Thursday, April 3, 2014

छोट्या नगण्य पक्षांची पाडापाडीतली महत्ता



   महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय समाज पक्ष किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना या नगण्य मानल्या जाणार्‍या गटांशी सेनाभाजपा युतीने जागावाटप केले, त्याला महायुती वा पाच पांडव असे संबोधले; तर त्यांची खुपच टवाळी झाली वा होते आहे. पण असे नगण्य पक्ष देशात किती आहेत आणि त्यांची मतदारांमध्ये किती ताकद आहे, त्याचे गणित अशी टिंगल करणार्‍यांना कितपत ठाऊक आहे, याची शंकाच येते. कारण त्या पक्षांचे उमेदवार वा नेते निवडणूकीला उभे रहातात, गदारोळही खुप करतात. पण क्वचितच त्यापैकी कोणी निवडून येतात. निकालानंतर त्यांची बातमीही सहसा कुठे झळकत आही. म्हणूनच अशी टिंगल त्यांच्या वाट्याला येत असावी. त्याचे प्रमुख कारण आपल्याकडले राजकीय अभ्यासक वा निकालांचे विश्लेषकही मतांची विभागणी बारकाईने बघत नाहीत किंवा अभ्यासत नाहीत. सामान्य प्रेक्षक वा वाचक जसा निवडून आलेल्यांच्या यशात वाहून जातो, तसेच अभ्यासकही वाहून गेले, तर दुसरे काय होणार? मागल्या सात सार्वत्रिक निवडणूकांनंतर कुठल्याच पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहूमत मिळालेले नाही. म्हणून विविध पक्षांना एकत्र येऊन सरकार बनवावे लागते. एक दोन सदस्य असलेल्या पक्ष वा अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागते. पण अशी पाळी राष्ट्रीय, प्रादेशिक, मान्यताप्राप्त पक्षांवर कोणामुळे आली, त्याचा शोध घेतल्यास या किरकोळ वाटणार्‍या लहान पक्षांची महत्ता लक्षात येऊ शकते. प्रामुख्याने आघाडीचे युग ज्याला म्हणतात, त्याच कालखंडात अशा स्थानिक, नोंदलेल्या व लहान पक्षांची महत्ता वाढलेली आहे. नुसत्या बहूमताच्या समिकरणात त्यांना महत्व आलेले नाही, तर जनमानसातही त्यांची शक्ती वाढलेली आहे. त्याचा अभ्यास केला तरच मोठमोठे राष्ट्रीय पक्ष अशा छोट्या नगण्य वाटणार्‍या पक्षांची मनधरणी कशाला करतात, त्याचे रहस्य उलगडू शकेल. असे पक्ष व त्याचे उमेदवार हातातोंडाशी आलेला मोठ्या पक्षाचा सत्तेचा घास काढून घेऊ शकतात, हेच ते सत्य आहे.

   चार महिन्यांपुर्वी दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने भाजपाचे बहूमत हुकवलेच. पण अवघ्या चार टक्के अधिक मतांच्या बळावर कॉग्रेस पक्षाला कुठल्या कुठे फ़ेकून दिले. ही छोट्या पक्षाची महत्ता आहे. पण मोदी वा भाजपाचा रथ दिल्लीत केजरीवालनी रोखला; असले उथळ विश्लेषण करणार्‍या अभ्यासकांना अशा छोट्या पक्षाची ताकद कशात आहे, ते रहस्य उलगडलेले नाही. तामिळनाडूमध्ये चार वर्षापुर्वी बलाढ्य़ वाटणार्‍या द्रमुक-कॉग्रेस आघाडीला जयलालितांनी नेमक्या त्याच डावपेचातून पाणी पाजले होते. आधीच्या विधानसभेत नगण्य वाटणारी मते मिळवणार्‍या डीएमडीके या विजयकांतच्या पक्षाला दोन जागा जिंकता आल्या नव्हत्या. पण त्याने अण्णाद्रमुकची सत्ता घालवली होती. त्याने प्रत्येक मतदारसंघात जी मुठभर मते घेतली, त्यामुळे त्या त्या जागी जयललिताचे पारडे हलके होऊन बहूमत बारगळले. २०११ मध्ये त्यालाच सोबत घेऊन जयललितांनी मोठी बाजी मारली. एका छोट्या पक्षाला सोबत घेतल्यावर त्यांचे पारडे कॉग्रेस द्रमुकपेक्षा इतके जड झाले, की विरोधी नेता होण्याइतक्याही जागा करूणानिधींना मिळू शकल्या नाहीत. विजयकांत आपल्या बळावर पडू शकणार्‍या २० जागी जयललितांच्या मदतीने आमदार निवडून आणू शकले तर त्यांच्या पाठींब्यामुळे जयललितांचे ६० हून अधिक उमेदवार आमदार होऊ शकले. अन्यथा त्या दोघांनी एकमेकांच्या विरोधात लढताना ७०-८० जागा गमावल्या असत्या आणि करूणानिधींची द्रमुक पुन्हा तामिळनाडूत सरकार बनवू शकली असती. हीच बाब तिथल्या एमडीएमके किंवा पीएमके अशा स्थानिक पक्षांची आहे. स्वबळावर ते मार खातात व प्रबळ प्रतिस्पर्ध्यापैकी कोणाला तरी पाडतात. त्यापैकी एकाच्या सोबत गेल्यास बड्यासोबत छोट्याचाही लाभ होत असतो.

   यावेळी तामिळनाडूत प्रथमच तिहेरी वा चौरंगी लढती होत आहेत. कारण द्रमुक, अण्णाद्रमुक आणि कॉग्रेस या तीन प्रबळ पक्षांच्या सोबत कुठलाही छोटा पक्ष गेलेला नाही. त्या छोट्या पक्षांनीच एकत्र येऊन आपली स्वतंत्र आघाडी बनवली आहे. जुन्या मतदानाचे आकडे व सध्याच्या मतचाचण्य़ांचे आकडे बघितले तर ती लहान पक्षांची आघाडी तुल्यबळ लढत देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भाजपाने तामिळनाडूतल्या अशा अर्धा डझन पक्षांना एकत्रित करून आपले बस्तान तिथे बसवण्याचा धुर्त डाव खेळला आहे. त्यात उदयोन्मुख नेता असलेल्या विजयकांतला मोठा वाटा देऊन वायको व प्रेमदासा अशा दोन स्थानिक नेत्यांना एकत्र आणायला भाजपाने पुढाकार घेतला. तिथे दोन्ही द्रविडीयन पक्षांना मोठे आव्हान प्रथमच उभे राहिले आहे. त्या छोट्या पक्षांना तिथे जितके स्थान आहे, तितकेच भाजपाचेही आहे. पण एकत्रित झाल्यास त्यांच्या आघाडीला २२ टक्के मते मिळू शकतात. जयललिता ३२ व करूणानिधी २३ टक्के असतील तर २२ टक्के ही छोट्या पक्षांची एकत्रित मते मोजणीच्या दिवशी चमत्कार घडवू शकतील. २००९ च्या मतदानात ह्या आघाडीतील पक्षांना दहा जागी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती, हे विसरता कामा नये. थोडक्यात एकमेकांना पाडण्यापेक्षा एकत्र येऊन मर्यादित यश मिळवण्याची रणनिती या पक्षांनी योजली, तर मोठ्या पक्षांसाठी तो चिंतेचा विषय होऊ शकतो. त्यासाठीच भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंग व्यक्तीगत तिथे गेले आणि त्यांनी तामिळी छोट्या पक्षांना सोबत आणायचा डाव खेळला आहे. महाराष्ट्रात युतीने आपले स्थान दुर्बळ असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी व रासप यांना महायुतीत आणून तेच गणित मांडलेले आहे. देशात अशा छोट्या व नगण्य पक्षांची ताकद किती आहे; त्याचे आकडे चक्रावून सोडणारे आहेत आणि त्यांचे वाढणारे यश राष्ट्रीय पक्षांना विचार करायला भाग पाडणारे आहे. 

No comments:

Post a Comment