कुठल्याही प्राण्याला पकडण्यासाठी सापळा लावतात. उंदीर असो किंवा बिबळ्या असो, त्याच्यासाठी लावलेल्या सापळ्यात त्याने अलगद येऊन अडकावे, अशीच रचना केलेली असते. ज्या कारणासाठी असा पशू सवकलेला असतो किंवा हव्यासाने खुळावलेला असतो, तेच त्या सापळ्यात लावलेले आमिष असते. म्हणजे उंदिर असेल तर त्याला आवडणारे तेलकट वा तत्सम पदार्थ पिंजर्यात ठेवले जातात आणि असे ठेवले जातात, की त्याने त्या पदार्थाला तोंड लावले तरी तितक्या धक्क्याने पिंजर्याचे दार आपोआप बंद होऊन उंदिर त्यात फ़सतो. बिबळ्या वा तत्सम जंगली श्वापदांची कहाणी वेगळी नसते. पिंजर्यात एक कप्पा असा असतो जिथे बकरी-शेळी बंद असते आणि दुसरा कप्पा एका बाजूने खुला असतो. जाळीतून दिसणार्या शेळीकडे खाद्य म्हणून असे श्वापद ओढले जाते आणि तीन बाजूंनी त्याला सावज दिसत असले तरी त्या तिन्ही बाजू सुरक्षित असतात. चौथी बाजू म्हणजे पिंजर्याचा दुसरा कप्पा असतो त्यातून शेळीपर्यंत पोहोचण्याच्या मोहात श्वापद सापडले, की पिंजर्याचे दार आपोआप बंद होते. उत्तरप्रदेशात भाजपाचे प्रभारी म्हणून पाठवण्यात आलेले अमित शहा हा केवळ उत्तम संघटक नेता नाही. तो नरेंद्र मोदींचा एक असाच सापळा आहे. मागल्या सहा महिन्यात त्याने देशातील या सर्वात मोठ्या राज्यात भाजपाची मरगळलेली संघटना उभी केली. तिच्यात उत्साह निर्माण केला आणि आता अखेरच्या टप्प्यात तो माणूस वाहिन्यांसह सार्वजनिक क्षेत्रात दिसू लागला. पण तोपर्यंत त्याने उघडपणे काहीही केलेले नव्हते. त्याच्यावर सातत्याने आरोप होत असतानाही त्याने खुलासे देत बसण्यात वेळ दवडला नव्हता. असा माणूस अचानक एका वादग्रस्त विधानातून विरोधकांच्या जाळ्यात अडकतो, हे नवल नाही काय?
आपल्या तोंडून एखादा शब्द वादग्रस्त बाहेर पडावा आणि आपल्याला सापळ्यात अडकवता यावे, यासाठी माध्यमांपासून सर्वच क्षेत्रातले सेक्युलर टपून बसले आहेत, याची अमित शहाला पुरेपुर खात्री होती. पण तसे काहीही घडू नये, याची त्यांनी कटाक्षाने काळजी घेतली होती. पण आता मतदानाला अवघे तीनचार आठवडे शिल्लक असताना त्यांनी मुझफ़्फ़रपुर येथे एक वादग्रस्त विधान केले आणि अपेक्षित सापळ्यात विरोधकांनी त्यांना अडकवले आहे. ‘अपमानाचा सूड घेण्याची मतदान ही संधी’ असल्याचे विधान त्यांनी केले आणि त्यावर काहूर माजले. आता तर त्यांच्या विरोधात दोन एफ़ आय आर दाखल झाले आहेत. अनेक पक्षांनी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. कदाचित आज वा उद्या त्याला अटकही होईल. पण एकुण कारभार बघता इरफ़ान मसूदप्रमाणे शहा यांनाही जामीन मिळू शकतो. म्हणजेच अटक वा गुन्हा नोंदणीमुळे त्यांच्या कामात कुठला अडथळा निर्माण होऊ शकणार नाही. पण अटकेनंतर जामीन घेण्यास शहा यांनी जाणिवपुर्वक विलंब केला आणि मोक्याच्या कालखंडात चार दिवस गजाआड बसायचा डाव खेळला तर काय होईल? त्यांचे तमाम विरोधक तेच विधान आणि त्यातून व्यक्त होणार्या धार्मिक विभाजनाचा व धार्मिक निष्ठांचा अतोनात उहापोह करतील. म्हणजेच शहा किंवा मोदींनी हिंदू-मुस्लिम असा एकही शब्द तोंडाने न उच्चारता तसा गवगवा माध्यमातून होत राहिल. उत्तरप्रदेश व बिहार राज्यात अशीच धार्मिक विभागणी व्हायला, ह्याच पद्धतीने चर्चा व गवगवा होण्याची गरज आहे. पण ती भाषा वा शब्दांचा वापर भाजपाने केल्यास गुन्हा ठरेल. पण त्याच संदर्भात त्यांच्यावर इतरांकडून आरोप होत राहिले, तर त्यासाठी मोदी, शहा किंवा भाजपाला कोणी जबाबदार धरू शकणार नाही.
हाच तर सापळा आहे. ज्या विषयाची चर्चा व्हावी अशी शहा-भाजपा यांची इच्छा नव्हेतर गरज आहे, त्याची वाच्यता आपल्या विरोधकांकडून करून ध्यायची आणि त्याचे बालंट आपल्यावर येऊ द्यायचे नाही. अशी चर्चा झाली तर त्याचा गल्लीबोळ व खेड्यापाड्यापर्यंत गदारोळ करण्यासाठी आवश्यक तितकी हिंदू मानसिकता आज शहा यांनी सज्ज केलेली आहे. कार्यकर्त्यांची फ़ौज सज्ज केलेली आहे. पण ती भावनात्मक दृष्टीने कामाला लागायची, तर भावना पेटली पाहिजे किंवा दुखावली पाहिजे. ते काम शहा यांच्या अटकेतून होऊ शकते. शहा गजाआड जाऊन पडले, तर होऊ शकते. कारण त्यांनी केलेले विधान कसेही बघितले तरी कायद्याच्या कसोटीवर गुन्हा ठरणार नाही. पण विरोधक शहा-मोदींना गोत्यात आणण्य़ासाठी त्याचे भांडवल करणार. शहांना अटक होऊन या देशात हिंदूंची गळचेपी होते, अशा भावनेला खतपाणी घातले जाणार आणि त्याचा परिणाम मतांच्या धृवीकरणात होणार. मात्र त्यासाठीची सगळीच मेहनत सेक्युलर पक्ष व माध्यमांकडून होणार. पुन्हा तोटा त्याच सेक्युलर लोकांचा. कारण अशा धृवीकरणातून लाभ भाजपाचा होणार. पण जेव्हा आरोपावर खटला होईल, तेव्हा त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. म्हणजेच जो नुकसान करायला जाणार त्याचेच नुकसान होऊन शहा व भाजपा यांचा लाभ. म्हणूनच तो सापळा आहे. अशा विधानात मोदी व भाजपाला गुंतवायला टपून बसलेल्यांसाठी लावलेला हा सापळा आहे. त्यात सगळे सेक्युलर छानपैकी फ़सले आहेत. गंमत अशी आहे, की मागल्या दहा वर्षापासून मोदींना पराभूत करण्याचा चंग बांधलेल्यांना मोदी काय चीज आहे ते जाणून घेण्य़ाची कधीच गरज वाटली नाही आणि म्हणूनच मोदी आपल्या विरोधकांचा अत्यंत धुर्तपणे वापर करून प्रत्येक लढाई जिंकत आले. शहा यांचे ताजे वादग्रस्त विधान त्यापैकीच एक सापळा आहे. पाच आठ्वड्यात त्याचे परिणाम समोर येतीलच.
No comments:
Post a Comment