बुधवारी माझ्या फ़ेसबुक खात्यामध्ये एका मित्राने एक संदेश सरकवला होता. तो वाचल्यावर माझे डोळे ओलावले. कारण त्यातला संदेशच माझ्यासारख्या जुन्या पत्रकाराला अचंबित करणारा होता. त्यात आज कानोकपाळी ओरडणार्या सेक्युलर माध्यमांचे व पत्रकाराचे खास आभार मानलेले होते. कशासाठी आभार मानले होते? तर दक्षिण मुंबईत उभा असलेल्या कॉम्रेड प्रकाश रेड्डी, या एका उमेदवाराचा साधा उल्लेखही बातम्यातून झाला नाही, त्याबद्दलचे आभार होते. प्रकाश रेड्डी कोण, हे मराठी वाहिन्यांवरील चर्चा बघणार्यांना सांगायला नको. वाढलेले विस्कटलेले शुभ्र पांढरे केस आणि जाड भिंगाचा चष्मा घातलेला एक माणूस तुम्ही अनेकदा बघितलेला असेल. आमच्या तरूणपणी चार दशकांपुर्वीचा तो विद्यार्थी चळवळीतला माझा मित्र आहे. त्याचे जन्मदाते ताराबाई रेड्डी व जी, एल रेड्डी हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासूनचे मुंबईतले सर्वात झुंजार कार्यकर्ते. ज्यांनी एका चाळीत जगताना आपले संपुर्ण आयुष्य गरीब कामगारांच्या कल्याणासाठी नि:स्वार्थपणे उधळून टाकले. असे हे कम्युनिस्ट दांपत्य. प्रकाश मातापित्यांच्या वाटेनेच चालत आजही शोषितांची लढाई लढतो आहे आणि त्याच्याइतका नि:स्वार्थ, निष्कलंक चारित्र्याचा दुसरा कोणीही प्रामाणिक उमेदवार दक्षिण मुंबईतून उभा नसेल. पण आम आदमी पक्षाच्या टोप्यांची जाहिरात करणार्या सेक्युलर माध्यमांना प्रकाशचा साधा उल्लेखही बातम्यातून करावासा वाटला नाही. परदेशी बॅन्केची जाडजुड पगाराची नोकरी करून सुखवस्तू झालेल्या मिरा सन्याल, त्याच मतदारसंघात उभ्या आहेत आणि त्यांच्यासाठी माध्यमांनी कित्येक तासाचे रोडशो प्रदर्शन मांडले. शिवाय कित्येक वृत्तपत्रिय स्तंभ खर्ची घातले. त्यापैकी कुणाला निष्ठेने व खस्ता खात आयुष्य सच्चाईने जगणार्यासाठी चार ओळी लिहीता येऊ नयेत?
योगायोग असा, की हा फ़ेसबुकवरचा संदेश वाचत असतानाच वाहिन्यांवर वाराणशीत भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आपला अर्ज भरण्यासाठी पोहोचल्याचे थेट प्रक्षेपण तब्बल सहा तास अथक चालू होते. त्यात मग तिथली राजकीय लढत कशी होणार आणि त्यात केजरीवाल मोदींना कितीशी टक्कर देऊ शकतील; याचाही उहापोह चालू होता. वाराणशीचा राजकीय इतिहास सांगताना तिथल्या मुस्लिम व हिंदू सौहार्दाच्या गप्पा रंगलेल्या होत्या. त्यातून आपल्या सेक्युलर विद्वत्तेचे प्रदर्शन मांडण्यात सगळेच ज्येष्ठ पत्रकार अभ्यासक गर्क होते. मी प्रकाश रेड्डीकडे झालेल्या दुर्लक्षाविषयी विचलीत होतो आणि स्मृतीच्या अडगळीत गेल्यावर आठवला वाराणशीचाही इतिहास. मी राजकारणाची तोंडओळख करून घेत होतो, त्याच काळात वाराणशी हा सेक्युलर राजकारणाचा अड्डा होता. चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रथमच कॉग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा संयुक्त विधायक दलाचा प्रयोग रंगलेला होता. त्यावेळी सर्वपक्षीय आघाडीच्या पाठींब्यावर सत्यनारायण सिंग नावाचा उमेदवार वाराणशीतू्न लोकसभेवर निवडून आलेला होता. त्याचा पक्ष होता कम्युनिस्ट पक्ष. विळाकणिस अशी त्याची निशाणी होती. आज तोच एक पक्ष व त्याचीच एक निशाणी अबाधित राहिली आहे. बाकी अनेक पक्ष नोंदले गेले, सत्तेपर्यंत पोहोचले आणि रसातळाला गेले. पहिल्या निवडणूकीपासून त्याच नावाने आजही अस्तित्वात असलेला एकमेव पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. १९६७ सालात त्याने वाराणशी जिंकली; तेव्हा तिथे गल्लीबोळात लालबावटा डौलाने फ़डकलेला असेल. आज वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपणात अवघी वाराणशी भगवी होऊन गेल्याचे सांगणार्यांना, त्यापैकी काहीही आठवतही नव्हते.
कधीकाळी उत्तर भारतात अनेक राज्यात बलवान असलेला कम्युनिस्ट पक्ष व डाव्या राजकारणाचे आता नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. १९७७ सालातही कानपूर येथून सुभाषिनी अली नावाच्या मार्क्सवादी नेत्या लोकसभेवर निवडून आलेल्या होत्या. महाराष्ट्रातही कम्युनिस्टांचा दबदबा होता. मुंबईत १९७४ साली गिरणी संपानंतर पोटनिवडणूकीत कॉम्रेड डांगे यांची कन्या रोझा देशपांडे लोकसभेवर निवडून आल्या, तो त्यांचा मुंबईतला शेवटचा खासदार होता, डाव्यांचेच बोलायचे तर १९७७ सालात मध्य उत्तर मुंबईतून अहिल्या रांगणेकर आणि महाराष्ट्रात अन्य दोन जागी मार्क्सवादी लोकसभेवर पोहोचले. पुढे जो दुष्काळ त्या डाव्या चळवळीच्या नशीबी आला; तो आजपर्यंत संपलेला नाही. जी अवस्था मुंबई महाराष्ट्राची तीच अनेक इतर प्रांतामध्ये झाली. आंध्रप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार अशा अनेक राज्यात कम्युनिस्टांचा भक्कम पाया होता. १९९६ सालातही बिहारमधून लोक्सभेत पोहोचलेले चतूरानन मिश्रा देवेगौडांच्या मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. पुढल्या दोन दशकात केरळ, बंगाल व त्रिपु्रा इतक्याच राज्यात कम्युनिस्ट शिल्लक राहिले. आता तर बंगालमध्येही तो पक्ष उतरणीला लागला आहे. कधीकाळी मुंबईत कॉम्रेड मिरजकर महापौर होते, त्याच मुंबईत आज त्या पक्षाचा एक नगरसेवकही निवडून येत नाही. आजही त्या पक्ष वा चळवळीत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. पण व्यवहाराशी जुळवून घेत वा बदलत्या काळात अस्तित्व टिकवून घेण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाला नाही. त्यामुळेच इतिहासजमा झाल्यासारखी त्या पक्षाची व चळवळीची अवस्था झालेली आहे. वाराणशी व प्रकाश रेड्डी यांच्या उल्लेखाने तो सगळा जुना इतिहास आठवला. प्रकाशकडे साफ़ दुर्लक्ष करणारे, केजरीवालचा इतका डंका वाजवतात, तेव्हा वाटते, खरेच ‘आखीर सच्चाई की जीत होगी?’
प्रकाश रेड्डीच्या उमेदवारीच्या, निवडणूक प्रचाराच्या बातम्या द्यायलाही प्रसारमाध्यमांनी हात आखडता घ्यावा ह्याचं मलाही आश्चर्य वाटतं.
ReplyDeleteह्या मुद्द्याला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन.
सुनील तांबे.
भाऊ खरेच आहे. बदलत्या काळानुसार डावे पक्ष बदलले नाही. कालच मी विकिपीडिया वर बघत होतो. अगदी गेल्या ३-४ निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांचे प्रतिनिधित्व होते पण आज ते कुठेही दिसत नाहीयेत. मला वाटते भा.ज.प. ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लालू वगैरे सोबत त्यांनी जुळवून घेतले त्याचेच हे फलित आहे.
ReplyDeleteभाऊ thanks... एकेकाळी तू भिन्तिवर वॅल पेन्टीग करत होतास....तुम्ही वैतागला आहात मग तुम्ही भाऊ तोरसेकर...मी आजही वैतागलो आहे...मी पण भाऊ तोरसेकर....माझ्या आठवणीत तू अजून आहेस...तुझा मित्र...प्रकाश..
ReplyDeleteSir, can u give your mobile. no. I need to talk to you
Deleteकित्येक दशके चिन्ह, चेहरा-मोहरा न बदललेला पक्ष, एवढेच एखाद्या राजकीय पक्षाचे ’मेरिट’ असावे का? जुने जाणते कडवे नेतृत्व वगैरे बिरुदावल्या...
ReplyDeleteरशिया व चिन यांच्याशी ज्यांच्या निष्ठा आहेत व होत्या, ते इथल्या मातीशी, संस्कृतीशी कुठवर इमान राखणार? माओवादी मंडळी आदिवासी लोकांची ’डोकी’ भडकवून समाजस्वास्थ्य बिघडवत आहेत, गेल्या ६० वर्षात ज्यांना मतपेटीव्दारे स्वत:ला सिध्द करता आले नाही, ती मंडळी विध्वंसक राजकारण करत आहेत, अन् तरीही त्यांना माध्यमांत प्रसिध्दी मिळत नाही, म्हणून अन्याय झाल्यासारखे वाटते...
राजकारणात, नितीमान, सत्शील नेतृत्व चुकीचा कार्यक्रम राबवते (उदा.महाभारतातील भिष्माचार्य) अन् कदाचित सिध्द न झालेले नेतृत्व सातत्याने देशाशी इमान राखून न भरकटता कार्यक्रम राबवते’, तेव्हा भविष्यकाळच दाखवून देईल दोन्ही नेतृत्वातला फरक...
हा सगळा भंपकपना आहे. जगभरात आज डाव्या विचारवादी पक्षांची सरकारे किती देशात आहेत? कट्टर पंथिय नक्की का्य करतायत याचा विचार कोणी करायचा?
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteसंपूर्ण आयुष्य नि:स्वार्थीपणे व्यतीत केल्यावर प्रकाश रेड्डींना कन्हैय्याच्या सोबत मोटारीत बसावं लागतं. याची खरंच गरज होती का? असल्यास हा कुणाचा पराभव मानावा?
आपला नम्र,
-गामा पैलवान