पत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नवे राजकीय समिकरण उभे केले आहे. त्याचे अर्थातच पत्रकारांना कौतुक असल्यास नवल नाही. आजवर ज्या पक्षांनी परस्परांचे शत्रूत्वच केले, त्या पक्षांनी एकत्र येऊन सत्तस्थापना करणे; हे नवेच अतर्क्य समिकरण असते. पण राजकीय घडामोडीमध्ये वा प्रक्रीयेमध्ये एका बाजूचे नवे समिकरण उभे रहात असताना; पलिकडे दुसरेही समिकरण आकार घेत असते. सहसा असे समिकरण तात्काळ नजरेत भरणारे नसते, पण आकार घेत असू शकते. १९८४ सालात मुंबई ठाण्यापुरती मर्यादित असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन लोकसभेच्या निवडणूका लढवण्याचे नवे समिकरण प्रमोद महाजन यांनी जुळवले. तेव्हा, त्याचे भवितव्य कुणाला माहिती होते? त्यावेळी वामनराव महाडीक व मनोहर जोशी असे दोन शिवसेना उमेदवार लोकसभेला उभे राहिले, ते भाजपाच्या कमळ निशाणीवरच लढले होते. अर्थात राजीव लाटेमध्ये सर्व पक्षांचा बोजवारा उडाला आणि भाजपालाही मोठा दणका बसला होता. त्यात सेनेचे दोन्ही शिलेदार कमळ निशाणी घेऊनही पराभूत झाल्याचा इतिहास वेगळा सांगायला नको. ते समिकरण फ़ारकाळ टिकले नाही आणि काही महिन्यातच आलेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने सेनेची साथ सोडून शरद पवारांनी जुळवलेल्या पुलोद आघाडीशी संगनमत केलेले होते. पण १९८४ च्या त्या पहिल्या युतीमध्ये जे बीज पेरले गेले, त्याचे भरभरून पीक १९८८ नंतरच्या राजकारणात आले. १९९० सालात तर त्याच युतीला घाबरून शरद पवार यांनी कॉग्रेसला रिपब्लिकन आठवले गटाशी आघाडी करायला भाग पाडलेले होते. पण हे १९८४ सालात नगण्य वाटणारे सेना भाजपा समिकरण इतके फ़लदायी ठरू शकेल, असे महाजन वा बाळासाहेबांना तरी कुठे ठाऊक होते? आजची कहाणी थोडीफ़ार तशीच आहे.
आज महायुती मोडून शिवसेना मुख्यमंत्रीपद मिळवायला दोन्ही कॉग्रेसच्या गोटात दाखल झालेली आहे आणि शरद पवार त्या नव्या आघाडीचे प्रेरणास्थान झालेले आहेत. ह्या हालचाली सुरू असताना एक किरकोळ मराठी पक्षाशी एका लहान महापालिकेसाठी भाजपाने महापौर निवडणूक जिंकण्यासाठी हातमिळवणी केलेली आहे. नाशिक महापालिकेत भाजपाची संख्या चांगली असली तरी त्यांचेच काही नगरसेवक विधानसभेच्या वेळी बंडाचा झेंडा घेऊन उभे राहिले होते. म्हणून आता आलेल्या महापौर निवडणूकीत भाजपा साशंक होता. कारण मुख्यमंत्रीपद मिळवायला शत्रूत्व घेणार्या शिवसेनेने महापालिकातही भाजपाला धडा शिकवण्यासाठी कंबर कसलेली होती. त्यासाठी नाशिकमध्येही दोन्ही कॉग्रेस सोबत घेऊन भाजपाला घाबरवले होते. अशा वेळी अचानक तिथे नगण्य वाटणारा मनसे हा पक्ष भाजपाच्या मदतीला धावून आला आणि तिथे भाजपाचा महापौर बिनविरोध निवडून येण्यापर्यंत मजल गेली. मुद्दा त्या एका महापौर पदाचा नसून गेल्या पाचसहा वर्षात नामोहरम होऊन गेलेल्या मनसे या प्रादेशिक पक्षाचा आहे. त्याने नव्याने आपली जमिन शोधण्याचा आहे. २००९ सालात लागोपाठ मोठी मजल मारत निघालेल्या राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष मोदी लाटेनंतर भरकटत गेला होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांना नवनवे प्रयोग व कसरती कराव्या लागलेल्या आहेत. शिवसेनेशी वाद नको म्हणूनही भाजपाला मनसेशी अनेकदा हातमिळवणी करणे शक्य झालेले नव्हते. आता तो रस्ता नाशिकच्या महापौर निवडणूकीने खुला केला आहे. यात आज मनसेची असलेली ताकद दुय्यम असून त्याची विस्ताराची क्षमता मोलाची आहे. मनसे हा शिवसेनेतून बाजूला झालेला गट असून शिवसेनेला पर्यायी असा नवा प्रादेशिक पक्ष होऊ शकतो. जिथे शिवसेना आपली भूमी सोडत जाईल, ती व्यापण्य़ाची भाजपाला शक्यता नसेल तर मनसेने तिथे आपले बस्तान बसवण्याला भाजपाही रणनिती म्हणून प्रोत्साहन देऊ शकतो. उद्धव ठाकरे सरकारवरील बहूमत प्रस्तावाच्या वेळी मनसेचा एकमेव आमदार तटस्थ राहिला, हे विसरून चालणार नाही.
उदाहरणार्थ आयुष्यभर कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशीच दोन हात करून शिवसेना विस्तारलेली आहे. नेत्यांचे आग्रह व अट्टाहास भागवण्यासाठी त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांनी पत्करलेली भांडणे संपत नाहीत. मुंबईत नेत्यांची युती आघाडी झाल्याने त्या गल्लीबोळातील कार्यकर्ते स्थानिक नेत्यांमधली वैरभावना संपुष्टात येत नाही. सहाजिकच अशा वरवरच्या आघाड्या जमवल्या जातात, तेव्हा त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची पुरती तारांबळ उडत असते. त्यांना हाती काहीही न लागता नुसती शरणागती पत्करणे रास्त वाटत नाही. म्हणूनच असे कार्यकर्ते अन्य मार्ग शोधू लागतात. जर नेते आपल्या मतलबासाठी पक्षाच्या भूमिका सोडून वाटेल ते करणार असतील, तर कार्यकर्तेही तसेच आपल्या सोयीचे पर्याय शोधू लागतात. म्हणूनच या नव्या आघाडीतील शिवसेनेतील चलबिचल महत्वाचा टप्पा आहे. त्या शिवसैनिकांची घुसमट वाढत जाणार आहे आणि त्यांची तगमग नव्या मार्गांचा शोध घेऊ लागणार आहे. असा वेगळा मार्ग थोडाफ़ार परिचीत असण्याला प्राधान्य आहे. तो परिचीत मार्ग मनसे आहे. कारण हा पक्षच मुळात शिवसेनेतून बाहेर पडलेला गट आहे आणि त्याचेही नेतृत्व ठाकरेच करतात हा योगायोग आहे. किंबहूना अनेक शिवसैनिकांना राज यांच्यात आपले लाडके साहेब दिसत असतात. त्यामुळे नाराज शिवसैनिकांसाठी ट्रांन्झीट कॅम्प किंवा पर्याय म्हणून मनसे असू शकते. एकीकडे शिवसेनेमधली चलबिचल हळुहळू कानी येऊ लागलेली आहे आणि दुसरीकडे भाजपाने मनसेची मदत घेतलेली आहे. त्यातून भविष्यात या दोन पक्षांमध्ये नवे काही समिकरण जुळण्याची शक्यताही आकारास येऊ शकते. अर्थात तेही इतके सोपे काम नाही. कारण लोकसभा व विधानसभेच्या काळात राज ठाकरे यांनी भाजपावर मुलूखमैदान तोफ़ा डागलेल्या आहेत. त्यामुळेच भाजपाच्या गोटात लगोलग दाखल होणे त्यांच्यासाठीही सोपे राहिलेले नाही, पण ज्या गतीने युती मोडून शिवसेना सत्तेसाठी कॉग्रेस गोटात जाऊ शकली, तसेच मनसेचे काम अवघड मानायचे कारण नाही.
अर्थात तात्काळ मनसे भाजपा एकत्र येण्याची शक्यता नाही. पण दरम्यानच्या काळात शिवसेनेतील कुरबुरी जशा वाढत जातील, तसा मनसेकडे शिवसैनिकांचा ओढा वाहू लागणे शक्य आहे. केंद्रातली सत्ता हातात असताना व राज्यातही आपले बळ वाढलेले असताना भाजपा अशा घटनेला प्रोत्साहन देऊ शकतो. त्याला आज शिवसेनेने शत्रूच मानलेले आहे. तर शत्रूपक्ष खच्ची होण्याला भाजपाने हातभार लावला, तर कोणी भाजपाला दोषही देऊ शकणार नाही. पण जे कोणी सेनेतले नाराज असतील, त्यांना मनसेकडे वळवण्यासाठी भाजपा आपली शक्ती लावू शकतो. भविष्यात सेनेऐवजी नवा प्रादेशिक पक्ष म्हणून भाजपा मनसेला जवळ घेऊ शकेल. नाराज शिवसैनिक भाजपाकडे येण्यात अडचण असली तर त्याला मनसेकडे वळवण्याची रणनिती भाजपाही खेळू शकतो. शरद पवारांच्या नादी लागून तरी मनसेने काय मिळवले आहे? मग शिवसेनेतील नाराजी आपले हत्यार बनवून राज ठाकरे कामाला लागले, तर भाजपा त्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावण्याची मोठी शक्यता आहे. त्याची सुरूवात नाशिक येथील महापौर निवडणूकीत झाली नसेल, असे कोणी म्हणू शकेल काय? एक निश्चीत आहे. भाजपाच्या युतीत राहून जी मस्ती शिवसेना दाखवित होती, ती नव्या आघाडी समिकरणातले मित्र पक्ष अजिबात सहन करणार नाहीत. त्यातूनच शिवसेनेचा संवेदनशील उत्साही कार्यकर्ता अधिक दुखावला जाणार आहे आणि तोच तर मनसेच्या मेगाभरतीचा कच़्चा माल असणार आहे. भाजपाने त्याला फ़क्त खतपाणी घालायचे आहे. कारण भाजपाचे चाणक्य राज ठाकरे यांची क्षमता ओळखण्याइतके हुशार नक्कीच आहेत. त्यांना भविष्यातला एक नवा प्रादेशिक पक्ष घडवण्यात जुन्या मित्रपक्षाला धडा शिकवण्याचा डावही खेळता येणार आहे. म्हणूनच एका बाजूला सत्तेचे जे समिकरण जुळवले जात आहे, तेव्हाच सहसा नजरेत न भरणारे दुसरे समिकरणही काळजीपुर्वक तपासले पाहिजे व हिशोबात घेतले पाहिजे.
राज हे बारामती चे पोपट नसते झाले तर आज त्यांना bjp सोबत जायला अजून सोपे झाले असते.. आणि bjp ने सामाहून ही घेतले असते..
ReplyDeleteसेने नी सोडलेली हिंदुत्ववाद त्यांनी पकडला तर निराश सैनिक ला दुसरा मार्ग मिळेल आणि लोकात ही मान्यता मिळेल
भाऊ पण मनसे मुळातच अस्तित्व हरवलेला पक्ष आहे. त्यामुळे हे करायला वेळ लागेल एवढं निश्चित.
ReplyDeleteभाऊ, पण मनसेचे हायकमांड राज ठाकरे अत्यंत आळशी माणूस आहे, पूर्णपणे भरात असताना हाताशी आमदार असताना कोणतेही आंदोलन त्यांनी पूर्ण केले नाही. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्युप्रिंट माझ्याकडे आहे हे अनेक वर्षांपासून ऐकतोय लोक त्यासाठी आतूर होते पण ती कधीच बाहेर आली नाही. आतातर लोकसभेपासून त्यांनी आपला पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधला आणि थोबाड फोडून घेतले. नाशिकला भाजपाला केलेली मदत ही वरुन न ठरता एकादेवेळेस लोकल नगरसेवकांनी केलेली असू शकते. असे बरेचवेळा घडलेले आहे.
ReplyDeleteनाशिकला भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचा व्हिप काढला होता मनसेने, त्यामुळे हे लोकल राजकारण नव्हतं
Deleteभाजप चे योग्य पाऊल !
ReplyDeleteराज हा हिरा असा आहे की त्याला परखणारा जवाहिर अमित शहा त नक्कीच लपलेला आहे
ReplyDeleteनवीन भस्मासूर उभा करण्यासारखेच वाटतेय पण शक्यता नाकारता येत नाही.भाऊ तुमचे राजकारणातील बारीकसारीक गोष्टीतील मर्म ओळखण्याचे कसब फारच जबरदस्त आहे त्यामुळेच उतावळया पत्रकारितेचा जो सध्या हैदोस चालला आहे त्यात तुमचे योग्य व अभ्यासपूर्ण विश्लेषण वाळवंटात पाणी प्यायला मिळाल्यासारखे वाटते.
ReplyDeleteअगदी योग्य मत भाऊ. मला सरकारच्या पहिल्या दिवसापासून वाटते की मनसेसाठी ही खूप मोठी संधी आहे. काळजीपूर्वक हालचाली आळस न करता केल्या तर राज जुने वैभव परत मिळवु शकतील. सुरवात मात्र आतापासूनच संघटना मजबूती कडे लक्ष देवून करावी लागेल ज्यामुळे शिवसैनिकांना आश्वस्त करायला सोपे जाईल. फिनिक्स पक्षाप्रमाणे आमुलाग्र बदल करण्याची संधी आयुष्यात काहींनाच मिळते त्याचं सोनं होणार की माती हा मुद्दा कळीचा आहे.
ReplyDeletebhau, actually Raj Thackrey should have gone with BJP in LS and Assembly elections also. that would have given BJP a booster and also with Modi's name he could have got 2/3 seats in LS and @ 20-25 Seats in Assembly. and could have been a ruling partner in State. he is perhaps the next to Phadanavis in the vision for maharashtra. but his politics is beyond the imagination of his workers also.still he can fight BMC elections with BJP and make a consideration impact and rule as partner with BJP.
ReplyDeletebhau somebody is using paragraphs from this article and posting it on maharashtra times comment section.
ReplyDeleteभाऊ,
ReplyDelete१. राज यांचे काँग्रेस बरोबर जाणे ही राजकीय अगतिकता होती. नाईलाज होता, हे सामान्या माणूस जाणून आहे.
2. राज जरी काँग्रेसकडे गेले, तरी देखील त्यांनी शिवसेन्सरखा हिंदुत्व सोडून दिले नाही, ते केवळ मोडीविरोध म्हणून तिकडे गेले. त्या भूमिकेवर नुसते मोदी एकदा येऊन प्रत्यक्ष भेटले तरी यु turn घ्यायला स्कोप आहे.
3. राज यांचा आक्रमकपणा मानणारा मोठा वर्ग अजून शिवसेनेत देखील आहे, जे या नवीन आघाडीने त्रस्त आहेत.
यामुळे राज भाजपासोबत गेले तर खूप लवकर पुनरागमन करू शकतात.
अवांतर -
शिवसेनेने जेव्हा सरकार स्थापन केले, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती -
पवारांनी राज ठाकरेंच्या सभांचे बिल चुकते केले आहे. आता पुढे ते बँकेतून कसे काढायचे ते राज वरती अवलंबून आहे, पण त्याच्यासारखा चाणाक्ष राजकारणी हे संधी सोडणार नाही. आत शहा काय करतात ते बघायचे
शुभस्य शिघ्रं
ReplyDelete२०१४ ला गडकरींनी एकञ येण्याचा सल्ला दिला होता...तो जर मानला असता तर आज मनसेचे १५-२० आमदार सहज दिसले असते...
ReplyDeleteभाऊ गुजराती मोदी हे उत्तर प्रदेशातून लोकसभेत गेले आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष मैत्री करणे सोयीचे होणार आहे का हा प्रश्नच आहे, तसेच मोदी आणि शहा यांचा भाजप देशातील प्रत्येक प्रांतात हात पाय पसरू पाहत आहे, त्यामुळे राज यांची महाराष्ट्रीय अस्मिता आणि भाजप यांचा ताळमेळ बसणे थोडे अवघड वाटते, तरीपण राजकारणात अशक्य मात्र काहीच नाही हे मात्र खरे आहे
ReplyDeleteShiv Sea put VETO on any relations with MNS. That veto is now gone. in next election, BJP will fight on more than 240- 250 seats and most probably will get majority single handedly.
ReplyDeleteलाव रे विडीओ
ReplyDelete!
😁😁😁
दुधाने तोंड पोळून घेतल्या नंतर भाजपा आता ताक ही फुंकून पिण्याच्या मनस्थितीत असणार. त्यातही अमित शहां च्या दृष्टीकोनात भाजपाचा वारू चौखूर उधळत असतांना मित्रपक्षाच्या कुबड्या कशाला? याही वेळेस भाजपा स्वतंत्र 288 जागा लढला असता तर सहज बहूमतात आला असता की. या परिस्थितीत नविन समीकरणें जुळवणे अवघडच वाटते आहे. शिवसेनेची फुटणारी मते भाजपाचीच बेगमी करणार हे स्पष्ट असतांना त्यात भागीदारी कशाला? मुळात आधाराची गरज भाजपा पेक्षा मनसेला कैक पट अधीक आहे. त्या करिता राज काय व किती पहल करणार यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील असे वाटते. नाशिकच्या एका सूतावरून स्वर्ग गाठणे ईतक्यात योग्य ठरेल?
ReplyDelete