सत्य हे नेहमी आपापल्या सोयीचे असते आणि सोयीनुसार बदलत असते. जो तपशील आपल्याला सोयीचा असेल, तो आपण स्विकारतो आणि तपशील अडचणीत आणणारा असेल, तर त्याच्या जनकाच्या प्रामाणिकपणाविषयी आपण प्रश्नचिन्ह उभे करतो. पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार डॉ. संजय बारू यांच्या नव्या वादग्रस्त पुस्तकाची कहाणी काहीशी तशीच आहे. त्यातले पंतप्रधान मनमोहन सिंग व कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयीचे उल्लेख, आज विरोधातील भाजपाला सोयीचे असल्याने भाजपाचे नेते त्याच्या समर्थनाला उभे ठाकले आहेत. उलट आपल्याच एका जुन्या सहकार्याने गोपनीय बाबी चव्हाट्यावर आणल्याने कॉग्रेस पक्षात संतापाची लाट उसळली असेल तर नवल नाही. बारू हे २००४ ते २००८ या कालखंडामध्ये पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणून कार्यरत होते. आता त्या पदावर असलेल्या व्यक्तीचा पंतप्रधानांच्या संपुर्ण कार्यालयात मुक्त वावर असणार, हे वेगळे सांगायला नको. त्यात मग कॉग्रेस पक्ष, युपीएमध्ये सहभागी असलेले अन्य पक्ष, त्यांचे नेते मंत्री आणि त्यांच्यातले अंतर्गत संबंध याविषयी बारूंना अनेक गोष्टी आपोआपच कळत असणार. त्या संबंधातले वादविवाद, भांडणे, हेवेदावे याचा जवळून अनुभव बारू यांना असला तर नवल नाही. कदाचित त्याच वादात अनेकदा त्यांना हस्तक्षेप सुद्धा करावा लागलेला असू शकतो. त्यातल्या निरोपाची देवाणघेवाणही त्यांच्या मार्फ़त झालेली असू शकते. मात्र अशा गोतावळ्यात ज्या गोष्टी घडतात, त्या गोपनीय ठेवाव्यात असा एक अलिखीत संकेत असतो आणि त्याचे सहसा काटेकोर पालन होत असते. पण हल्ली त्याही मर्यादा ओलांडल्या जात आहेत आणि म्हणूनच असल्या उखाळ्यापाखाळ्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत.
तसे पाहिल्यास आज बारू यांनी केलेल्या गौप्यस्फ़ोटाने कॉग्रेसजनांना मिरच्या झोंबल्या तर नवल नाही. कारण आज जे सत्य समोर येते आहे, ते त्यांनाच अडचणीत आणणारे आहे. मात्र मागल्या आठदहा वर्षात असेच काही गौप्यस्फ़ोट गुजरातच्या प्रशासनातील काही अधिकार्यांनी केले; तेव्हा त्यात कॉग्रेसजन खुश होते. कारण या अधिकार्यांनी केलेल्या गोपनीयतेच्या भंगामुळे कॉग्रेसला मोदींविरोधात काहूर माजवण्यास कोलित सापडले होते. गुजरातची दंगल चालू होती, त्या काळात तिथे पोलिस आयुक्त, उपायुक्त म्हणून काम करणार्यांनी नंतर दोनचार वर्षांनी मोदींवर वाटेल ते आरोप केलेले आहेत. त्यावरून गदारोळ झाला आणि अनेक कोर्टाकडून त्याच्या चौकशीसाठी खास पोलिस पथके नेमली गेली. खुद्द मुख्यमंत्री मोदींचाही जबाब घेण्यात आलेला आहे. त्यावेळी श्रीकुमार, संजीव भट वा प्रदीप शर्मा अशा अधिकार्यांनी केलेल्या आरोपाच्या विरोधात गद्दार अशी शिवी हासडायला कोणी कॉग्रेस नेता पुढे आलेला नव्हता. पण आज तेच काम संजय बारू यांनी केल्यावर मात्र त्यांना गद्दार ठरवण्याची स्पर्धा कॉग्रेसवाल्यांमध्ये लागली आहे. जितका गुजरातच्या अधिकार्यांचे आरोप गंभीर होते, तितकेच बारू यांनी आज केलेले आरोप गंभीर आहेत. मग त्याच्या चौकशीची मागणी का होऊ नये? त्याचे राजकीय भांडवल करण्यात गैर ते काय? कारण दोन्ही बाबतीत शासनाच्या यंत्रणेचा गैरवापर झालेला आहे. तिथे कायदा व्यवस्था ढासळली होती, इथे तर गेल्या काही वर्षात देशातली एकूण शासनयंत्रणाच मोडीत गेली आहे. म्हणूनच बारू यांच्या आरोपाला केवळ राजकीय हेतूचे लेबल लावून कॉग्रेसजनांना पळ काढता येणार नाही. कारण बारूंनी सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाचा त्याग केला, त्याचा बुडबुडाच फ़ोडला आहे.
नाव मनमोहन सिंग यांचे पण कारभार व अधिकार मात्र सोनियांचा; असा बारू यांनी केलेला गौप्यस्फ़ोट आहे. अर्थात त्यात नवे असे काहीच नाही. युपीए सत्तेवर आल्यापासून दोन सत्तेची केंद्रे असल्याचा आक्षेप वारंवार घेतला गेला होता. मात्र त्याची कुजबुज माध्यमातून होत असली तर जाहिर बोलले जात नव्हते. मोदींच्या विरोधातल्या कुठल्याही थापा व आरोपांना जितक्या गंभीरपणे माध्यमे लोकांसमोर मांडत होती, तितक्या गंभीरपणे युपीएच्या दुहेरी सत्तेचा उल्लेख होत नव्हता. घोटाळ्यांची मालिका समोर आली, पंतप्रधान कार्यालयातून त्यांच्या अपरोक्ष कुठल्याही फ़ायली हलवल्या जातात व निर्णय घेतले जातात, याविषयी सुप्रिम कोर्टाने सीबीआयला जाब विचारला, तरी माध्यमांनी त्यावर पांघरूण घालण्याचीच कसरत केलेली होती. मोदींवर बिनबुडाचे आरोप झाले तरी त्याला सत्य मानून व्हायची; तितकी छाननी पंतप्रधानांच्या माघारी होणार्या सत्तेच्या गैरवापराचा उहापोह होत नव्हता. आता माध्यमांच्याही त्या मौनाची कसोटी लागली आहे. मोदींच्या प्रतिज्ञापत्रातल्या पत्नीच्या उल्लेखाचा चिकित्सक उहापोह करणार्यांना, बारूंनी आज केलेल्या आरोपाची जुनी कुजबुज तेव्हाच तपासून बघण्याची गरज कशाला वाटली नव्हती? तिथेच माध्यमे व कॉग्रेसच्या सत्याच्या आग्रहाची कसोटी स्पष्ट होते. आपल्या सोयीचे असेल त्याच सत्याचा आग्रह असतो आणि जिथे सत्य अडचणीत आणणारे असेल, तिथे सत्य नकोसे असते. पण आता बारू यांनी सगळा पटच उधळून टाकला आहे. त्यामुळे केवळ कॉग्रेसच गोत्यात आलेली नाही, तर त्यांच्या पापावर पांघरूण घालण्यात मागली दहा वर्षे आपली बुद्धी पणाला लावणार्या माध्यमांसह बुद्धीमंत व जाणकारांचीही अब्रु पणास लागलेली आहे. कदाचित येत्या लोकसभेत मोदी सत्तेपर्यंत पोहोचले, तर असे शेकड्यांनी ‘बारू’ बोभाटा करायला समोर येतील.
बारूंचा बोभाटा! मागोमाग परीख यांच्या पुस्तक रूपी बाटलीतून निर्माण झालेल्या भुतावळी बाळ राहूल व माता सोनिया यांची पाठ सोडतील असे वाटत नाही. मौनी मनमोहन सिंह जी मात्र फुकट बदनामीचे धनी होणार आहेत.
ReplyDeleteशशिकांतराव,
Deleteघर फिरलं की घराचे वासेही फिरतात. न जाणो, राष्ट्रभक्ती म्हणजे सोनिया आणि राहुल गांधींना शिव्या देणे असंही समीकरण रूढ होईल.
आपला नम्र,
-गामा पैलवान
गामा पैलवान
Deleteखरे आहे.
गांधी वाद्यांना गांधीजींचे विचार लोकांपर्यंत पोचवता आले नाहीत. त्यांच्या पश्चात गांधींच्या विचारांची न कळत टिंगल टवाळी झाली ती एककल्ली होती असे सिनेमाध्यमातून मुन्नाभाईच्या गांधीगिरीतून नव्या पिढीला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. विचार मरत नाहीत पण त्यांचा इतरांनी डोळे झाकून केलेला वापर अप्रभावी ठरतो. असो.
मात्र सध्याच्या गांधी घराण्यातील व्यक्तींच्या बाबत 'सत्याच्या आग्रहाचे' वैचारिक तत्वज्ञान वा बैठक दिसत नाही. (भाऊ तसे वर म्हणतात) मग अशी टीका टिप्पणी यानंतर होत राहिली तर नवल नाही. वाईट इतकेच ते सरदार मनमोहनजींच्या नावाने केले जाईल. आता पाहू काय कसे घडतेय ते.
सूडाचे राजकारण करणार नाही असे मोदींनी नुकतेच एका मुलाखतीत म्हटले आहे ते कितपत त्यांना पाळता येतेय ते ही कळेल लवकरच.