Tuesday, August 13, 2019

बुडत्या पाकला कॉग्रेसचा आधार

३७० च्या निमीत्ताने   (७)



आताच हाती आलेल्या बातमीनुसार अर्णब गोस्वामी याच्या रिपब्लिक वाहिनीने एक स्टींग ऑपरेशन केलेले असून, लौकरच त्याचे प्रसारण होणार आहे. हे रेकॉर्डींग पाक पंतप्रधान इम्रानखान आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री शाह महंमद कुरेशी यांच्यातल्या बंद खोलीत झालेल्या खलबताचे असल्याचे सुत्रांनी सांगितले. धक्कादायक गोष्ट म्हणजे या खलबतात इम्रान व कुरेशी हे दोघेही चक्क मराठीत एकमेकांशी संवाद साधताना टिपले गेलेले आहेत. म्हणूनच ते नेमके कशाबद्दल बोलत असतील, याविषयी सार्वत्रिक उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. एका सुत्रानुसार ते दोघेही भारतीय संसदेने ३७० व ३५-ए कलमे रद्द करण्याविषयीच बोलत असतानाचे हे रेकॉर्डींग आहे. पण त्यासाठी मराठीत बोलण्याची काय गरज होती? हा प्रश्न कळीचा आहे. त्याचे उत्तर दोघांमधील संवादाचा विषय समजला, तर लक्षात येऊ शकते. दोघांमध्ये विषय ३७० असला, तरी संदर्भ मराठीतला असल्याने दोघांना मराठीतून बोलावे लागले आहे. कारण जे काही घडले आहे आणि पाकिस्तानला घाम फ़ुटलेला आहे. त्याचा महत्वपुर्ण संदर्भ जगातल्या फ़क्त मराठी भाषेतच यापुर्वी आलेला होता आणि मराठीची जाण नसल्याने पाक सरकारसहीत पाक लष्कर व गुप्तचर संस्था आयएसआय असे सगळेच मोदीं-शहांच्या व्यापक कारस्थानाविषयी अंधारात राहून गेले. म्हणूनच अवघ्या दोन दिवसात इम्रान व कुरेशी या दोघांनी मराठी भाषा शिकून घेतली व खलबतेही मराठीतूनच केल्याचे समजते. ३७० कलम रद्द करण्याचा भाजपाचा अजेंडा खुप जुना असला, तरी मोदी-शहांनी शिजवलेले कारस्थान गुजराती भाषेत बोलून निश्चीत केले होते आणि त्याचा पहिला व एकमेव गौप्यस्फ़ोट मराठीतून झाला होता. कारण त्या व्यापक कटाचे मराठीतून विश्लेषण ज्येष्ठ संपादक कुमार केतकरांनी लोकसभा निवडणूकांपुर्वीच केलेले होते. आपले तिकडे दुर्लक्ष झाल्याने कुरेशी व इम्रान आता कपाळावर हात मारून घेत आहेत.

पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल्ला बासित यांनी हे कारस्थान खुप जुने असल्याचा खुलासा नुकताच केलेला आहे. भाजपाचे सरचिटणिस राम माधव यांची  बासित यांनी भारतात असताना भेट घेतली होती आणि त्यांना हुर्रीयत वगैरे विसरून जाण्याचा सल्ला माधव यांनी तेव्हाच दिलेला असल्याचे बासित आता सांगत आहेत. त्यामुळे या व्यापक कटाची व्याप्ती आपल्या लक्षात येऊ शकते. ह्या कारस्थानामध्ये केवळ मोदी वा शहाच नाहीत, तर आंतरराष्ट्रीय शक्ती असल्याचा खुलासा वर्षभरापुर्वी कुमार केतकर यांनी एका व्याख्यानातून केलेला होता. त्यानंतर त्यांनी त्याचे अनेक खुलासे केले. पण मराठीतून त्यांनी मते प्रदर्शित केल्याने, कुणा इंग्रजी माध्यमाने त्याची फ़ारशी दखल घेतली नाही आणि पाकिस्तानसह भारतातले पाकप्रेमी त्या उदबोधक माहितीपासून वंचित राहिले होते. बरखा दत्तपासून रविशकुमार वा राजदीप सरदेसाई यांच्यापर्यंत कोणाला त्या मराठीतल्या गौप्यस्फ़ोटाच गवगवा करण्याची गरज वाटली नाही. सहाजिकच तो विषय मराठी माध्यमांपुरता किंवा अग्रलेख खरडण्यापुरता मर्यादित राहिला. अन्यथा कधीच आयएस्आयने त्यावर गंभीरपणे काम सुरू केले असते. उर्दु भाषांतर करून इम्रानना पुर्वकल्पना दिली असती. जनरल कमर बाजवा यांना रणनिती बनवून श्रीनगरपर्यंत सेनेची ‘जैश’पुर्ण तैनाती केली असती. पण पाकचे इथले सर्व हितचिंतक इंग्रजीबाधित आल्याने केतकरांच्या व्यापक कटाची व्याप्ती मराठीच्या पलिकडे जाऊ शकली नाही. परिणामी पाकिस्तान व्यापक कटाचा तपशील मिळण्यापासून वंचित राहिला होता. चर्चा मराठी जगतापुरती मर्यादित राहिली, तरी कारस्थान मात्र विश्वव्यापी होते. अन्यथा ती कलमे रद्द झाल्यावर अवघ्या जगातून पाकिस्तानला एकाकी पाडण्याची नामुष्की कशाला आली असती? आज मराठी भाषा शिकण्याची इम्रान व कुरेशी यांच्यावर वेळ कशाला आली असती?

नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधानपदी आणणे हा जागतिक पातळीवरचा व्यापक कट होता, याचा सुगावा लागलेला कुमार केतकर हा जगातला एकमेव विचारवंत, अभ्यासक, संपादक होता. आपण मराठी आहोत म्हणून आपल्याला सर्वात आधी त्या कारस्थानाचा सुगावा लागला होता. पण मराठीतल्या बीबीसी वा द प्रिंट, द वायर इत्यादी पोर्टलांनीही केतकरांच्या त्या गौप्यस्फ़ोटाचा इतर भाषेत गवगवा केला नाही. पर्यायाने आयएसआयला अशा मोक्याच्या माहितीपासून वंचित ठेवले. मात्र व्यापक कटाचा गौप्यस्फ़ोट करणार्‍या केतकरांनी त्यातला गाभा जाहिर केला नव्हता. मुळातच ३७० कलम रद्द करणे हा कावा होता आणि तेवढ्यासाठीच मोदींना पंतप्रधानपदी आणावे, असा घाट घातला गेला होता. त्यांनी सत्तेत आल्यापासून त्याची पुर्वतयारी सुरू केली आणि राम माधव यांना काश्मिरची जबाबदारी देऊन तिथे मुफ़्ती व भाजपाचे संयुक्त सरकार सत्तेत आणले. हुर्रीयतला संपवण्याची ती पहिली खेळी होती. नंतर भाजपा मंत्र्यांनी एकत्रित राजिनामे देऊन मुफ़्तींवर राजिनाम्याची सक्ती करणे, हा त्या व्यापक कटाचा दुसरा भाग होता. इतके पहिल्या पाच वर्षात केल्यावर दुसर्‍या लोकसभेत अमित शहांना लोकसभेत निवडून आणून गृहमंत्रीपदी बसवणे, हा कटाचा पुढला भाग होता. एकदा तितके झाल्यावर ३७० कलमाची खैर नव्हती. त्याची शाश्वती फ़क्त केतकरांना वाटलेली होती. म्हणून ते मोदी पुन्हा जिंकले तर वाटोळेच होईल, असे इशारे एबीपी माझाच्या काट्ट्यावरून देत होते. पण इशारे पुन्हा मराठी भाषेतून दिलेले आणि पाकिस्तान वा दिल्लीत कोणी कट्ट्याकडे ढुंकून बघणारा नसल्याने केतकरांचे सगळे इशारे हवेत विरून गेले. इम्रान, कुरेशी किंवा जनरल बाजवा केतकरांचा इशारा समजून घेण्यापेक्षा दिल्लीच्या ल्युटीयन्स पत्रकारांनी उभारलेल्या मुर्खांच्या नंदनवनात बागडत राहिले आणि व्हायचे ते होऊन गेले. व्यापक कट यशस्वी झाला ३७० कलम संपुष्टात आले.

अर्थात चुक केतकरांची नाहीच. त्यांनी योग्यवेळी पाकिस्तान वा आयएसआयला धोक्याचा इशारा दिलेला होता. पण इम्रान वा कुरेशींना मराठी येत नसेल वा समजणार नसेल, तर तो दोष केतकरांच्या माथी कशाला मारता येईल्? किमान इतर कोणी नाही तरी सुधींद्र कुलकर्णींनी केतकरांच्या इशार्‍याची दखल घेऊन मणिशंकर अय्यरना जागे करायला हवे होते. सुधींद्रना मराठी कळते आणि त्यांना हा इशारा नॅशनल हेराल्डमध्ये प्रकाशित करता आला असता. आपोआप तो राहुल गांधींच्या नजरेत भरला असता आणि ल्युटीयन्स दिल्लीच्या माध्यमे व पत्रकारांनी उभारलेल्या नंदनवनातून राहुल बाहेर पडले असते. कन्हैयाशी झिम्माफ़ुगड्या खेळायचे सोडून, त्यांनी मोदींच्या कारस्थानात लक्ष घातले असते. पण त्यांना राफ़ायलच्या विमानातून झेपावण्यातून सवड नव्हती, की त्यांचे ते कागदी विमान उडवण्यासाठीचे इंधन गोळा करण्यातून सुधींद्रना केतकरांचे भविष्य ऐकायला मोकळीक मिळू शकली नाही. पर्यायाने केतकर वगळता बाकी सगळे ल्युटियन्स दिल्लीतल्या मुर्खांच्या नंदनवनात खेळत राहिले आणि आता शाह महंमद कुरेशी यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. त्यांनी जाहिरपणे आता पाकिस्तानी पत्रकार, बुद्धीमंत किंवा राजकारण्यांना ‘मुर्खांच्या नंदनवनात’ राहू नका, असा इशारा दिलेला आहे. ते मुर्खांचे नंदनवन कुरेशींना कुठे गवसले? जिथे मणिशंकर, चिदंबरम, दिग्विजय, इत्यादी प्राण्यांचे संग्रहालय उभारलेले आहे, तिथेच असे नंदनवन असू शकते ना? असे प्राणी सहजगत्या भेटू शकतात वा त्यांच्याशी संवाद साधला जाऊ शकतो, तेच नंदनवन असणार ना? कुरेशी इम्रान तिथेच भरकटले आणि केतकरांचा इशारा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. म्हणून तर कुरेशी पाकिस्तानला इशारा देत आहेत. यापुढे मुर्खांच्या नंदनवनात बागडू नका. त्यासाठी मराठी शिकावे लागेल असेही त्यांच्या लक्षात आलेले आहे. बहुधा त्यासाठी नवे विद्यापीठ काढून केतकरांना तिथे कुलगुरूही नेमले जाऊ शकेल.

अर्थात केतकरांचा उपयोग यापेक्षाही मोठा होऊ शकतो. मोदी हा केवळ भारताचा पंतप्रधान नाही, तर जागतिक व्यापक कटाचा भाग असल्याचे सत्य सांगण्याची हिंमत ज्याच्यापाशी आहे, असाच कोणीतरी पाकिस्तानला आता चक्रव्युहातून सोडवू शकणार आहे. बहुधा त्याच दिशेने गोपनीय खलबते करण्यासाठी इम्रान-कुरेशी यांनी मराठी भाषेत परस्परांशी संवाद केलेला असावा. आता राष्ट्रसंघ आपल्या मदतीला येणार नाही, किंवा तिथे कोणी आपल्यासाठी हार घेऊन उभा नाही. जगातले मुस्लिम देशही आपल्याला आता कुठली मदत करू शकणार नाहीत. तेव्हा मुर्खाच्या नंदनवनातून आपल्याला बाहेर पडावे लागेल, असे कुरेशी म्हणतात. मग जायचे कुठे? पाकिस्तानला मदत कोण करणार? आज ३७० रद्द करून हुर्रीयत पाठोपाठ अब्दुल्ला व मुफ़्तींची हुकूमत संपवणरे मोदी-शहा; उद्या पाकिस्तानातून जैश, तोयबांनाही संपवण्याचा धोका आहे. मग पाक राजकारण्य़ांनी व लष्करी अधिकार्‍यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचे? जेव्हा अशी परिस्थिती येते, तेव्हा काय करावे? मराठी शिकत असल्याने आता कुरेशींना मराठी म्हणीही ठाऊक झाल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान इम्रानला त्यापैकी एक समजावली. बुडत्याला काडीचा आधार असे मराठीत म्हणतात. तसा पाकिस्तानला आता जगात फ़क्त भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचा आधार आहे. इम्रान चकीत होऊन कुरेशींकडे बघत राहिला. तर उत्तेजित होऊन कुरेशींनी त्याला समजावले. तोयबा जैशवाल्यांना मोदी-शहांनी गोळ्या घालून संपवले. हुर्रीयतला आर्थिक गुन्ह्यात् अडकवून आटोपले. कर्फ़्यु लावून अब्दुल्ला मुफ़्तींना गजाआड टाकले. राहिले कोण? भारतात आजकाल पाकिस्तानसाठी लढतो आहे कोण? कॉग्रेसच ना? मग त्यांच्याखेरीज आपल्याला पर्याय उरलेला नाही. म्हणून आता पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरती कुमार केतकरांची नेमणूक करावी, जनाब इम्रानखान! हे ऐकून आठवड्याभरात प्रथमच इम्रानच्या कपाळावरील आठ्या कमी झाल्या.

53 comments:

  1. अप्रतिम बहुधा केतकर जातील तिकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून . नाहीतरी इथे काही काम नाही सध्या जाऊदेत .

    ReplyDelete
  2. भाऊ,ही तर कमालीच्याही वरची कमाल झाली!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  3. भाऊ,
    काँग्रेस आणि पाकिस्तान दोघांना मलम पाठवून द्याच!हे वाचून खूपच दुखत असणार...

    ReplyDelete
  4. भाऊ, तुम्ही तर उपरोधाची परिसीमा गाठली....👌👍

    ReplyDelete
  5. किती माराल😊😊😊

    ReplyDelete
  6. भाऊ आता आत्मचरित्र येऊ द्या.अनेक वाचक उत्कंठतेने वाट पाहत आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ ............कुमार केतकरांना एवढ्या ' क्रूरपणे ' गुदगुल्या कोणी केल्या असतील असे वाटत नाही. लेख नेहमीप्रमाणे एकदम झकास !! केतकर आता ' कटाच्या आमटीचा ' भुरका मारतानाही अनेकवेळा विचार करतील असे वाटते.

    ReplyDelete
  8. Great Bhau. Remarkably worded satire. Ketkar , ABP etc are thoroughly exposed. Atleast Ketkar should retire from his dirty anti Nationals politics.

    ReplyDelete
  9. लेख वाचतांना हसू आवरत नाहीये.

    ReplyDelete
  10. अस्खलीत "पाणउतारा" यालाच म्हणतात.

    ReplyDelete
  11. वा भाऊ, प्रहसन आवडले. शेवट तर एकदम भन्नाट !'पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरती कुमार केतकरांची नेमणूक करावी, जनाब इम्रानखान! ' वा काय सुंदर कल्पना आहे.

    ReplyDelete
  12. 'मुर्खांच्या नंदनवनात राहू नका' हा भारतातील पाकिस्तानी गुप्तहेरांना इशारा असू शकतो का?

    ReplyDelete
    Replies
    1. अरेरे. कुमारकेतूंनी पर्सनली स्वतः केलेल्या वेदकालीन असलेल्या पाचपाखडी ते घंटाळी या भुयाराच्या उत्खननात उकरून उकरून काढलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापक कटाच्या दस्तावेजाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच पाकिस्तान व काँग्रेस वर ही परिस्थिती आली आहे.

      Delete
  13. एक व्हिडिओ बघितला, स्पष्ट नावे घेतली आहेत अरुंधती रॉय, ममता बॅनर्जी, काँग्रेस पक्ष ईत्यादी. लाज वाटते आणि राग ही खूप येतो

    ReplyDelete
  14. सौ सोनार की एक लोहार की... kaddak भाऊ

    ReplyDelete
  15. भाऊ भाऊ.....जरा थांबा...1 लेखात किती पक्षी(विरोधक) मारताल

    ReplyDelete
  16. Ultimate! याहून अधिक शब्दिक मार असूच शकत नाही.

    ReplyDelete
  17. भाऊ म्हणजे ग्रेटच ह

    ReplyDelete
  18. एकदम झकास....लेख वाचतांना हसू आवरत नाहीये.👌😂😆

    ReplyDelete
  19. भाट झालेत खरे पण उध्वस्त साम्राज्याचे. विकली जाणारी टोळी भारतातून लौकर बाहेर पडो .

    ReplyDelete
  20. अगदी ठेवणीतले फटकारे काय असू शकतात याची प्रत्यक्ष अनुभूती दिल्याबद्दल भाऊंचे आभार!!

    ReplyDelete
  21. कुमार केतकर हेच desrve करतात त्यांना एकदम रॉयल चपराक दिली आहे पण डोक्यात शिरले तरचा प्रश्न आहे

    ReplyDelete
  22. Far Sundar Bhau.
    Mast shaljoditun hanala Sampurna gangla.pan jyanchyavar lihilay te koni sudharnar nahit. Tyanchi rojiroti pakchi tali uchalnyat ahe.

    ReplyDelete
  23. यालाच मराठीत "शालजोडीतले"म्हणतात..हो ना?

    ReplyDelete
  24. भाऊ, केतकरांची खरच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमणूक झाली तर...
    मग राष्ट्रीय कॉंग्रेसचे काय होईल?

    ReplyDelete
  25. खूपच छान भाऊ.

    ReplyDelete
  26. वा वा वा काय ठोकलय भाऊ, अगदी १०० मारून १ मोजलाय.

    ReplyDelete
  27. भाऊ अप्रतिम,उल्लेखनीय,उपहासात्मक लेख.त्रिवार अभिनंदन.

    ReplyDelete
  28. पूणेरी शाल जोडी भन्नाटच

    ReplyDelete
  29. कुमार केतकरांचे आजवरचे सर्वोच्च वस्त्रहरण म्हणजे हा लेख!

    ReplyDelete
  30. 🤣 खूप हसलो भाऊ

    ReplyDelete
  31. भाऊ, अप्रतिम!! बुडवून बूडवून मारलंय!!

    ReplyDelete
  32. भाऊ, आजचा लेख अप्रतिम आहे. अनेक दिवसांनी उपरोधित भाषेचा आनंद घेता आला.
    आता याच "व्यापक कटाअंतर्गत",आता महेंद्रसिंग धोनीला जर जम्मू आणि काश्मीरचा मुख्यमंत्री केलं तर या विद्यावाचस्पति मंडळींंचे राजकीय ज्ञान संपूष्टात येऊन, हे नक्कीच दिवाळखोरी जाहीर करतील.
    पुन्हा एकदा, छान लेख!

    ReplyDelete
  33. पुढिल आठवड्याचे आकर्षण...."(संगीत) केतकरांचे वस्त्रहरण किंवा (संगीत) कुमार असंभव...सुप्रभात 😁😁😁

    ReplyDelete
  34. वाः छानच !
    गंभीरते कडून विनोदाकडे नेणारा हा विचार ,खूप करमणूक करून गेला !

    ReplyDelete
  35. त्यांना सुमार केतकर म्हटले तर योग्य होईल

    ReplyDelete
  36. थेट बोल समजत नाहीत त्यांना उपरोध काय समजणार

    ReplyDelete
  37. त्यांना कुणीतरी नीट आठवण करून द्यायला हवी की, "बाब्बौ, तुमचे नाव 'केत'कर आहे, 'कट'कर नाही म्हणून.."
    अर्थात् त्यांच्या नावातच "मार" आहे आता तर ते तरी काय करणार [मार] खाण्याशिवाय म्हणा...

    बाकी तुमचा लेख वाचून एक प्रश्न पडलाय.. ते ***ची कातडी सोलणे म्हणजे यालाच म्हणतात काय हो? _/\_

    ReplyDelete
  38. भाऊ, केतकर यांच्या विषयी एक मजेदार गोष्ट तुम्हाला नक्कीच महित असेल. ती म्हणजे केतकरानी महाराष्ट्र टाइम्स चे सम्पादकत्व गोविन्द तळवळकरां सारख्या कडून घेतले होते.

    ReplyDelete
  39. भाऊ, केतकर यांच्या विषयी एक मजेदार गोष्ट तुम्हाला नक्कीच महित असेल. ती म्हणजे केतकरानी महाराष्ट्र टाइम्स चे सम्पादकत्व गोविन्द तळवळकरां सारख्या कडून घेतले होते.

    ReplyDelete
  40. छानच भाऊ...पण हे लोक इतके कोडगे आहेत ...कितीही फटके मारले तरी त्यांचे कु उद्योग चालूच राहतात

    ReplyDelete