विधानसभा दोनतीन महिन्यावर येऊन ठेपल्या असताना विरोधी पक्षातून पळापळीची धामधुम सुरू झालेली आहे. कोण सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करतो आहे तर कोणी सत्ताधारी भाजपामध्ये आपल्याला आश्रय मिळवण्यासाठी पुढाकार घेतो आहे. मुंबई राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असतानाच त्याच पक्षाचे एक दिग्गज नेते मधूकर पिचड यांचा वारसपुत्र वैभव पिचड यांनी राधाकृष्ण विखे पाटिल यांच्यासहीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने त्यांच्याही निर्गमनाचे संकेत मिळालेले आहेत. पिचड हे शरद पवारांचे जुने निकटवर्तिय मानले जातात, म्हणून वैभवच्या नावाला महत्व आहे. वीस वर्षापुर्वी पवारांनी कॉग्रेस पुन्हा सोडून वेगळी चुल मांडली, तेव्हा विधानसभेतील विरोधी नेता असलेले पिचड नि:शंक मनाने कॉग्रेसचे नेतृत्व झुगारून राष्ट्रवादीत दाखल झालेले होते. त्यांचाच वारसाहक्क म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले येथील विधानसभा मतदारसंघ त्यांच्या पुत्राला मिळाला होता. आता त्यालाही सत्ताधारी भाजपात जाण्याचे वेध लागलले असतील, तर या प्रादेशिक पक्षाची अवस्था काय आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. कालपरवाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटिल यांनी रात्रीच्या अंधारात अनेक विरोधी नेते मुख्यमंत्र्यांना येऊन भेटतात, असे विधान केल्यावर अजितदादा संतापले होते. त्यांनी अशा नेत्यांच्या नावाची यादीच सादर करावी म्हटलेले होते. त्यालाच वैभव पिचड यांनी पुढे येऊन उत्तर दिले असेल काय? कारण वेगळी वाट त्यांनी एकट्यांनीच शोधलेली नाही. तर मुंबईत सचिन अहिर, सातार्यातील शिवेंद्र राजे भोसले यांनीही पक्षाच्या मुलाखतीला अनुपस्थित राहून आपला मनोदय जणू व्यक्त केला आहे. अशावेळी त्यांना सामावून घेणार्या पक्षाच्या नावाने शिमगा करण्यापेक्षा आपले कुठे व काय चुकले व चुकते आहे, त्याचे आत्मपरिक्षण आवश्यक होते आणि आहे.
सचिन अहीर यांच्या सेना प्रवेशानंतर प्रतिक्रीया देताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते नबाब मलिक यांचा सल्ला बोलका आहे. बोलका अशा अर्थाने की नबाबच आजच्या राष्ट्रवादी पक्षाचे खरेखुरे प्रतिक आहेत. ते सचिन अहीर यांना लढायची हिंमत संपलेले किंवा वेगळ्या भाषेत पळपुटे ठरवित आहेत. पक्ष अडचणीत व संकटात असताना त्याच्यासाठी लढायची हिंमत असावी लागते. किंबहूना प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी धाडस लागते, असे त्यांनी ज्ञानदान केलेले आहे. हे शरद पवार किंवा अन्य कोणा राष्ट्रवादी नेत्याने केले असते, तर गोष्ट वेगळी होती. पण नबाब मलिक? हे गृहस्थ प्रवाहाचा विरुद्ध कधी पोहलेले आहेत? त्यांचा पुर्वेतिहास नेमका काय आहे? १९९५ च्या काळात ते समाजवादी पक्षात होते आणि त्यांच्या मतदारसंघात विधानसभेला पराभूत झालेले होते. नंतर न्यायालयीन कारवाईत शिवसेनेचे सुर्यकांत महाडीक यांची निवड रद्द झाली, तेव्हा पोटनिवडणुकीत नबाब मलिक विधानसभेत प्रथम निवडून आले. पण तेव्हा ते कुठल्या पक्षात होते? समाजवादी पक्षात होते. पण नंतरच्या काळात देशातला राजकीय प्रवाह बदलून गेला आणि समाजवादी पक्षातले अनेक आमदार एकामागून एक कॉग्रेस पक्षात गेले. तिथून मग राष्ट्रवादी पक्षातही दाखल झाले, त्यापैकीच मलिक एक आहेत. तेव्हापासून अबू आझमी एकाकी समाजवादी पक्ष मुंबईत चालवित आहेत आणि मलिक मात्र नव्या पक्षात जाऊन मंत्रॊपद भूषवून सचिन आहिरांना प्रवाहाविरुद्ध पोहोण्याचे धडे देत आहेत. यापेक्षा आजकालच्या राजकीय पक्षनिष्ठा किंवा वैचारिक बांधिलकीचा कुठला लक्षणिय पुरावा असणार आहे ना? भुजबळ वा गणेश नाईक यांच्यापासून भास्कर जाधवांपर्यंत कितीजणांकडून नबाब मलिक पक्षनिष्ठा शिकलेत, त्यांनाच ठाऊक. आजच्या जमान्यात पक्षनिष्ठा शिकवण्याचे धाडस मात्र प्रवाहाविरुद्ध पोहणे नक्कीच आहे.
सांगायचा मुद्दा इतकाच, की सचिन अहीर किंवा वैभव पिचड पक्ष सोडून प्रवाहाच्या बाजूने पोहायला पुढे कशाला सरसावलेले आहेत? जेव्हा त्याचा शोध किंवा अभ्यास सुरू होतो, तेव्हा आपण किंवा आपल्या पक्षाच्या विरोधात लोकमताचा प्रवाह गेलाच कशाला, त्याची उत्तरे सापडू शकत असतात. मागल्या पाच वर्षात राष्ट्रवादी किंवा कॉग्रेस पक्षासह बहुतांश पुरोगामी पक्षांनी त्याचे कधी आत्मपरिक्षण केले आहे काय? की प्रवाहपतित होऊन आव्हाडांप्रमाणे नुसती नथुरामाची जपमाळ ओढत बसल्याने प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे शक्य होणार आहे? २०१२ सालात अण्णा हजारेंना नथूराम घोषित केल्यापासून त्यांचे तेवढेच टुमणे चालू आहे. त्यामुळे प्रवाह बदलला नाही किंवा राष्ट्रवादी कॉग्रेसला आपापल्या विहिरीत वा तळ्यातही पोहताना नाकातोंडात पाणी जाऊ लागले आहे. अशा वेळी मुळात प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे लोकमताच्या विरुद्ध नव्हे, इतके तरी समजून घेतले पाहिजे. लोकमताच्या विरुद्ध जाऊन लोकशाहीत जिंकता येत नाही. सत्ता हाती असताना आणि लोकमतही आपल्याच प्रवाहातून वहात असताना जो पोरखेळ कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने केला, त्यातून प्रवाहच उलटा फ़िरला आहे. बहुतांश हिंदू समाजाला गुन्हेगार व दहशतवादी ठरवणेच प्रवाहाच्या विरोधातले होते आणि त्या प्रवाहाची बघता बघता त्सुनामी होऊन गेली. आतापर्यंत दोनदा सगळे पुरोगामी पक्ष त्यात घरादारासह वाहून गेलेले आहेत. त्यामुळेच प्रवाहाच्या विरोधात पोहणे म्हणजे काय, ते समजून घेण्याची गरज होती. तितकी सदबुद्धी पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनाही सुचलेली नाही, तर नुसतेच नावाचे नबाब कसला शहाणपणा करू शकणार आहेत? शकले असते, तर सचिन अहीर यांनी उच्चारलेल्या शब्दाचा अर्थ त्यांना उलगडला असता. सचिन यांनी आजचे लोकमत पक्षाच्या विरोधात गेल्याने निवडून येणेही अशक्य असल्याचे विधान केलेले आहे.
अहीर यांच्यापासून वैभव किंवा जयदत्त क्षीरसागर यांच्यापर्यंत अनेकांना प्रवाहत उडी घेऊन लाटेवर स्वार होण्याचा झालेला मोह जिंकण्यासाठीचा आहे. १९९६ नंतरच्या काळात जसे नबाब मलिक सत्तेसाठी मुळ पक्षातून अन्य पक्षात गेले, त्यापेक्षा आता घडणारे पक्षांतर वेगळे नाही. तुमच्या पक्षात राहून विजयाची, जिंकण्याची शक्यता संपली, हे सत्य आहे. त्यामुळे अहिर वा इतरांना प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे सल्ले देण्यापेक्षा, प्रवाहच आपल्या बाजूने फ़िरण्यासाठी काम करण्याची गरज आहे. ते आपोआप होत नाही. लोकमताला पटणारे विचार व काम करावे लागते. मोदींची लोकप्रियता ही लाटेत रुपंतरीत झाली, पण त्यासाठी नरेंद्र मोदींनी मुळात प्रवाहाच्या विरुद्ध ठाम उभे रहाण्याची हिंमत केलेली होती. देशातला हा एकमेव नेता असा होता, की ठामपणे त्याने मौलवीने दिलेली टोपी डोक्यावर ठेवायला नकार दिला. अन्यथा भाजपा़चेही अनेक नेते इफ़्तार पार्ट्या करून त्यात मुस्लिमांपेक्षाही अधिक विणलेल्या टोप्या मिरवित होते. इतर पुरोगामी पक्षांची कथा सोडूनच द्या. मुस्लिम मतांशिवाय कोणाला सरकार स्थापन करता येत नाही, किंवा बहूमताचा पल्ला गाठता येत नाही, हा मतप्रवाह जोरात चालला होता. तेव्हा त्याच्या विरोधात पोहण्याची हिंमत करणरा एकमेव नेता नरेंद्र मोदी होता. तितकी हिंमत शरद पवार यांना दाखवता आली असती, तर आज तेही पंतप्रधान पदावर आरुढ झालेले जगाने बघितले असते. पण् पवार किंवा तत्सम कुठल्याही नेत्याला कधी प्रवाहाच्या विरोधात पोहता आले नाही आणि प्रवाहपतित होऊनच त्यांचे राजकारण निकालात निघालेले आहे. प्रवाह वा महापुरात वहात एकत्र येणारे ओंढके किंवा लाकडे मिळून कुठली इमारत आकार घेत नाही; किंवा त्याची संघटना होऊ शकत नाही. दुसरा महापुर आला मग तीच एकत्र दिसणारी लाकडे पालापाचोळा होऊन बाहून जातात, विस्कळीत होतात. त्याला आजकाल पक्षांतर म्हणतात.
तेव्हा मुद्दा अहिर वा कोणाच्या पक्षांतराचा वा पक्षनिष्ठेचा नसून, राष्ट्रवादी वा कॉग्रेसला ओहोटी कशाला लागली असा मुद्दा आहे. देशातला मतप्रवाह राष्ट्रनिष्ठेचा होता आणि त्यावरच कॉग्रेसने पन्नास वर्षे सत्ता उपभोगलेली होती. पण राहुलसहीत प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला निघालेल्या नेत्यांनी कॉग्रेस व पुरोगाम्यांनी राजकारण बुडवून टाकलेले आहे. सचिन अहीर त्याचाच बळी आहे. कार्यकर्ता किंवा स्थानिक नेत्त्यांना तत्वज्ञानाचे डोस पाजून पक्षाची संघटना उभी रहात नसते, किंवा विस्तारत नसते. उलट त्याच्याकडून जनमानसाची जी धारणा नेतृत्वापर्यंत येत असते, त्यानुसार वैचारिक प्रवाहाला दिशा देण्याचे काम नेतृत्व करीत राहिले, तरच पक्षाला भवितव्य असते. त्याचे भान सोडून नेते व पक्ष भरकटत गेला, तर प्रवाहपतित होऊन त्याचे परस्पर विसर्जन होत असते. कॉग्रेस वा राष्ट्रवादी यांच्यातले अनेक नेते कार्यकर्ते आजकाल युतीपक्षांमध्ये आश्रय घ्यायला धावत सुटलेले असतील, तर त्यांना आपल्या जागी असलेले राजकीय बस्तान टिकावायचे आहे. ते टिकवायला पक्षाच्या नेतृत्वाची मदत मिळण्यापेक्षा तोटाच होणार असेल, तर अशा नेतृत्वापासून दुर जाण्याला पर्याय उरत नाही. निवडून येण्याची शक्यता असे अहिर म्हणतात, तेव्हा पवारांमुळे आपलीही राजकीय पत संपत असल्याचाच इशारा देत आहेत. त्यांना निष्ठा वा ज्ञानामृत पाजण्यापेक्षा पक्षनेतृत्वाला आपला मतप्रवाह जनमताशी जुळवायचा सल्ला देणे महत्वाचे आहे. जे कोणी आपापले पक्ष सोडून चाललेत, त्यांच्या पक्षनिष्ठा सैल झालेल्या नाहीत, त्यांना आपलेच नेतृत्व नुकसान करण्याची भिती सतावते आहे आणि त्यातूनच अशा पक्षांतराला वेग आला आहे. कारण निवडणुकीचा मोसम अशा पळपाळीचाच उत्सव असतो ना? मग त्यात आपापला जीव वाचवायला पळायला पर्याय उरत नाही. नुसत्या पक्षनिष्ठा बुडत्याला वाचवित नसतात.
राजकारणातील पळापळीला महाराष्ट्रात १९७८ साली शरद पवारांनी सुरुवात केली. ते काँग्रेस सोडून पुलोद नावाचा गट करून मुख्यमंत्री झाले. आता त्यांचेच शिष्य त्याचा कित्ता गिरवातेहेत.
ReplyDeleteखरय भाउ. खर तर भारतात लोकांचे समस्या प्रश्न खुपच आहेत पण काॅंगरेस ते न उचलता पुरोगामी लोकांनी स्वमग्न दिलेले विषय उचलते,म्हनुन ही अवस्था झालीय.
ReplyDeleteहा पक्ष एके काळी स्वतःला " पार्टी विथ Difference" असे काही तरी म्हणण्याचा. शेवटी काळ श्रेष्ठ, हा घोडेबाजार बीजेपी ला प्रचंड महागात पडणार आहे, आतून खिंडार पडेल. आज ना उद्या. नोट बंदी ची यशोगाथा. 😊
ReplyDeleteदाट शक्यता. .....
DeleteBhau namaskar aapan kele vishleshan agdi binchuk v vastavik paristhila anusarun aahe yat muluch sankela jaga nahi aaj kharokharch sharad pawarani aapli pratisha gamavleli aahe karan he tyanchya karmache phal ahe mala ek manoj kumar chya sanyasi chitrapatale gane athavte te "jaise karan karega vaise phal dega bhagvan ye hai geeta ka gyan" Thanks to Hon prime minrester Narendra Modi and amit shah yani ya sharad pawar v congress walya halkat ani nalayak lokana apli jaga dakhavli evdhech nahi tar yanche astitva sampaun takle aahe he aplya karmachi phale bhogtil v aapan yache sakshidar asut mazya sarkhya samanya mansache shrap yana sampun taktil upar vale ke paas der hai andher nahi hech kharedhanyavad
ReplyDeleteTai aani Dadana waiet watat asel Ki aaplyala utipakshat jata yet nahi.
ReplyDeleteआजघडीला दुसऱ्या पक्षाची लक्तरे पहाताना बरे वाटत असले तरी भाजपाच्या दृष्टीने हे योग्य नाही. उद्या तिकीट वाटप करतानां निष्ठावंत वगळता या आयारामानां प्राधान्य दिल्यास निष्ठावंत तर नाराज होतीलच पण भाजपाचा जो केंद्रबिंदू सुशिक्षित मध्यमवर्ग तो दुरावण्याची शक्यता खूपच आहे. त्यामुळे आयारामानां किती महत्त्व द्यायचे याचा विचार पक्ष नेतृत्वात करावाच लागेल.
ReplyDeleteअगदी बरोबर,
ReplyDeleteकाळ आपले हिशेब चुकते करतोय
26, 2019 at 3:31 AM
ReplyDeleteआजघडीला दुसऱ्या पक्षाची लक्तरे पहाताना बरे वाटत असले तरी भाजपाच्या दृष्टीने हे योग्य नाही. उद्या तिकीट वाटप करतानां निष्ठावंत वगळता या आयारामानां प्राधान्य दिल्यास निष्ठावंत तर नाराज होतीलच पण भाजपाचा जो केंद्रबिंदू सुशिक्षित मध्यमवर्ग तो दुरावण्याची शक्यता खूपच आहे. त्यामुळे आयारामानां किती महत्त्व द्यायचे याचा विचार पक्ष नेतृत्वात करावाच लागेल.हेच भाजपच भविष्य असेल तर शेवट लवकरच आहे.
"जे कोणी आपापले पक्ष सोडून चाललेत, त्यांच्या पक्षनिष्ठा सैल झालेल्या नाहीत, त्यांना आपलेच नेतृत्व नुकसान करण्याची भिती सतावते आहे आणि त्यातूनच अशा पक्षांतराला वेग आला आहे"
ReplyDeleteअगदी बरोबर.
ही पळापळ नसून भाजपमध्ये आपल्या माणसांची पेरणी असेल का?
ReplyDelete