आपल्या वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला गेलेल्या सोनिया गांधी यांना तिथल्या कुठल्या न्यायालयाने म्हणे समन्स काढले आहे. त्याचे कारण तब्बल २९ वर्षापुर्वीच्या भारतातील दंगलीचे आहे. १९८४ च्या नोव्हेंबर महिन्यात इंदिरा हत्येमुळे दिल्लीत व आसपासच्या परिसरात भीषण दंगली उसळल्या होत्या. अर्थात त्याला दंगल असे म्हणणेही चुक आहे. कारण दंगलीत दोन समाज गटात तुंबळ हिंसाचार होतो. दिल्लीत घडले ते गुजरातपेक्षाही भीषण होते. निव्वळ शीखांचे शिरकाण होते. त्या कालखंडात भारतामध्ये आजच्या इस्लामी जिहाद सारखी खलीस्तानी चळवळ जोरात होती आणि तिचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान पदावर असलेल्या इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाई केलेली होती. शिखांचे सर्वात पवित्र मानले जाणारे अमृतसर येथील सुवर्णमंदीर आहे. तिथे या हिंसक आंदोलनाचे म्होरके लपून बसलेले होते आणि त्यांनी अनेकांना ओलीसही ठेवलेले होते. या सशस्त्र खलीस्तानी घातपात्यांचा बंदोबस्त सा्धे पोलिस करू शकणार नव्हते. म्हणूनच तिथे धार्मिक स्थान असतानाही लष्कर घुसवण्याचे धाडस इंदिराजींनी दाखवले होते. पण त्यामुळे देशभरचाच नव्हेतर जगभर पसरलेला शीख समुदाय विचलित झालेला होता. सहाजिकच त्यातल्या माथेफ़िरूंनी इंदिरा गांधींवर डुख ठेवला होता. त्यातूनच मग इंदिरा हत्या झालेली होती. त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेले बियांत सिंग व सतवंत सिंग अशा अंगरक्षकांनी पंतप्रधान निवासातच इंदिराजींना अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारले. त्यातून मग दिल्ली व अन्यत्र अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटलेली होती. दिल्ली व आसपासच्या परिसरात शिखांची मोठी लोकसंख्या आहे आणि तेच मग त्या प्रक्षोभक हिंसाचाराचे बळी झाले. अक्षरश: शिखांचे त्या काळात शिरकाण झाले.
त्यात शिखांना टिपून टिपून ठार मारण्यात आले. मुले, म्हातारे, महिला अशी कोणाविषयी दयामाया दाखवण्यात आली नाही. शिखांची घरेदारे दुकाने व मालमत्ता जाळण्यात आल्या आणि त्यासाठी प्रामुख्याने कॉग्रेस नेत्यांचा पुढाकार होता. आईच्या हत्येनंतर काही तासातच पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेणार्या राजीव गांधी यांनी त्यावर कठोर कारवाई करण्यापेक्षा हत्याकांडाचे धक्कादायक समर्थन केलेले होते. जुना प्रचंड वृक्ष उन्मळून पडला, मग त्याखाली किरकोळ जीव मारले जातातच. असे म्हणत राजीव गांधी यांनी त्या शिख शिरकाणाला जणू मान्यताच दिलेली होती. इतकेच नव्हेतर त्यात पुढाकार घेणार्या अनेक कॉग्रेस नेत्यांना पुढल्या काळात बक्षीसी दिल्याप्रमाणे सत्तापदे व अधिकारपदे वाटण्यात आली. आज तीन दशकाचा कालावधी होत आलेला असला, तरी त्या भीषण हत्याकांडातील कुणाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, की त्यांच्यावर सरकारने खटले चालविलेले नाहीत. तपासकाम होऊ शकले नाही, की गुन्हे दाखल होऊ शकले नाहीत. त्यामुळेच जगभर पसरलेल्या शिख समुदायाने सतत त्याविरुद्ध मिळेल तिथे आवाज उठवलेला आहे. त्या कालखंडात बहुतांश सत्ता कॉग्रेसच्याच हाती राहिली आणि म्हणूनच त्यातील आपल्याच पक्षातल्या गुन्हेगारांना कॉग्रेस पाठीशी घालत राहिली; असा अनेक शिख संघटनांचा आरोप आहे. असाच एक गट अमेरिकेत असून त्यांनी तिथे त्याविरुद्ध न्याय मिळवण्य़ाचा प्रयत्न केलेला आहे. त्याच संदर्भात आता सोनिया गांधींना कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणून हे समन्स काढण्यात आलेले आहे. पण जी घटना भारतात घडली, त्याबाबतीतला खटला अमेरिकेत वा परदेशात होऊ शकतो काय? अनेकांना असा प्रश्न पडलेला आहे. काहींना तो अमेरिकन कोर्टाचा आगावूपणाही वाटलेला आहे.
भारतातही कायदे आहेत आणि इथे घडलेल्या घटनांचे न्यायनिवाडे करण्याइतकी भारतीय न्यायव्यवस्था समर्थ आहे. तेव्हा त्यात अमेरिकेने हस्तक्षेप करणे म्हणजे अतिरेकच झाला. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो असे म्हणतात, त्यातला हा प्रकार झाला. सवाल सोनियांच्या समन्सपुरता मर्यादित नाही. हा भारतीय कारभार व न्यायातला हस्तक्षेप आहे, असेही काहीजणांना वाटते आहे. पण असे प्रथमच घडले आहे काय? काळ सोकावयाचे भय आताच कुठून आले? यापुर्वी अमेरिकन सरकार व कायदे राबवणार्यांनी असाच अतिरेक केलेला नाही काय? आणि आज गळा काढणार्यांना तेव्हा त्यातूनच अमेरिकारुपी काळ सोकावतो, याचे भान नव्हते काय? गुजरातच्या दंगली झाल्या त्याच्या विरोधात तिथे अमेरिकेत व युरोपात स्थायिक झालेल्या काही लोकांनी मुख्यमंत्री मोदी यांना गुन्हेगार ठरवून व्हिसा नाकारण्याचा आग्रह तिथल्या सरकारकडे केलेला होता आणि तो मानला गेलेला आहे. तेव्हाच भारतीय न्यायप्रक्रियेत अमेरिका व अन्य युरोपीयन देशांनी हस्तक्षेप केला होता. कारण अजून तरी कुठल्या भारतीय न्यायालयाने दंगलप्रकरणी मोदी यांना दोषी ठरवलेले नाही. पण तरीही त्यांना त्यातले दोषी मानून व्हिसा नाकारण्यात आला. इतकेच नव्हेतर अन्य साधनांच्या मार्गाने मोदींचे तिथे कुठल्या कार्यक्रमात भाषण ठेवण्यातही अडथळे आणले गेले. तोही तितकाच हस्तक्षेप होता. पण तेव्हा त्या आक्षेपार्ह वागण्याचे टाळ्य़ा वाजवून स्वागत करणारेच आज विचलीत झालेले आहेत. कारण आता अमेरिकेच्या आगावूपणाचे चटके त्यांच्याच लाडक्या सोनियांना बसू लागले आहेत. तेव्हा त्यांना काळ सोकावतो असे वाटते आहे. मोदींच्या व्हिसा नाकारण्याला म्हातारी मेल्याने दु:ख करायला नको म्हणणार्यांनीच, हा काळ सोकावण्यास प्रोत्साहन दिले. तेव्हा आता त्याचे चटके बसले तर रडायचे कशाला?
No comments:
Post a Comment