युद्धक्षेत्र हा अखंड अराजकाचा प्रदेश असतो. ज्याला आपल्या व शत्रूच्या क्षेत्रातील अराजक नियंत्रणाखाली आणता येते तोच त्यातला विजेता असतो. -नेपोलियन बोनापार्ट
आज आपल्या देशात ज्या लोकसभा निवडणूका चालू आहेत, त्यात एकूण समाजाचे व लोकसंख्येचे दोन उभे भाग पडलेले दिसत आहेत. एका बाजूला भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि दुसर्या बाजूला त्यांचे विरोधक, अशा दोन गोटात देशाची विभागणी होताना दिसते आहे. तसे बघितल्यास मोदी हे दिल्लीच्या म्हणजे राष्ट्रीय राजकारणातले नेता नाहीत. भाजपाच्याही राष्ट्रीय राजकारणात नेता म्हणून त्यांचा समावेश अगदी अलिकडे झाला. एक दोन वर्षापुर्वी काही लोक मोदी पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतील असे बोलत होते. राजकीय अभ्यासकांनी त्या कल्पनेची सतत टिंगलच केली होती. पण अशा सहजतेतून अनेकदा लोकांसमोर कल्पना मांडली जात असते आणि त्यातून मग समाजमन कामाला लागत असते. मुळात देशातले सेक्युलर विचारवंत, अभ्यासक व त्यांच्याच तालावर नाचणार्या माध्यमांनी मोदींची सातत्याने टिंगल व विरोध करताना जनमानसात त्यांची एक कठोर व कडवी प्रतिमा बनवून ठेवलेली होती. याच कठोर प्रतिमेने पुढले काम मोदींसाठी सोपे करून टाकले. वास्तविक एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने तिथे फ़ार मोठे कौतुकास्पद काम केल्याचा ठोस पुरावा नाही. पण इतर राज्यातल्या अनागोंदीच्या तुलनेत गेल्या बारा वर्षात गुजरातमध्ये मोदींची सत्ता आहे आणि तिथे शासकीय वा राजकीय अराजक नाही. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. उलट केंद्रातील वा कुठल्याही अन्य राज्यातील कारभार व राजकारण अराजकाच्या अवस्थेला येऊन पोहोचलेले आहे. त्याला गांजलेल्या जनतेला पर्याय हवा असतो. अशा जनतेच्या डोक्यात माध्यमांनी रंगवलेला कठोर नेता म्हणून मोदींविषयी आकर्षण निर्माण होत गेले. कारण जनतेला अराजकातून मुक्ती हवी होती.
आज देशातल्या राजकारण व शासकीय कारभ्राराची काय अवस्था आहे? अनेक घोटाळ्यांनी सरकार उघडे पडलेले आहे. सामुहिक बलात्काराच्या घटना घडत असतात आणि सीमेवर सैनिकांचेही गळे चिरले जातात. महागाईने उच्छाद मांडलेला आहे आणि घातपात्यांना आवरणे सरकारला जमलेले नाही. सामान्य जनता त्याने गांजलेली असताना विविध पक्षात सत्तेची साठमारी व सत्तेसाठी झुंबड उडालेली आहे. या सर्वाचे एकत्रित परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागत असतात. थोडक्यात जनतेची अवस्था सामुहिक बलात्काराची शिकार झालेल्या निर्भयासारखी असते. तिला कायद्याची कलमे सांगणारा किंवा तत्वज्ञान सांगणारा नेता नको असतो, तर होणार्या अत्याचार वा अन्यायातून मुक्ती देणारा कोणी बलदंड राखणदार हवा असतो. ज्या काळात अशा अराजकाने जनतेला भयभीत करून सोडलेले होते, नेमक्या त्याच कालखंडात तुलनेने खंबीर व कठोर नेता अशी मोदींची प्रतिमा देशभरच्या लोकांसमोर माध्यमे उभी करीत होती. जेव्हा घराबाहेर पडणार्या माणसांना, महिलांना सुखरूप घरी परतण्याची हमी कोणी राजकारणी देऊ शकत नव्हता, त्यालाच सेक्युलर सरकार असे संबोधले जात असेल, तर लोकांना त्याचीच भिती वाटू लागते. त्यापासून मुक्ती देणारा उद्धारक वाटू लागतो. मग तो लोकशाही मानतो, किंवा आणखी काय करतो; याला अर्थ उरत नाही. मनमोहन सिंग यांच्यासारखा पुळचट नाकर्ता पंतप्रधान आणि दुसरीकडे कठोरपणे विरोध मोडून काढणारा नेता; अशातून निवड करण्याची सक्तीच जनतेवर होत असते. ही निवड कशी करावी लागते, त्याचेच मोजक्या शब्दात नेपोलियनने वर्णन केले आहे.
आता मोदींची लोकप्रियता किंवा त्यांच्याकडे असलेल्या जनमानसाचा झुकाव तपासून बघा. मोदींच्या भाजपामध्येही मोठेच अराजक वर्षभरापुर्वी होते. पण त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आणि दिल्लीतल्या श्रेष्ठींना आपली निवड करायला भाग पाडले. थोडक्यात सत्ता गमावल्यापासून मागल्या दहा वर्षात भाजपामध्ये जे राजकीय अराजक माजलेले होते, त्याला नियंत्रणाखाली आणण्यात मोदी यशस्वी झाले. पुढली लढाई राजकीय युद्धक्षेत्रावरची होती. तिथे प्रत्येक पक्ष व सत्ताधारी कॉग्रेस यांच्यातही अराजकाचीच परिस्थिती होती. कोणाचेच कशावर नियंत्रण नव्हते. आपल्या पक्षातील कार्यकर्ते व सहकार्यांना नियंत्रणाखाली आणल्यावर मोदींनी खरी राजकीय लढाई सुरू केली आणि आपल्याच अटीवर लोकसभा निवडणूकीची लढाई लढली जावी, असे पद्धतशीर प्रयत्न केले. बाकीच्या पक्ष व विरोधकांनाही हळुहळू मोदींच्याच अजेंड्यावर यावे लागले. त्यातून जनमानसात एक विश्वास त्यांनी निर्माण केला. भाजपा किंवा मित्र पक्षात असलेले अराजक मोडून काढण्यात यश मिळवल्यानंतर आक्रमक झालेल्या मोदींनी प्रचाराचा असा सपाटा लावला, की विरोधकांना त्यांच्याच मार्गावर यावे लागले. हा माणूसच सर्वकाही नियंत्रणात आणू शकतो अशी धारणा लोकांमध्ये वाढीस लागली. सामान्य जनतेला अराजकातून सुटका व जीवनातील शाश्वती हवी असते. धरसोडवृत्तीचा नेता ती शाश्वती देऊ शकत नाही. मोदींनी मागल्या दहा महिन्यात ती शाश्वती आपण देऊ शकतो; असे चित्र उभे केले. त्यांच्या सुदैवाने विरोधकांनी शाश्वतीची हमी देण्यापेक्षा मोदींना हरवण्यासाठी अराजकालाच सुरक्षा ठरवण्याचा मुर्खपणा करून मोदींना उपकारक भूमिका घेतली. त्यातूनच आज मोदींच्या लोकप्रियतेची लाट आलेली आहे.
No comments:
Post a Comment