Friday, October 25, 2013

कॉमनसेन्स आणि नॉनसेन्स



   देशात कांद्याच्या किंमती भडकल्याने प्रत्येकजण कृषीमंत्री शरद पवार यांच्या नावाने शंख करतो आहे. पण त्याबद्दल नुसते एका पत्रकार परिषदेत विचारले असताना, साहेब इतके वैतागले, की त्या पत्रकारालाच सामान्यबुद्धी नसल्याचे प्रमाणपत्र त्यांनी देऊन टाकले होते. पत्रकार परिषद सचिनच्या अंतिम कसोटी सामन्याच्या तयारी व पवारांच्या नव्या अध्यक्ष पदाच्या मुहूर्ताची असताना, कांद्याचा विषय काढू नये; इतकीही सामान्यबुद्धी आजकालच्या ‘नॉनसेन्स’ पत्रकारांना उरलेली नाही. म्हणूनच मग पवारांना त्याचे धडे असे जाहिरपणे द्यावे लागत असतात. खरे तर त्याच सामान्यज्ञानाचा पुढला तास पवारांनी लौकरच घेण्याची गरज आहे. मात्र तो पत्रकारांसाठी न घेता दिग्विजय सिंग व अन्य कॉग्रेस श्रेष्ठींसाठी घ्यायला हवा आहे. कारण ही तमाम मंडळी कसलाही अनुभव नसलेल्या राहुल गांधींना थेट पंतप्रधान करायला निघालेली आहेत. तसे झाल्यास राहुल गांधी यांच्यासमवेत आपल्याला काम करता येणार नाही, अशी घोषणा पवारांनी करून टाकली आहे. त्यामुळे मग आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पवार युपीएमध्ये असतील काय; अशी शंका पत्रकारांना येणारच. लगेच पवारांनी बॉम्ब टाकला, असली भाषा सुरू झाली. पण पुढे पवार काय म्हणाले त्याकडे कोणी डोळसपणे बघितलेले नाही. पंतप्रधान होण्यापुर्वी आपली कुवत राहुलनी सिद्ध करावी, असा त्यांचा आग्रह आहे. म्हणजे कुवत सिद्ध झाली; तर पवार राहुलच्याही सोबत म्हणजे हाताखाली काम करतीलच. आता ही कुवत कशी सिद्ध होते आणि तिचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे; त्याबद्दल पवारांनी मौन पाळले आहे. कारण यापुर्वी त्यांनी अशीच अनेकांना प्रमाणपत्रे बहाल केलेली आहेत. राहुलचे मातापिता त्यापैकीच होत.

   १९८४-८५ अशा दोन सार्वत्रिक निवडणूका राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील कॉग्रेस विरोधात लढवल्यावर आणि त्यात दणकून आपटी खाल्ल्यावर पवार यांना राजीव गांधीची कुवत फ़ार मोठी असल्याचा साक्षात्कार झाला होता आणि त्यांनी वर्षभरातच आपला समाजवादी कॉग्रेस पक्ष गुंडाळून थेट कॉग्रेसमध्येच प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या वर्षभरात त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दुसर्‍यांदा मिळालेले होते. याला म्हणतात कसोटी घेऊन कुवतीचे प्रमाणपत्र द्यायची कुवत. ती केवळ शरद पवार यांच्यापाशीच आहे. बाकीच्या भारतीय राजकारण्यांना आपली तेवढी व्यापक गुणवत्ता आजवर तरी सिद्ध करता आलेली नाही. जेव्हा राजीव गांधींनी लोकसभेच्या विक्रमी जागा व निर्विवाद सत्ता मिळवली; तेव्हाच त्यांच्यात कुवत असल्याचे सिद्ध झाले. पण ते सिद्ध करताना राजीव गांधींनी शरद पवार यांच्यापाशी आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे महाराष्ट्रातही साधे बहूमत मिळवण्याची कुवत नसल्याचे सिद्ध केलेले होते. याचा अर्थ असा, की राजीव गांधी यांनी आपली कुवत असल्याचे सिद्ध करण्यापेक्षा पवारांपाशी कुवत नसल्याचे सिद्ध करून दाखवले होते. तेव्हा कुठे पवारांना राजीव गांधींची कुवत असल्याचे जाणवले. ताबडतोब त्यांनी आपला पक्ष गुंडाळला आणि राजीवजींचे आधीच बळकट असलेले हात; आणखी बळकट करण्यासाठी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. राजीवपाशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद संभाळणारा कुवतीचा कुणी नेता नव्हता, ती कुवत घेऊनच पवारसाहेब कॉग्रेस पक्षात माघारे गेले. पुढल्या काळात तर त्यांना नरसिंहराव आणि सीताराम केसरी अशा अफ़ाट कुवतीच्या नेत्यांच्या हाताखाली काम करण्याची अपूर्व संधी लाभली. राहुलनी अजून त्यापैकी काहीच केलेले नाही. मग पवारांना त्यांच्यासोबत काम करणे कसे जमावे?

   पुढे राव आणि केसरी यांच्या कार्यक्षम नेतृत्वाबद्दल पवारांनी कधी तक्रार केली नाही. पण केसरी यांना सत्ता व बहुमत जिंकून दाखवता आले नाही; तेव्हा पवारांना केसरींची कुवत कळली आणि त्यांनी तात्काळ सोनिया गांधींची कुवत ओळखून त्यांना कॉग्रेसने नेतृत्व करायचा आग्रह धरला. त्यासाठी केसरी यांना पक्षाच्या कार्यालयातून पळता भूई थोडी केली होती. पण सोनियांची कुवत पवारांना वर्षभरात आलेल्या पुढल्याच लोकसभा मध्यावधी निवडणुकीत कळली आणि त्यांनी सोनियांसमवेत काम अशक्य असल्याचे जाहिर करून टाकले होते. तेव्हा अकस्मात सोनिया परदेशी नागरिक असल्याने देशाचे नेतृत्व करायची कुवत त्यांच्यापाशी नसल्याचा शोध पवारांना लागला होता आणि त्यांनी विनाविलंब सोनियांचे नेतृत्व नाकारून आपली वेगळी चुल मांडली होती. अशी चार वर्षे गेली. पुढल्या सार्वत्रिक निवडणूकीत सोनिया गांधी सत्ता व बहुमत आणू शकतात, ही कुवत असल्याचे दिसताच त्याच पवारांनी सोनियांच्या सोबत काम करायचे मान्य केले. गेली नऊ वर्षे मग सोनियांच्या इशार्‍यावर चाललेल्या युपीए सरकारमध्ये पवार कृषीमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर कधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कुवत तपासली नाही. कारण सरकार पंतप्रधान चालवत नाहीत, की स्वत: थेट लोकसभेत निवडून येत नाहीत. पण पवारांनी कधी कुवतीची तक्रार केली? त्यांच्यासह मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळाने एक अध्यादेश काढला होता. एका फ़टक्यात राहुल गांधी यांनी सर्व मंत्रीमंडळालाच मुर्ख घोषित करून टाकले. अध्यादेश प्रकरणात युपीए सरकारने जे काही केले तो निव्वळ नॉनसेन्स म्हणजे मुर्खपणा होता, असे राहुलनी म्हटल्यावर (कम)कुवत, पवारांची सिद्ध झाली की राहुलची?

No comments:

Post a Comment