राहुल गांधी आता पक्षाध्यक्षपद सोडायचा हट्ट धरून बसलेत अशी बातमी आहे. शतायुषी पक्षाच्या इतिहासातील ही केवढी शोकांतिका म्हणायची ना? त्यांचा पोरकट अध्यक्ष त्यांना आधी बुडवतो आणि आता बुडालेल्या पक्षाचे नेते म्हणतात, बाबा आम्हाला सोडून जाऊ नकोस. तूच गाळातून बाहेर काढू शकतोस. खरे तर हा पक्ष बुडत चालला आहे, त्याचे अनेक संकेत मागल्या दोन वर्षापासून मिळत होते. ते बघायला कोणी दिल्लीकर नामवंत संपादक वा अभ्यासक राजी नव्हते आणि अध्यक्ष महोदयांच्या मुर्खपणाला शहाणपणा ठरवण्याची जणू स्पर्धाच चाललेली होती. त्यामुळे रोम जळत असताना फ़िडल वाजवत बसलेल्या निरो नामक सम्राटाचे स्मरण झाले. मुळात निरोने रोम जळत असताना वाद्य वाजवत बसण्यात काहीही गैर नव्हते. कारण तो मनोरुग्ण होता आणि त्याला साधासरळ विचारही करता येत नव्हता. पण याने दिलेली वतने व अनुदाने याच्यावरच ज्यांची गुजराण किंवा चैनमौज चाललेली होती, त्यांना साम्राज्य किंवा देश याची कुठलीही फ़िकीर नव्हती. साम्राज्य वाचवण्यासाठी कोणी खमक्या हुशार राजा त्या जागी आणला तर नक्कीच ते राज्य वाचवणे शक्य होते. पण असा कर्तबगार राजा असल्या फ़ुकट्या बुद्धीमंतांची आधी हाकालपट्टी करण्याची खात्री होती. त्यापेक्षा मनोरुग्ण सम्राट त्यांना कौतुकाचा वाटत होता. यापेक्षा आजच्या कॉग्रेस पक्षाची वा त्याच्या भगतगणांची कहाणी किंचीतही वेगळी नाही. त्यांना नेहरूंच्या जमान्यापासून मिळालेली वतने टिकवण्यासाठी कॉग्रेस हवी आहे आणि त्याचे नेतृत्व कोणातरी गांधी वारसाने करणे आवश्यक आहे. मग राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडून कसे चालेल? सहाजिकच अशा तोंडपुज्या भाट वर्गाला राहुल गांधी कौतुकाचे असतात आणि जयराम रमेश यांच्यासारख्या खर्या बुद्धीमान कॉग्रेस नेत्याला कॉग्रेस नावाचा पक्ष टिकवण्याची चिंता भेडसावत असते. हल्ली कुठे रमेश यांचे वक्तव्य ऐकले आहे काय?
तब्बल दोन वर्षापुर्वी रमेश यांनी आलेल्या व येऊ घातलेल्या संकटाचा इशारा दिलेला होता. कोणी तो ऐकला होता काय? ऑगस्ट २०१७ च्या सुमारास रमेश यांनी एला वृत्तसंस्थेला मुलाखत देताना कॉग्रेसचे भविष्य किती अंधारले आहे, त्याची भविष्यवाणी केलेली होती. कॉग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न गहन झाला आहे. मोदी शहांच्या आक्रमक राजकारणाला जुन्या कालबाह्य पद्धतीने व रणनितीने रोखता येणार नाही; अशी ग्वाही रमेश यांनी त्या मुलाखतीतून दिली होती. शिवाय कॉग्रेस पक्षात मोकाट झालेल्या खालसा संस्थानिकांकडे बोट दाखवून रमेश काय म्हणाले होते? संस्थान वा सल्तनत संपलेली आहे. पण आमचे नेते आजही सुलतानाच्या मस्तीत रममाण झालेले आहेत. त्यांना आपला पक्ष किती गाळात रुतून पडला आहे, त्याचे भानही उरलेले नाही. हा इशारा कुठल्याही कॉग्रेस नेत्याला भावला नाही आणि नंतरच्या काळात रमेश कायमचे अडगळीत जाऊन पडले. त्यापेक्षा अभिषेक मनु सिंघवी, कपील सिब्बल वा चिदंबरम असल्या बिनबुडाच्या नेत्यांना पक्षात प्राधान्य मिळाले. मात्र त्यामुळे परिस्थिती बदलली नाही, की भविष्य बदलले नाही. आज दोन वर्षांनी कॉग्रेस ४४ वरून ५२ इतकी मजल मारू शकले्ला आहे. प्रचार काळात राहुल गांधी इतके मोकाट झालेले होते, की त्यांना तेव्हा कोणीतरी आवरले असते, तर कदाचित कॉग्रेसला ८०-९० इतकी तरी नक्की मजल मारता आली असती. किंबहूना राहुलनी प्रचारच केला नसता, तरी कॉग्रेसला आणखी २०-३० जागा अधिक मिळून गेल्या असत्या. पण तोंडपुज्या भाटांनी मुर्खपणाला शहाणपणा ठरवण्याच्या नादात कॉग्रेसला पुरेपुर गाळात ढकलून दिले. नव्या युगाची चाहुल लागलेली असताना कालबाह्य चाली खेळून मोदी-शहांना पराभूत करता येणार नाही, हे जयराम रमेश यांचे दोन वर्षापुर्वीचे शब्द खरे ठरले आहेत. अर्थात रमेश यांची हीच पहिली भविष्यवाणी नाही. सहा वर्षापुर्वी त्यांनी अशीच एक भविष्यवाणी केलेली होती.
२०१३ च्या मध्यास त्यांनी एक धक्कादायक विधान केलेले होते. तेव्हा भाजपाने सोळाव्या लोकसभेची तयारी चालू केलेली होती आणि पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचे नाव घोषित केलेले होते. त्यानंतर एकूण पुरोगामी गोटातून आलेल्या प्रतिक्रीया अपेक्षितच होत्या. मोदींमुळे भाजपाच धुव्वा उडणार, यापासून देशात हिंदूत्वाचा दहशतवाद सुरू होणार, इथपर्यंत अनेक प्रतिक्रीया उमटल्या होत्या. त्यामध्ये अनपेक्षित अशी एकच प्रतिक्रीया होती. ती जयराम रमेश यांची होती. त्यांनी अतिशय ठामपणे असे म्हटलेले होते, की नरेंद्र मोदी हे कॉग्रेस पक्षासमोरचे अभूतपुर्व आव्हान आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेससमोर नरेंद्र मोदी हे आव्हान सोपे नाही. म्हणूनच जपून पावले टाकावी लागतील. पण यातला आशय ओळखून विचार करण्याला कॉग्रेसमध्ये स्थान नाही. म्हणूनच कॉग्रेसच्या अनेक नेत्यांनी मग रमेश यांच्यावर टिकेची सरबत्ती केली आणि त्यांना निमूट गप्प बसावे लागले. एका कॉग्रेस प्रवक्त्याने तर रमेश यांच्यावर मोदीभक्त असा शिक्का मारून, त्यांना सरळ भाजपात जाण्याचाही सल्ला दिलेला होता. अर्थात त्यामुळे रमेश यांचे कुठलेही नुकसान झाले नाही. मात्र कॉग्रेस पक्ष सत्तेत होता, तो विरोधी पक्ष म्हणूनही लायकीचा राहिला नाही. त्याला २०६ खासदारांवरून ४४ संख्येपर्यंत खाली घसरावे लागले. ही अर्थातच एकमेव भविष्यवाणी नव्हती. तेव्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी किती पप्पू व मुर्ख आहेत, त्याचाही इशारा जयराम रमेश यांनीच दिलेला होता. अर्थात खरे बोलण्याची कॉग्रेसमध्ये बंदी असल्याने रमेश यांनी साखरेत घोळलेल्या शब्दात राहुल गांधींचा बालीश मुर्खपणा जगाला सांगितला होता. २०१४ ची निवडणूक कॉग्रेसने कशी आधीच गमावली आहे, त्याची ग्वाही दिलेली होती. पण कोणाला पर्वा होती. भाटांनी भरलेल्या दरबारात रमेश यांनी स्वत:च्या डोळ्यांनी आपला पक्ष उथळ पाण्यात बुडताना बघितला.
लोकसभेसाठी नरेंद्र मोदी विविध राज्यात फ़िरू लागले आणि त्यांनी दणदणित मोठ्या सभा घेण्याचा सपाटा लावला, तेव्हा कॉग्रेसची सुत्रे राहुलकडे आलेली होती. मात्र लोकसभा जिंकण्यासाठी जी तयारी लागते, त्याचा अभाव पक्षात होता. राहुल गांधींना निवडणूका कधी आहेत, त्याचाही पत्ता नव्हता,. तो विरोधभास कथन करता्ना रमेश यांनी सावध शब्दात इशारा दिला होता. सगळा पक्ष २०१४ च्या निवडणूका जिंकण्यासाठी आसुसला आहे आणि राहुल गांधी मात्र २०१९ च्या निवडणूकीसाठी पक्ष संघटना उभारण्यात गर्क झालेले आहेत. अर्थात राहुल गांधींच्या बाजूने त्यांचे वय आहे. एक निवडणूक गमावली तरी पुढली निवडणूक प्रयत्नपुर्वक जिंकायला याच्यापाशी खुप वर्षे आहेत. पण मोदींचे वय तितके कोवळे नाही. मोदींना २०१४ ची निवडणूक जिंकली नाही तर राजकारणातून गाशा गुंडाळावा लागेल. वरकरणी रमेश यांचे शब्द मोदी विरोधातील वाटतील. पण प्रत्यक्षात त्यांना आपल्याच तरूण नेत्याचा मुर्खपणा कथन करायचा होता. राहुल गांधींची बेफ़िकीरी कथन करायची होती. म्हणूनच लेकी बोले सुने लागे शैलीत, त्यांनी राहुलच्या बेतालपणावर बोट ठेवलेले होते. सहा महिन्यावर निवडणूका आलेल्या असताना राहुल अत्यंत बालीश पद्धतीने स्वयंसेवी संस्थेत चालतात, तसे पोरकट प्रयोग कॉग्रेस पक्षात करत होते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच कॉग्रेस पक्ष हरल्यात जमा असल्याची खात्री रमेश यांना पटलेली होती. पण कोणाला फ़िकीर होती? थोडक्यात २०१२ सालात कॉग्रेसचे उपाध्यक्षपद स्विकारून राहुल गांधींनी कॉग्रेस विसर्जित करण्याचा जो विडा उचलला, त्याची पहिली चुणूक रमेश यांनी बघितली व त्यांना जाणवली होती. पण बोलायची चोरी होती. म्हणून त्यांनी साखरेत घोळलेल्या शब्दात राहुलच्या मुर्खपणाचा दाखला दिला होता. पण राहुल गांधी त्यांच्यापेक्षाही सव्वाशेर निघाले. त्यांनी २०१९ ची लोकसभाही तशीच गमावून कॉग्रेसवर डोळे पांढरे करण्याची वेळ आणलेली आहे.
यापुर्वी मी एका लेखात राहुल गांधींचा उल्लेख शेफ़ारलेले पोर असा केलेला होता. त्याचा अर्थ श्रीमंताच्या घरात जन्मलेले मुल खुप लाडावलेले असते आणि कुठल्याही किंमती वस्तुची बिनधास्त मोडतोड करून टाकते. त्याच्या किंमतीशी त्याला कर्तव्य नसते, की होणार्या नुकसानाची पर्वा नसते. राहुल गांधी अक्षरश; शतायुषी कॉग्रेस पक्षाला मोडायचे खेळणे असावे, तसे वापरत असतात. अन्यथा त्या पक्षावर लागोपाठ दुसर्या निवडणूकीत दारूण पराभवाचा सामना करण्याची नामुष्की आलीच नसती. एकतर त्यांच्या खुळेपणामुळे कॉग्रेसवर घराणेशाहीचा अधिक आक्रमक आरोप होतो आहे. त्यांना पिढीजात अमेठीची जागाही जपता वा टिकवता आलेली नाही. परंतू तेच राहुल आपल्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना आपापल्या मुलांसाठी पक्षाचे नुकसान करीत असल्याबद्दल दोष देत आहेत. चिदंबरम, कमलनाथ किंवा गेहलोट यांनी आपली मुले निवडून आणण्यासाठी सर्व लक्ष दिले आणि पक्ष मात्र त्या राज्यात जमिनदोस्त झाला; असा राहुलचा दावा आहे. मग अमेठी जिथे आहे, त्या उत्तरप्रदेशात राहुल किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आईने काय केले? पुत्राचे लाड करताना अमेठी जाणार, हे गृहीत धरून वायनाडची जागा त्याला आंदण देताना सोनियांनी कुठला त्याग केला? त्याला पुत्रप्रेमाचा उमाळा नाहीतर काय म्हणतात? जे चिदंबरम यांनी केल्यावर पाप असते, तेच सोनिया प्रियंकांनी केल्यावर पुण्यकर्म कसे काय असू शकते? राहुल कधी आपल्याच पक्ष कार्यकर्ते वा नेत्यांना हे समजावणार आहेत काय? आपण घराणेशाहीच्या नादात देशभरचा पक्ष बुडवला आहे आणि त्याला आपल्याच आईने चालना दिलेली असताना, राहुल अन्य नेत्यांना झापतात, तेव्हा हसावे की रडावे तेही समजत नाही. पण तरीही त्यांचे दरबारी भाट मात्र त्याच राहुलकडे कॉग्रेसला संपण्यापासून वाचवण्याचे साकडे घालीत आहेत. अशा पक्ष वा नेत्यांचे भवितव्य कोणी सांगण्याची गरज नसते. ते नियतीनेच लिहून ठेवलेले असते ना?
भाउ तुमचे अंदाज खरे ठरतात.हा पण खरा ठरला तर शहा म्हनतात तस ५० वर्ष भाजपला कोणी सत्तेतुन घालवु शकणार नाही.खुप अजस्र यंत्रणा आहे भाजपची.परत एक विचार आहे.काॅंगरेसकड दोन्ही नाही.नेतृत्वपण नाही.वय हातात आहे म्हनुन कधीतरी लोक कंटाळतील परत काॅंगरेसकडे येतील हा राहुलचा समज असेल तर तो चुकीचा आहे काऱण दुसरी फळी भाजपकडे तयार आहे.स्वतः शहा राहुलपेक्षा फार मोठे नाहीत.
ReplyDeleteबढिया झाला लेख आपला
ReplyDeleteExcellent भाउ सडेतोड लेख
ReplyDeleteकृपया एवढे स्पष्ट विषलेशन करून काँग्रेस ला जागे करू नका, वतनदार भाट पपु ला जागे करतीलच
ReplyDelete'आज दोन वर्षांनी कॉग्रेस ४४ वरून ५२ इतकी मजल मारू शकले्ला आहे. प्रचार काळात राहुल गांधी इतके मोकाट झालेले होते, की त्यांना तेव्हा कोणीतरी आवरले असते, तर कदाचित कॉग्रेसला ८०-९० इतकी तरी नक्की मजल मारता आली असती. किंबहूना राहुलनी प्रचारच केला नसता, तरी कॉग्रेसला आणखी २०-३० जागा अधिक मिळून गेल्या असत्या'
ReplyDeleteभाऊ, तुमचे वरील म्हणणे खरे वाटते. कारण या मंदबुद्धी बाळाला पंजाब मध्ये प्रचाराला येऊ दिले नाही व त्याचा परिणाम, विधानसभा काँग्रेस ने जिंकली. कप्तान अमारेंद्रसिंग ना जेव्हडे कळले तेव्हडे बाकीच्या म्हाताऱ्या बांडगुळ लोकांना समजले नाही. चाटु वृत्ती बाकी काही नाही. निरोची उपमा सार्थ !
फारच सुंदर विश्लेषण! भाऊ, तुमचे लेख वाचूनच या निवडणुकीत खरा अंदाज येत गेला आणि कदाचित मोदी हरतील की काय ही शंकाही पार नष्ट झाली ! आताही तुमचं निष्पक्ष विश्लेषण खरंच कॉंग्रेस नेत्यांनी अभ्यासलं तर एक ब-यापैकी विरोधी पक्ष तरी तयार होईल ! आपण जयराम रमेश यांच्या बद्दल लिहिले आहे तेही पटलं , पण ते कुंभकर्णाप्रमाणे जरी रावणाला चार चांगल्या गोष्टी सांगत असले तरी बाहेर पडत नाहीत हा भाबडा आशावादच वाटतो ! आपल्या मते कॉंग्रेसचे स्वच्छ, देशभक्त आणि हिंदूंविषयी अकारण तिरस्कार नसलेले नेते किती आणि कोण आहेत ?? हे एकत्र आले तर काही आशा आहे कॉंग्रेस पक्षाला ! पण अध्यक्ष कुणीतरी वेगळा झाला तरीही रीमोट १० जनपथच असणार की ! पुन्हा एकदा उत्कृष्ट लेखाबद्दल धन्यवाद!! अरविंद कुलकर्णी
ReplyDeleteभाऊ, तुम्ही अभिषेक मनु सिंघवी, कपील सिब्बल वा चिदंबरम असल्या बिनबुडाच्या नेत्यांच्या यादीत एक नाव विसरलात. ते म्हणजे अहमद पटेल. २०१४ सालच्या पराभवानंतर कॉंग्रेसने ए. के. ॲंटोनी यांच्या नेतृत्वाखाली कमिटी नेमली होती. त्या कमिटीने दिलेला अहवाल धुळ खात पडला आहे. त्यावर अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. आता नवीन कमिटीच्या अहवालावर काय होणार आहे त्याची कल्पना न केलेली बरी. पक्षाच्या सर्वत्र झालेल्या पराभवाची चिकित्सा करण्यासाठी ही कमिटी नेमलेली नाही. तर फक्त अमेठीमध्ये पराभव झाला याकरता कमिटी नियुक्त झालेली आहे. एकुण काय टिवी धारावाहिकापेक्षा अधीक करमणूक भविष्यात बघायला मिळणार आहे.
ReplyDeleteVery proper anyalisis.Big surgery is required in Congress but they don't have proper surgeon.BJP DARE DO THIS BY REMOVING ADVANIJI.
ReplyDeleteनमस्कार भाऊंचे सर्व लेख छान असतात व ते जे लिहतात ते मनाला एकदम पटते
ReplyDelete