Wednesday, May 29, 2019

मोदी ३००+ भाकिताचा पुर्वेतिहास

‘इंदिरा ते मोदी: अर्धशतकातला अधांतर के लिए इमेज परिणाम

‘पुन्हा मोदीच का? या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन २६ जानेवारी रोजी पंढरपुरात झालेले होते. एप्रिल उजाडेपर्यंत त्याच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि महाराष्ट्रात मतदान चालू असताना, त्याच्या हिंदी व इंग्रजी आवृत्त्या प्रकाशित झाल्या. सगळ्या माध्यमात अभ्यासक विश्लेषक गठबंधनाची चर्चा करीत असताना, एक मराठी अनुभवी पत्रकार मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा बहूमत मिळवणार, किंवा तीनशेचा पल्ला ओलांडणार असे ठामपणे सांगतो, याविषयी कोणाला कुतूहल तरी वाटायला हवे ना? निदान पत्रकारिता करणार्‍यांना अशा दाव्याची दखल तरी घ्यावी असे वाटायला नको काय? मागल्या खेपेस म्हणजे २०१४ सालातही माझे असेच ‘मोदीच का’ पुस्तक तब्बल सहा महिने आधी प्रकाशित झाले होते. पण माध्यमांना वा पत्रकारांना त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. आताही त्याचीच पुनरावृत्ती झाली. मला त्याचे वैषम्य अजिबात नाही. मागल्या पन्नास वर्षात तसा मुख्यप्रवाहातील माध्यमांनी बहिष्कृत ठेवलेला पत्रकार, अशीच माझी ओळख असल्याने मला त्याची पर्वा नव्हती. अलिकडल्या काळात तथाकथित माध्यमांपेक्षाही सोशल माध्यमे अधिक प्रभावी झाल्याने माझे विचार वा विश्लेषण प्रमुख माध्यमांपेक्षाही अधिक वाचक व प्रेक्षकांपर्यंत जाऊ लागलेले होते. म्हणूनच जेव्हा लोकसभेचे निकाल लागले, किंवा मतमोजणी चालू होती, तेव्हा माझ्यावर अशा वाचकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. तेही स्वाभाविक होते. कारण भारतात बहुधा असे मोदी ३००+ भाकित करणारा मी एक्मेव विश्लेषक होतो. पण माझ्या वाचक श्रोते व चहात्यांनाही माझ्या राजकीय भाकिताविषयी शंका व प्रश्न असणे स्वाभाविक आहे. कारण मी काढलेला तीनशेचा आकडा चाचण्या वा कुठलाही ओपिनियन पोल घेऊन शोधलेला नव्हता. तर घरातच बसून विविध पोल, आजवरचे निवडणूक निकाल यांच्या अभ्यासातून काढलेला तो निष्कर्ष होता. तो अभ्यास म्हणजे काय? ते समजून घ्यायचे असेल, तर याच काळात प्रकाशित झालेले माझे दुसरे पुस्तक चिकित्सकांनी वाचले पाहिजे. कदाचित अनेकांनी ते वाचलेलेही असेल. त्यांना माझ्या भाकिताचे नक्कीच नवल वाटणार नाही.

१९ सप्टेंबर २०१८ रोजी ठाण्याच्या एका समारंभात बोलताना मी प्रथम मोदी ३००+ हे भाकित केले होते आणि दिलीप महाजन यांच्या आग्रहास्तव पुढल्या कालखंडात त्यावर पुस्तक लिहून काढले. त्याच्या प्रकाशनानंतर दुसरे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी काही शंका काढल्या व प्रश्न विचारून मला त्याचेही खुलासेवार लेखन करावे असा आग्रह धरला. त्यातून मार्च महिन्यात दुसरे पुस्तक आकाराला आले. ‘इंदिरा ते मोदी: अर्धशतकातला अधांतर’ असे त्या पुस्तकाचे नाव आहे. ज्यांना राजकारणाचे मुद्दे व अभ्यास करण्यात रस आहे, त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. मोदींना बहूमत वा नंतर तीनशे जागा मिळू शकण्याचे भाकित मी कुठल्या अभ्यासाच्या आधारे करू शकलो, असा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांच्यासाठी नेहरूंच्या निधनापासून मोदींच्या पंतप्रधान म्हणून उदयापर्यंतचा भारतीय राजकीय इतिहास संगतवार समजून घेणे जरूरीचे आहे. या अर्धशतकातील घटनाक्रमाची संगतवार आशयासह मांडणी समजून घेतली, तर कुठल्याही चाचणीशिवाय मोदी ३००+ जागा कशा जिंकू शकतात, त्याचे रहस्य शिल्लक उरत नाही. हा आकडा काढण्यासाठी कुठल्या चाचणी वा दिव्यदृष्टीची अजिबात गरज नव्हती. १९६४ ते २०१४ या कालखंडातील राजकारण कसकसे सरकत वा बदलत गेले, ते समजून घेतले तरी २३ मे रोजी मोदी इतके यश का मिळवू शकले, त्याचे उत्तर कोणीही सामान्य नागरिकही काढू शकतो. त्यासाठी भाऊ तोरसेकरची गरज नाही, किंवा विश्लेषणाची गरज उरत नाही. भारतातले राजकीय पक्ष, त्यांची कार्यशैली, त्यांची पात्रता किंवा मुर्खपणा, यांच्यासह कुटील व पोरकट राजकारणातला उहापोह संगतवार समजून घ्यावा लागेल. तशीच राजकीय नेत्यांपासून विश्लेषक अभ्यासकांची मानसिकताही उलगडून समजावी लागेल. त्याचे विविध निवडणूक निकाल व राजकीय उलथापालथीमध्ये पडलेले प्रतिबिंब समजून घ्यावे लागेल. बाकी काम सोपे आहे.

मोदीच का? आणि पुन्हा मोदीच का? असा दोन्ही पुस्तकांचा गाभा ‘इंदिरा ते मोदी’ या पुस्तकात आलेला आहे. नेहरूंच्या निधनापासून कॉग्रेसचा राजकीय पक्ष म्हणून र्‍हास सुरू झाला होता. मात्र त्याची जागा व्यापू शकणारा कुठला राष्ट्रव्यापी पक्ष मतदाराला उपलब्ध नव्हता, म्हणून पुन्हा पुन्हा मरणासन्न कॉग्रेसला उभारी मिळत गेली. सत्ता कॉग्रेसच्या हातून जात-येत राहिली. त्या पक्षाच्या र्‍हासाला किंवा पुनरुज्जीवनाला विविध राजकीय पक्ष व प्रस्थापित व्यवस्थेने कसा हातभार लावला, तेही संदर्भासह समजून घेतले पाहिजे. तरच मोदी हा चमत्कार नसल्याचे लक्षात येईल. आज समोर आलेला आहे, त्या नेत्याचे नाव नरेंद्र मोदी असेल. पण अशा कोणा नेत्याचा शोध भारतीय मतदार चक्क अर्धशतकापासून घेत होता. अशा कुठल्या पक्षाची प्रतिक्षा भारतीय जनता १९६४ पासून करीत होती. आरंभी काहीकाळ इंदिराजी त्या कल्पनेत फ़िट बसल्या. पण लौकरच त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला. पण त्यांचा कोणी पर्याय नव्हता आणि त्यांच्या हत्येनंतर भासमात्र पर्यायही समोर उरलेला नव्हता. कुठला पक्ष कॉग्रेसला पर्याय होऊ बघत नव्हता आणि विविध पक्षांच्या आघाड्या बेरजा गणिते, असल्या गोधड्यांवर भारतीय जनतेला समाधान मानावे लागत होते. पुढे २० वर्षांनी म्हणजे १९८४ च्या दारूण पराभवानंतर भाजपामध्ये पर्यायी पक्ष होण्याचा विचार सुरू झाला. तेव्हा त्याही पक्षासमोर मोदी किंवा कुठला चेहरा होता असे म्हणता येणार नाही. पण नेत्याच्या चेहर्‍यासाठी न थांबता, भाजपाने कॉग्रेसला देशव्यापी पर्याय होण्यासाठी पावले उचलली. त्याला आकार येत असताना मोदी नावाचा नेता पुढे आला. मोदींची महत्वाकांक्षा दुय्यम होती किंवा भाजपाचे प्रयत्नही महत्वाचे नव्हते. त्यापेक्षा सामान्य भारतीयाला परिस्थिती बदलण्याचे लागलेले वेध निर्णायक होते. ते शिवधनुष्य उचलण्यास पुढे येईल, त्याच्या गळ्यात माळ पडणार होती.

हा सगळा इतिहास व त्याच्या संगतवार घटनाक्रम वाचला व अभ्यासला, तर मोदी ३००+ हा आकडा ठामपणे सांगणार्‍या भाऊ तोरसेकरपाशी कुठली दिव्यदृष्टी नसल्याची कोणालाही खात्री पटू शकते. त्यासाठी ‘अर्धशतकातला अधांतर’ वाचावे लागेल, समजून घ्यावा लागेल, निकाल लागल्यापासून आता पुढल्या राजकारणाविषयी मी कोणते भाकित करतो, त्याची अनेकांना उत्सुकता आहे. अनेकांनी तशी विचारणाही विविध माध्यमातून माझ्याकडे केलेली आहे. पण तशी भाकिते करण्याची कुठली गरज नसते. सामान्य वाचक विचारी व अभ्यासू झाला, तर त्याला विश्लेषणाच्या कुबड्यांची गरज उरत नाही. एकूण घटनाक्रम व इतिहासाची जाण असेल आणि त्याचे संदर्भ योग्यप्रकारे जोडण्याची बुद्धी शाबुत असेल, तर भविष्यातल्या राजकारणाच्या घडामोडींचे भाकित कोणीही करू शकतो. मात्र संदर्भ गैरलागू असतील वा वडाची साल पिंपळाला लावण्याचा उद्योग होत असेल, तर भाकिते करता येत नाहीत किंवा उत्तरेही गवसणार नाहीत. ज्यांना यापुढल्या माझ्या राजकीय अभ्यासावि्षयी उत्सुकता आहे, किंवा स्वत:साठी राजकीय अभ्यास करण्याची तीव्र इच्छा आहे, त्यांनी म्हणूनच ‘अधांतर’ पुस्तक अभ्यासले पाहिजे. संदर्भासाठी जवळ बाळगले पाहिजे. २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही निवडणूकांची अचुक भाष्ये मी करू शकलो, त्याचे सार त्या अधांतर पुस्तकात आलेले आहे. ते जाणून घेतले तर भविष्यात नरेंद्र मोदी कुठल्या दिशेने वाटचाल करू शकतील, किंवा विविध पक्ष कुठल्या हालचाली करतील, त्याचा प्रत्येकाला आपला अंदाज बांधता येईल. ज्यांनी मागल्या दोनचार दिवसात माझ्याकडे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली, त्यांना म्हणूनच अधांतर वाचण्याचा व अभ्यासण्याचा सल्ला मी देईन. त्यातून नेहरू ते मोदी किंवा स्वातंत्र्योत्तर काळापासून एकविसाव्या शतकातल्या भारतीय राजकारणाची दिशा समजायला मदत होऊ शकेल.

पुस्तकाविषयीचा तपशील येथे मिळू शकेल.
http://shop.chaprak.com/
मोबाईल  ७०५७२ ९२०९२

11 comments:

  1. पुण्य प्रसुन वायपेयीनी भाजप १४५ असा पोल दिला होता.

    ReplyDelete
  2. मला हे पुस्तकं हवय. दिलेल्या लिंक वर गेलो पण तिथे हे पुस्तक नाही. Please help me to get this book. पुन्हा मोदीच का हे पुस्तकं मी वाचलंय. खूप छान. It helps to understand the indian politics

    ReplyDelete
  3. भाऊसाहेब पुस्तके मागवली सुद्धा. या ठिकाणीच लिंक दिल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  4. Well said :
    सामान्य वाचक विचारी व अभ्यासू झाला, तर त्याला विश्लेषणाच्या कुबड्यांची गरज उरत नाही. एकूण घटनाक्रम व इतिहासाची जाण असेल आणि त्याचे संदर्भ योग्यप्रकारे जोडण्याची बुद्धी शाबुत असेल, तर भविष्यातल्या राजकारणाच्या घडामोडींचे भाकित कोणीही करू शकतो.

    ReplyDelete
  5. भाऊ एका प्रश्नाचे अजून समाधान झाले नाही. पार्थ पवार आणि सुप्रियाताई दोघेही शरद पवारांशी संबंधित असताना एकाचा पराभव आणि दुसऱ्याचा विजय कसा ? यावर विश्लेषण वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  6. E-book आहे का उपलब्ध कुठे?

    ReplyDelete
  7. Magil 70 te pudil 70 kinva ankhi pudehi saglyach Rajkaranachi disha and Dasha dakhawnare vichar..😊

    ReplyDelete
  8. धन्यवाद श्री भाऊ..मी हे पुस्तक नक्कीच अभ्यासणार..जय श्रीराम

    ReplyDelete
  9. भाऊ तुम्ही अगदी अचूक असा अभ्यासपूर्ण अंदाज वर्तवला होता जो आज अगदी तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे !
    आपल्या संशोधन आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणाला सलाम !

    ReplyDelete
  10. भाऊ आजच पुस्तक आले आहे. बाकी तुमचा अंदाज बिलकुल बरोबर ( चंद्रा बाबू )

    ReplyDelete