आम आदमी पक्षाचे नेते व बुद्धीमंत म्हणून माध्यमात ख्यातनाम असलेले अभ्यासक योगेंद्र यादव, नेहमी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचे नामस्मरण करीत असतात. विधानसभांचे निकाल येण्यापुर्वी यादव ती आठवण सांगताना कांशीराम यांचे ऐतिहासिक विधान ऐकवायचे. ‘पहिला चुनाव हारने के लिये. दुसरा हराने के लिये और तिसरा चुनाव जितने के लिये.’ दिल्लीत मोठेच यश मिळवताना यादव यांच्या पक्षाने एकदम तीन पायर्या पार केल्या आहेत. त्याच्यापुढली पायरी कोणती हे मात्र यादव सांगत नाहीत. कदाचित कांशिराम यांनीच सांगून ठेवलेली नसेल, म्हणून यादवांना त्यापैकी काही सुचत नसावे. असो, त्यांच्या माहितीसाठी अशाच एका मोठ्या यशानंतर कांशिराम यांनी केलेले एक ऐतिहासिक विधानाचे स्मरण करून देणे अगत्याचे ठरावे. बाबरी पाडली गेल्यावर १९९३ सालात झालेल्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत कांशिराम यांच्या पक्षाने प्रथमच अन्य कुठल्या पक्षाबरोबर युती वा आघाडी केली व मोठे यश पहिल्यांदाच मिळवले होते. आधीच्या प्रत्येक निवडणूकीत क्रमाक्रमाने वाढलेली बसपाची मते विचारात घेऊन, नव्याने मांडणी करणार्या मुलायमसिंग यादव यांनी सपा-बसपा युतीचा प्रयोग केला होता. त्यात दहा पंधरा जागांवर घुटमळणार्या बसपाला मोठेच यश मिळून गेले होते. त्या युतीने प्रथमच बहुजन समाज पक्षाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले होते. त्या पक्षाचे राज्यात चाळीसच्या आसपास आमदार निवडून आलेले होते. त्यानंतर इतर अनेक राज्यात कांशिराम मित्र पक्षांचा शोध घेऊ लागले होते. महाराष्ट्रापासून आंध्रप्रदेशपर्यंत त्यांनी अनेक प्रादेशिक पक्षांशी मैत्री करण्याचा प्रयास केला. तेव्हा प्रत्येकवेळी कांशिराम म्हणायचे, ‘मी या राज्यातला मुलायमसिंग शोधतो आहे’.
कांशिराम यांच्या पक्षाच्या मदतीमुळे, धुळीस मिळालेल्या समाजवादी पक्ष व मुलायम यांना नव्याने उत्तरप्रदेशात आपले पाय रोवून उभे रहाता आले तरी त्याच्या त्या युतीला बहूमत मात्र मिळू शकले नव्हते. पण त्यांनी भाजपाला बहूमतापासून वंचित ठेवण्यात यश मिळवले होते. मग सपा-बसपा युतीला सरकार स्थापन करण्यासाठी कॉग्रेसने बाहेरून पाठींबा दिला आणि पावणे दोनशे आमदारांचे पाठबळ असूनही भाजपाला विरोधी पक्षात बसायची वेळ आणली होती. मुलायम त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि त्यांना आव्हान देत मायावती उदयास आल्या. असो, मुद्दा कांशिराम यांच्या दुसर्या ऐतिहासिक विधानाचा आहे; जे योगेंद्र यादव सांगत नाहीत. पण दिल्लीत यश संपादन केल्यावर यादव यांच्या पक्षाने देशाच्या अन्य भागात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा जो मार्ग चोखाळला आहे; त्याचे सुत्र अनवधानाने नेमके कांशिराम यांचेच आहे. प्रत्येक राज्यात कांशिराम स्थानिक मुलायमचा शोध घेत होते आणि योगेंद्र यादव यांचा आम आदमी पक्षही स्थानिक वंचित राजकीय कार्यकर्ते व नेत्यांचा शोध घेताना दिसत आहे. विविध राज्यात ‘आप’ची आधीच संघटना असल्याचे दावे यापुर्वीच करण्यात आलेले आहेत. आता त्या पक्ष शाखा मित्रांचा शोध घेऊ लागल्या आहेत. कांशिराम जसा मुलायमचा शोध घेत होते, तसेच भागीत निवडणूका जिंकू बघणार्यांचा आम आदमी पक्ष शोध घेताना दिसतो आहे. महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना वा शेकाप अशा पक्षांशी बोलणी सुरू असल्याच्या बातम्या कांशिराम यांचे स्मरण करून देणार्या आहेत. दोन दशकांपुर्वीच्य त्या शोधात कांशिराम यांना कुठल्याच राज्यातला मुलायम हाती लागला नव्हता, पण उत्तरप्रदेशातला मुलायम मात्र त्यांच्या पक्षाचा पुढे कायमचा शत्रू होऊन बसला,
त्यावेळी कांशिराम अन्य प्रांतातला मुलायम शोधत होते आणि त्यांच्याच उत्तरप्रदेशातील प्रभावी नेत्या मायावती यांनी कांशिराम यांनी शोधलेला पहिला्च एकमेव मुलायम मात्र पक्षाचा कायमचा शत्रू बनवून टाकला होता. तेव्हा ज्या भाजपाला पराभूत करण्यासाठी मुलायम व कांशिराम एकत्र आले होते, त्याच भाजपाशी साटेलोटे करून व त्याचा बाहेरून पाठींबा घेऊन मायावती उत्तरप्रदेशच्या प्रथमच मुख्यमंत्री बनल्या होत्या. यादव यांनी आपल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा जुना इतिहास किती शिकवला आहे ठाऊक नाही. पण महाराष्ट्रातील त्यांच्याच पक्षाची शाखा स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा अन्य ज्या पक्षांशी लोकसभा निवडणूकीसाठी बोलणी करीत आहे; त्यात कोलदांडा घालण्याचे काम ‘आप’च्या नेत्या असलेल्या अंजली दमाणिया आपल्या बोलघेवडेपणातून करीत आहेत. ह्याला इतिहासाची पुनरावृत्ती म्हणायची, की नवा इतिहास म्हणायचे; हे त्यांनीच ठरवावे. कारण पुढल्या काळात उत्तरप्रदेशात मायावती व बसपा यांनी आपला जम चांगला बसवला व स्वबळावर सत्ता संपादनापर्यंत मजल नक्कीच मारली होती. पण बाकीच्या राज्यात त्यांना तितके यश कधी संपादन करता आले नाही. अगदी कालपरवाच्या विधानसभा निवडणूकीत त्याच पक्षाचे दिल्लीतील बस्तान नवख्या आम आदमी पक्षानेच पुरते फ़स्त करून टाकलेले आहे. पुढल्या काळात अन्य राज्यात हातपाय पसरू बघणार्या या पक्षाचा विस्तार होताना, अशा किती व कोणत्या पक्षाचे बालेकिल्ले तो नवा पक्ष बळकावत जाईल, ही अभ्यासण्यासारखी बाब असणार आहे. उत्तरप्रदेशातही या नव्या पक्षाने लोकसभा लढवायचे ठरवले आहे. तेव्हा दिल्लीची पुनरावृत्ती होते की ‘आप’चाच बसपा होऊन जातो, ते इतिहासच सांगू शकेल.
जुनी माहिती मिळाली , धन्यवाद
ReplyDelete