राजकारणात माणसे बोलतात काय यापेक्षा ते करतात काय, याला अधिक महत्व असते. पण तितकीच गोष्ट राहुल गांधींना उमजलेली नाही. अन्यथा त्यांनी कॉग्रेसचा इतका सत्यानाश कशाला केला असता? राहुल २००९ पासून कॉग्रेसचे प्रमुख महासचिव होते आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यावर त्यांनाच पक्षाध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तुलनाच करायची तर मोदी यांचे राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितीजावरील आगमन आणि राहुल यांच्याकडे एकहाती कॉग्रेसचे नेतृत्व येण्याचा मुहूर्त जवळपास एकच होता. आणखी एक योगायोग आहे. मोदींना भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत चेहरा किंवा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पुढे आणले, त्यावेळी राहुल तुलनेने खुप तरूण होते आणि त्यांनी कॉग्रेसला नेतृत्व देऊन पुन्हा सत्तेत आणल्यावर त्यांची अध्यक्षपदी निवड करण्याचा मुळ बेत होता. त्यांच्याच वयाचे गुजरातचे भाजपा नेते अमित शहांना मोदींनी उत्तरप्रदेश पक्षाचे प्रभारी म्हणून आणलेले होते. ह्यातले साम्य समजून घेतले पाहिजे. आपल्या लोकप्रियतेमुळे मोदींना पक्षाने केंद्राचे नेतृत्व सोपवले असले, तरी त्यांचे विश्वासू अमित शहा गुजरातच्या बाहेर कधी काम केलेले नव्हते. पण त्यांच्या संघटना कौशल्याचा लाभ उठवूनच उत्तरप्रदेश जिंकता येईल, हे मोदींनी ताडले होते. देशातील त्या सर्वात मोठ्या राज्यात शहा भाजपला मोठ्या यशापर्यंत घेऊन गेले, तरच त्यांना राष्ट्रीय राजकारणात पुढे न्यायचे असे बहुधा ठरलेले असावे. म्हणजेच २०१४ ची लोकसभा निवडणूक एकाच वेळी तीन नव्या नेत्यांसाठी सत्वपरिक्षा होती. त्यांची नावे आहेत मोदी, शहा आणि राहुल.
२०१४ च्या आरंभी कॉग्रेसच्या हातात देशाची सत्ता होती. नाव भले युपीए असे असेल, पण सत्ता सर्वतोपरी कॉग्रेस पक्षाच्या हातात केंद्रित झालेली होती. तेव्हा राहुलना अध्यक्षपदी आणायचा बेत निश्चित झालेला होता. म्हणून तर मोदींच्या सामन्याला त्यांचे जयपुर येथे अनावरण करण्यात आले. त्यांच्यासाठी पक्षात उपाध्यक्षपद निर्माण करून तिथे त्यांना बसवण्यात आले. जयपूर अधिवेशनात राहूलनी अतिशय आवेशपुर्ण भाषण देऊन छान सुरूवात केली, असे निदान अनेक पुरोगामी पत्रकार संपादकांचे मत होते आणि त्यांनी किंचीतही न लाजता मोदी व राहुलची तुलना केलेली होती. कारण राहुलचे जयपूरचे भाषण आणि मोदींचे दिल्लीच्या श्रीराम कॉलेजातील भाषण यांची तुलना या पत्रकारांनी केलेली होती. मोदी कसे निष्प्रभ व राहुल कसे प्रेरणादायी आहेत, त्यासंबंधी अशा पत्रकार संपादकांचे लेख ट्वीटच आजही तपासून बघता येतील. साडेसहा वर्षानंतर चित्र एकदम बदलून गेलेले आहे. अवघे जग मोदींचा प्रत्येक शब्द गंभीरपणे घेते आणि राहुल जगासमोर केवळ विदूषक ठरलेले आहेत. हा राहुल गांधींचा पराभव नसून त्या पत्रकारांचा व त्यांच्या आकलनाचा दारूण पराभव आहे. पण मुद्दा तो अजिबात नाही. कारण त्याच दरम्यान भाजपामध्ये नवी मांडणी झालेली होती आणि मोदींनी आपला विश्वासू अमित शहा नामक सहकारी उत्तरप्रदेशात आणून बसवला होता. त्याही नेत्याबद्दल बहुतांश संपादक विश्लेषक किती गाफ़ील होते, त्याची साक्ष लोकसभा निकालांनी दिली. कारण एकट्या उत्तरप्रदेशात ८० पैकी ७३ जागा भाजपाला जिंकून देताना शहांनी आपली न पुसणारी छाप पाडली होती.
मुद्दा इतकाच, की शहा गुजरात सोडून राष्ट्रीय राजकारणात आले ते भाजपाचे फ़क्त उत्तरप्रदेश प्रभारी महासचिव म्हणून. त्या परिक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यावर शहांनी लौकरच पक्षाचे अध्यक्षपद मिळवले. मात्र पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचे श्रेय घेऊन पक्षाध्यक्ष होण्याचे राहुल गांधींचे स्वप्न किंवा पक्षाची महत्वाकांक्षी योजना शहांनी पुरती धुळीस मिळवली. योगायोग असा, की दोघांचे वय जवळपास सारखेच आहे. एका बाजूला आपल्या व्यक्तीगत पुण्याई वा कर्तृत्वावर शहांनी इतकी मजल मारली आणि घराण्याची पुर्वपुण्याई पाठीशी असतानाही राहुल पक्षालाच धुळीस मिळवून गेले. हा इतिहास आता सहा वर्षे जुना झालेला आहे. मध्यंतरी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले आणि फ़क्त दिड वर्षात त्यांनी पुन्हा पक्षाला मातीमोल करून दाखवलेले आहे. दरम्यान त्यांच्या मेहनतीमुळे एकाहून एक नामवंत निष्ठावंत व गुणी नेत्यांना कॉग्रेस सोडावी लागलेली आहे आणि अजून तो सिलसिला संपलेला नाही. कालपरवाच कॉग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात एकूण पक्षाच्या दुर्दशेबद्दल बोलण्याचा केवळ प्रयत्न केला, म्हणून एका तरूण नेत्याला कानपिचक्या मिळालेल्या आहेत. सतत मोदींना लक्ष्य करणारी टिका अनाठायी व कॉग्रेसलाच घातक ठरत असल्याचे सांगत या नेत्याने भाजपाच्या धोरणावर टिका करावी असे सुचवले होते. तर त्यालाच प्रियंका गांधींनी गप्प केले. राहुलनी तर आपण एकटेच मोदींना लक्ष्य करतो आणि इतर कॉग्रेसनेते मोदींवर चकार शब्द बोलत नाहीत, असा उलटा आरोप केला. मग कार्यकारिणीतील सर्व ज्येष्ठ नेत्यांची बोबडी वळली आणि त्यांनी राहुलच कसे योग्य आहेत, त्यावर शिक्कामोर्तब करून बैठक संपवण्यात आली.
गेल्या पाचसहा वर्षात कॉग्रेसने अशा किती नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला? जयंती नटराजन, ज्योतिरादित्य शिंदे, टॉम वडक्कन आणि आता संजय झा. इतर लहानसहान नेत्यांची तर खिजगणती नाही. अशा त्यांचा गुन्हा नेमका काय होता? त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला प्रश्न विचारले. त्यांनी चुकीच्या भूमिका व धोरणामुळे पक्षाची पिछेहाट होतेय, म्हणून आक्षेप नोंदवलेले आहेत. अगदी कालपरवाच रायबरेली येथील कॉग्रेसच्या आमदार आदिती सिंग यांनी प्रियंका गांधी यांनी जो हजार बसेसचा तमाशा केला, त्याविषयी नाराजी व्यक्त करून योगी सरकार उत्तम काम करीत असल्याचे सत्य बोलून दाखवले. म्हणून त्यांची हाकालपट्टी झाली. थोडक्यात सामान्य जनतेशी जोडलेल्या सामान्य कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांकडून श्रेष्ठींना जी प्रतिक्रीया मिळत असते, ती लाथाडण्याखेरीज काहीच होताना दिसत नाही. पक्षात विचारमंथन नाही आणि ज्यांना जनतेत स्थान नाही, त्यांच्याच हातात पक्ष फ़सलेला आहे, असे एकूण सामान्य कार्यकर्त्याचे मत आहे, तेच व्यक्त करणारा लेख संजय झा यांनी लिहीला होता. त्याचीच शिक्षा म्हणून त्यांची पक्षातून हाकालपट्टी झाली. हे संजय झा नेमके कोण आहेत? आपल्या सफ़ाईदार इंग्रजी भाषेतून त्यांनी मागली पाचसहा वर्ष राहुल गांधींच्या प्रत्येक पोरकट वा खुळचट विधानांना समर्थनीय ठरवण्याची विविध वाहिन्यांवर कसरत केलेली आहे. तर लोकसभेतील पराभवाचे खापर अशाच लोकांवर फ़ोडून राहुलनी आधी सर्व प्रवक्त्यांची हाकालपट्टी केली. त्यांच्या जागी अनधिकृत प्रवक्ते आणलेले आहेत. रवि श्रीवास्तव, निशांत वर्मा, चेतन शर्मा, कोणी मनस्वी, अब्बास असे तथाकथित पत्रकार विश्लेषक आजकाल कॉग्रेसची बाजू हिरीरीने वाहिन्यांवर मांडताना दिसतात. हा काय प्रकार आहे?
चांगली हिंदी वा इंग्रजी बोलता येणे आणि भाजपा व मोदींच्या विरोधात द्वेषपुर्ण भाषेत बोलण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. पण जिथे मुद्दाच नाही, तिथे वकिली तरी कशी करता येणार? त्यामुळे असे उसनवारीचे प्रवक्ते पोरसवदा युक्तीवाद किंवा खुळचट विधाने करीत असतात. भाजपा मोदींना शिव्या देण्या़चे कर्तव्य त्यांच्याकडून पार पाडले जाते. पण कॉग्रेसची बाजू समर्थपणे मांडली जात नाही किंवा कॉग्रेसकडे काही पर्यायी अजेंडा असल्याचेही मांडले जात नाही. थोडक्यात विरोधासाठी विरोध करणारे शोधून राहुल कॉग्रेसने त्यांच्याकडे पक्षाची लढाई सोपवली आहे. दुसरीकडे भाजपाने आपली प्रवक्त्यांची फ़ौज उभी केली आहे आणि प्रत्येक मंचावर आपली बाजू समर्थपणे मांडली जाईल याची काळजी घेतलेली आहे. संजय झा यांची तीच तक्रार आहे. कॉग्रेसपाशी खंबीरपणे आपली बाजू मांडू शकतील असे नेते व बुद्धीमान लोक आहेत. पण त्यांना गुंडाळून ठेवले गेले आहे. किंवा त्यांनीच स्वेच्छेने बाजूला बसायचे ठरवलेले आहे. कारणही स्पष्ट आहे. त्यांना पक्षाची धोरणे व अजेंडावर समर्थपणे बोलता येईल. पण राहुल यांच्या वेडगळ वक्तव्ये किंवा आरोपांची वकिली करणे अशक्य आहे. त्यातून कॉग्रेसच्या भूमिकेचा प्रसार होणार नाही, पण ते युक्तीवाद मांडणारे अधिकाधिक हास्यास्पद होत जातील. जी स्थिती आजकाल चेतन शर्मा वा निशांत वर्मा यांची आहे. त्यापेक्षा जयराम रमेश सारखे नेते अधिक प्रभावीपणे बोलू शकतील. पण राहुल शहाणे असल्याचे सिद्ध करणे त्यांनाही केवळ अशक्य आहे. किंबहूना राहुल कसे जनतेशी व वास्तवाशी तुटलेले नेतृत्व आहे, त्याची ग्वाही रमेश यांनी २०१३ सालीच दिलेली होती. पुन्हा २०१८ च्या मध्याला त्यांनी ते सांगितलेले होते. पण त्यांना जोडे खाऊन गप्प बसावे लागलेले आहे. कॉग्रेसमध्ये आजकाल शहाण्यासारखे बोलणे वा सांगणे पक्षद्रोह ठरलेला आहे. मग दुसरे काय व्हायचे?
नरेंद्र मोदी हे कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान आहे असे रमेश यांनी २०१३ साली एका मुलाखतीतून सांगितले होते. तर सत्यव्रत चतुर्वेदी नामक चमचेगिरी करू शकणार्या नेत्याने रमेश यांच्यावर हल्ला चढवला होता. इतकीच मोदीभक्ती उतू जात असेल तर रमेश यांनी भाजपात जाऊन मोदींचे गोडवे गावेत असली टिप्पणी झाली आणि रमेश थंडावले. त्यांचे शब्द खरे ठरले आणि आज कॉग्रेस नामशेष व्हायच्या कडेलोटावर उभी आहे. गेल्या वर्षी म्हणजे साधारण लोकसभा निवडणुकीपुर्वी रमेश यांनी पुन्हा कॉग्रेसला सावध करण्याचा प्रयास केला होता. राहुल व एकूण गांधी खानदानाच्या चमच्यांचा कान पिरगाळताना जयराम रमेश टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, बादशाही साम्राज्य कधीच रसातळाला गेले आहे. पण बादशाहीचा मस्तवालपणा अजून संपलेला नाही. त्यांचे शब्द पुन्हा २०१९ च्या लोकसभा निकालांनी खरे ठरवले. पण ऐकायला कोण राजी आहे? सर्व नेते व त्यांचे भाटचमचे पराभवालाच विजय ठरवण्यात गर्क आहेत आणि कॉग्रेसचा दिवसेदिवस र्हास होत चालला आहे. तो कसा व कोणी थांबवायचा इतकाच प्रश्न आहे. मात्र तसा कोणी प्रयत्न केला तरी त्याला बाहेरचा रस्ताच दाखवला जातो. थोडक्यात कॉग्रेसमध्ये रहायचे असेल तर राहुल व प्रियंकाच्या खुळेपणाला शहाणपणा ठरवण्याचे कौशल्य अंगी बाणवता आले पाहिजे. त्यातले दोष व नुकसान दिसत असूनही त्याकडे काणाडोळा करता आला पाहिजे. अन्यथा तुम्हाला आपला मार्ग मोकळा आहे. कॉग्रेस संपवायची आहे आणि त्यात आड येणारा प्रत्येकजण कॉग्रेसचा शत्रू मानला जाईल, हाकलून लावला जाईल.
लेखाच्या आरंभी म्हणून तीन नेत्यांची तुलना केली. त्यापैकी मोदी आता सत्तरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. पण आपला वारसा चालवण्यासाठी त्यांनी पक्षात नव्या नेतृत्वाची नवी फ़ळी उभी करण्याला मागल्या सहा वर्षात प्राधान्य दिले आहे. कितीही विश्वासातला व निकटचा सहकारी असूनही अमित शहांना आपल्या गुणवत्तेची परिक्षा देऊनच इथवर यावे लागलेले आहे. राहुल उपाध्यक्ष झाले आणि शहा महासचिव झाले, तो मुहूर्त समान होता. पाठीशी कसलीही पुण्याई नसतानाही शहांनी पक्षाला देशाच्या कानाकोपर्यात नेण्यापर्यंत मजल मारली, उलट राहुलनी त्याच कालखंडात कॉग्रेसची विविध राज्यात खोलवर रुजलेली मुळे उखडून काढण्याचा चमत्कारीक पराक्रम केला आहे. त्यांनी तीनदा आरामात जिंकलेला अमेठीचा वडिलार्जित बालेकिल्ला यावेळी गमावला आणि प्रियंका यांनी रायबरेली अमेठीतल्या एकमेव कॉग्रेस आमदार अदिती सिंग यांनाही पक्षातून हाकलून लावण्याचा पल्ला गाठला आहे. या दोघा वंशजांकडून कॉग्रेस कुठे ढकलली जात आहे, त्याची ही कहाणी सांगायला पुरोगामी पत्रकार तयार नाहीत, म्हणून सत्य बदलत नाही किंवा परिणाम बदलणार नाहीत. अमित शहांनी या काळात पक्षासाठी किती लोक जोडले आणि राहुलनी किती नेते कार्यकर्ते व लोक तोडले? कधीतरी त्याचेही साकल्याने विश्लेषण होण्याची गरज आहे. पत्रकारांनी नुसती दोन पक्षांची आरोपबाजी लोकांना सांगण्याचा चुगलखोरपणा थांबवून वाचकांसमोर राजकारणाचे तुलनात्मक विश्लेषण करायला हवे. तरच देशातील भाजपा ह्या सत्ताधारी पक्षाला पर्याय उभा राहू शकेल. अन्यथा भाजपाचीही कॉग्रेस होऊन जाईल आणि एकपक्षाच्या वर्चस्वाने लोकशाही दुबळी होत असते. माध्यमांनी बुद्धीमंतांनी लोकांना पर्याय द्यायचा नसतो, तर पर्याय उभा करायला प्रवृत्त करायचे असते. म्हणून ही तुलना.
शहा हे धूर्त आहेत. पण जनतेला चेतवणारे भाषण करत नाहीत. इतरही पुढे आले पाहिजेत.
ReplyDeleteपरखड आणि स्पष्ट विश्लेषण
ReplyDeleteकाँग्रेस पक्षातील सर्व घटकांना एकत्र ठेवण्यासाठी नेहरु गांधी घराण्यातील व्यक्तीच्या हाती पक्षाचे नेतृत्व असणे आवश्यक आहे हे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्याचा अर्थ पक्षात अनेक गट केवळ भाजपला विरोध एवढ्या एकाच मुद्द्यावर एकत्र आहेत पण त्याचे अन्य तात्विक मुद्द्यावर एकमत नाही आणि अन्य विचारसरणी असलेल्या व्यक्तव्यक्तीचे नेतृत्व ते स्वीकारायला.तयार नाहीत. इंदिरा गांधीनी आणीबाणी लादल्यामुळे नाइलाजाने काँग्रेस विरोधी पक्ष जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले पण त्या प्रचंड यशानंतर लगेच विखरले. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप हा बऱ्यापैकी एकच विचारसरणी मानणाऱ्या अनुयायांचा व मोदींच्या राजकीय नेतृत्वावर भरोसा असलेल्यांचा पक्ष आहे, त्यामुळे सत्तेच्या महत्त्वाकांक्षेने फुटून वेगळे झाल्यास आपल्याला राजकीय भवितव्य नाही ही जाणीवही पक्षात आहे. मोदींच्या विचारसरणीला विरोध असणारे वृत्तपत्रीय लेखन करणाऱ्या. लोकांना त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष उभा असलेला हवा आहे आणि म्हणून ते त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण राजकीय पक्ष जनतेच्या पाठिंब्यावर उभे राहतात. या वृत्तपत्रीय लेखन करणाऱ्यांना जनता मानत नाही. त्यामुळे सरकारविरोधात प्रचार भरपूर दिसतो पण लोकाचा विश्वास मोदींवरच असल्याचे निवडणुकीत दिसते. तुल्यबळ विरोधी पक्ष निर्माण होण्यास मोदी इंदिरा गांधींसारखी चूक जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत शक्यता दिसत नाही.
ReplyDeleteexcellent analysis
ReplyDeleteभाऊ
ReplyDeleteछान लेख व विचार.ही कॅान्ग्रेस ज्या कॉन्ग्रेसने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले ती नसून सत्तालोलुप राजकारण्यांची टोळी आहे हे समजून घेतले पाहिजे.प्रबळ विरोधी पक्ष असणे हे निरोगी लोकशाहीची गरज आहे.पण गेल्या सहा वर्षातील कॉन्ग्रेसचे काम हा पक्ष लवकरात लवकर संपणे आवश्यक आहे त्याशिवाय नवा पर्याय येऊ शकत नाही.
भाऊ, अगदी सत्य लिहिले आहेत. तसा राहूल हा बेभानपणे आरोप करतो इतका बेभान की कोणत्यातरी अमली पदार्थाच्या अंमलाखाली आहे की काय अशी शंका यावी. लोकांनी बहूमताने निवडून दिलेल्या पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणे, प्रत्येक निर्णयावर बेफाम आरोप करणे, यातून जनसामान्यांच्या मनातून दिवसेंदिवस उतरत चालला आहे.
ReplyDeleteआपल्याकडचे सध्या स्वतःला बुद्धिमंत समजून मिडियावर चमकोगिरी करणाऱ्यांना बुद्धिमंत का म्हणावे हा मोठा प्रश्न आहे. हे स्वतःच्या घरातील निर्णय घ्यायच्या लायकीचे नाहीत आणि आपण त्यांच्याकडून पर्याय द्यायची अपेक्षा करता आहात. गेली सात आठ वर्षे ते राहूल गांंधीमध्ये पंतप्रधान पहाताहेत यावरुनच त्यांची कुवत समजते. प्रियांका वडेरा मध्ये त्यांना इंदिरा गांधी दिसते याला बुद्धिमंत नाही गाजरपारखी म्हणतात.
सत्य आहे कार्यक्षमता सिद्ध करून दाखवली तरच तुम्हाला पुढे जाता येते त्याला कोणताही पर्यायी मार्ग नाही
ReplyDeleteनेहमप्रमाणेच छान आणि वास्तववादी लेख आहे सर तुमचे लेख अगदी राजकारणातल्या र माहीत नसणाऱ्या आमच्या सारख्या नवीन वाचकांना संजय बनून संपूर्ण कुरक्षेत्र दाखवत आहेत
ReplyDeleteसुंदरच. विशेषतः शेवटची दोन वाक्ये. 'माध्यमांनी बुद्धीमंतांनी लोकांना पर्याय द्यायचा नसतो तर पर्याय उभा करायला प्रवृत्त करायचे असते. म्हणून ही तुलना.'
ReplyDelete
https://youtu.be/0JbfQcymlIo
ReplyDeleteभाऊ हा व्हिडिओ बघा , RVS Mani हे चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना होम सेक्रेटरी होते .RVS Mani यांनी राजीव गांधी फाऊंडेशनला जे पैसे दिले गेले त्यातून देशाला कसे नुकसान झाले आहे ते सांगितले आहे , व मराठीतून या विषयावर व्हिडिओ बनवा .
भाऊ तरीही गबाळे लोक काँग्रेसची तळी उचलतातच. महाराष्ट्रात काँग्रेस ला मतदान
ReplyDeleteकसे झाले? त्यांचे 35+ आमदार व तेच ते लीडर्स कसे निवडून आले. गेलाबाजार
महाराष्ट्राचे सोडा, मध्यप्रदेश घ्या, छत्तीसगढ घ्या, लोक काँग्रेसची तळी उचलतातच
इलाईट वर्गात राहुल गांधी पप्पू आहे. जनमानसात नेहरू गांधी घराण्याचे
गारुड आहेच. भारतात अत्यंत विचित्र पोलिटिकल सिनॅरिओ आहे. शरद पवारांना
जाणता राजा म्हणून त्यांचे लोक चिवसेनेला सत्तेवर बसवतात. काय वाट्टेल ते
करतात. बी जे पी ला जनमानसात नेहरू गांधी घराण्याचे जे गारुड आहे त्याचा
मुळापासून बंदोबस्त करायला हवा. पत्रकारांवर ते काम सोडून चालणार नाही. काँग्रेस
ने केलेल्या कुलंग्या अत्यंत ठळकपद्धतीने लोकांसमोर आणायला हवे.
हे वाचल्यावर कुमार केतकरांच्या व्यापक कटाच्या वक्तव्यावर विश्वास बसू लागलाय 🤣
ReplyDeleteNice bhau
ReplyDeleteमुद्देसूद, सडेतोड तुलना!
ReplyDeleteकॉंग्रेस आणि नेहरू परिवाराची भलावण करून होणाऱ्या विविध प्रकारच्या लाभार्थी पत्रकारांना राहुल नावाचे दुखणे गळू सारखेच त्रास देत असावे.त्याला जपताना हाल होत असावेत..त्यात नव्या सरकारने मलिदा बंद केल्याने सहन ही करता येत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था झाली आहे... आता ह्या वर औषध काय? 'पू' काढून स्वच्छ होईल तेंव्हा 'रोगामीं'ना बरे वाटण्याची शक्यता आहे!😂
सत्य परिस्थिती आहे, झोपलेल्या माणसाला उठवता येते पण ढोंग करणाऱ्याला नाही.
ReplyDeleteभाऊ काल हुरीयत चे संस्थापक अध्यक्ष गिलानी यांनी राजीनामा दिला, त्याचा खरा / गूढ अर्थ, किंवा यात काय गमक आहे त्यावर एक लेख किंवा व्हिडीओ यावा अशी विनंती आहे
ओ भाऊ,काँग्रेस ला सावध करू नका. कारण काँग्रेस सम्पलेलीच बरी आहे. Congress must die now.
ReplyDeleteतुम्ही जे सत्य सांगता ते बऱ्याच काँग्रेसी ना समजते पण भाऊ त्यांना जागे करू नका
ReplyDeleteया देशातून काँग्रेस उच्चाटन झालेच पाहिजे
बाकी सगळे म्हणत आहेत त्या प्रमाणे राहुल गांधी हा विषय बाजूलाच ठेवा,पक्षाला श्रद्धांजली द्यायच्या वेळेला बोलू
ReplyDeleteI love your content your content is rich in quality thanks for sharing this type of content.
ReplyDeleteMORE= miss u Quotes | shayri | status | images