची वाट पाहणे आले.

    ReplyDelete
  3. बेहद्द सुंदर ...!

    ReplyDelete
  4. भाऊ मी तुमचे खूप लेख वाचले आहेत आणि तुमची अभ्यासपूर्ण भाकिते खरी ठरताना मी याची देही याची डोळा पाहिले आहे.
    खरचं २३ मे च्या पोटात काहीतरी उलथापालथ होणार हे नक्की...

    ReplyDelete
  5. मोदी हिमालयात गेले म्हणून साहेब चक्क ईफ्तार पार्टीला टोपी, गमछा घालून भाषण देतायत?
    ही कसली स्पर्धा?
    साहेबांच मानसीक संतुलन नक्की ढासळलय।

    ReplyDelete
  6. पिंपरी चिंचवडसारख्या शहरी भागात भाजपाने हरायचे ठरवले तरी लोकांनी मोदींना मते दिली आहेत त्यामुळे इच्छा असो वा नसो, पक्ष वेगळा असला तरी बारणे जिंकणार. शिवसेना भाजपाशी लोकांना काहीच घेणेदेणे नाही. मते मोदींच्या नावे असतात.

    ReplyDelete
  7. करावे तसे भरावे...." काका मला वाचवा " च्या ऐवजी " पुतण्या मला वाचव " असा टाहो ऐकायला मिळाल्यास नवल वाटू नये...
    भाउ , तुम्ही २०१९च्या रणधुमाळीतला हा धागा अचूक पकडला आहे. तुमच्या तीक्ष्ण नजरेला त्रिवार वंदन !

    ReplyDelete
  8. आता आणखी काय होणार भाऊ ?मोदी सरकार स्पष्ट बहुमत घेउन येणार हे एक्सिट पोलनी केव्हाच स्पष्ट केलंय.

    ReplyDelete
  9. आजवर केलेले पवारांचेच राजकारण पवारांवर उलटणार आहे कारण नियती पुढे कोणाचे काही चालत नाही मग ते
    पवार तरी कोण

    ReplyDelete
  10. सत्ते साठी सर्व काही हे दादांचे समिकर आहे. विधानसभे साठी भाजप चे नवीन सहकारी झाले तरी नवल नको

    ReplyDelete