Wednesday, January 22, 2020

स्मारकांमागची संकल्पना

Image result for shivaji memorial

अरबी समुद्रातील शिवरायांचे स्मारक किंवा मुंबईच्या इंदू मिल आवारात उभारायचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक; यावरून अनेक उलटसुलट मते व प्रतिक्रीया आलेल्या आहेत. त्याचवेळी जगात ख्यातकिर्त असलेले भक्तांचे श्रद्धास्थान शिर्डीचे साईबाबा, यांच्या जन्मस्थळाचा वाद पेटवण्यात आलेला आहे. ह्या बाबींना मिळणारी प्रसिद्धी व त्यावरून चाललेला वादविवाद बघितला, तर देशाच्या सामान्य जनतेच्या जीवनातील सर्व समस्या प्रश्नांचे निराकरणच झालेले असावे, असेच कोणालाही वाटेल. राज्यात विधानसभा निवडणूका चालू असताना वा नंतर सरकार स्थापन होत असताना, यापैकी कुठल्याही विषयाची कोणाला फ़िकीर नव्हती, किंवा गंधवार्ताही नसावी. अन्यथा तेव्हाही त्यावर तितक्याच आस्थेने व प्राधान्याने चर्चा झाल्या असत्या. पण तेव्हा कोणीही स्मारके वा जन्मस्थळाविषयी अवाक्षर बोलत नव्हता आणि प्रत्येकाला अवकाळी पाऊस व त्यात बुडलेल्या शेतकर्‍याची फ़िकीर होती. मात्र सरकार स्थापन होऊन सत्तावाटप झाल्यापासून कोणालाही त्या विषयांचे स्मरणही राहिलेले नाही. की असे खरेखुरे प्रश्न झाकून टाकण्यासाठी भलतेच विषय ऐरणीवर आणले गेलेले आहेत?

शेतकर्‍यांना बुडिताची भरपाई मिळालेली नाही आणि त्यांचा आवाजही कुठल्या माध्यमात झळकताना दिसत नाही. पण साईंचे जन्मस्थळ म्हणून पाथरी गावाच्या विकासाला मुख्यमंत्र्यांनी अगत्याने शंभर कोटींचा निधी दिला आणि पैसे मिळालेले वा हुकलेले प्रक्षुब्ध होऊन मैदानात आलेले आहेत. साई असोत किंवा बाबासाहेब त्यांनी याक्षणी कुठल्या विषयांना प्राधान्य दिले असते, याचे तरी यापैकी कोणाला भान आहे काय? कर्तबगारीने शिवराय इतिहासपुरूष झाले, ते रयतेचा राजा म्हणून. ती रयत आज कुठे आणि कुठल्या अवस्थेत आहे? त्याचा विचार करून तिला चिंतामुक्त करण्यातून त्यांचे अधिक मोठे स्मारक होऊ शकते. तीच बाबासाहेबांची कथा आहे. स्वत: उच्चशिक्षण कष्टाने मिळवलेल्या बाबासाहेबांनी त्याचा व्यक्तीगत सुखासाठी कितीसा वापर केला होता? त्यापेक्षा आपले सर्वस्व दलित पिडितांच्या व सामान्य जनतेच्या हक्क अधिकारासाठी पणाला लावण्यातून त्यांनी आपली प्रतिमा उभी केली. त्या प्रतिमेची उंची कुठल्याही स्मारकापेक्षाही गगनचुंबी आहे. ती बघण्याची कुवत नाही, त्यांना स्मारकावर होणार्‍या खर्चाची रक्कम कळते. त्यातून असे वाद सुरू होतात. कारण स्मारक कशासाठी, हेच आपण विसरून गेलो आहोत. प्रामुख्याने सामान्य जनतेच्या समस्या आणि स्मारकांचा विषय एकाचवेळी वादाचा केला जातो. कारण अशा लोकांनी रयतेची दु:खे व स्मारकामागचा हेतू यांचीच गल्लत झालेली असते. राज्यकर्ते व राजकारणी यांनी जनतेच्या विषयांना प्राधान्य दिले पाहिजे ना?

कुठल्याही महापुरूष वा इतिहासपुरूषाचे स्मारक त्याच्या आचारविचारांचे असावे. म्हणजे त्यांच्या स्मरणातून काही आदर्शांचे सामान्य माणसाला आपल्या जीवनात अनुकरण करण्याची प्रेरणा मिळावी, अशीच अपेक्षा असते. पण हल्ली आचारविचारांच्या आदर्शापेक्षाही त्यात आपापले राजकीय स्वार्थ शोधले जातात. अन्यथा स्मारकाचा खर्च व अन्य कुठल्या उपक्रमाला योजनेला कमी पडणारा पैसा; यांच्यात गल्लत झाली नसती. सहा लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महाराष्ट्राला दोन भव्य स्मारकांचा काही हजार कोटी रुपयांचा खर्च वाचवण्याचे कारण नाही. त्यातून आरोग्यसेवा किंवा अन्य कुठल्या अडलेल्या योजनेशी तुलना करणेही निरर्थक आहे. कारण योजना आखताना त्यासाठी लागणार्‍या खर्चाचा वा पैसा उभारणीचा वेगळा विचार होत असतो आणि त्यानुसारच रक्कम उभी केली जाते, बाजूला काढली जाते. मुळात सरकारच्या खजिन्यातील पैशाचा सदूपयोग करण्याला प्राधान्य असते आणि दोन महापुरूषांच्या स्मारकाची योजना आखताना त्याची तरतुद झालेली आहे. त्यात उंची वा भव्यता हा विषय खर्चामुळे बदलता येत नाही. गरजही नसते. तिथून पैशाची बचत करण्यापेक्षा अनाठायी खर्च होणारा पैसा वाचवायला खुप जागा आहेत.

देखाव्याच्या वा प्रचाराच्या कार्यक्रम उपक्रमावर हजारो कोटी खर्च होत असतात आणि त्यातून समाजाच्या वाट्याला काहीही येत नसते. नेत्यांच्या चेहर्‍यांच्या जाहिरातीवर किती कोटी रुपये सरकारी खर्च होतो? अशा सर्व जाहिरातींना चाट लावली, तर किती बचत होईल? त्याचाही हिशोब कोणीतरी मांडला आहे काय? त्यातून डझनावारी अडलेल्या योजनांसाठी अधिकचा पैसा उपलब्ध होऊ शकतो. सरकारच्या पैशातून आपले चेहरे इतिहासात नोंदवण्याचा हा अनाठाय़ी खर्च ज्यांना रोखता येत नाही, त्यांनी इतिहासावर आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवलेल्या महान व्यक्तीमत्वांच्या स्मारकाच्या खर्चात बचत करण्याचे प्रस्ताव देणेही आगावूपणाच आहे. कारण त्या महापुरूषांनी उद्याच्या पिढ्यांनी आपले स्मारक उभारावे, म्हणून कर्तृत्व गाजवलेले नाही. अत्यंत निरपेक्षवृत्तीने आपले काम करून त्यांनी जगाचा इतिहास बदलण्याचा पराक्रम केलेला आहे. त्याची फ़क्त आठवण वा पावती म्हणून अशी स्मारके उभारली जातात व जायलाही हवीत. कारण त्यांच्याइतके नाही तरी त्या दिशेने काही पावले टाकण्याची प्रेरणा पुढल्या पिढीला मिळावी हाच त्यातला उद्देश असतो. ती स्मारके महान व्यक्तीमत्वावर तुम्ही केलेले उपकार नसतात. त्यांच्या उपकाराची ॠणाची परतफ़ेडही नसते. तर त्यांच्या नंतरही तसे काम करण्याची प्रेरणा म्हणून स्मारकातली भव्यता हा अविष्कार असतो. तुलनेने त्यांच्या जवळपासही जाऊ शकणार नाहीत, अशा नेत्यांनी वा लोकांनी स्मारकाच्या खर्च व उंचीवर बोलण्याची म्हणूनच गरज नाही. दगडविटा, सिमेन्ट अशा पदार्थाच्या स्मारकाने अशा महापुरूषांची उंची ठरवण्याइतके आपण अजून मोठे झालो नाही, इतके भान ठेवले तरी खुप झाले.

6 comments:

  1. Last line is the epitome of this article. Brilliant bhau.

    ReplyDelete
  2. भाऊ,
    फार सुंदर विचार मांडलेत. शक्य तितक्या माध्यमांमधून अधिकाधिक जनते पर्यंत निदान असे विचार पोहोचावेत. त्याने प्रेरित होणे न होणे ज्याच्या त्याच्या हातात. इतके उत्तम विचार मांडणारे पत्रकार अजून भारतात आहेत हे काय कमी आहे का?

    प्रथम असे म्हणणार होतो की इतक्या प्रगल्भ आणि प्रामाणिक विचारांशी किती लोकांना कर्तव्य आहे. परंतु ते लिहिल्यावर वाटले की असे नकारात्मक विचार तरी आधी स्वतः मधे आणि मग दुसऱ्या मधे काय बदल घडवू शकणार आहेत? मग ते विचार खोडून वरील विचार केला आणि लिहिला.

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  3. रयत आपल्या कामात व भाजी भाकरी मध्ये व्यस्त असते. कोणाही महापुरुषाच्या स्मारकास त्यांचा पाठिंबा नसतो. कार्यकर्ते काही बोलू शकत नाहीत. नेत्यांना राजकारण करायचे आहे. हे सरकार म्हणजे आंधळी राजा... प्रजा मात्र डोळस आहे. मतदान करण्याची वाट पाहणार ५ वर्षे

    ReplyDelete
  4. शिर्डी अथवा पाथरी हा वादच निरर्थक आहे. साई-भक्ताना यात फारसे स्वारस्य नसते, घरातील साईंच्या फोट़ोलाही भक्त मनोभावे नमस्कार करतात.तसेच पुतळे उभे करून आपण या महपुरुषांचा आदर्श थोडाच घेतो? पुतळा उभा करून त्याखाली लिहीलेल्या नामफलकाबाबत आपणांस उत्सुकता.कोणाच्याअध्यक्षतेखाली व कोणाच्या हस्ते यालाच जास्त महत्त्व. नंतर पुतळ्यांची विटंबना व त्याचे राजकारण हे तर नक्कीच

    ReplyDelete
  5. उत्तम भाऊ... अगदी ह्रदयातले

    ReplyDelete