Tuesday, November 12, 2019

आता कशाची भूक तहान......

Image result for maha flood victims

तुझ्या घामामधून, तुझ्या कामामधून
उद्या पिकल सोन्याचं रान
चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आण

भाग्य लिहीलेलं माझं तुझं
घाम आलेल्या भाळावरी
स्वप्न लपलेलं माझं तुझं
इथं बरड माळावरी

घेऊन कुदळ खोरं, चला जाऊ म्होरं
आता कशाची भूक तहान......

१९६० च्या दशकात शाळकरी वयात राष्ट्र सेवादलाच्या शाखेत खेळायला गेलो असताना अशी अनेक सुंदर गाणी सामुहिकरित्या गायलेलो आहे. मुलांना तरूणांना उत्साह उत्तेजन देणारी गीते तिथे सातत्याने म्हटली जायची. कवि प्राध्या्पक वसंत बापटांनी लिहीलेली ही कविता किंवा कवन. त्यातला आशय त्या कोवळ्या वयात कितीसा कळणार म्हणा? पण गुणगुणायला खुप मजा यायची. आता इतक्या वर्षानंतर त्यातला आशय शोधू गेल्यावर नवल वाटते. त्या कविने साठसत्तर वर्षानंतर भारतात कशी सामाजिक राजकीय नेतॄत्वाची अवस्था असेल आणि सामान्य जनतेची किती किंमत असेल, त्याचे मोजक्या शब्दात वर्णन करून ठेवलेले नाही काय? असे म्हणतात, सूर्यालाही जे दिसत नाही, तितके पलिकडले कवीला बघता येते. वसंत बापट तितक्या प्रतिभेचे कवि नक्कीच असावे. अन्यथा त्यांनी साठसत्तर वर्षापुर्वी आजच्या महाराष्ट्राचे इतके नेमके वर्णन कशाला लिहून ठेवले असते? जणू भविष्यच ना? आज अवघा महाराष्ट्र अतिवृष्टी व महापुराने बुडाला व बेजार झाला आहे. त्याचे संपुर्ण आयुष्य आणि भविष्य जणू उध्वस्त होऊन गेलेले आहे. पण त्या दुर्दशेतून त्याला बाहेर काढायची कोणाला फ़िकीर आहे काय? त्याला अन्नदाता वा जगाचा पोशिंदा म्हणून नित्यनेमाने माध्यमाच्या कॅमेरात बोलणारेच त्याची वंचना करीत आहेत. ज्यांनी मते मिळाल्यावर आपापल्या जबाबदार्‍या ओळखून सरकार स्थापन करावे, किंवा त्या सरकारला धारेवर धरून कामाला जुंपावे, असे सगळेच कोणते गीत कृतीतून गात आहेत? काय करीत आहेत? कसे वागत आहेत? उपरोक्त कवनातील शेवटची ओळ त्या दुरावस्थेतील ग्रामिण शेतकरी नागरिकाला सगळेच पक्ष ठणकावून सांगत नाहीत का? तो बिचारा अपेक्षेने पुनर्वसनाच्या भरपाईच्या प्रतिक्षेत आशाळभूत बसला आहे आणि कृतीतुन सगळे पक्ष काय म्हणतात?

आता कशाची भूक तहान......

मित्रांनो, गेले आठवडाभर सत्तास्थापनेचा जो काही तमाशा सर्वच पक्षांनी चालविला आहे, त्याचा सूर काय आहे? लक्षावधींची शेती उध्वस्त झाली व घरेदारे उजाड झाली आहेत. त्यांच्या शेतीची माती झाली आहे आणि त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कोरडा दिलासा देणारा प्रत्येकजण एकाहून एक मोठ्या रकमेची मागणी सरकारकडे करतो आहे. पण सरकार कोण आहे? सरकार कुठे आहे? सरकार कुठे असते? सरकार नावाची जादूची कांडी कुठून जन्माला येते? ज्यांना आपण निवडून देतो, त्या लोकप्रतिनिधींनीच एकत्र बसून चर्चा करून राज्याचा कारभार चालवण्याला लोकशाही असे म्हणतात. त्यातले काही एका बाजूला बसतात आणि राज्याचा कारभार हाकू लागतात, त्यांच्यापेक्षा कमी संख्या असलेले दुसर्‍या बाजूला बसून त्यांच्या कामकाजातील त्रुटी दाखवून कारभार योग्य होण्याची काळजी घेतात. त्याला लोकशाही म्हणतात ना? आता कोणी कुठे बसावे, कोणाच्या सोबत बसावे किंवा कोणाच्या समोर बसावे, त्याचा निर्णय मतदार करू शकत नाही. ज्या सामान्य नागरिकाने इतक्या अतिवृष्टी वा महापुरातही मतदानाचे कर्तव्य बजावून आपले प्रतिनिधी निवडले, त्यांची जबाबदारी आहे की नाही? कुठे बसावे आणि कोणासोबत बसून मतदाराचे काम हाती घ्यावे, हे त्यांनीच ठरवायचे आहे ना? तर तेच खो खो खेळत बसले आहेत आणि सामान्य शेतकर्‍याला बांधावर येऊन कुठल्या तरी काल्पनिक सरकारकडून अमूक हजाराची भरपाई मिळाली पाहिजे म्हणून मागण्याही करीत आहेत. जणू त्यांचीच घरेदारे उध्वस्त झालीत किंवा महापुरात वाहून गेल्यासारख्या आवेशात बांधावर येऊन बोलणारे, मुंबईपुण्यात पोहोचले, मग त्यांना बुडालेल्या शेताची वगैरे काही आठवणही होत नाही. मग त्यांना त्यांच्या भाळावरील भाग्य दिसते आणि आपापले स्वप्न आठवते. उपरोक्त ओळींनी आपल्या लोकशाहीतील खरेखुरे विभाजन केलेले आहे. जरा समजून घेतले पाहिजेत त्या ओळी.

तुझ्या कामामधून व तुझ्या घामामधून, हे सामान्य लोकांना नागरिकांना शेतकरी कष्टकर्‍याला उद्देशून म्हटलेले आहे. म्हणणारा कालपरवा आपल्या बांधावर येऊन रडून गेला तोच आहे. तो कुठल्याही पक्षाचा असेल व झेंडा घेऊन आलेला असेल. तो आपल्याला काय सांगतोय, ते समजून घ्यायला हवे मित्रांनो. तुझ्या काम वा घामातून, याचा अर्थ तो स्वत: कुठलेही काम करीत नाही आणि वातानुकुलीत दालनात बसत असल्याने त्याला घामही येणाचा विषय उगभवत नाही. सहाजिकच ह्या ओळी तुम्हा आम्हा सामान्य जनतेसाठी आहेत. आपण जगण्यासाठी काबाडकष्ट उपसतो. रोजच्या भुकेचा अग्नी शांत करण्यासाठी राबतो. त्यात अशा लोकप्रतिनिधी वा पक्ष व नेत्यांचा काडीमात्र संबंध सहभाग नसतो. कष्ट त्याचे नसतात, ते फ़क्त तुमच्या वाट्याला येत असतात. अर्थात कारखाना असो किंवा शेत असो, तिथे काम करून घाम गाळला, तर सोनंच पिकणार ना? तिथल्या कष्टाने भाग्य उजळणार ना? भाग्य कष्टानेच लिहीले जात असते. पण भाग्य हा शब्द येताच चित्र कसे पालटून जाते बघा. तिथे बांधावर भेटायला येणारा कडक इस्त्रीच्या कपड्यातला नेता म्हणतो. ‘भाग्य लिहीलेलं माझं तुझं’. म्हणजे काय? तर भाग्य किंवा पिक येण्याच्या वेळी कष्टकरी मागे पडतो. आधी बांधावरचा पर्यटकाचा हिस्सा आणि उरलंसुरलं तर तुझं. रांगेत पहिला तो आणि नंतर तुम्ही असता, मित्रांनो. म्हणून इतका मोठा महापूर येऊन किंवा अतिवृष्ग्टी होऊन अर्धा महाराश्ट्र उध्वस्त उजाड झालेला असतानाही भांडणे भरपाईची चालली नसून सत्तापदे, मंत्रीपदे किंवा त्यांच्या लाभाची आहेत. त्यात कुणालाही देशोधडीला लागलेल्या शेतकरी ग्रामिणांची आठवणही नाही. प्राधान्य आपापल्या अधिकारपदांना आहे आणि त्याकरिता उध्वस्त शेतकरी जनतेने कळ काढायची आहे. ती कळ काढताना मरून गेलात तरी फ़िकीर नाही. कारण तुमच्या बरड बुडालेल्या माळावर स्वप्न त्यांचं लपलेलं असते. आपण फ़क्त घाम गाळावा, काम करावं. भाग्य स्वप्न त्यांची असतात.

मतदानाच्या आधीपासून महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलेले आहे. तेही संपून निकाल लागला, तरी रोजच्या रोज पाऊस कुठल्या तरी भागाला झोडपतो आहे आणि नवनवी गावे बेजार करून सोडतो आहे. पण निवडणूक वा सत्तेचे वाटप किंवा त्यासाठीच्या खेळ्या डावपेच बाजूला ठेवून कोणी हरीचा लाल नेता शेतकर्‍यांच्या पुनर्वसनाला सर्वाधिक प्राधान्य, असा विषय बोलला आहे काय? तुमची दुर्दशा झालेली असतानाही नापिकी राजकीय जमिनीवर जे काही पीक काढून दिले आहे, त्यातला कोणाचा किती हिस्सा यावरून हाणामारी चालू आहे. आपापली स्वप्ने पुर्ण करायला झुंज लागली आहे. त्यात झुंजणार्‍यांना खेळवणार्‍या खिलाडू नेत्यांचेही माध्यमातून कोडकौतुक चालू आहे. अधूनमधून तोंडी लावायला महापूर अतिवृष्टी बुडालेली शेते पिके; यांची फ़ोडणी घातली जात असते. बाकी तुम्ही आम्ही फ़क्त कामाचे घामाचे भागिदार. पिकातला आपला हिस्सा कोणाच्या हिशोबातही नाही व नसतो. खुप गवगवा झाला तर बांधावर यायचे आणि तुमचे अश्रू पुसल्याचे फ़ोटो काढून घ्यायचे. तुमची शेते गाव तरी कॅमेरात तेव्हाच येतात ना? जर तिथे कोणी नेता आपली टिमकी वाजवायला पोहोचला व कॅमेरा घेऊन आला म्हणून. नाही तर तुमच्याकडे वळून बघायला पत्रकारांना कुठे वेळ आहे? माध्यमांना कुठे सवड आहे? सिनेमाच्या सेटवर विविध वस्तु देखावा रंगवण्यासाठी मांडतात, तशी बुडालेल्या घरांची शेतीची दृष्ये बातम्या सजवण्यासाठी, खमंग बनवण्यासाठी असतात. आलिशान घरात सजावटीसाठी मांडलेला निवडूंग असतो ना, कॅक्टस नावाचा? त्यापेक्षा उध्वस्त महाराष्ट्र वा बुडालेल्या शेतकर्‍याची कोणाच्याही लेखी अधिक किंमत नाही. कारण एकूण व्यवहारात कष्टकरी शेतकरी वर्गाचा हिस्सा घाम गाळण्याचा व काम करण्यापुरता असतो ना? भाग्य दुर्भाग्य वा स्वप्न याच्याशी आपला कुठे संबंध येतो? पोटातल्या बावीस फ़ुट लांबीच्या आतड्याचा पल्ला गाठताना आयुष्य संपून जाणार्‍यांना, नेत्यांच्या स्पर्धेत हजारो किलोमिटर्स दौरे कसे धावता येतील?

सत्तेची साठमारी करताना कुठल्याच पक्षाला राज्यातील कोट्यवधी उध्वस्त नागरिकांच्या जगण्याचे प्राधान्य नसावे, यासारखे महाराष्ट्राचे दुर्दैव नाही. एक पक्ष दुसर्‍याला म्हणतो, तुम्ही सरकार बनवा आणि दुसरा म्हणतो, माझ्यापाशी बहूमताचा आकडा नाही. तर पहिला धमक्या देतो, माझे अमूक इतके आमदार आहेत. मुख्यमंत्री आमचाच होणार वगैरे. पलिकडे बसलेले कावळ्याच्या तोंडातले कधी सुटते आणि आपल्याला मिळणार, म्हणून आशाळभूत होऊन सैरावैरा फ़िरत आहेत. त्यातच कोणाला डाव आणि खेळी सुचलेल्या आहेत. कोणात सख्य व्हावे किंवा दुरावा व्हावा, म्हणून जाणतेही आपली कुशाग्र बुद्धी पणाला लावून बसलेले आहेत. पाऊस हातशी आलेले पीक जमिनदोस्त करून गेला, त्याची कोणाला फ़िकीर आहे? त्यापेक्षा सगळी शक्ती आपले आमदार कोणी पळवू नये, म्हणून खर्ची घातली जात आहे. कुणा पक्षाचे सगळे नवे निवडून आलेले आमदार उचलून दुरच्या राज्यात लपवून ठेवलेले आहेत. शेतकरी काही हजार रुपये मिळून नरकातून बाहेर पडण्यासाठी लाचार बसलेला आहे आणि इथे एका आमदाराची किंमत ५० कोटी असल्याच्या बोली आरोप चालू आहेत. असे आरोप करणार्‍यांनाही जाहिर आपलीच किंमत सांगायची शरम उरलेली नाही. सडून गेलेल्या कांद्याला वा फ़ळांना बाजारात भाव मिळत नाही, म्हणून कॅमेरासमोर रडायचे आणि त्याच श्वासात पुढे एका आमदाराला किती भाव मिळतोय, त्याचीही यादी सादर करायची. अशा नुसत्या आकड्यांनी शेतकरी आणखी व्याकुळ होतो, याचेही भान कोणाला उरलेले नाही. अगदीच निर्लज्जपणा दिसू नये म्हणून निकालाना आठवडा उलटल्यावर एकामागून एका पक्षाचे नेते बांधावर दिलासा द्यायला पोहोचले. पण दरम्यान राष्ट्रपती राजवटीची भाषा कानावर येताच प्रत्येकजण उठून राजभवनात धापा टाकीत पोहोचले. शेतात बुडालेल्या पिकापेक्षाही प्रत्येक पक्षाला निवडणूक निकालातून हाती आलेले पीक वाचवण्यासी घाई लागलीय ना?

मित्रांनो ही आजची शहरी वा ग्रामीण वस्तुस्थिती आहे. जितका ग्रामिण नागरिक बेजार आहे, तितकाच शहरी नागरीकही रडकुंडीला आला आहे. त्याला खड्ड्यांनी माखलेल्या रस्त्यांनी रडवले आहे आणि भाजी वा अन्नपदार्थाच्या महागाईने जेरीस आणलेले आहे. निवडणूकीपुर्वी मेट्रोसाठी तोडल्या जाणार्‍या झाडांवरच्या फ़ुफ़्फ़ुसाला जखमा होऊन ज्यांचे रक्त भळभळा वाहात होते, त्यांच्या जखमा घट्ट सुकून खपलीही दिसेनाशी झाली आहे. तेव्हा सावरकरांना भारतरत्न देण्यावरून घसा कोरडा करणारे आज तशा मागणीलाही पाठींबा देण्यासाठी हाती भगवे तृण धरून सामोरे येत आहेत. निवडणूक लढवलेले व जिंकलेले सोडाच, पराभूत वंचितांनाही शेतकर्‍याच्या वेदनांपेक्षाही राजभवनातील घडामोडींविषयी आस्था उफ़ाळून आलेली आहे. काम नाही आणि घाम येऊ नये, म्हणून वातानुकुलीत दालने व गाड्यांची रेलचेल चालू आहे. तत्वज्ञान किंवा विचारसरणी कुठल्याही क्षणी अब्रु लुटली जाईल, म्हणून अंगावरची लक्तरे कशीबशी संभाळत प्रत्येक राजकीय पक्षाच्या कोनाड्यात तोंड लपवून बसलेली आहे. एकीकडे त्या लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत आणि राज्यभर शेतकरी नागरिक निराश्रित होऊन कोसळला आहे. कुठे आणून ठेवलाय महाराष्ट्र अशा नेय्त्यांनी, पक्षांनी, शहाण्यांनी? त्या महाराष्ट्राला कोणी वाली उरला आहे काय? राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर जायचे कुठे; असे आपले पुर्वज म्हणायचे. त्यापेक्षा एकविसाव्या शतकातली लोकशाही व राजकारण वेगळे आहे काय? म्हणून मग कवि बापटांच्या त्या ओळी खुप अर्थपुर्ण होऊन जातात. वस्तुस्थितीच्या दुखण्यावरची खपली काढतात आणि रक्त भळभळा वाहू लागते. भाग्य त्यांचं असतं आणि आपल्याला फ़क्त कष्ट मेहनत करायची असते. तोंड उघडलं तर ते विचारणार, ‘कशाची भूक तहान?’

25 comments:

  1. BJP aani Devendra Phadanvis, yaancha kahihi dosh nahi, SS cha attahas aahe. Phakta 50 MLA, aani CM pahije.

    ReplyDelete
    Replies
    1. पक्षांचे अंतर्गत निर्णय काही का असेना, भाजपापेक्षा (१०५) कमी आमदार (५६) निवडून आणल्यावर नैतिकतेने सेनेने वेळीच भाजपासोबत योग्य तडजोड करून सामान्य माणूस व शेतकऱ्याच्या काळजीपोटी सरकारस्थापन करण्यात सहकार्य करणेच इष्ट होते.... पद पाहीजे याचाच अर्थ सेनेचा लोभ निदर्शनास येतोय!

      Delete
    2. Jast MLA aslyavr cm asto asa kute kayda ahe ka

      Delete
    3. जास्त MLA असल्यावरच CM असावा असा कायदा नसला तरी common sense आहे.

      Delete
  2. देवेंद्र मुख्यमंत्री होणार म्हणून आम्ही मतदान केले ते पण शिवसेनेच्या बकवास उमेदवाराला आत्यंतिक अनिच्छेने
    आम्ही पाप केलं असं वाटतयं

    ReplyDelete
  3. भाऊ, इतक्या पोटतिडकीने कोण लिहिते?

    ReplyDelete
  4. सामान्य माणसाच्या नाशिबी हेच! खड्ड्यांनी भरलेले रस्ते, महागाई आणि प्रतारणा!
    ५ स्टार हॉटेल मध्ये आमदारांना ठेवण्याचा खर्च पक्षांना परवडतो कसा? मग तो खर्च वाचवून किमान १०० शेतकऱ्यांना मदत करता आली असती. पण नाही. सगळ्यांना मुख्यमंत्री पदाची हाव कुणालाही कृषिमंत्री पद नकोय. फक्त आपण शेतकऱ्यांचे कैवारी दाखवायचे बास्स

    ReplyDelete
  5. सामान्य माणसाला काडीची देखील किंमत नाही....
    1. पुरग्रस्तांच्या वेदना सगळे राजकीय पक्ष विसरले
    2. 2 3 वर्षांपूर्वी अमरावतीच्या दवाखान्यात incubator मध्ये लहान बाळे दगावली.....कुणी साधी आठवण देखील काढत नाही
    3. मराठवाड्यात ओला सुका दुष्काळ पण तिथली पण कुणालाही चिंता नाही.....

    शिवसेना भाजप यांच्या नाटका मध्ये सामान्य लोकांच्या वेदनेची काय किंमत....
    शिवसेना ला मुख्यमंत्री पद नाही तर महाराष्ट्राचा अपमान..
    आणि इथे सामान्य माणूस शिक्षण आरोग्य नौकरी या सगळ्या आघाडीवर अपमानाचे शरणागताचे जिणं जगतोय याचं कुणाला काही देणंघेणं नाही...

    ReplyDelete
  6. कस होणार या महाराष्ट्राचं

    ReplyDelete
  7. पण याला उपाय काय?
    आम्हाला आता कोणाचेही सरकार नकोय.. आम्हाला राष्ट्रपती राजवट हि चालेल पण पावसाने केलेली नासधूस केंद्रातल्या सरकारने तरी सावरायला घ्यावी एव्हढीच इच्छा आहे. आम्हाला जिंकलेल्या आणि हरलेल्या पक्षांपैकी कोणीच नकोय.. राज्यपालांचे असले तरी चालेल पण सरकार हवंय..
    कोणी कोर्टात PIL करू शकते का कि आता महाराष्ट्राला कोणत्याच पक्षाचं सरकार नकोय आणि राष्ट्रपती राजवटच हवी आहे. आता कोणीच कुठल्याच चर्चा करू नयेत आणि सगळ्या मीटिंग आता थांबवा म्हणून..

    ReplyDelete
  8. Bhau saglech bajar mandun baslet. Tyat motha, lahan,sagle ch aahe .Sarv paksh
    Kami jast farkane sarkhech aahet. Kon mhanto aamhi dramnirpeksh, kon mhanto aamhi
    Vikas karnare..shabdancha hyani bajar mandla aahe. Jantene lokshahi chya gondas nava khali swatalach lachar karun thevale aahe. Nokarshahi samajala pokhrat aahe. He rajkaranee tyache bap..aaple kam pramanikpane karu ya bas. Sadhya yevdech possibl aahe..

    ReplyDelete
  9. ....... सर्व मतदान हे एखाद्या खेळासारखे असते. फक्त त्याला एक नैतिकतेचा मुलामा दिलेला असतो. या खेळात आपल्याला चांगले आणि वाईट या दोन्हीपैकी एकाची बाजू घ्यायची असते आणि हा एक प्रकारचा जूगारच असतो.

    मी चांगल्याच्या बाजूने मत टाकतो पण विजय चांगल्याचाच होईल का या बाबतीत मी बेफिकीर असतो. ते मात्र मी बहूमतावर सोडतो. म्हणजे मला जे चांगले वाटते, व जे चांगले आहे हे इतरांना चांगले वाटले नाही किंवा त्यांना तसे पटवले गेले की संपले.

    यामुळे होते काय की जर मतदारांच्या उपयोगी एखादा उमेदवार पडला तर तो चांगला असे समिकरण तयार होते.

    याचा दुर्दैवाने असा अर्थ होतो की तुम्ही अत्यंत दुबळ्या आवाजात एका मताद्वारे सांगत असता की चांगले काय आणि वाईट काय ! आणि दुबळ्यांच्या मताला तीच किंमत मिळते जी मिळायला पाहिजे.

    शहाणा माणूस सत्य हे कधीच दैवाच्या भिकेवर सोडत नाही. तो यासाठी बहूमतावरही अवलंबून रहात नाही आणि सत्तेचा त्यासाठी उपयोग करत नाही.....

    लोकशाही... एक मुलभूत विचार . आपण आपल्याला जे पटते ते इतरांना पटवू शकलो नाही त्याचा हा दुष्परिणाम आहे... (In broader sense)
    - हेन्री डेव्हिड थोरो.
    From " वॉल्डन आणि थोरोचे चरित्र’’

    ReplyDelete
  10. शेतकरी,कामगार यांची आठवण निवडणुकीच्या आधीच्या काळात पुढारी , राजकारणी अशा सर्वाना येते.राजकारणी कशाला? खाऊन पिऊन सुखी असणारे शिकलेसवरलेलेसुद्धा सत्ता स्थापनेचा विषय चघळून चोथा झाला की रूचिपालट म्हणून किंवा अपराधी वाटून शेतकरी आणि त्यांची हलाखी याबाबत बोलू लागतात.राजभवन, मंत्रालय किवा पक्ष
    कार्यालये येथे काही घडत नसले की शेताच्या बांधावर बसलेला शेतकरी आठवतो .

    ReplyDelete
  11. लाज वाटतेय असल्या लोकशाहीची.

    ReplyDelete
  12. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, भाजपने??

    ReplyDelete
  13. सगळे राजकारणी फक्त स्वतःचे इगो सांभाळण्यात गुंतलेले आहेत... सामान्य नागरिक मात्र जेरीस आलेल्या आहे

    ReplyDelete
  14. As kas dosh nahi mhanta, sadhyachya paristhitila pratyek pakshach jabadar ahe, sarwat jast bjp n sena ani mag ncp ic

    ReplyDelete
  15. अमितभाई शहांना 'Man of commitment' असे म्हटले जाते. त्यांच्यावरच शिवसेना खोटेनाटे आरोप करते? का?

    ReplyDelete
  16. Thakare Pawar yanche kautumbik jivhalyache naate sambandh aahet.veloveli pawarkaka thakare bandhunna hitchintak, gharatale vadildhare mhanun margdarshan karta karta kayrajcha ghaat dakhavtat.tyanna chaltay tar aapan ka vaeet vatun ghyayche?

    Pan ya pudhe bjp ne Shahane vhave. Tumchya karykartya mandalin var bharvsa theun tyanna pudhe yenyachi sandhi dyavi. Janata ajunhi Devendra fadnvis yannach cm padachi jababdari deu ecchite.
    Ek mardar mhanun loksabheka narendra nadin Sathi ani vidhan sabhela Devendra fadanvis Sathi anicchene shivsenechya umedwaranna mat dile.
    Bjp ne ya pudhe tyanche karykarta ani matdar japavet.

    ReplyDelete
  17. Jevha spasht bahumat dile jat nahi tevha janatela he sahan karavech lagate. Yala Janatach purnapane javabadar ahe. 10 nalayakana nidun denya peksha ekach nalayakavar purn javabadari sopavali asati tar jab vicharu shakale asate.

    ReplyDelete
  18. अप्रतिम भाऊ अप्रतिम!
    मराठी वृत्तपत्रांच्या अग्रलेखांच्या निवडक संग्रहात जावा असा लेख आहे हा.

    ReplyDelete