आठ वर्षापुर्वीची गोष्ट आहे, तेव्हा भाजपामध्ये काही मतभेद किंवा बेबनाव झालेला होता आणि त्याची माध्यमातून खुप चर्चा रंगलेली होती. भाजपाचे दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे पक्ष सोडणार असल्याची ती चर्चा होती. अर्थातच त्याविषयी खुद्द मुंडे यांनी काहीही जाहिर वक्तव्य केलेले नव्हते. पण पक्षाध्यक्ष नितीन गडकरी व मुंडे यांच्यातला वाद विकोपास गेल्याच्या बातम्यांना रोजच्या रोज माध्यमे फ़ोडणी घालत होते. त्याचा स्वाद घ्यायलाही राजकीय जाणत्यांनी गर्दी केलेली होती. त्या गर्दीतले एक जाणाकार होते. शरद पवार. त्यांनी तेव्हा एका समारंभात बोलताना एक सुचक विधान मोजूनमापून केलेले होते. ‘आपल्याकडे सध्या मुंडे यांना देण्यासारखे काहीच नाही’. तेव्हा तात्पुरती त्या विधानावर चर्चा होऊन विषय बाजूला पडला. पण त्यातून खरेतर राष्ट्रवादी कॉग्रेस व शरद पवार यांच्या एकूण राजकारणाचे चरित्र साफ़ होते. आजवर पवारांनी राजकारण करताना सतत अन्य पक्षातील माणसे फ़ोडून आपला कार्यभाग साधलेला आहे आणि जेव्हा अन्य कुठल्या पक्षात मतभेद वा बेबनाव निर्माण होतात, तेव्हा पवारांनी सातत्याने तिथे गळ टाकण्यातून आपले राजकाररण पुढे रेटलेले आहे. त्यामुळेच आज त्यांच्याच पक्षातले कोणी दिग्गज वा इच्छुक अन्य पक्षात आश्रयाला जात असतील, तर त्यावरून गहजब करण्याचे काही कारण नाही. निदान त्यांचे पुतणे अजितदादांनी तरी आदळआपट
करायची गरज नाही. कालपरवा राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिन अहीर शिवसेनेत दाखल झाले आणि मधूकर पिचड यांच्या सुपुत्राने मुख्यमंत्र्यांची भेटगाठ घेतल्याने अजितदादा खवळले आहेत. त्यांनी पक्ष सोडून जाणार्यांवर आगपाखड केलेली आहे. तर त्यांच्या प्रवक्त्यांनी शापवणीही उच्चारलेली आहे. पण असे करण्यापुर्वी त्यांनी आपल्या पक्षाध्यक्षांचा राजकीय मंत्र अभ्यासला असता, तर प्रक्षोभ जरा कमी ठेवता आला असता.
राजकारणातल्या पक्षांतराला कितीही तात्विक मुलामे चढवले किंवा मुखवटे लावले; म्हणून त्यातले सत्य कधीच लपून रहात नाही. त्यामुळे आज सचिन अहीर वा अन्य कोणी राष्ट्रवादीचे नेते शिवसेना किंवा भाजपात जात असतील, तर त्यांनी पवार साहेबांच्या गुरूमंत्राचाच पाठपुरावा केला, हे लक्षात् घेतले पाहिजे. ज्या कारणास्तव तेव्हा छगन भुजबळ डझनभर आमदार घेऊन शिवसेनेतून कॉग्रेसमध्ये दाखल झाले, त्यामागे तोच गुरूमंत्र होता. भुजबळांना पितृतुल्य बाळासाहेबांपेक्षा शरद पवार पित्यासमान वगैरे वाटलेले नव्हते. तर पवार मंत्रीपदाची खुर्ची देणार म्हणून भुजबळांनी शिवसेनेला तलाक दिलेला होता. नंतर असे अनेक शिवसैनिक किंवा कार्यकर्ते अन्य पक्षातून पवारांच्या आश्रयाला गेले, तेव्हाही तत्वज्ञान किंवा विचारधारेचा विषय नव्हता. पवारांपाशी काहीतरी देण्यासारखे होते. आज देण्यासारखे काहीही राहिले नसेल, तर राष्ट्रवादीत कोण कशाला थांबणार ना? एकामागून एक नेते कार्यकर्ते अन्य पक्षात किंवा सत्ताधारी पक्षात दाखल व्हायला रांग लावून उभे असतील, तर दोष त्यांचा नाही. दोष गुरूमंत्राचा आहे. म्हणून सचिन अहीर नेमक्या शब्दात सांगतात, पवारसाहेब हृदयात आहेत. म्हणजे त्यांनी पवारांचा आदेशच पाळलेला आहे. जिथे काही मिळणार आहे, तिथे जाऊन आपले कल्याण करून घ्यावे. ज्याच्यापाशी काही देण्यासारखे असेल, तिथे जाण्यातूनच आपले राजकीय भवितव्य उज्ज्वल करायचे असते. मग त्याचेच पालन अहीर यांनी केलेले नाही काय? वैभव पिचड असोत किंवा जयदत्त क्षीरसागर असोत, त्यांनी अशी कुठली चुक केली आहे? पवारांपाशी किंवा राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये देण्यासारखे काहीही उरलेले नाही, हेच त्यातले एकमेव सत्य आहे. भाजपा किंवा शिवसेनेपाशी देण्यासारखे काही असेल, तर घ्यायला पुढे पाऊल टाकणे, ही पवारसाहेबांचीच शिकवण नाही काय?
विंदा करंदीकरांच्या कवितेच्या छान ओळी आहेत, ‘देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे’. राजकारण् त्यापेक्षा वेगळे नाही. नेहमीच फ़क्त घेऊन चालत नाही. हळुहळू आपली क्षमता वाढली, की देताही आले पाहिजे. सगळेच आपल्या घरात किंवा तिजोरीत बंद करून ठेवले, मग घेणार्यांना अन्यत्र जाण्याची पाळी येत असते. एकाच घरातल्या कितीजणांना उमेदवारी द्यायची, म्हणून शरद पवारांना माघार घ्यावी लागली. तो अनुभव खुप जुना नाही ना? आधीच देण्यासारखे काही उरलेले नाही आणि तरीही आपल्याकडेच सर्व काही ठेवण्याच्या अट्टाहासाने ही पाळी आलेली आहे. पिचड एकत्रित कॉग्रेसमध्ये विधानसभेत विरोधी नेता होते आणि आघाडीचे सरकार आल्यावर त्यांना एकदाही उपमुख्यमंत्रीपद मिळाले नाही्. नंतरच्या काळामध्ये साध्या मंत्रीपदालाही ते वंचित राहिले असतील, तर त्यांच्या वारसपुत्राने त्यापासून काय धडा घ्यावा? पार्थ, अजियदादा, सुप्रियाताई आणि खुद्द साहेबच सत्तापदे किती काळ बळकावून बसणार? पक्षापाशी भरपूरच सत्तापदे असतील तर गोष्ट वेगळी असते. पण जेव्हा अधिकारपदांचा तुटवडा असतो, तेव्हा काटकसर घरातून सुरू करावी लागते, हे अनुभवी पक्षाध्यक्षांना कोण समजावू शकेल? बाकीच्या गोष्टी सोडून द्या! जेव्हा पक्षासाठी त्यागाची व संघर्षाची वेळ असते, तेव्हा तरी हव्यास कमी असायला नको काय? देण्यासारखे काही नाही म्हणणे आणि असलेल्यातला मोठा हिस्सा बळकावून बसण्याला गुरूमंत्र म्हणता येणार नाही. किंबहूना जेव्हा तुमच्या नावाने वा नेतृत्वाने जिंकता येत नसते, तेव्हा लढवय्यांना अधिक प्रोत्साहन म्हणून संधी द्यायची असते. त्याचीच वानवा असेल, तर त्यांना अन्यत्र वाट शोधावी लागते. संधी शोधत इतरत्र मुलूखगिरी करावीच लागते. निदान शरद पवारांना जे समजत नसेल का? अजितदादांची गोष्ट वेगळी आहे.
मुंडे घराण्यातील अंतर्गत वादाला खतपाणी घालून धनंजय मुंडे यांना हाताशी धरण्याचा प्रकार कशासाठी होता? सत्ता हातात होती म्हणून विरोधी पक्षातल्या आमदारांना फ़ोडण्याची मस्तीच नव्हती का? शिवाय धनंजय विधान परिषदेतले आमदार होते. त्यामुळे सत्तेत फ़ारसा फ़रक पडणार नव्हता. पण् विरोधी नेता म्हणून राजकारण करणार्या गोपिनाथ मुंडेंना दुखावण्यापलिकडे त्यात अन्य काहीही हेतू नव्हता. पण असल्या डावपेचातून कुठले बीज आपण राजकारणात रुजवित आहोत, त्याचे भान शरद पवारांनी कधी ठेवले नाही. मिळेल त्या पक्षातून व मिळेल त्या आमदाराला फ़ोडण्याला ते धुर्तपणा समजत राहिले. आज त्यांचेच डावपेच त्यांचे विरोधक वापरत असतील, तर त्यावर वैचारिक टिप्पणी करण्यात अर्थ नाही. पण विषय गंभीर इतकाच आहे, की त्यांच्याच अनुयायांचा पवारांवर विश्वास उरलेला नाही. पवारांचे नेतृत्व आणि प्रभावाने निवडून येण्याची खात्री या आजवरच्या निष्ठावंताना उरलेली नाही, ही बाब गंभीर आहे. राज्यातला पवारांचा प्रभाव संपू लागल्याचा पुरावा २९१४ नंतर सतत मतदानातून मिळालेला आहे. पण आता त्याची खात्री त्यांच्याच अनुयायांना पटू लागली; हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून कोण पक्ष सोडून गेला, त्यापेक्षा कशाला सोडून गेला, ही बाब महत्वाची आहे. तो अर्थातच आत्मपरिक्षणाचा विषय आहे आणि पवारांनी राजकीय जीवनात तितकीच कृती करायला कायम नकार दिलेला आहे. किंबहूना पवारांच्या राजकीय जीवनातील तीच सर्वात मोठी त्रुटी राहिलेली आहे. सचिन अहीर वा अन्य दोनचार आमदार नेते सोडून गेल्याने राष्ट्रवादी पक्षाचा अंतकाळ जवळ आला, असे होत नाही. पण मरगळ संपवून पक्ष नव्याने उभा करण्याची प्रक्रीयाही सुरू होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी चुका शोधून वा दुरूस्त करूनच पुढली पावले टाकावी लागतील. माध्यमांना सुखावणारी वा विरोधकांना डिवचणारी विधाने करून ही घसरगुंडी संपण्याची शक्यता शून्य आहे. देण्यासारखे आपल्यापाशी काहीही का उरलेले नाही, त्याचा शोध म्हणून महत्वाचा आहे.
खरय भाउ.सातारचे शिवेंद्रराजेपण गेले भाजपमधे.आता काय राहिल?
ReplyDeleteVery true!
ReplyDeleteजैसी ज्याचि करणी तैसे । फळ देतो रे ईश्वर ।।
ReplyDeleteatyant vastunishtha vishleshan
ReplyDeleteनेमक्या शब्दात सुरेख वर्णन तुम्हीच करू जाणे भाऊ.
ReplyDeleteVery true
ReplyDeleteभाऊ, अजून एक शरद पवार म्हणाले की, ईडी, इन्कमटँक्स, इत्यादि संस्थाची भिती दाखवून भाजपा आमचे लोक आपल्याकडे खेचत आहेत, पण ते त्यामध्ये नकळत की जाणूनबूजून एक सत्य बोलून गेले की, भिती दाखवण्यासाठी काहीतरी यांच्या पक्षातील लोकांनी केलेले आहे. चित्रा वाघ यांच्याबद्दल तर स्पष्टपणे तसा उल्लेख केला. यामध्ये त्यांचा हतबलपणा दिसत आहे की, पक्ष सोडून गेले ते चोर होते असे सुचवायचे आहे?
ReplyDeleteकरावे तसे भरावे म्हणतात ते बरोबर आहे.
ReplyDeleteपवारांच्या घटत्या प्रभावामुळे होत असलेला उद्वेग सर्वांना वारंवार दिसलाय. चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीची किती दुरावस्था व्हावी!
ReplyDeleteHe will not learn anything Sir,
ReplyDeleteपवार साहेब जाणार्यांना यशवंतराव चव्हाणांची आठवण करून देत आहेत..वसंतदादा पाटलांची पण आठवण ठेवली असती तर बरे झाले असते...
ReplyDelete