Friday, January 17, 2020

कारवॉश की सामुहिक कलाकृती?



 (माझे शतकाच्या प्रतिक्षेत असलेले दुसरे संसारी मामा, बाबा नाडकर्णी)

नव्या वर्षाच्या आरंभी घरगुती समारंभाला कोकणात गेलो होतो.  तिथे माझ्या मामाचा मठ आहे. त्यांचे भक्त त्यांना दादा महाराज म्हणून ओळखतात. मी तसा धर्मकार्य अध्यात्मापासून दुर रहात असल्याने तिकडे सहसा जाणे होत नाही. पण दोन दशकानंतर जाण्याचा योग आला. गाव शिवडाव, तालुका कणकवली. पुण्यातला तरूण मित्र आणि माझ्यासारख्या मासेखाऊंचा आश्रयदाता गुरू सावंत, याच्या गुरूकृपेने थेट गावापर्यंत प्रवास होऊ शकला आणि आरामात परत येऊ शकलो. बर्‍याच काळानंतर कोकणात व मालवणी पट्ट्यात गेलो होतो. एकूणच मालवणी व कोकणी माणसाबद्दल खुप जुने पुर्वग्रह आहेत आणि काही माझ्यातले उपजत दोषही आहेत. त्याला छेद देऊन मालवणी माणूस पुढे जाऊ शकत नाही, अशी माझी ठाम समजूत होती. एकवेळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कोरियाचा तो कोणी हुकूमशहा, यांच्यात कुठल्या विषयावर सहज एकमत होऊ शकेल. पण दोन मालवणी माणसात फ़क्त वाद होऊ शकतात, असे आमचे स्वभाव असतात. तुम्ही काहीही बोललात तर त्यात आक्षेप घेऊन वेगळी ‘भूमिका’ घेण्याला आम्ही मालवणी जणू कर्तव्य मानतो. छिद्रान्वेषी अशी आमची शैली असते. निदान माझा तरी तसा अनुभव आहे, कारण मी देखील त्यातलाच एक आहे. आमच्यात दुमत हा स्थायीभाव आहे. सहमती जणू गुन्हाच असतो. पण त्यावरही मात करून मोठी कामे करणारेही मालवणी आहेत आणि त्यांनी जगाला चकीत करून सोडणारे पराक्रमही केलेले आहेत. मजा अशी, की बारीकसारीक बाबतीत मतभिन्नता व विवाद हा स्वभाव असलेल्या मालवणी अनुभवाला प्रथमच जमिनदोस्त करणारे तीनचार तरूण मला सावंतवाडीत दिसले आणि मला त्यांच्या मालवणी असण्याचाच संशय आला.

झाले असे, की ३ जानेवारीला भल्या सकाळी उजाडताना गुरू आणि मी पुण्याहून कोल्हापुरकडे निघालो आणि संध्याकाळी अंधारताना निपाणी, आजरा, सावंतवाडी करीत गोवा हायवेने उलटे कणकवलीत पोहोचलो. मठात जाईपर्यंत अंधारले होते. तिथला उत्सव आणि प्रवासात थकल्यामुळे यथासांग झोप काढली. त्या निमीत्ताने अनेक नातेवाईक व परिचीतांच्या भेटीगाठी घेऊन दुसर्‍या दिवशी दुपारी शिवडाव सोडले. पुन्हा उलटे निघालो. येताना गुरूच्या गावी तळवड्याला जेवायचे होते. गुरूच्या हॉटेलात मिळणारी मालवणी थाळी फ़िकी पाडणारा बेत त्याच्या आईने केलेला होता. कट्ट्यावरचा तळलेला बांगडा आणि गुरूच्या तळवड्याच्या घरी तळलेला बांगडा यातला फ़रक त्याला खातानाच स्पष्ट केला. तिथून पोटोबा उरकून सावंतवाडीला निघालो. तर रात्रभर मठाच्या आवारात उभ्या गाडीच्या काचेवर दंवामुळे ओलावा होता. त्यावर माती बसल्याने काच साफ़ करण्याचा हट्ट गुरूच्या आईने धरला होता. पण गुरूने गॅरेजमध्ये फ़वार्‍याने गाडी धुवून घेतो म्हणत निरोप घेतला. खरेच सावंतवाडीला पोहोचताच त्याने एका शेडवजा गॅरेजपाशी गाडी उभी केली. त्याला म्हटले, हे लोक लौकर काम उरकणार नाहीत. गाडी थांबताच तिथला एक पोरगा जवळ आला आणि काय करायचे ते विचारले? घाई असल्याचे सांगताच कसलेही आढेवेढे न घेता त्याने तात्काळ गाडी आत आणायला सांगितले. हा पहिला धक्का होता. खरा मालवणी असा धंदा बघून गोड व समजूतदार बोलणे म्हणजेच धक्का होता. आधीच तिथे हे तिघेचौघे मिळून दोन गाड्या व तीन मोटरसायकलीची धुलाई करीत होते. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्यात कुठेही वादावादी वा युक्तीवादाचा मागमूस नव्हता. एकमेकात हलक्या आवाजात बोलत होते. पण विवाद मतभेद औषधालाही नव्हता. हे शंकास्पद होते. इतक्या समजुतदारपणे व एकदिलाने टीम म्हणून काम करणारे चौघे मालवणी हा चमत्कारच होता. साध्या ग्रामस्थ मंडळाची मुंबईतली बैठक असो वा अन्य काही समारंभ; धुमशान नसेल तर त्यात मालवणी उरले काय? मी आश्चर्य बघावे, अनुभवावे, तसा पुढली चाळीस मिनीटे त्या चौघांच्या हालचाली न्याहाळीत होतो.



घोगळे वॉशिंग सेंटर, सावंतवाडी

वेळ दुपारी तीनचा सुमार होता आणि कुठल्याही वर्कशॉप वा शेडमध्ये अशावेळी सगळीकडले लोक आळसावले असतात. त्यात हे मालवणी सावंतवाडकर. म्हणूनच काम चालू असण्याविषयी मुळात शंका होती. ती फ़ोल ठरल्यावर त्यांची कार्यशैली थक्क करून सोडणारी सुसुत्र आणि एकमेकांना कमालीची पुरक होती. चौघांना एकाच वेळी इतक्या गाड्यांचे काम करताना कुठेही परस्परांचा अडथळा होत नव्हता, की एकमेकांना सुचनाही द्याव्या लागत नव्हत्या. संगणकीकरण झालेल्या यंत्रणा जशा परस्पर समन्वयाने कामे उरकतात, तसे हे चौघेजण एकमेकांशी जुळवून काम करत होते. कामासंबंधाने त्यांना एकमेकांशी कुठलाही चकार शब्द बोलायची वेळ येत नव्हती. एकाने हातात पाण्याचा फ़वारा घेऊन गाडीला बाहेरून भिजवण्याचा अवकाश, तात्काळ दुसरा तिथे बादली घेऊन यायचा आणि त्याच गाडीला साबणाच्या पाण्याने सारवून घासून स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचा. त्यामध्ये बाजूच्या गाडीवर हलकेच पाणी मारायचे असले, तरी दुसर्‍याला सांगावे लागत नव्हते. हातातली गाडी सोडून तो हळूच पलिकडल्या गाडीवर हलका फ़वारा मारून पहिल्या गाडीकडे वळत होता. साबणाचे पाणी असलेली बादली घेऊन शेजारी उभ्या असलेल्याची अपेक्षा हातातला फ़वारा तिकडे वळवून तिसरा पुर्ण करायचा. कोणी गाडीला साबण लावत होता, तर कोणी गाडीला खालून ऑईल लावून चासी मडगार्ड साफ़ करीत होता. अशारितीने गाडीचे अभ्यंगस्नान पार पडल्यावर त्यातलाच कोणी गाडी शेडमधून बाहेर काढण्यासाठी चावी घेऊन तयार असायचा. गाडी रस्त्यावर आणली नाही, इतक्यात त्यातलाच एकजण हातात फ़डके घेऊन धुतलेली गाडी पुसून काढायचे काम सुरू करायचा, त्याचे काम हातावेगळे होण्यापुर्वी दुसरा तिसरा कोणी गाडीतली रबरी पायदाने घेऊन हजर. हा थक्क करणारा ताळमेळ आणि तोही सावंतवाडीच्या मालवणी तरूण कारागिरात बघून मी चकित झालो होतो.

त्यांचे हे काम चालू असताना मी गुरूकडे विचारणा केली. यातले कोणी बिहारी युपीवाले आहेत का? तामिळ तेलगू आहेत का? कारण तिथल्या कामगारांमध्ये अशी सुसुत्रता असते. धंद्याकडे लक्ष असते आणि हुज्जतीचा मामला नसतो. ग्राहकाचे समाधान हा विषय मालवणी स्वभावात बसणारा नाही. त्याहीपेक्षा अधिकाधिक धंदा व सामंजस्य राखून? गुरू म्हणाला सगळे मालवणी आणि सावंतवाडीतलेच आहेत. मला खरोखरच धन्य वाटले. मालवणी म्हणून अभिमान वाटलाच. पण त्याहीपेक्षा त्यांच्यातल्या नि:शब्द सुसुत्रतेला सलाम करावासा वाटला. इतक्या वेगाने कामे करताना जणू चौघेही एकाच देहाचे अवयव असल्यासारखी अवर्णनीय एकात्मता कौतुकास्पद होती. गुरूला म्हटले गोष्ट तशी छोटी व नगण्य आहे. गाड्या धुणारे अनेक वॉशर्स आता देशाच्या कानाकोपर्‍यात आहेत. पण तिथेही इतकी सुसुत्रता दुर्मिळ असेल. काहीतरी चुकले वा राहिले, तर दुसर्‍याच्या नावाने हाका मारणे वा शंख करणे. उडवाउडवी आपल्या अनुभवाला येतेच. पण इथली व्यावसायिकता आणि समन्वयी कामे बघून त्यांच्यावर चार शब्द लिहीण्याची अनावर इच्छा झाली. गुरूला म्हटले त्यांचे एकदोन फ़ोटो काढून घे. घोगळे नावाचे हे गॅरेज वॉशर्स तुम्हाला सावंतवाडीच्या खासकीलवाड्यात भेटू शकतील. गाडी असली नसली वा धुवायची नसली, म्हणून बिघडत नाही. त्यांच्या त्या सुसुत्र कामाचे एक शिल्प म्हणून निरीक्षण करायलाही हरकत नाही. एखाद्या सुंदर नृत्यनाट्य वा बॅलेसारखे त्यांचे काम मनाला सुखद अनुभव देणारे आहे. कुणा नृत्य व नाट्य दिग्दर्शकालाही तितके सुत्रबद्ध काम आपल्या कलाकार संचाकडून करून घेणे अशक्य होईल.

घोगळ्यांनु, गाडी कसली? तुमी माझ्या मनातलो पुर्वग्रह आणि अढी धुवून काढलात ना राव. प्रार्थना त्या पाटेकराक, कोणाची दृष्ट लागाक नको.

17 comments:

  1. श्री भाऊ जरा हलकं फुलक मस्त वाटलं तुम्ही अस ही लिहिता

    ReplyDelete
  2. सुंदर...
    गुरु ची आठवण इथे काढलीत...आनंद झाला..

    ReplyDelete
  3. भाऊनु,
    आमच्या मालवण नी मालवणी भाषेचा नाव मोठा केलास...हय पुण्यात आमच्या मित्रमंडळात तुमच्या ब्लाॅगचो चाहतोवर्ग खूप आसा.ह्यो लेख वाचान् माजी कॉलर ताठ होतलीहा आता....
    कदीमदी पुण्यात इलास तर भेट घेवचो परयत्न करतंय...
    देव रामेश्वर तुमका उदंड आयुष्य आनी आरोग्य देवनेत्

    ReplyDelete
  4. आवडला लेख, भाऊ!

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  5. छान लेख. खरोखरच ही वृत्ती सगळ्या कोकणात पसरू दे. नेहमीच्या विषयापेक्षा वेगळा आणि योग्य त्याचे कौतुक करणारा लेख वाचून बरे वाटले. 👍

    ReplyDelete
  6. Wa mast....Proud of as sawantwadikar

    ReplyDelete
  7. वा, काय सुंदर वर्णन केलं आहे, भाऊ... मस्तच

    ReplyDelete
  8. खुपच छान....असे काही सकारात्मक वाचले की तिथून पुढचा दिवस झकास जातो.

    ReplyDelete
  9. कोकण ची आठवण आली उद्या जाणार आहे तिथे वेळ मिळाला तर माझी गाडी तिथेच सर्व्हिसिंग करू घेतो

    ReplyDelete
  10. वा भाऊ, छोटीशी गोष्ट किती अचूक पकडलीत!खूपच आवडले!!

    ReplyDelete
  11. भाऊनु, मी हरकुळतलो,नदी पार केलास की माझी गाव, बरा वाटला तुम्ही शिवडावक जाऊन ईलास ते.तुम्ही जो मठ संगतहास थय मी सहलिक जाय, साळेक होतंय हरकुळात मी. तुम्ही वर्णन एकदम परफेक्ट केलास.
    गवाक जाऊन इल्या सारख्या वाटला.

    ReplyDelete
  12. खूपचं सुंदर पूर्ण दृश्य डोळ्यासमोर उभे केलेत!! धन्यवाद!!

    ReplyDelete
  13. छान .आपण ललित लेख व कथा यांचे सुंदर मिश्रण करून लिहिले आहे. मधून मधून असे लिहित जावे,ही विनंती

    ReplyDelete
  14. भाऊ खूप छान ..कोणत्याही विषयावर इतकं रंजक लिहिता येण हा वस्तुपाठ तुमच्या कडून शिकण्यासारखा आहे .खूप छान .

    ReplyDelete
  15. असाच अनुभव मला आमच्या अलिबागेस गाडी धुवायला टाकताना आला.ते ही भुमिपुत्रच होते.

    ReplyDelete
  16. मालवणी माणसात एकमत ज़ाले तर ते काहिही करु शकतिल हे नक्की...पण तस ते दुर्मिळ आहे..हे माजे स्वानुभव आहेत.अप्रतिम लेख

    ReplyDelete