Sunday, October 6, 2019

व्यावसायिक चळवळी

अफ़रोज शहा माहिती आहे कुणाला?

Afroz Shah, the man behind the clean-up of Mumbai’s Versova beach, is now looking for other locations in the city that need to be cleaned.

मुंबई मेट्रोची कारशेड उभी करण्यासाठी आरे येथील काही भागात झाडे तोडून मार्ग काढण्यात आल्यावर जे रणकंदन माजले. त्यात माध्यमांची भूमिका अतिशय मोलाची ठरावी. कारण आजकाल अशा आंदोलनकर्ते व चळवळ्यांमध्ये एक व्यावसायिकता आलेली आहे. पुर्वीच्या कालखंडात विविध समाज घटकातून अनेक समाजसेवक उदयास आले. त्यांना कोणी प्रशिक्षित केलेले नसायचे किंवा त्यांना आंदोलने उभी करण्यासाठी कोणी आर्थिक पाठबळ दिले, असे होत नसे. समाजातील कुठल्या तरी गैरलागू रुढीपरंपरा किंवा कुठल्या तरी नव्या योजनेतून सामाजिक अन्यायाने चिडून उभे रहाणारे लोकच समाजसेवक मानले जात. महात्मा गांधी त्यापैकीच एक होत. त्यांना कुठल्या कॉलेज वा महाविद्यालयात आंदोलनासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले नव्हते, किंवा कुठल्या जागतिक संस्थेने आर्थिक पाठबळ दिलेले नव्हते. पण दुर्दैव असे आहे, की आजकाल जे कोणी त्याच महात्म्याचे नाव घेऊन चळवळी उभारत असतात आणि गांधी विचाराचे हवाले देत असतात, त्यांना गांधींच्या साधनशुचितेचा पत्ताही नसतो. त्यांनी चळवळ हा आपला व्यवसाय बनवलेला आहे. जेव्हा नियम कायदे त्यांच्या बाजूने कौल देतात, तेव्हा त्याला न्याय म्हणायचे आणि तोच कौल आपल्या विरोधात गेल्यावर मात्र त्याच कायदे व नियमांना आव्हान देऊन अन्यायाचा डंका पिटायचा. ही फ़ॅशन झालेली आहे.

मुंबईत पर्यावरणाचा सत्यानाश झाला आहे, याविषयी दुमत होण्याचे कारण नाही. पण हा पर्यावरणनाश गेल्या दोनपाच वर्षात झालेला नाही. गेल्या पन्नास वर्षात मुंबईची लोकसंख्या सतत वाढत राहिल्याने आणि इथे लोटणारे मानवी लोंढे थोपवले गेले नाहीत, म्हणून हा पर्यावरण विनाश ओढवला आहे. पवई किंवा अन्य उपनगरातील वाढलेली लोकसंख्या पर्यावरणाचा सत्यानाश करूनच वाढलेली आहे. कित्येक चौरस मैलाच्या खाड्या बुजवल्या गेल्या आणि तिवरांच्या कत्तलीवर शेकडो गृहप्रकल्प व संकुले आज उभी आहेत. बारकाईने शोध घेतला तर पर्यावरणाचा तमाशा उभा करणार्‍या अनेक नामवंतांचे वास्तव्य अशाच कुठल्यातरी ऐसपैस संकुलातले आढळून येईल. जगभर अशा जनहित आंदोलनांचा फ़ड रंगत असतो आणि त्याला मोठे आर्थिक पाठबळ मिळत असते. त्यांच्यामागे नेमके कोण लोक सुत्रे हलवित असतात, त्याचाही शोध घेतला गेला पाहिजे. कालपरवा ग्रेटा नावाच्या सोळासतरा वर्षाच्या मुलीचे राष्ट्रसंघात पर्यावरण रक्षणासाठी भाषण झाल्याचे खुप कौतुक आहे. तिच्यावर तिरकस टिप्पणी केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप टिकेचे लक्ष्य झाले. पण तिच्या कौतुकाने अस्वस्थ झालेले तेच एकटे राष्ट्रप्रमुख नाहीत रशियाचे पुतिन व अन्य लोकांनीही त्या मुलीचा गाजावाजा करण्याविषयी शंका घेतल्या आहेत. म्हणूनच अशा व्यावसायिक चळवळीकडे नव्याने बघण्याची गरज आहे.

याच मुंबईत शेकड्यांनी लोक फ़लक घेऊन ‘आरे वाचवा’ म्हणून उभे राहिले. अर्थातच हातात फ़लक घेऊन उभे रहाणे सोपे असते. जत्रेला जाऊन किंवा मनिऑर्डरने पैसे पाठवून अभिषेक करणारी देवभक्ती सर्वत्र सारखीच असते. पायी वारी करणारे आणि घरात बसून जगातल्या कुठल्याही देवाचे दर्शन घेत भक्तीभावाचे प्रदर्शन मांडणारे यात मोठा फ़रक असतो. या फ़लक झळकवणार्‍यापैकी कितीजणांनी आपले तेच हात अफ़रोज नावाच्या तरूणाच्या मदतीसाठी झिजवलेले आहेत? कदाचित त्यांना अफ़रोज नावाचा कोणी पर्यावरणवादी असल्याचेही माहिती नसेल. कारण तो फ़लक झळकवणारा पर्यावरणप्रेमी नाही. शक्य असेल तितका वेळ कामधंद्यातून काढून मुंबईच्या अनेक चौपाट्यांना प्लास्टीकमुक्त करण्याचा वसा घेतलेला प्रामाणिक मुंबईकर आहे. त्याला हे काम कोणी सांगितले नाही की शिकवले नाही. कधीकाळी तोही पर्यावरणाच्या नाशाने चिंतीत झालेला एक तरूण होता. वकिलीचा व्यवसाय करतानाच चौपाटीवर फ़िरताना, प्लास्टीकचा कचरा समुद्राला वेढा घालत असताना बघून तो बेचैन झाला. तरीही वकील असूनही त्याने जनहित याचिका करून पर्यावरण जपण्याचा विचार त्याच्या मनाला शिवला नाही. त्याने एका रविवारी उठून नजिकच्या चौपाटीवर प्लास्टीकचा कचरा गोळा करायला सुरूवात केली. त्यासाठी आवाहन केले नाही किंवा डंका पिटला नाही. एकला चालोरे करताना कुतूहलाने बघणारे अनेक तरूण तरुणी त्याच्यासोबत येत गेले आणि आता अनेक चौपाट्या साफ़ करणारी फ़ौज गोळा झालेली आहे.

हे लोक सरकार, महापालिका यांच्या नावाने शिमगा करीत नाहीत, की सामान्य नागरिक कचरा फ़ेकतात म्हणून शिव्याशाप देत नाहीत. कुणाला शिस्तीचे धडे देत नाहीत, किंवा सरकार दरबारी कायदे कठोर करण्याचीही मागणी करीत नाहीत. आपल्याला जमेल तितके पर्यावरणाचे रक्षण करण्याकडे त्यांचा कल आहे आणि त्यांच्या अशा प्रयत्नांना कुठेही मोठी प्रसिद्धी मिळालेली नाही. पण अफ़रोजच्या या कामासाठी पर्यावरणातील मोठे लक्षणिय कार्य, म्हणून त्याला अनेक जागतिक संघटनांनी प्रशस्तीपत्रके देऊन गौरवही केला आहे. त्यासाठी अफ़रोज कुठे मिरवायला जात नाही किंवा बुडणार्‍या पृथ्वीला आपणच वाचवतो आहोत; असा त्याचा अभिनिवेशही नाही. तोच अफ़रोज मुंबईकर असूनही ‘आरे वाचवा’ असा फ़लक घेऊन त्या गर्दीत कुठे उभा दिसला नाही. त्याच़्या चौपाटी साफ़ करणार्‍या फ़ौजेलाही आरे वाचवण्याचे अगत्य वाटले नाही. हाच सर्वात मोठा वा लक्षणिय फ़रक आहे. व्यावसायिक समाजसेवक आणि प्रामाणिक समाज सुधारक, याची ओळख अशा फ़रकातून होत असते. आता तर न्यायालयलाही त्याची जाणिव झालेली आहे. अन्यथा ‘आरे वाचवा’ म्हणून या़चिकाकर्त्याला कोर्टाने ५० हजार रुपये दंड कशाला ठोठावला असता?

26 comments:

  1. खरय भाउ

    ReplyDelete
  2. भाऊ अत्यंत परखड पणे मांडले व या भाडोत्री व ढोंगी पर्यावरण प्रेमींचे वस्त्रहरण केले हे फार बरे झाले, सगळ्या तथाकथित वार्ताहर व स्तंभ लेखकांनी २७८५ झाडे शासनाने पोलिस बंदोबस्तात तोडली व पर्यावरणाचा ह्रास केला असा गळा काढला आहे ,एकानेही सत्य मांडायची तसदी घेतली नाही हे दुर्दैव.हा मेट्रो ३ प्रकल्प अत्यंत महत्वाकांक्षी व गरजेचा व मुंबईकर प्रवाशांसाठी वरदान ठरणारा आहे .खरतर असे प्रकल्प फार आधिच व्हायला पाहिजे होते पण आधिच्या शासन कर्त्यांनी मुंबईकरांना नेहमी गृहीत धरले व रेल्वेच्या जीवघेण्या प्रवास करण्यास भाग पाडले.वृक्षतोडीला विरोध करणारे बाँलीवुडकर व तत्सम अन्य NGO चालवणारे कधिही लोकलने जीवघेणा प्रवास करत नाहीत व नेहमी स्वतःच्या ए.सी.आलीशान गाडीने व विमानाने प्रवास करतात त्यांना मेट्रोशी काही देणेघेणे नाही.आज मेट्रो ३चे जे काम चालले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे व MMRDAच्या अध्यक्षा सौ.अश्विनी भिडे व त्यांचा समस्त सहकारी वृंद यांचे अभिनंदन .

    ReplyDelete
  3. Very well said Bhau. People want vikas,better transportation,better life than forest.

    ReplyDelete
  4. भाऊ, मी असे वाचले आहे की, आरेची प्रस्तावित जागा काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन चर्च किंवा दफनभूमीला दिली होती. नेहमीप्रमाणेच बरीच वर्षे ती जागा त्यांच्याकडे पडून होती (हा बऱ्याच संस्थांचा उपक्रम असतो अल्पदरात व फुकटात महत्वाच्या ठिकाणच्या जागा काहीतरी सामाजिक कामासाठी सरकारकडून घ्यायच्या आणि न वापरता ठेऊन द्यायच्या व बराच काळ गेला की व्यापारी वापर करुन पैसे कमवायचे) वापर करण्याची मुदत संपलेली होती. मेट्रोला गरज आहे म्हणून या जागेकडे सरकारचे लक्ष गेले व जमीन काढून घेतली व मेट्रोला दिली. तेव्हापासून हे आंदोलन पर्यावरण बचाव या नावाखाली सुरू झाले. ख्रिस्ती मिशनरी शाळा व्यवस्थापनानी तर मुलांच्या पालकांना या आंदोलनात उतरायच्या सुचना दिल्या. आतासुद्धा हायकोर्टाने सर्व याचिका नाकारून याचिकाकर्त्यांना ५०००० रु. दंड लावला तरीही मिडिया व सोशल मिडियावर जोरदार आघाडी उघडलेली आहे आणि बरेच भाजपसरकार विरोधी लोक तेल ओतत आहेत.

    ReplyDelete
  5. अगदी योग्य विश्लेषण. अशा'आंदोलनाचे'फोटो पेपर मध्ये येतात. त्यांत 10जण फलक घेऊन उभे असतात. फलकावर मजकूर वाचता येईल इतक्या जवळून फोटो असतात. ह्या ढोंगीपणा वर योग्य लिहिले आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  6. कोणत्याना कोणत्या कारणाने सारखे समाज माध्यमांनमध्ये झळकण्याचे व्यसन सामाजिक कार्यकर्ते,राजकीपक्ष-सत्तेत नसताना विशेषतः विरोधात असणारे हे प्रसिध्दी साठी प्रयत्नशील असतातच.
    जसे सभेसाठी, मोर्च्या साठी लोकांना पैसे देऊन गोळा केले जाते तसेच येथे ही करत असावेत.चॅनल वाले आशयाच्या बाईट्स घ्यायला जात नाहीत. तसे केल्यास आंदोलकांचे पितळ नक्की उघडे पडले.
    लेख खूप आवडला.

    ReplyDelete
  7. पटलं नाही भाऊ, जे चूक आहे ते चूकच आहे, तुम्ही आजकाल जरा जास्तच सरकारच्या बाजूने लिहीत आहात.

    ReplyDelete
    Replies
    1. वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.

      Delete
    2. वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.

      Delete
    3. २६०० झाडांची कत्तल करणे अजिबात पटले नाही.

      Delete
    4. महाशय तुम्ही ज्या घरात,गल्लीत राहता तिथे काय पाहिले वाळवंट होते का? तुमचे घर,गल्ली मध्ये पण पाहिले हजारो झाडे होती,लाज नाही वाटत का झाडे कापून तिथे घर बनवून राहायला.हे फालतू रिकामटेकडे लोक 2700 झाडांसाठी जितका वेळ आंदोलन आणि पाट्या घेऊन नाटक करत आहेत तितका वेळ जर झाडे लावण्यासाठी दिला असता तर लाखो झाडे लावली गेली असती.

      Delete
    5. खरंय भाऊ तुमचं .पुर्ण मुंबईत अफरोज शहा हाच एकमेव पर्यावरण प्रेमी उरलेला आहे . त्यामुळे तो जर सामील होत नसेल तर आरेचं आंदोलन धंदेवाईकच मानलं पाहीजे .

      Delete
  8. aamhi sarkaarla pathheemba deto metro saathee

    ReplyDelete
  9. Costal road विरोध
    Metro विरोध
    Bulllet train विरोध
    नाणार Oil refinery विरोध
    जैतापूर प्रकल्प विरोध

    आणी वरुन
    रोजगार नाही बोंबलायच
    ट्रफीक जामवर बोंबलायच
    विकास नाही बोंबलायच

    ReplyDelete
  10. 'बारकाईने शोध घेतला तर पर्यावरणाचा तमाशा उभा करणार्‍या अनेक नामवंतांचे वास्तव्य अशाच कुठल्यातरी ऐसपैस संकुलातले आढळून येईल.'

    हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. झाडे कापणाऱ्या एखाद्या बिल्डरला विरोध केला तर फटके पडतील, खून सुद्धा होऊ शकतो. सरकारला विरोध करणे सोपे असते. कुत्री मारू नका किंवा याकुबला फाशी देऊ नका म्हणून कोर्टात जाणारे याच जातीचे.

    ReplyDelete
  11. सरकारचे कुठलेही विकासकाम संपूर्ण होऊ द्यायचे नाही असा वसा डाव्या चळवळीने प्रथमपासूनच घेतलेला आहे त्यातून सरकार कसे नाकर्ते आहे हे त्यांना सिद्ध करण्याची घाई झालेली असते. आणि त्यातून आम्हीच कसे अत्यंत स्थिर सरकार देऊ शकतो हे त्यांना लोकांच्या मनात बिंबवायचे असते. साधे गणित आहे आरे मधून जर मेट्रो जाऊ लागली तर तिथून रोज प्रदूषण करत जाणारी किमान चार ते पाच लाख वाहने जाणे कायमचे बंद होणार आहे. परंतु काहीतरी निमित्त करून सरकारला घेणे हेच डाव्यांचे काम आहे आणि केवळ विरोधाला विरोध म्हणून शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या संघटना देखील त्यांना सामील होतात यासारखे दुसरे दुर्दैव काय

    ReplyDelete
  12. झाडे तोडणे केव्हाही चूकच. न्यायालयाने सर्व मुद्दे विचारात घेऊन निर्णय दिला असणार. . आता नेते मंडळी जेथे राहतात ते एकेकाळी जंगल किंवा खाडी चाच भाग होता. झाडे, खारफुटी तोडून बंगले बांधले आहेत . असा विरोध करत बसला तर मेट्रो कधीच होणार नाही. नेते लोकांना लोकल ट्रेन मधून प्रवास करावयास लागला कि त्यांना मेट्रोचे महत्व कळेल. जंगलात , नदी , नाल्यावर , खारफुटीवर झोपड्या,अनधिकृत बांधकामे उभी राहतात त्यावेळी पर्यावरणाचा विचार येत नाही. आरे मध्ये सुद्धा अनधिकृत बांधकामांना कोणाचे संरक्षण आहे याचा सुद्धा विचार करावा. यंदाच्या पावसात अंबरनाथ,बदलापूर आदी भागात जेंव्हा पूर आला तेंव्हा अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी कोणी पर्यावरणवाल्यानी , राजकारणी लोकांनी आंदोलन केले नाही. पूर्वी कळवा आणि मुंब्रा या दरम्यान एकही बांधकाम नव्हते. आता सगळं पारसिक चा डोंगर साफ करून झोपडपट्टी उभी राहिली आहे. त्या वेळी पर्यावरण वाले / राजकारणी लोक कोठे होते . राजकारणी त्या लोकांना वीज , पाणी मिळावे म्हणून आंदोलन करीत होते . व त्यांची मते मिळवून आपली पोळी भाजून घेत होते.

    ReplyDelete
    Replies
    1. नेते लोकांना लोकल ट्रेन मधून प्रवास करावयास लागला कि त्यांना मेट्रोचे महत्व कळेल.

      जयंतराव टिळक जेंव्हा मुंबई पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकले तेंव्हा एक्स्प्रेस वे ला चालना मिळाली.

      Delete
  13. ह्यांचा हाच धंदा आहे. ह्यांना नवीन काही केलेलं बघवत तर नाहीच पण करणाऱ्यांनाही हे विरोध करत असतात. बरोबर विश्लेषण

    ReplyDelete
  14. संतोष गोरेOctober 8, 2019 at 3:19 AM

    बरोबर आहे. एकदम बरोबर.

    ReplyDelete
  15. अफरोज या आंदोलनात दिसला नाही म्हणून हे आंदोलन संशयास्पद आहे हे मांडणे भरपूरच खटकले. आफरोज म्हणजे पर्यावरण आंदोलनाचा ISI मार्क आहे का?(आफरोज जे करत आलाय ते अतिप्रशंसनीय आहे ह्यात दुमत नाही)

    ReplyDelete
  16. Bhau,Your very true and logical blogging may irritate many as they are breeded comfortably for decades without being exposed.

    ReplyDelete
  17. वाड्याचे तेल वांग्यावर.
    आफ्रोज शहा म्हणजे काय प्रमाण आहे का? तो ज्या ज्या आंदोलनांना जात नाही ती सगळीच भाडोत्री आहेत काय? अगदी "हौडी मोदी" सुध्दा??

    ReplyDelete