Monday, February 3, 2014

उद्धाराचा बाजार


   गेल्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या कुठल्याशा बैठकीत देशातल्या विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या नावाची एक यादी वाचून दाखवली आणि त्यांच्यामुळे देशाच्या संसदेत भ्रष्ट अपराधी लोक बसले असल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या विरोधात ‘आप’चे भक्कम उमेदवार उभे करण्याचे आवाहनही करून टाकले. आता अशी नावे व यादी जाहिर करून त्यांच्या विरोधात उमेदवार लढवण्याची भाषा करताना, ती माणसे कुठल्या निवडणूका लढवतात आणि त्या निवडणूका कशा होतात; हे तरी केजरीवाल यांनी लक्षात घ्यायला हवे होते. पण केजरीवालांना असले साधेसरळ निकष लागू होत नाहीत. त्यांना कुठला नियम, प्रक्रिया, कार्यपद्धती वा संकेत यांचे कुठलेही बंधन वा मर्यादा लागू होत नाहीत. केजरीवाल वा त्यांचे सहकारी ‘राजनिती करायला थोडेच आलेत?’ ते तर परिवर्तन करायला आलेत. त्यामुळे नियम, पद्धती वा प्रक्रियेची त्यांना कसली अडचण असेल? जे काही आडवे येईल, ते भ्रष्ट ठरवून तुडवायला त्यांना आम आदमीने मुखत्यारपत्र दिलेले आहे ना? मग लोकसभा निवडणूकीला उभे रहातच नाहीत, त्यांच्या विरोधातही उमेदवार उभे करायला केजरीवालांना कोण अडवू शकणार आहे? त्यांनी भ्रष्ट व बेईमान ठरवला, तो कोणीही असो वा त्याने निवडणूक लढवायचीही नसो; केजरीवाल त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करणारच. त्यामुळेच कनिमोरी, जेटली इत्यादी लोकसभेत नसलेल्यांनाही केजरीवाल हरवू शकतात. केजरीवाल यांना काय शक्य नाही? त्यांनी म्हटले तर मध्यरात्रीही आकाशात माध्यान्हीचा सूर्य तळपू शकतो. न तळपण्याची सूर्याची तरी बिशाद आहे काय? तेवढी हिंमत सूर्याने केलीच, तर त्यालाही भ्रष्ट काळतोंड्या घोषित करायला केजरीवाल मागेपुढे बघणार नाहीत.

   दिल्ली विधानसभेच्या निवडणूकात थोडे नेत्रदिपक यश मिळवल्यावर केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांना इतकी झिंग चढली आहे, की प्रस्थापित राज्यव्यवस्था बदलण्याची त्यांनी इच्छाशक्ती भलतीच प्रबळ झाली असून अशक्य अतर्क्य गोष्टीही करण्याचे मनसुबे त्यांनी रचायला सुरूवात केली आहे. गेल्या सहा सात दशकात कुठल्या सरकारने वा गेल्या कित्येक शतकात कुठल्या मानवानेही ज्या गोष्टी कधी साध्य केल्या नाहीत; त्या केजरीवाल यांनी एका महिन्यात करून दाखवल्या आहेत. अरूण जेटली, कनिमोरी वा तत्सम काही नेते राज्यसभेवर निवडून येतात आणि त्यांना मते देण्य़ाचा हिशोब आधीच मांडलेल्या गणिताने साधलेला असतो. त्यात सामान्य मतदार हस्तक्षेप करू शकत नाही. मग अशा नेत्यांना ‘आप’चे उमेदवार कसे पराभूत करू शकणार आहेत? त्यासाठी त्या पक्षाकडे त्या त्या विधानसभांमध्ये हुकमी आमदार मतदार असावे लागतात. पण टाळ्या पिटायला जमा केलेली गर्दी आणि थापाच प्रक्षेपित करायला जमा झालेला ब्रेकिंग न्युजवाल्यांचा गोतावळा सभोवार असला; मग वाटेल त्या थापा मारायला काय हरकत आहे? आणि समजा एखाद्याने आपले डोके ठिकाणावर ठेवून अशा शंका विचारल्याच; तर पुन्हा त्याला भाजपा कॉग्रेसचा हस्तक ठरवायला केजरीवाल मोकळे आहेतच. मग समोरची गर्दी कशाला सवाल करणार ना? सहाजिकच मस्तपैकी ‘रियालिटी शो’ जोरात चालू आहे. मुद्दा इतकाच, की अशी हुकमी गर्दी समोर असताना आणि आम आदमीने आपल्याला निर्विवाद मुखत्यारपत्र दिलेले असल्याची खात्री असताना, केजरीवाल असल्या भ्रष्ट नावांच्या याद्या तरी कशाला जाहीर करतात? त्यांच्यासह त्यांच्या गोता्वळ्यातले लोक सोडले, तर उर्वरीत जगच भ्रष्ट आहे. त्यापैकी कोणाला इमानदार व्हायचेच असेल, तर तो यांच्याकडे प्रमाणपत्र घ्यायला येईलच ना?

   इमानदारीची अत्यंत सोपी व्याख्या त्याच पक्षाच्या झुंजार नेत्या अंजली दमाणियांनी अलिकडेच जाहिर केली आहे. त्यांच्या पक्षात दाऊद, गवळी इत्यादी कोणीही प्रवेश घेऊ शकतो. त्याने सुधारण्याची तयारी ठेवली पाहिजे. आता सुधारणे म्हणजे काय? तर आम आदमी पक्षात सहभागी होणे. सहभागी झालात मग तुम्ही आपोआपच सुधारलेले असता. तुमची पापे, अपराध, भ्रष्टाचार, गुन्हे तात्काळ प्रभावी म्हणजे पूर्वलक्षी धुतले जातात. दिल्लीत स्फ़ोट घडवून निष्पाप जीवांचे बळी घेणारा खलिस्तानी दहशतवादी भुल्लर याची फ़ाशी रद्द करावी, अशी शिफ़ारस केजरीवाल यांनी उगाच केली? त्यांनी शिफ़रास करताच भुल्लरची पापे धुतली गेली आणि तो विनाविलंब पावित्र पुण्यवंत होऊन गेला ना? हे असेच हजारो वर्षे होत आलेले आहे. कुणी नव्या धर्माचा प्रेषित उद्धारक उदयास येतो, त्याला आधी अवघ्या मानव जमातीलाच पापाच्या कर्दमात बुडालेले घोषित करावेच लागते. एकदा त्याने कथन केलेली ही जगबुडी मान्य झाली; मगच त्याच्याकडून उद्धार करून घेण्यासाठी लोकांची रीघ लागत असते. आसाराम बापूंनी तरी दुसरा कुठला धंदा केला होता? त्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात आपले दुकान थाटले, तर केजरीवालांनी राजकीय सामाजिक जीवनात आम आदमीच्या उद्धाराचा बाजार मांडला आहे. जोपर्यंत लोकांना व्यवहारिक जीवनात कित्येक तडजोडी कराव्या लागत असतात आणि त्यांच्या मनात अपराधी भावना खुपत असते; तोपर्यंत कुठल्याही प्रेषित उद्धारकाची दुकाने, बाजार चालतच असतात. त्यासाठी आधी खुप मेहनत घेऊन जनमानसात अपराधी भावना जोपासावी लागते व त्यातून उद्धाराची आकांक्षा जागवावी लागत असते. पापपुण्याचे पाखंड माजवावेच लागते. त्यासाठी मग पापांची व पाप्यांची यादी ओरडून जाहिर करावीच लागते.

1 comment: