Saturday, April 26, 2014

अमेठी रायबरेली धोक्यात?



   एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा उत्तरप्रदेशातील कुठल्या जिल्ह्यातील उत्साही कॉग्रेस कार्यकर्त्यांनी एक भव्य पोस्टर तयार करून त्यांच्याच शहरात धरणे धरले होते. त्यांची मागणी होती की प्रियंका गांधी यांनी राजकारणात उतरावे. त्यांना गप्प करण्याऐवजी पक्षातून त्यांची हकालपट्टी झालेली होती. कारण त्यांच्या धरण्यापेक्षा पोस्टरवरची घोषणा वादग्रस्त झालेली होती. ती घोषणा होती, ‘मईया अब रहती बिमार, भईया पर बढ गया भार; प्रियंका फ़ुलपु्रसे बनो उम्मीदवार, पार्टीका करो प्रचार’. त्यांनी कुठल्याही प्रकारे कॉग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली नव्हती, की गांधी कुटुंबाची बदनामी केली नव्हती. पण तरीही नुसती प्रियंकाला पक्षात आणायची मागणी करणेही तेव्हा पक्षशिस्तीचा भंग ठरला होता. कारण तेव्हा राहुल गांधी हाच कॉग्रेसचा भावी नेता, हे निश्चित झाले होते आणि त्याच्याकडून पक्षाची विल्हेवाट लावली जात असल्याच्या वेदनेतून हा तळागाळातला कार्यकर्ता बदलाची मागणी करत होता. पण त्यांची हकालपट्टी करून एक संदेश पक्षात पाठवला गेला. प्रियंका लोकप्रिय होऊ शकणार असेल व पक्षाला त्याचा लाभ मिळू शकणार असेल; तरी ती मागणी होता कामा नये. कारण वारसा हक्क राहुलकडे आहे आणि त्याला बाधा आणायचा कुठलाही प्रयास ही शिस्तभंग ठरेल. त्यानंतर प्रियंकाला कॉग्रेस पक्षात आणायची वा तिचे नाव घेण्याची हिंमत कोणी केली नाही. नुसता त्याविषयी प्रश्न पत्रकारांनी विचारला, तरी पक्षाचे नेते अंग झटकून पळ काढायचे. त्याच प्रियंकाने मागल्या दोनचार दिवसात अकस्मात रायबरेली व अमेठी या मतदारसंघात थेट भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध तोफ़ा डागायला आरंभ केला आहे. त्याला प्रसिद्धीही दिली जाते आहे. हे काय प्रकरण आहे?

   प्रियंका कुठलेही नवे आरोप करत नाही. जे आरोप दिग्विजय सिंग वा तत्सम वाचाळ नेत्यांनी यापुर्वी अनेकदा केलेले आहेत; त्याचाच पुनरूच्चार राहुलनी अर्धे मतदान संपल्यावर अकस्मात सुरू केला. त्यालाही खुप प्रसिद्धी मिळाली. पण जनमानसावर त्याचा ठसा उमटला नाही. रायबरेली येथे सोनिया गांधी उमेदवारी अर्ज भरायला गेल्या; तिथेही प्रियंकाचा पत्ता नव्हता. त्याच्या बातम्या झाल्या. प्रियंकाच्या भूमीबळकावू पती रॉबर्ट वाड्राचे प्रकरण अंगाशी येईल, अशा भयाने रायबरेलीपासून प्रियंकाला दूर ठेवले गेल्याच्याही बातम्या झाल्या. त्यामुळे अमेठीत राहुलच्या अर्ज समारंभाला पतीसह प्रियंकाने हजेरी लावली. पुढे नेहमीप्रमाणे स्थानिक प्रचाराचे काम तिच्यावर सोपवण्यात आले. तोपर्यंत प्रियंका राष्ट्रीय मुद्दे वा राजकारणावर सहसा बोलत नव्हती. पण मतदानाच्या पहिल्या पाच फ़ेर्‍या पार पडल्यानंतर जे मतचाचण्यांचे निष्कर्ष पुढे आले; तिथून अकस्मात प्रियंकाने थेट राष्ट्रीय राजकारणावरचे भाष्य व आरोपबाजी सुरू केली आहे. मोदींवर आरोप सुरू केले आहेत. अगोदर त्यांनी आपल्या पतीची बदनामी राजकारणासाठी केली जाते, असा सुर लावला होता. पतीवर गरीब लोकांच्या जमीनी बळकावल्याचा आरोप असताना आपण अपप्रचाराच्या बळी असल्याचे दाखवण्याचा प्रियंकाचा प्रयास होता. पण त्याचा फ़ारसा प्रभाव पडला नाही त्यानंतरच त्यांनी थेट मोदींना लक्ष्य बनवण्याचा पवित्रा घेतलेला आहे. पण त्यांनी केलेल्या आरोपात नवे काहीच नाही. मग त्या आरोपांचा निवडणूका जिंकायला उपयोग कसा होणार? पण तरीही सातत्याने तीनचार दिवस तेच आरोप प्रियंका करीत आहेत. त्याची म्हणूनच कारणमिमांसा आवश्यक आहे, आजवर कधी त्या दोन मतदारसंघात राष्ट्रीय राजकारणाचा उल्लेख झाला नव्हता. मग ह्याच वेळी प्रियंकाने हे मुद्दे कशाला उकरावेत?

   कारण सरळ आहे. आजवर ज्या दोन मतदारसंघांना बालेकिल्ले समजून तिकडे फ़िरकण्याचेही कष्ट गांधी कुटुंबाने घेतलेली नव्हते. त्या बालेकिल्ल्याची आज शाश्वती वाटेनाशी झाल्याचे हे लक्षण आहे. रायबरेलीतून सोनिया वा अमेठीतून राहुल गांधी निर्विवाद मताधिक्याने नेहमी निवडून आलेले आहेत. कुठल्याही विकास कामाशिवाय त्यांना सतत यश मिळालेले आहे. मग यावेळी इतक्या आक्रमक पवित्र्याची गरज कशाला भासावी? त्याचे कारण मागल्या महिन्यात स्पष्ट होत गेले. दहा वर्षानंतर आपल्या बालेकिल्ल्यात मतांसाठी पोहोचल्यावर जनमत बदलत असल्याचे संकेत राजघराण्याला मिळालेले आहेत. त्यामुळेच आपल्या बालेकिल्ल्यात जाऊन प्रियंकांना डरकाळ्या फ़ोडाव्या लागत आहेत. आरंभी त्यांनी कुठलेही कारण वा चिथावणी नसताना चुलतभाऊ वरूण गांधी यांच्यावर तोफ़ डागली होती. घराण्याशी भेदीपणा करणार्‍याला धडा शिकवा; अशी भाषा प्रियंकाने वापरली, वास्तविक वरूण गांधी पलिकडल्या सुलतानपूर मतदारसंघात उभे आहेत. त्यांचा प्रभाव रायबरेली व अमेठीत पडण्य़ाचे भय नसते; तर प्रियंकाला त्याच्यावर तोफ़ डागण्याची गरजच काय होती? दुसरीकडे प्रथमच दोन्ही बालेकिल्ल्यात मागासलेपणा व अविकसित प्रदेशाचे प्रश्न उघडपणे विचारले जाऊ लागले आहेत. त्यातून मग गांधी कुटुंबाचा धीर सुटलेला आहे. शिवाय तिथे ताकदीने उतरलेल्या विरोधी उमेदवारांनी कौटुंबिक विकास व संपन्नतेचे मुद्दे उपस्थित करून अबोल मतदाराला प्रश्न विचारायला सज्ज केलेले आहे. त्याची जाणिव झाल्यानंतर प्रियंकांचा धीर सुटणे स्वाभाविकच होते. आज त्यांनी मोदींवर व्यक्तीगत टिका करून आपल्याच कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात जी आरोपांची राळ उडवली आहे, त्यामागे बालेकिल्ला धोक्यात असल्याचा भयगंड अधिक दिसतो.

1 comment: