Tuesday, April 23, 2013

आठवणीतला गारवा



झाली त्याला आता पन्नास पंचावन्न वर्ष. ‘लालबागचा राजा’ जिथे स्थानापन्न होतो ना, तिथे हमरस्त्यावरून एक वळण चिंचपोकळी रेल्वे स्थानकाकडे जाते. त्याच वळणावर जरा पुढे गेल्यावर गणेश टॉकीज आहे. नेमक्या याच वळणाच्या फ़ुटपाथला लागून काही मसाल्याची व कोंबड्यांची दुकाने आहेत. त्यांच्याच डोक्यावर किमान तीनचारशे फ़ुट लांबीचे व पंधरा एक फ़ुट उंचीचे भव्यदिव्य अगडबंब पोस्टर लागलेले आठवते. त्या काळात आजच्यासारखी वहानांची गर्दी नव्हती. एक बस वा ट्रक कशीबशी जाऊ शकेल इतकाच रुंद रस्ता असायचा. पण दोन्ही बाजूंना आणि मध्यंतरी तेवढीच रुंदी ट्रामच्या रुळांनी व्यापलेली असायची. अशा त्या वळणावर ते पोस्टर दोनचार दिवस तरी लोकांना खिळवून ठेवणारे होते. तिथे थबकून व संथगतीने चालत लोक पोस्टर न्याहाळत पुढे जायचे. आम्ही आठदहा वर्षाची पोरे तर शाळेत जाता येताना कित्येक दिवस ते बारकाईने बघत त्यातल्या कलावंतांना डोळ्यात साठवत होतो. कारण त्या काळात व त्या वयात चित्रपट बघण्याची रीतच नव्हती. कुठे कोणाच्या घरी बारसे निघाले वा चाळीचा सत्यनारायण असला, तर रेकॉर्डीवर सिनेमाची गाणी वाजायची. आणि ज्यांच्याकडे रेडीओ होता, त्यांच्या घरातल्या आजोबांच्या शिस्तीमुळे सिनेमाची गाणी वाजवणारे स्टेशन लागतच नसायचे. अशा काळातले ते अवाढव्य पोस्टर म्हणजे आम्हा पोरांसाठी पर्वणी होती. महिनाभरापेक्षा अधिक काळ आम्ही पोरं आशाळभूतासारखी तिथे टाईमपास करीत ते न्याहाळण्यात कित्येक तास खर्ची घातलेले आहेत. तो चित्रपट होता ‘मुगले आझम’.

त्याच चित्रपटाने आमच्या मागल्या बाजूच्या रस्त्यावर असलेल्या गणेश टॉकीजचा मुहूर्त झाला. तो तिथे झळकलेला पहिला चित्रपट. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे ते आम्ही ऐकलेले पहिले एअरकंडीशन्ड थिएटर होते, मध्य मुंबईच्या गिरणगावातले. कदाचित एकुलते एक. खरे तर आमच्या ज्ञानात एअरकंडीशन या शब्दाची भर घालणारी ती पहिली वास्तू. चित्रपट तिथे किती चालला माहित नाही. पण टॉकीज सुरू झाल्यापासून कित्येक महिने मग आम्हा पोरांसाठी त्या थिएटरच्या प्रवेशाचा भाग अड्डाच झालेला होता. कारण काचेची दारे व त्यांची आपोआप उघडझाप झाल्यावर बाहेर डोकावणारी गार झुळूक, हे अप्रुप होते. साली ही गार हवा येतेच कुठून? काचेतून आत कुठे पंखा दिसायचा नाही, पण बर्फ़ाने फ़ुंकर घालावी तशी ती हवा वेड लावून गेली होती आम्हा पोरांना. रिकामा वेळ मिळाला, की सर्वकाही सोडून आम्ही गणेश टॉकीजच्या दारात हजर. मग तिथला गुरखा गर्दीच्या वेळी हुसकून लावायचा. पण काही आठवड्यातच एक मोठा शोध लागला. काचेच्या पार गेले, की अडव्हान्स बुकींगची रांग असायची. एकदा किशाने बापाची पाटलोण चढवून थेट काचेच्या पार जाण्याची हिंमत केली. काचेच्या आतल्या जगात बुकिंगच्या रांगेत उभा राहून थंडगार हवेची लूट केली त्याने आणि आम्ही बाहेर उन्हातून त्याला बघतोय. दुसर्‍या दिवसांपासून आणखी चारपाच जणांनी बापाच्या काकाच्या लांबड्या पाटलोणी चढवून काचेच्या पार प्रवेश मिळवला. माझ्या नशीबी ते सुख नव्हतेच. म्हणजे तिथे जाऊन रांग धरायची आणि खिडकीपाशी जवळ दोनतीन नंबर असले, मग रांग सोडून पुन्हा मागे शेवटी येऊन उभे रहायचे. मात्र दोनतीन दिवसातच गुरख्याला चेहरे ओळखीचे झाले आणि लांबड्या पाटलोणीची जादू संपली. पण पुढे कित्येक महिने आम्ही त्या दारात काचेच्या बाहेर राहूनही त्या थंड हवेची यथेच्छ लुटमार करीतच होतो.

पुढे वय वाढले, जग बदलले. एअरकंडीशनचा एसी झाला. ऑफ़िसमध्ये वा केबीनमध्येही एसीची सुविधा आली. पण पन्नास वर्षापुर्वीच्या त्या गणेश टॉकीजच्या दारात जी थंड हवेची मौज लुटली होती, तो गारवा परत कधी अनुभवता आलाच नाही. एक साधा एअरकंडीशन हा विषय आम्हाला वर्ष दिडवर्ष तरी कौतुकाचा वा अपुर्वाईचा ठरला होता. ते नाविन्य पचवण्याला दिर्घकाळ लागला होता. नवनव्या गोह्टी सुविधा येण्याचा वेगच खुप संथ होता. आज त्याहीपेक्षा कोवळ्या वयात मोबाईल वा आयफोन हजम करणारी मुले बघितली; मग आपण खुपच बावळट होतो, असे वाटू लागते. पण अजूनही त्या गणेश टॉकीजच्या बाजूने कधी गेलो किंवा कधी कुठे दाराच्या फ़टीतून एसीची गार झुळूक आली, मग ते आनंदाचे क्षण धावत येऊन मिठीच मारतात.

No comments:

Post a Comment