भाजपाच्या अपयशाचेही मूल्यमापन झाले पाहिजे. माझा कल भाजपा किंवा काहीसा शिवसेनेच्या बाजूने असतो, हे मी कधीच लपवलेले नाही. पण याचा अर्थ त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे, मला योग्य वाटत नाही. किंबहूना जिथे खरोखर आपल्या नजिकच्या व्यक्तीची चुक होत असते, तेव्हा अगत्याने त्यावर बोट ठेवण्याला महत्व असते. पण चुकांवर बोट ठेवण्याचा अर्थ कुठल्याही गैरलागू आरोप वा टिकेचे समर्थन असाही होत नसतो. सत्ताधारी पक्ष आहे म्हणून त्याच्यावर टिका केली, म्हणजेच परखड असा नसतो. किंवा विरोधकांच्या कसल्याही खुळेपणाचे समर्थन करण्यालाही निर्भीड समजणे खुळेपणा असतो. त्यामुळे मला मोदीभक्त वा भाजपाला विकला गेलेला ठरवण्याचा राग येत नाही. तसे म्हणणार्याची कीव नक्की येत असते. असो, मुद्दा भाजपाच्या चुकांचा आहे आणि त्याचेही पोस्टमार्टेम योग्यरित्या अजून झालेले नाही. भाजपाला आपल्या असलेल्या जागा जिंकता आल्या नाहीत वा घोषित २२० जागांचा पल्ला युतीला गाठता आला नाही. इतके निमीत्त पकडून पराभवाचा आनंदोत्सव साजरा करणेही मुर्खपणाचे आहे. कारण त्यातून भाजपाचेच विरोधक निश्चींत होत असतात. किंबहूना म्हणूनच गेल्या पाच वर्षात विरोध मरगळले आहेत वा पुर्णत: निष्क्रीय होऊन गेलेले आहेत. तथाकथित निर्भीड परखड पत्रकार विश्लेषकांकडून भाजपाच्या नसलेल्या अपयशाचा डंका इतका पिटला गेला आहे, की भाजपा आपोआप पराभूत होणार आणि आपल्याला आयते यश मिळणार; असल्या भ्रमात विरोधकांची पाच वर्षे निघून गेली. म्हणूनच त्या खोट्या वा पक्षपाती टिकेने व टिकाकारांमुळे भाजपाचे नुकसान झाले नाही. पण खर्याखुर्या राजकीय विरोधकांचे नुकसान झालेले आहे. कारण अशा बोगस टिकेने आरोपबाजीने विरोधकांना गाफ़ील करण्याचे पाप त्यांच्या समर्थक माध्यमे व भाटभक्तांनीच केलेले आहे. असो, यावेळच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला पोषक वातावरण असूनही त्यांचा पराभव नाही तरी नुकसान कशाला झाले आहे?
लोकसभा सहजगत्या वा मोठ्या फ़रकाने जिंकली गेली असताना विधानसभेत भाजपाला पोषक वातावरण असल्याचे भाकित करण्यासाठी कोणा ज्योतिषाची वा विश्लेषकाची गरज नव्हती. पण परिस्थिती अनुकुल असली म्हणून आपोआप चमत्कार घडत नाही. त्यासाठी करायचे प्रयत्न, कष्ट व सावधानता सोडून चालत नाही. ते अपयशाला वा हानीला आमंत्रण असते. ते आमंत्रण भाजपाने दिलेले होते, हे कोणी नाकारू शकणार नाही. लोकसभेनंतर चार महिने विधानसभा मतदानाला होते आणि आधीच्या यशावर स्वार होण्यासाठीची तयारी करायला तो भरपूर अवधी होता. युती लोकसभेतच झालेली होती, तर विधानसभेसाठीही जागावाटप उरकून घ्यायला ती उत्तम संधी होती. त्यातून पुढली तारांबळ टाळता आली असती. भले युती करायची नसेल तरी आधीच तसा निर्णय घ्यायचा होता. किंवा युती करायची असेल, तर जागा निश्चीत करून इच्छुकांना उगाच टांगून ठेवण्याचे काहीही कारण नव्हते. पण शिवसेना किंवा इतरांना खेळवण्याच्या उत्साहात किंवा धुर्तपणाचे प्रदर्शन करताना भाजपाने उत्तम संधी मातीमोल करून टाकली. समोर कोणी लढायला नव्हता, हे सत्य असले तरी तो खराखुरा पहिलवान भाजपाच्या मस्तीतूनच निर्माण करण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे. कारण निकाल सांगतात, दुसर्या क्रमांकाच गट वा पक्ष ‘इतर’ म्हणजे अपक्ष बंडखोर आहेत. ज्यांनी प्रचंड मते खाल्ली आणि विरोधकांना कमी मतातही यशाचा पल्ला गाठणे सोपे करून दिले. त्याचा दोष बंडखोरांच्या माथी मारता येणार नाही. त्यांना बंडखोरीला प्रोत्साहित करणारे नेतृत्व त्यातला खरा गुन्हेगार आहे. कारण उशिरापर्यंत त्यांच्या अपेक्षा आकांक्षा टांगून ठेवण्यात आल्या आणि त्यातून अशा इच्छुकांना बंडखोरीला प्रवृत्त करण्यात आले. जणु डिवचण्यात आले. शिवसेना हा धाकटा भाऊ असेल तर थोरला म्हणून भाजपाने समजूतदार वागले पाहिजे. तो शहाणपणा वा परिपक्वता भाजपाला दाखवता आलेली नसेल, तर अपेक्षाभंगाचे खापर भाजपा नेतृत्वावरच फ़ोडले पाहिजे.
जुन वा जुलै महिन्यात युतीपक्षांच्या जागा निश्चीत करण्यात कुठली अडचण होती? बिहारमध्ये नितीश सोबत झालेल्या युतीनंतर लोकसभेच्या दोन महिने आधीच प्रत्येकी १७ जागा आणि इतर मित्रांना ६ जागा असा निर्णय होऊ शकला. मग महाराष्ट्रात जागावाटपाला विलंब लावण्यात कसलाही शहाणपणा असू शकत नाही. किंबहूना तो अतिरेकी मस्तवालपणा म्हणता येईल. आपल्याला कोणी पराभूत करू शकत नसल्याची मस्ती चढली, मग आपणच आपल्या अपयशाची तजवीज करू लागतो. आपला शत्रू आपणच निर्माण करतो. भाजपाने यशाची झिंग चढल्यामुळे ही गंभीर चुक केली. कॉग्रेस व राष्ट्रवादी आपल्याला पराभूत करू शकत नसल्याने जणू आपल्या पराभवासाठी भाजपाच्या मुत्सद्दी नेतृत्वाने बंडखोर अपक्ष नावाचा आपलाच शत्रू उभा केला आणि पदरात अपयश पाडून घेतलेले आहे. वेळीच जागावाटप झाले असते तर सेना वा भाजपा यांच्या इच्छुक उमेदवारांची नाराजी शमवायला भरपूर वेळ मिळाला असता आणि उपलब्ध असलेले यश संपादन करता आले असते. पण ते करण्यापेक्षा भाजपा शरदनितीकडे झुकत गेला अणि पवारांप्रमाणेच स्वत:च्या अपयशाची तजवीज करीत गेला. आपले काही उभे करण्यापेक्षा अन्य कुणाला घरी बसवणे वा त्याचे नुकसान करण्याच्या नादात पवारांनी आयुष्यभर अनेक सुवर्णसंधी मातीमोल करून टाकल्या. भाजपा विधानसभा लढवताना त्याच शरदनितीचा अवलंब करीत गेला नाही का? अन्य पक्षातले नेते फ़ोडून आपल्याकडे आणणे, मित्रपक्षाला जागांच्या वाटपात ताटकळत ठेवणे आणि आपल्याविषयी सहानुभूती वा आपुलकी असलेल्या मतदाराच्याही मनात संभ्रम निर्माण करण्याला रणनिती म्हणत नाहीत. आत्मघातकी हट्टीपणा म्हणतात. निकालांच्या आकड्यावर नजर टाकली तरी भाजपा व शिवसेनेने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचेच निष्पन्न होते. प्रत्येक पक्षाला मिळालेली मते व बंडखोरीला गेलेली मते त्याचे साक्षीदार आहेत.
भाजपाला मिळालेली मते एक कोटी ४२ लाख इतकी आहेत आणि त्यानंतर क्रमांक लागला आहे तो कुठल्या मान्यताप्राप्त पक्षाचा नसून इतर अपक्षांचा आहे. त्या खात्यात एक कोटी २ लाख मते गेलेली आहे. बाकी मित्र वा विरोधी पक्ष कोणी एक कोटीचा पल्लाही गाठू शकलेला नाही. राष्ट्रवादी (९२), शिवसेना (९०) आणि कॉग्रेस (८७) अशी लाखातली मते आहेत. अपक्ष इतरांना इतकी भरघोस मते तेव्हाच मिळतात, ज्यावेळी असे अपक्ष बंडखोर हमखास लोकप्रिय पक्षातून आलेले असतात. म्हणजेच जी एक कोटी मते इतर अपक्ष खात्यात दिसतात, त्यातील ५०-७० लाख मते तरी भाजपा व शिवसेनेच्या बंडखोरांनी खाल्लेली आहेत. त्याला आळा घातला गेला असता आणि त्यातली निम्मी मते जरी भाजपा व शिवसेना आपल्या खात्यात राखू शकले असते, तरी आज दिसणारे जागांचे आकडे कुठल्या कुठे बदलून गेले असते. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत तब्बल तीन महिन्यांचा अवधी त्यासाठी होता आणि आपापल्या इच्छुकांना विश्वासात घेऊन युतीपक्षांनी बंडखोरीला मोकाट रान मिळणार नाही अशी काळजी घेतली असती तर? ती घेतली नसेल तर तो आपल्याच इच्छुकांच्या भावनांशी खेळ केलेला असतो. त्याला नेतृत्वाचा माजोरीपणा म्हणावा लागतो. समर्थ शत्रू समोर नसेल तर आपला नवा शत्रू निर्माण करण्याचा तो मस्तवालपणा म्हणणे भाग आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या किंवा अन्य काही बेछूट आरोपांमुळे युतीला मतदाराने दणका दिला, हा भ्रम आहे. युतीला त्यांच्या मस्तवालपणाने दणका दिला आहे. त्यांच्यातल्याच दुखावलेल्या नाराजांनी युती पक्षांच्या पायात पाय घालून धडा शिकवला आहे. त्यात नवे काहीच नाही. पुर्वी हेच कॉग्रेसच्या बाबतीत व्हायचे. हल्ली भाजपाच्या बाबतीत होऊ लागले आहे. मतदाराला कॉग्रेसच्या मस्तवाल मानसिकतेचा दुसरा पक्ष पक्ष हवा होता, म्हणून जनता भाजपाकडे वळलेली नाही, इतके जरी यातून त्या पक्षाच्या नेतृत्वाल उमजले तरी खुप आहे. अन्यथा त्यांच्या जागी नवा पर्याय उभा करायला मतदार समर्थ असतो, हे विसरता कामा नये. ज्याने सत्तर वर्षात कॉग्रेसला पर्याय म्हणून भाजपा उभारला, तो मतदार भाजपालाही पर्याय निर्माण करू शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. मात्र तो पर्याय कालबाह्य झालेली कॉग्रेस नक्कीच नाही. म्हणून तर भाजपाच्या इतक्या चुका होऊनही कॉग्रेस वा राष्ट्रवादीचे पुनरुत्थान होऊ शकलेले नाही.
Good post..
ReplyDeleteOne question I would like to ask why voters turn to independent candidates other than BJP candidates:
1.Failure of BJP to address voters problem in its 5 year term.
2.And all of reason listed in article
This time voters feel that there is no difference in BJP and other parties because many candidates were imported from other parties
भाऊ, भाजप नेत्यांचा अहंकार हा खुप मोठा दुर्गुण आहे . १९९९, २००४ या दोन्ही वेळेस अहंकारा मुळेच सत्ता गेली होती . आजही सेनेच्या कमित कमी २० जागा भाजप च्या मुर्खपणामुळे कमी झाल्या . फुगवलेले नेतृत्व आणि समर्थ नेतृत्व यामधला हा फरक आहे . चंद्रकांत पाटिल यांनी ज्या पध्दतीने कोल्हापुर सोडुन कोथरुड येथुन उमेदवारी केली ती एक प्रकारे स्वतःच्या लायक नसल्याची च कबुली होती .
ReplyDeleteBhau vanchit mule pan Congress ncp chya 33 jaga geleyatach ki ,tyache Kay?
ReplyDeleteशरद पवार यांनी फार आनंदी होण्याचे कारण नाही. 'क्लीन स्वीप करू' करू असे पवार म्हणत होते पण तसं काहीही झालेलं नाही. पवार त्यांच्या 1995 च्या अनुभवावरून तसे म्हणाले होते; पण अंदाज चुकलाच! 1995ला पवारांनी त्यांच्या पक्षातील म्हणजेच कॉंग्रेसचेच 38 उमेदवार बन्ड्खोरिची जाळे उभारून पाडले होते. म्हणून त्यांना वाटले की महयुतीतील बन्डखोरि त्याना तसा फायदा देईल. पण प्रत्यक्षात वंचित ने त्यांची मते खाल्ली आणि ते क्लिन स्विप मारू शकले नाहीत.
ReplyDeleteकाँग्रेस किंवा राष्ट्रवादी परत सत्तते यावे अशी आमची इच्छा पण नाही
ReplyDeleteघराणेशाहीतील पुत्रमोहात बुद्धी मूढ झाल्याने राष्ट्रपती राजवटीचे सावट येऊ घातलंय असे आपल्याला नाही का वाटत?
ReplyDeleteभाजपला काँग्रेसची घराणेशाही चालत नाही पण शिवसेनेची घराणेशाही मात्र चालते; असे का असावे?
ReplyDeleteमुळात...पुन्हा निर्विवाद बहुमत येण्याची धुंदी डोळ्यासमोर होती....
ReplyDelete1. असंख्य भाजप समर्थक मेगा भरती मुळे नाराज झाले....हर्षवर्धन पाटील, दिलीप सोपल यांनी 1995 ला सत्ता भोगली आणि 1999 ला लगेच कांग्रेस ला पाठिंबा दिला.....15 वर्षे सत्ता भोगुन....पुन्हा सत्ताधारी बनन्यासाठी...भाजपने सेनेने यांना पावन करून घेतले....हेच लोकांना पटले नाही...
2. उदयन राजेंना घेऊन देखील काहीच फायदा झाला नाही....उलट पवारांच्या बाजुने सहानुभूती तयार झाली....
3. अनेक ठिकाणी त्याच पडेल उमेदवारांना किंवा घराणेशाही तिकिट वाटप...
4. खडसे तावडे बावनकुळे यांची तिकीटे कापल्यावर निर्माण केलेली सहानुभूती....खडसे म्हणतात 3 महिने आधीच कळवंल होते तिकिट मिळणार नाही म्हणून....तरी अर्ज भरणे...कालाय तस्मै नमः अश्या क्रुतींनी भाजपाविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली....
मुळात बाहेरून आलेले नेते हे त्यांच्या आधीच्या पक्षात ओवाळून टाकलेलेच होते.त्यामुळे भाजपचा फायदा न होता पक्षातले निष्ठावंत नाराज होऊन नुकसानच झाले.भले उदयनराजे शिवरायांचे वंशज असतील, पण सातार्यात त्यांची काय किर्ती आहे हे सर्व जाणतात. त्यामुळे पक्षांतराचे निमित्त मिळून विरोधात मतदान करण्याचे कारण सातार्याच्या मतदारांना मिळाले असेच दिसते. पावसातले छत्री न घेता केलेले भाषण हे कारण नव्हे. एवढा विश्र्वास असता तर पक्षातला एखादा मातब्बर उमेदवार दिला असता.प्रुथ्वीराज चव्हाणांनी पण विरूद्ध लढण्यास नकार दिला नसता.
Deleteभाऊ, योग्य बोललात. हि मेगा भरती करायला नको होती. आधी आपल्या इच्छूकांना संधी देऊन मग उरलेल्या जागांसाठी कोणी दुसऱ्या पक्षातून आले असते तर जास्ती योग्य ठरले असते. भाजपला खरेतर मेगा भरती नडली आणि त्यामुळेच बंडखोरीही घडली. पण यातून एक बरे झाले कि अनेक जुने नेते घरी बसले आणि नवीन लोकांना संधी मिळाली, अनेकांना अपक्ष म्हणून लढून वयक्तिक ताकद दाखवून देण्याची संधी मिळाली त्यामुळे आता त्यांना कोणी गृहीत धरणार नाही. राष्ट्रवादीच्या (भ्रष्टवादी च्या) नको तितक्या लोकांना घेऊन भाजपने आपले पारंपरिक पण तत्ववादी (माझ्यासारखे) मतदार नाराज केले. आणि आता जी काही चिखलफेक चालू आहे त्यातून युती आपले हिंदुत्ववादी (माझ्यासारखे) मतदार नाराज करते आहे. मोठ्या भावाचा समंजसपणा कोणी दाखवायलाच तयार नाही. एकीकडे राम मंदिराची तयारी, सावरकरांना भारतरत्न याबद्दल बोलायचे आणि दुसरी कडे मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आणि दोन हिंदुत्ववादी पक्षातील दुही यातून मतदाराच्या अपेक्षांवर पाणी पडतंय हे कोणी समजून घ्यायलाच तयार नाही. यासाठी पदरचे ४०० रुपये रिक्षासाठी खर्चून मतदानाला गेले का? निकाल लागल्यावर ४च दिवसात आपल्या मताची किंमत शून्य होते का? यांना राम भक्ती किंवा सावरकर निष्ठेपेक्षा , सत्ताभक्ती आणि पदनिष्ठा अती महत्वाची झालीये. आपण जे आदर्श निर्माण करू पाहतोय त्यांची तत्वे ते आदर्श निर्माण होण्यापूर्वीच अशी पायदळी तुडवण्यातून कोणते सकारात्मक राजकारण घडणार आहे? भाजप आणि फडणवीस सत्तेचा खेळ करून पुन्हा स्वतःसाठी आणखी मोठा खड्डा खणू पाहताहेत. त्यांना सावध करा.
ReplyDeleteभाजप ने १२२ पैकी ४० जागा घालवल्या व २३ नवीन जिंकल्या .
ReplyDeleteघालवलेल्या ४० जागांचा विचार करता असे , मला , आढळले कि ,
१. फक्त ८ जागा सेना/ भाजप बंडखोरांमुळे गेल्या आहेत ,
रावेर,मु.नगर,रामटेक,तुमसर,भंडारा,चांदा,मीरा-भायंदर ,कोल्हापूर (द)
२. ५ जागा : लोकसभा २०१९ पेक्षा ; ३ ते २० हजार मते कमी पडल्याने ''क्लोज फाईट ''
अर्जुनी मोरगाव, डहाणू ,हडपसर, कोपरगाव, वडगाव शेरी
३. ८ जागा :अपक्ष,दोन्ही काँग्रेस व विरोधक लोकसभा २०१९ मध्येही पुढे
अमरावती,दर्यापूर,मेळघाट,अहेरी,राजुरा,विक्रमगड,शिरूर,शिराळा
४. १४ जागा :दोन्ही काँग्रेस व इतर पक्ष लोकसभा २०१९ व विधानसभा २०१४ पेक्षा ताकतवान झाल्यामुळे तसेच युतीची मते लोकसभा २०१९ पेक्षा ५ ते २० हजार घटल्यामुळे
मलकापूर,मोर्शी,काटोल,उमरेड,नागपूर प, नागपूर उ, आमगाव,मावळ,राहुरी,माजलगाव,आष्टी,उदगीर.जत
५. ५ जागा ताकतवान आघाडी / विरोधी उमेदवार
साकोली,नेवासा,कर्जत-जामखेड,परळी,इचलकरंजी
तुमच्या पाँईंट नंबर 1 मध्ये अपुर्ण माहिती आहे...
Deleteनांदेड दक्षिण, करमाळा, हदगाव या जागा पण
अगदी बरोबर
Deleteछान.जिंकलेल्या २३ जागांबद्दल विश्लेषण केलेत तर बरे होईल.
DeletePerfect analysis.
ReplyDeleteफार मार्मिक व अचुक विश्लेषण..भाजपाने नक्कीच बोध घेतला पाहिजे.नशीब...दिल्लीची पुनरावृत्ती नाही झाली.
ReplyDeleteभाऊ अतिशय मार्मिकपणे आपण म्हटले आहे की जनता पर्याय तयार करते,आणि सेना भाजपचे 1999 चे सरकार एकमेकांना पाडल्यानेच गेले होते, तेंव्हाही हेच घडले होते पश्चिम महाराष्ट्रात पुर्णपणे काँग्रेस राष्ट्रवादी निवडून आले होते आणि मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात या दोघांनी एकमेकांना पाडले होते या वेळी देखील थोडे फार तसेच घडले आहे, मात्र जनतेला काँग्रेस राष्ट्रवादी नको असल्याने त्यांना विरोधात बसण्याचा कौल मिळाला आहे आणि सेना भाजप हेच सत्तेत बसू शकतात अन्य दुसरे कोणतेही समीकरण तयार होऊ शकत नाही हे मतदाराने सांगितले आहे या दोन्ही पक्षांनी त्याचा आदर करावा म्हणजेच भाजपने सेनेला चांगली वागणूक द्यावी आणि सेनेने संजय राऊत यांच्यासारख्या प्रवक्त्याला बाजूला ठेवावे अशी मतदारांची इच्छा आहे, कारण 1995 पासून युती आणि आघाडी म्हणून एकत्र लढल्या गेलेल्या निवडणुकात हा सगळ्यात मोठा कौल आहे कारण 2014 साली चारही पक्ष वेगळे लढले होते, त्यामुळेच सेना भाजपने या कौलाचा आदर करावा आणि चांगले सरकार द्यावे हे दोन्ही पक्षांच्या हिताचे आहे.
ReplyDeleteBut the aforesaid mistakes of BJP-SS alliance has made Mr. Sharad Pawar resurgent. He was almost marginalised and finished since 2014.
ReplyDeleteभाऊ, अगदी योग्य शब्दात पोस्टमार्टेम! शिवसेनेची आता चाललेली अरेरावीमुळे..'तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला' असे होते की काय असे वाटते. आताच्या परिस्थितीत आदित्य ठाकरेही एकदम मुख्यमंत्री करणे म्हणजे स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी राऊत आदित्यला गळ्यात दोरी बांधून माकड बनवू पाहताहेत. त्याला आधी ५ वर्षे मंत्रीपदाचा अनुभव घेणे गरजेचे आहे. आताच तर तो थोडासा पत्रकारांशी कसे बोलावे हे शिकू लागला आहे. मुख्यमंत्रीपद म्हणजे राणीच्या बागेत पेन्ग्विन ठेवणे वा नाईट लाईफची मागणी बालिशपणे करत बसण्याएवढा पोर खेळ नाही. त्यामुळे त्याला फडणवीसांच्या हाताखाली ५ वर्ष शिकू द्यायला हवे. सेनेने पवारांच्या नादी लागून स्वतःचे माकड करुन घेऊ नये ही अपेक्षा
ReplyDeleteएवढी अक्कल सेना नेतृत्वाला सुरूवातीपासून असती तर ९३ बॉम्बस्फोट,२००६ रेल्वे साखळी स्फोट, २००८ मुंबई दहशतवादी हल्ला आणि २०१० आझाद मैदान दंगल खपवूनच घेतली नसती.नाव महाराजांचं घ्यायचं आणि लाथा खायच्या. आणि वर, हरामखोर माध्यमांना हाताशी धरून मराठी जनतेत दहशत पसवायची.
DeleteIn one of my comments on your earlier blog, I had said that it is the overconfidence that did the BJP in same like "shining India" Your factual analysis supported by facts, figures etc speaks volumes which any sane party can ill afford to ignore. This is now or never.How do you explain very low turn out by voters?
ReplyDeleteभाऊ, भाजप मध्ये मेगाभरती का झाली, त्यामागे नक्की काय राजकीय खेळी असावी, ती खेळी फसली का अजून काही बाकी आहे ह्याविषयी आपले मत वाचायला आवडेल. कारण भाजप नेतृत्वाला मेगाभरतीमुळे पूर्वीचे समर्थक आणि मतदाते गोंधळून जातील, दुरावतील आणि जुने नेते तिकीट न मिळाल्यास नाराज होतील हे नक्कीच माहित होते. मग मेगाभरतीचे नक्की कारण काय असावे? का खरोखरच फडणवीस/शहा हे समजून घेण्यात कमी पडले?
ReplyDeleteभाऊ नागपुरातील कुणबी समाज हा फडणवीसांच्या मागेच होता मग एका जाहीर सभेत हे कुणब्यांचे राज्य नाही म्हणून उगाच कोपरखळी मारण्याची फडणवीसांना काही गरज नव्हती. आधीच नितीन गडकरी नाराज त्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांची ही कोपरखळी त्यातून नाराजी येणार नाही तर काय.
ReplyDelete"शरद नीती" 👌
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteका कोणास ठाऊक मला वेगळाच संशय येतोय. कल्पना करा युतीस घवघवीत यश मिळालंय. मग फडणवीस आजून ५ वर्षं टिकणार. तसं झालं तर ते मोदींपेक्षाही मोठे होतात ना !
कल्पना करा गुजरातचा सलग १२ वर्षं मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचा सलग १० वर्षं मुख्यमंत्री यांत कोणाचं पारडं जड दिसतं? शिवाय तो समृद्धी महामार्ग आहेच. २०२४ साली दिल्लीत प्रवेश करतांना फडणवीस हे मोदींपेक्षाही अधिक भारदस्त ठरतात. मग अशा वेळेस फडणविसांना महाराष्ट्रातच अडकवून ठेवण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी हे बंडखोरीचं जाळं रचलं असावं.
एकीकडे बावनकुळेंसारखे कार्यप्रवीण निष्ठावान डावलायचे आणि दुसरीकडनं आयारामांना आयात करायचं. त्याच वेळेस शिवसेनेलाही शिरजोर होऊ द्यायचं नाही. त्याकरता तिकीट वाटपात जमेल तितकी संदिग्धता ठेवायची. म्हणून युती लांबली.
आणि एक गंमत बघा, अनेक ठिकाणी मातब्बर नेत्यांच्या विरोधात किरकोळ उमेदवार आहेत. हेमंत जोशींचा लेख पहा : http://www.vikrantjoshi.com/2019/10/blog-post_0.html. या सगळ्याचा अर्थ सामान्य मतदाराने काय लावायचा? मोदींचं स्थान जास्त बळकट झालं असा ? की फडणवीसही या खेळत सामील आहेत असा ? तर मग गडकरी पूर्णपणे अलिप्त कसेकाय राहू शकले ?
आपला नम्र,
-गामा पैलवान
माझ्या मते यावेळी भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा करूच नये.शिवसेनेची मस्ती जिरविण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे. राजीव गांधींनी एकावेळी असे करून धमाल उडवून दिली होती.
ReplyDelete